29 June 2018

क्रिस्पी ओनियन रिंग्स (Crispy Onion Rings)

No comments :

खमंग कांही खावे वाटले किंवा बाहेर पाऊस पडायला लागला की आपल्याला हमखास कांदा भजीची आठवण येते. तर याच पारंपारिक कांदभजी प्रकारातील पण थोडासा वेगळा ओनियन रिंग्स हा पदार्थ आहे.  करायला एकदम सोपा व खायला खमंग असा आहे.  तर कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मोठे कांदा १
* मैदा १ वाटी
* काँर्नफ्लोअर १ टेस्पून
* ताक १ वाटी
* मीठ चवीनुसार
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* हींग चिमूटभर
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* काळी मिरी भरड अर्धा टीस्पून
* सोडा चिमूटभर
* तेल तळण्यासाठी गरजेनुसार
* चाट मसाला वरून घालण्यासाठी

कृती :-
प्रथम कांदा साल काढून गोल आकाराच्या व साधारण पाव इंच रूंद चकत्या कापून घ्यायच्या.  नंतर फोटोत दाखविल्या प्रमाणे त्याच्या एक -एक रिंग ⭕ हाताने सुट्या कराव्यात.

आता त्या रिंग्जवर थोडासा मैदा व चिमुटभर काँर्नफ्लोअर घालून हाताने सर्व रिंग्जना चोळून घ्यावे.

नंतर एका भांङ्यामधे मैदा व काँर्नफ्लोअर एकत्र घेऊन त्यामधे वरील सर्व मसाला मिसळावा. तसेच ताकही एकदम न घालता थोडे थोडे घालून कालवावे. गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्यावी व बँटर तयार करावे.

शेवटी कांद्याच्या एकेक रिंग घेऊन तयार बँटरमधे बुडवून गरम तेलामधे तांबूस तळून काढाव्यात.

तयार ओनियन रिंग्ज एका डिशमधे घेऊन वरून चाटमसाला भुरभुरावा.  मस्त कुरकुूरीत ओनियन रिंग्ज तयार.

टिप्स :
* या रिंग्ज पीठात बुडवून नंतर ब्रेडक्रम्स मधे घोळवून तळले तर अधिक कुरकुरीत होतात.
* पीठामधे आवडीनुसार आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी.
* गरम असतानाच खावीत. थंड झाले की त्याचा क्रिस्पीनेस कमी होतो.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.