Showing posts with label kheer. Show all posts
Showing posts with label kheer. Show all posts

21 April 2018

मँगो फिरनी (Mango Firani)

No comments :

साधारण ख्रीरीसारखाच हा पदार्थ आहे. आजकालच्या पध्दतीनुसार डेजर्ट म्हणून थंड स्वरूपात खाल्ला जातो. मात्र आमच्याकडे गरम व खीर म्हणून जेवणात पोळीसोबत खायला आवडते. आपल्या आवडीनुसार कसेही खावे. आहे मात्र झकास पदार्थ. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बासमती तांदुळ १/४ कप
* दूध अर्धा लिटर
* मँगो पल्प २ आंब्याचा
* साखर अर्धा कप (आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ
* काजू, बदाम काप

कृती :-
प्रथम दूध एका पातेल्यात गरम करण्यास ठेवावे. दूध उकळू लागल्यावर मधे मधे ढवळत रहावे.

दूध उकळून थोडे घट्ट होईपर्यंत दोन आंब्याचा गर काढून ब्लेडरने घुसळून तयार करावा. तसेच तांदुळ धुवून, तूपावर थोडे परतून मिक्सरमधे  भरड वाटून घ्यावेत.

आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल त्यामधे वाटलेले भरड तांदुळ घालून पांच मिनिट उकळू द्यावे. शिजले की त्यामधे साखर, वेलचीपूङ घालून गँस बंद करावा.  पांच मिनिटानंतर तयार केलेला मँगो पल्प घालावा व एकत्र ढवळावे. शेवटी वरून काजू, बदाम चे काप घालावेत. मँगो फिरनी तयार!

आवडीनुसार थंड अथवा गरम खा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

26 June 2017

शीर खुरमा (Shir Korma)

No comments :

शीर म्हणजे दूध व खुरमा म्हणजे सर्व सुका मेवा. रमजान ईद दिवशी आपल्या मुस्लिम बांंधवांच्या घरी हमखास केला जाताे व सर्व मित्र मंडळी, नातेवाईकां सोबत खाल्ला जातो. तर असा पौष्टीक व गोड "शीरखुरमा " चे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* दूध १ लिटर
* शेवया १ वाटी
* काजू, बदाम, चारोळी, बेदाणे, अंजीर सर्व मिळून २ वाट्या.
* साखर १ वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १/२ वाटी
* वेलचीपूङ
* केशर

कृती:-
प्रथम पँन मधे तूप गरम करून सर्व सुका मेवा तुकडे करून, तांबूस परतावा. तोपर्यंत दुसरिकडे दूध उकळत ठेवावे.

सुका मेवा भाजून झाला की त्याच राहीलेल्या तूपावर शेवया तांबूस परतून घ्या.

आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल. त्यात भाजलेल्या शेवया व सुकामेवा, केशर, वेलची घालावे . पांच मिनिट उकळू द्यावे.पाच मिनिटानी गँस बंद करावा.

शेवटी गँस बंद केल्यावर साखर घालावी व ढवळावे. गरम असल्याने साखर विरघळते.

आता गरमा-गरम शीर खुरमा सर्वासोबत फस्त करावा.

टीप :-  सुक्या मेव्यातील पिस्ता भाजून वेगळा ठेवावा व ऐनवेळी सर्व्ह करताना घालावा. कारण पिस्ता टिकण्यासाठी खारवतात व त्यातील मीठामुंंळे शीर खुरमा फाटतो.

आपल्या आवडीनुसार सुकामेवा घ्यावा. यात खजूर, खारीक पण घालतात. मी नाही घेतले.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

11 February 2017

लाल भोपळ्याची रबडी (Pumpkin Rabadi)

No comments :

"लाल भोपळ्याची रबडी " झटपट होणारा व  पौष्टीक असा गोड पदार्थ आहे. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* लाल भोपळा पाव किलो
* दूध १ लिटर
* साखर अर्धी वाटी
* वेलचीपूङ
* बदाम सजावटीला
* तूप १ टेस्पून

कृती :-
प्रथम भोपळा साल काढून मोठ्या फोडी चिरून घ्याव्यात व प्रेशर कुकर मधे वाफवून घ्याव्यात.

आता भोपळा शिजेपर्यंत दूध उकळवायला ठेवावे.

नंतर वाफवलेल्या फोडी मँशरने मँश करून घ्याव्यात. थोड्या तूपावर मँश केलेला भोपळा पांच मिनिट परतावा.

आता परतलेला भोपळा आधिच उकळत असलेल्या दूधामधे घालावा. पांच मिनिट उकळवावे.

शेवटी साखर व वेलचीपूड घालावी. व्यवस्थित ढवळावे. साखर विरघळली की, गँस बंद करावा.

गरमा-गरम रबङी वरून बदाम बी ची सजावट करून खायला द्यावी.

टिप :- साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

08 January 2017

कन्डेंस्ड मिल्क (Condensed Milk)

No comments :

"कन्डेंस्ड मिल्क" हे केक,निरनिराळ्या खीरी, हलवा, मिठाई बर्फी तसेच फ्रूट सँलड करताना उपयोगात आणले जाते. "कन्डेंस्ड मिल्क" पदार्थात वापरले तर वेगळी साखर किंवा खवा वापरण्याची गरज उरत नाही व पदार्थ झटपट बनतो. बाजारात "नेसले मिल्कमेड " "अमूल मिठाईमेड" हे  कन्डेंस्ड मिल्क सहज उपलब्ध आहेत. पण एखाद्या ऐन गरजेवेळी नाही मिळाले किवा दुकानात जाणे शक्य नसते अशावेळी आपण घरच्या-घरीच बनविले तर? अगदी साधी,सोपी व कमी साहित्यातील कृती आहे. तर हे "होममेड कन्डेंस्ड मिल्क" कसे करायचे साहित्य व कृती 👇

साहित्य :-
° गाईचे दूध १/२ लिटर
° साखर १/२ कप
° चिमुटभर खाण्याचा सोडा

कृती :-

प्रथम एका जाङ बुङाच्या पातेल्यात दूध तापविण्यास ठेवावे.

तापून वर आले की, त्यामधे साखर घालावी. पळीने हलवत रहा. साखर विरघळून दूध उकळू लागले की चिमूटभर सोङा घालावा व दूध सतत ढवळत रहावे. दूध उकळून साधारणपणे एकूण दूधाच्या १/३ दूध झाले पाहीजे.

दूध आटत आले की,मधे-मधे बशीत थेंब टाकून पहावा. साधारण चिकट व साखरेच्या एकतारी पाकाप्रमाणे बोटाला लागला तर आपले कन्डेंस्ड मिल्क" तयार झाले. थंड करून काचेच्या हवाबंद बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावे. गरज पडेल तेव्हा वापरा.

रोजची घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे घेऊन त्याचे मोठे चौकोनी तुकडे करा व वरून हे होममेड तयार मिल्कमेड चमचाभर घालून मुलांना डिशमधे घालून काटा चमच्याने खायला द्या.खूप सुंदर लागते व मुलं फळे आवडीने खातात.

टिप :- दूध उकळत असताना पळीने तळापासून सतत हलवत रहावे. दूध खाली लागले तर  करपट वास येतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 September 2016

अंगूर बासुंदी (Angoor Basundi)

No comments :

अंगूर बासुंदी हा पदार्थ जेवणात पुरी, पोळीला लावून खाण्यापेक्षा जेवण झाल्यावर खायला मला खूप आवडतो. माफक गोड व थंड असावा खूपच मस्त लागतो.कसा केला साहित्य व कृती,

साहित्य :-
* दूध १/२ लिटर
* साखर २ वाट्या
* पाणी ४ वाट्या
* लिंबू अर्धा
बासुंदी साठी
* दूध १लिटर
* साखर १/२ वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* वेलची पावङर
* ड्रायफ्रूट्स
* केशर

कृती :-

प्रथम दूध गरम करायला ठेवावे. तापून उकळी आली की, त्यामध्ये लिंबू रस घालावा व सतत ढवळत रहावे. दूध फाटून पाणी वेगळे होईल. आता गँस बंद करा.

