29 November 2015

आवळा लोणचे (Indian. Gooseberry Pickle)

No comments :

या मोठ्या आवळ्यांना 'डोंगरी आवळा' सुध्दा म्हणतात. आवळा हे तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे फळ आहे. व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहीले जाते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. शिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बियासुद्धा औषधी गुणांच्या असतात. अशा या गुणी आवळ्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, आवळकाठी, सुपारी , सरबत इत्यादी अनेक पदार्थ केले जातात. सिझनमधे जितका जास्त खाता येईल तेवढा निरनिराळ्या प्रकारानी खाऊन घ्यावा. आज मी ताजे-ताजे लगेच खाता येण्यासारखे लोणचे केले.कसे पहा.

साहीत्य :-

* आवळे मध्यम आकाराचे 8-10 नग
   (250 ग्रॅम)
* मोहरी डाळ 2 टेस्पून
* मेथी दाणे पाव टीस्पून
* हळद अर्धा टीस्पून
* लाल मिरची पूड अर्धा टीस्पून
* मीठ 6 टीस्पून किवा चवीनुसार
* हिंग पाव टीस्पून
* मोहरी अर्धा टीस्पून
* तेल 2-3 टेस्पून
* पाणी अर्धी वाटी

कृती --

प्रथम आवळे धुवून-पुसून साधारण चपट्या अर्ध चंद्राकृती फोडी कराव्यात. मीठ, हळद व मिरची पूड घालून एका बाऊलमधे ठेवा.

आता मोहरीडाळ मिक्सरवर बारीक करा व त्यातच  पाणी घाला. नाकाला झिणझिण्या येईपर्यत (अंदाजे पांच मि.) घुसळावे व चिरलेल्या फोडीवर घालावी. मेथीदाणेपण तेलात तळून बारीक पूड करून घाला. सर्व व्यवस्थित कालवावे.

नंतर लहान कढल्यात तेल गरम करून हिंग, मोहरीची खमंग फोडणी करावी व थंड करून तयार केलेल्या लोणच्यावर घालावी व परत एकदा नीट हलवावे. लोणचे तयार !

ताजे-ताजे थोडे आंबट, थोडे तूरट चवीचे करकरीत लोणचे जेवणाची लज्जत वाढवते. तोंडाची रूची वाढवते. व हे लोणचे करकरीत खाण्यातच मजा येते

टीप : हे लोणचे फ्रीजमधे ठेवून खाल्यास आठ ते दहा दिवस टिकते. बाहेर फोडी मऊ पडतात व रंगही काळवंडतो. चवीत फरक पडत नाही.

तसेच जर जास्त प्रमाणात आवळे असतील  व बर्षभरासाठी करायचे असेल तर फक्त पाणी घालू नये.बाकी सर्व कृती सारखीच.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment