26 January 2017

तिरंगा सैंडविच (Tiranga Sandwich)

No comments :

सर्वांच्या परिचयाचा नाष्ट्याचा, टीफीनचा झटपट होणारा एक पदार्थ म्हणजे "सैंडविच ". त्यामधे आपण आपल्या आवडीनुसार अनेक वेरीएशनस् करू शकतो. मी आज "तिरंगा सैंडविच" केलेय. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
° ब्रेड स्लाइस गरजेनुसार
° गाजर किसून
° टोमँटो पातळ गोल काप करून
° टोमँटो साँस
° बटर
° कोबी किसून
° काकडी पातळ गोल काप करून
° हिरवी चटणी
° चाट मसाला
° मीठ

कृती :-

प्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात. नंतर एका सँडविचला तीन ब्रेड एका ओळीत पसरून ठेवावेत. पहिल्या ब्रेडला हिरवी चटणी लावावी, दुसर्या बटर लावावे व तिसर्याला टोमँटो साँस लावावे.

नंतर पहिल्या हिरवी चटणी लावलेल्या ब्रेडवर कोबी, काकडी ठेवावे. त्यावर चाट मसाला व मीठ भुरभुरावे. त्यावर बटर लावलेला ब्रेड ठेवावा. त्याच्या दुसर्या बाजूला पण बटर लावावे.  त्यावर गाजराचा किस, टोमँटोच्या चकत्या ठेवाव्यात व त्यावर मीठ, चाट मसाला भुरभूरावे.

शेवटी साँस लावलेला ब्रेड त्यावर पालथा ठेवावा व हाताने किंचित दाब द्यावा. तयार सैंडविच धारदार चाकूने मधून तिरपे कापावे व खायला द्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 January 2017

गाजर-मटार कटलेट (Carrot -Matar Cutlet)

No comments :

कटलेट,टिक्की, पँटीस असे चटपटीत प्रकार संध्याकाळच्या हलक्या नाष्ट्याला नेहमीच पसंद केले जातात. करायला तसे सुटसुटीत व कमी साहित्य असते. तर आज "गाजर-मटार कटलेट" कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
° ताजे मटार २ वाट्या
° बटाटे २
° गाजर २
° पातळ पोहे अर्धी वाटी
“ रवा किंवा ब्रेडक्रम्स गरजेनुसार
° आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
° कोथिंबिर
° धना-जीरा पावडर १ टीस्पून
° चाट मसाला १ टीस्पून
° आमचूर पावडर अर्धा टीस्पून
° हळद पूड
° मीठ चविनूसार
° तेल

कृती :-

प्रथम बटाटे उकडून, मँश करून घ्यावेत. गाजर साल काढून किसून घ्यावेत.

नंतर त्यामधे वरील सर्व मसाला व पातळ पोहे मिसळावे व हाताने चांगले एकजीव करावे.

आता तयार मिश्रणाचे आपल्याला आवडतील त्या आकारात लहान -लहान चपटे गोळे करावेत व रव्यामधे घोळवून तेलामध्ये तळावेत.

तयार कटलेट साँस किंवा चटणीसोबत खा!

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

21 January 2017

टोमँटो राईस (Tomato Rice)

No comments :

"टोमँटो राईस"  हा भाताचा एक उत्तम, सात्विक व पौष्टीक प्रकार आहे. नेहमी नेहमी टोमँटोचे सूप,सार,कोशिंबिर खाण्यापेक्षा अशा प्रकारे भात करूनपण टोमँटो खाता येतो.करायला सोपा व सुटसूटीत प्रकार आहे. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
° बासमती तांदुळ २ वाट्या
° लाल टोमॅटो २ -३ मध्यम
° कांदा १
° आल-लसूण पेस्ट १ टीस्पून
° हिरवी मिरची २-४
° टोमँटो साँस २ टेस्पून
° धना-जीरा पावडर २ टीस्पून
° मीठ चविनुसार
° लाल मिरचीपूड १ टीस्पून
° तेल २ टेस्पून
° जीरे
° कोथिंबिर बारीक चिरून

कृती :-

प्रथम मोकळा भात शिजवून घेऊन ताटात गार होण्यासाठी पसरून एका बाजूला ठेऊन द्यावा.

आता कांदा व टोमँटो ची वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी.

नंतर तेल गरम करून जीरे फोडणीत घालावे.त्यावर आल-लसूण पेस्ट, पाठोपाठ हिरवी मिरची व कांदा घालून परतावे. कांदा परतून तेल सुटायला लागले की टोमँटो प्यूरी घालावी. सर्व नीट परतावे.

आता त्यात लाल मिरची पावडर, धणे-जीरे पावडर. मीठ घालावे. कोथिंबिर व टोमँटो साँसही आताच घालावे. शेवटी शिजवलेला भात घालावा व व्यवस्थित एकत्र करून परतावे. झाकून एक वाफ काढा.

मस्त गरमा-गरम लालसर रंगाचा "टोमँटो राईस" तयार.

टिप्स :- यामधे आवडीनुसार मटार, शिमला मिरची पण वापरली जाते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 January 2017

आचारी पराठा (Achari Paratha)

No comments :

"आचारी पराठा " हा काय प्रकार? एकदम सरळ आहे. आचार म्हणजे "लोणचे " लोणच्याचा पराठा. तर काय होते, बरेचवेळा अंब्याचे लोणचे जुने झाले की, बरणीत तसेच पडून रहाते, कोणालाच नको असते. नंतर हळू-हळू नविन अंब्याचा सिझन येतो व या जुन्या लोणच्याचे करावे तरी काय? हा प्रश्न गृहीणींसमोर असतो. तेव्हा त्याचे असे पराठे करून टाका. मुलांना डब्यात द्यायलापण सोयीचे व नाष्ट्यालाही छान लागतात. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* अंब्याचे लोणचे बिना कोयीचे
* गव्हाचे पीठ
* लाल मिरचीपूड
* हळद,हिंग
* ओवा
* तेल
* मीठ

कृती :-

प्रथम लोणचे मिक्सरमधे लहान भांड्यात घालून फिरवून घ्यावे व सरसरीत लोणचे बाऊलमधे काढावे. त्यामधे सैलपणा येण्यासाठी गरजेनुसार थोडे कच्चेच तेल घालून एकसंध करावे. व बाजूला ठेवून द्यावे.

आता गव्हाचे पीठ घेऊन त्यामधे तिखट,मीठ, हळद, ओवा सर्व घालून पाण्याने नेहमीच्या कणकेप्रमाणे मळावे.

नंतर नेहमीच्या घडीच्या पोळीप्रमाणे लहान गोळी लाटून त्यावर चमच्याने तयार मसाला थोडा पसरावा व घडी घालून जाडसर पोळी लाटावी. दोन्ही बाजूनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावी.

तयार गरमा-गरम खमंग, खुसखूषीत असे पराठे तूप/लोणी लावून खावेत.

11 January 2017

ओल्या हळदीचे दूध ( Turmeric Golden Milk)

No comments :

"हळद" ही अत्यंत औषधी व गुणकारी आहे.सर्दी, कफ झाले असेल तर "हळदीचे दूध" त्यावर रामबाण उपाय आहे. घशातील खवखव थांबते. तसेच आयुर्वेदात हळदीला खूप महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.अजूनही हळदीचे खूप फायदे आहेत. रक्तशुध्दी होते, निद्रानाशापासून आराम मिळतो.,श्वसन विकारांवर उपयोगी आहे.त्वचेवर चमक येते. रंग उजळतो. तसेच दूधात कँल्शियम भरपूर असते. त्यामुळे हळद घालून दूध प्यायल्याने  दुहेरी फायदा होतो. थंडीच्या दिवसात हळदीचे दूध अवश्य प्यावे. अनेक फाबयदे होतात. कसे तयार करायचे, साहित्य व कृती 👇 👇

साहित्य :-
* दूध अर्धा लिटर
* ओली हळद २ इंच
* वेलची पावङर १/२ टीस्पून
* लवंगा २
* दालचिनी पावडर १/२ टीस्पून
* मध २ टेस्पून
* खडीसाखर १ टेस्पून (ऐच्छीक)

कृती :-
प्रथम दूध गरम होण्यास ठेवावे. दूध गरम झाले की, त्यामधे हळदीचे खोड चेचून अथवा किसून घालावे. पाठोपाठ लवंगा टाकाव्यात. तसेच वेलची पावडर, थोडी दालचिनी पावडर घालावी व दूध पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. गोड हवे असेल तर आताच खडीसाखर घालावी.

आता चांगले उकळलेले दूध ग्लासमघे गाळणीने गाळून ओतावे. वरून मध घालावा व थोडी दालचिनी पावडर भुरभुरावी. गरम-गरम दूध प्यावे.

औषधी व गुणकारी असे "हळदी दूध" थंडीमघे आवर्जून प्यावे. तुम्हीही जरूर करून बघा. नक्की आवडेल.

टिप:- ओली हळद नसेल तर १/२ टीस्पून हळद पावडर वापरावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 January 2017

मटार-पनीर सब्जी (Matar-Paneer subji)

No comments :

घरामधे मटार व पनीर असले की भाज्यांचे विविध प्रकार करता येतात.जसे की, पनीर मसाला,मटर मसाला, मटर-पनीर मसाला, मटरची उसळ, पनीर भुर्जी,पनीर पकोड़े एक का दोन असंख्य पदार्थ होतात व चविष्ट होतात. त्षातलाच एक आज एक मटार-पनीर हा पदार्थ केला. साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* मटार २ वाट्या
* पनीर २०० ग्रँम
* टोमँटो २
* कांदा १
* काजू ७ -८
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* मीठ चवीनुसार
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* आमचूर पावडर गरज वाटल्यास
* साखर चिमूटभर
* जीरे, हिंग, हळद
* लाल मिरचीपूड
* तेल २ टेस्पून
* कोथिंबिर

कृती :-

प्रथम कांदा, टोमँटो व काजूची वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी. पनीर शॅलो फ्राय करून घ्यावे.

नंतर पँनमधे तेल गरम करून त्यामधे जीरे, हिंग व हळद घालून फोडणी करून घ्यावी. फोडणीमधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घालून थोडे परतावे. नंतर कांद्याची पेस्ट घालून परतावे. अगदी तेल सुटेपर्यंत गुलाबी रंगावर परतावे. शेवटी टोमँटो व काजूची पेस्ट घालावी.

तयार ग्रेवीमधे गरम मसाला,मीठ, साखर, लाल मिरचीपूड, आमचूर पावडर, धना-जिरा पावडर सर्व मसाला घालून परतावे. गरज वाटली तर थोडेसे पाणी घालावे व ग्रेवी थोडी शिजू द्यावी.

शेवटी तयार ग्रेवीमधे मटार व शॅलो फ्राय केलेले पनीर घालावे. सर्व व्यवस्थित हलवून पांच मिनिट झाकून शिजवावे.

आता तयार "मटार पनीर सब्जी" बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर पेरावी व वाढण्यास घ्यावी.विशेष करून गरम फुलक्यासोबत ही भाजी खूप चवदार लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

ब्रेड डोसा ( Bread Dosa )

No comments :

डोसा करायचा म्हणजे बरीच वेळखाऊ प्रक्रिया. डाळ तांदुळ ५ -६ तास भिजवणे,वाटणे,आंबवणे मग डोसा खायला मिळणार. तर कधी खायची इच्छा झाली व लगेच झटपट खायला मिळावा वाटले तर असा ब्रेडडोसा करून बघा. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ब्रेड स्लाइस कडा काढून ८
* रवा १/२ वाटी
* तांदुळाचे पीठ २ टेस्पून
* दही पाव वाटी
* पाणी गरजेनुसार
* मीठ चवीनुसार

कृती :-
प्रथम ब्रेड कुस्करून त्यामधे सर्व साहित्य घालावे व अर्धा तास झाकून ठेवावे.
नंतर मिक्सरमधे फिरवून काढावे. गरज वाटली तर पाणी घालावे व नेहमीच्या डोसा बँटर प्रमाणे बँटर तयार करावे.

नंतर तवा गरम करून तव्यावर वाटीने पीठ पसरून, कडेने तेल सोडून नेहमीप्रमाणे डोसे काढावेत.

तयार डोसे हिरव्या चटणी सोबत खायला द्यावेत.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

08 January 2017

कन्डेंस्ड मिल्क (Condensed Milk)

No comments :

"कन्डेंस्ड मिल्क" हे केक,निरनिराळ्या खीरी, हलवा, मिठाई बर्फी तसेच फ्रूट सँलड करताना उपयोगात आणले जाते. "कन्डेंस्ड मिल्क" पदार्थात वापरले तर वेगळी साखर किंवा खवा वापरण्याची गरज उरत नाही व पदार्थ झटपट बनतो. बाजारात "नेसले मिल्कमेड " "अमूल मिठाईमेड" हे  कन्डेंस्ड मिल्क सहज उपलब्ध आहेत. पण एखाद्या ऐन गरजेवेळी नाही मिळाले किवा दुकानात जाणे शक्य नसते अशावेळी आपण घरच्या-घरीच बनविले तर? अगदी साधी,सोपी व कमी साहित्यातील कृती आहे. तर हे "होममेड कन्डेंस्ड मिल्क" कसे करायचे साहित्य व कृती 👇

साहित्य :-
° गाईचे दूध १/२ लिटर
° साखर १/२ कप
° चिमुटभर खाण्याचा सोडा

कृती :-

प्रथम एका जाङ बुङाच्या पातेल्यात दूध तापविण्यास ठेवावे.

तापून वर आले की, त्यामधे साखर घालावी. पळीने हलवत रहा. साखर विरघळून दूध उकळू लागले की चिमूटभर सोङा घालावा व दूध सतत ढवळत रहावे. दूध उकळून साधारणपणे एकूण दूधाच्या १/३ दूध झाले पाहीजे.

दूध आटत आले की,मधे-मधे बशीत थेंब टाकून पहावा. साधारण चिकट व साखरेच्या एकतारी पाकाप्रमाणे बोटाला लागला तर आपले कन्डेंस्ड मिल्क" तयार झाले. थंड करून काचेच्या हवाबंद बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावे. गरज पडेल तेव्हा वापरा.

रोजची घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे घेऊन त्याचे मोठे चौकोनी तुकडे करा व वरून हे होममेड तयार मिल्कमेड चमचाभर घालून मुलांना डिशमधे घालून काटा चमच्याने खायला द्या.खूप सुंदर लागते व मुलं फळे आवडीने खातात.

टिप :- दूध उकळत असताना पळीने तळापासून सतत हलवत रहावे. दूध खाली लागले तर  करपट वास येतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

05 January 2017

झटपट पावभाजी (Pavbhaji)

No comments :

पावभाजी हा स्नँक्सचा पदार्थ सर्वाना परिचयाचा आहे. भाज्या असल्याने पौष्टीक आहे. ज्या भाज्या इतरवेळी नुसत्या केल्या तर मुलं खात नाहीत त्या यात लपवून घालता येतात. किंवा आठवड्याच्या शेवटी फ्रिज स्वच्छ करायचा असेल तर, उरलेल्या सर्व थोड्या थोड्या भाज्या घेऊन त्यात बटाटा घालून भाजी करता येते. सर्वसाधारणपणे पावभाजी करताना आपण आधी भाज्या चिरून व शिजवून घेतो. नंतर फोडणी करून मसाला वगेरे साहित्य घालून शिजवतो. पण लहान प्रमाणात व झटपट करायची असेल तर कशी करायची पहा साहित्य व कृती 👇 👇

साहित्य :-
* फ्लाॅवर, शिमला,कोबी,बीन्स,गाजर, बीटरूट,भोपळा, मटार यापैकी उपलब्ध असतील त्या भाज्या, आवडेल त्या प्रमाणात 
* बटाटे ४ नग
* लाल टोमँटो २
* कांदे २ + २
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* पावभाजी मसाला गरजेनुसार
* लालमिरची पावडर
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* तेल २ टेस्पून
* बटर आवडीनुसार वर घालण्यासाठी
* कोथिंबिर, लिंबू

कृती :-
प्रथम सर्व भाज्या, टोमँटो, कांदा, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.

नंतर कुकरमधे तेल घालून त्यावर कांदा,आले-लसूण, मिरची पेस्ट नंतर टोमँटो घालून परतावे.आताच हळद,लाल तिखट व मसाला घालावा. शेवटी सर्व भाज्या, बटाटे घालाव्यात. त्यावर मीठ,साखर घालावे. थोडे परतून पाणी घाला व झाकण लावून ३शिट्टया काढाव्यात.

कुकरची वाफ जिरल्यानंतर उघडून त्यातच भाज्या मँश कराव्यात अथवा ब्लेडरने घुसळाव्यात व थोडे पाणी घालून बारीक गँसवर  रटरटत ठेवून द्या.  दुसर्या गँसवर पँनमधे बटरवर पाव भाजावा.

शेवटी गरमा-गरम भाजी वरून बटर, कांदा,कोथिंबिर घालून, लिंबूची फोड ठेवून भाजलेल्या पावासोबत खायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.