आता गाळणीवर स्वच्छ तलम कपडा पसरवा व त्यावर फाटलेले दूध ओतावे. वरून गार पाणी घालावे, म्हणजे थंडही होईल व लिंबाचा आंबटपणाही पनीरला येणार नाही. आता पनीर पूर्ण पाणी निघून जाण्याकरता पुरचुंडी करून कपडा घट्ट पिळावा व टांगून अथवा वजनाखाली ठेवावा.

आता दुसरे एक लिटर दूध बारीक गँसवर उकळत ठेवा. सतत ढवळत रहावे.म्हणजे खाली करपणार नाही. किमान २५ टक्के आटवून घ्षावे.

नंतर त्यामधे साखर, वेलचीपूङ, केशर घालावे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.

आता कपड्यातून पनीर काढून घ्यावे व भरपूर मळावे. किमान १५-२० मिनिट मळावे. हाताला तूप सुटून लागले पाहीजे.

मळून होईपर्यंत साखरेत पाणी घालून गँसवर ठेवावे. साखर विरघळून उकळू लागले की, नंतर मळलेल्या पनीरचे लहान -लहान द्राक्षाइतक्या आकाराच्या गोळ्या करून त्यामधे सोडा. २० मिनिट मोठ्या आचेवर गोळ्या शिजू द्या. शिजून, फुलून आकार वाटलेला दिसेल.गँस बंद करावा.

आता आधि तयार करून ठेवलेल्या बासुंदी मधे तयार पनीरचे गोळ्या पाकातून काढून सोडा वरून ड्रायफ्रूट्स घाला. अंगूर बासुंदी तयार.

आवडीनुसार तयार अंगूर बासुंदी फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवून द्यावी व जेवणाच्या वेळी थंडगार "अंगूर बासुंदी" वाढावी.

टिप :- 

* दूध होल मिल्क वापरावे. पनीर छान मलईयुक्त व मऊ होते.

* पनीर मळण्यामधे तडजोड नको. जितके जास्त मळाल तितके अंगूर (गोळे)  मऊ व स्पाँजी बनतात अथवा टणक रहातात.

* दूधाला घट्टपणाा येण्यासाठी दोन टेस्पून मिल्कपावङर पाण्यात अथवा दूधात कालवून मिसळली तरी चालते.

* बासुंदी तयार करण्याचा वेळ वाचण्यासाठी दूधाऐवजी मिल्कमेड वापरले तरी चालते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 September 2015

शेवयाची खीर ( Sevai Kheer )

No comments :

शेवयाची खीर सर्वाच्याच परिचयाची आहे. ऐत्यावेळी कोण पाहुणा आला किवा नैवेद्याला पट्कन आपण करतो. पण त्यातसुध्दा प्रत्येकाची करण्याची पध्दत निरनिराळी असते. तसेच बरेचवेळा कोणाची पातळ ,अगदी शेवया तळाला व दुध वर असे होते. तर कधी उकडलेल्या शेवयाच जास्त, दूध कमी.इतके की शेवयाचा शिराच खातोय असे वाटते. पण खीर अशी असावी की, ती जास्त घट्ट नको,जास्त पातळ नको रूबरूबीत असावी. कशी करायची पहा.

साहीत्य :-

* बारीक बिना पाॅलिशच्या शेवया 1/2 वाटी
* दूध 1/2 लिटर
* साखर 1/4 वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* पाणी अर्धी वाटी
* तूप 1टेस्पून
* वेलची पूड
* ड्राय फ्रूट्स ऐच्छीक

कृती :-

प्रथम दूध उकळण्यास एका गॅसवर ठेवून द्या.
तोपर्यंत एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून शेवया चांगल्या तांबूस गुलाबी परतवून घ्या.

नंतर त्यामधे गरम पाणी अर्धी वाटी घाला व शेवया चांगल्या शिजून मऊ होऊ देत.

आता दूध उकळून घट्ट झाले का ते बघा. नसेल तर अजून चांगले उकळून आटू दे.मलईसह राहू दे.मलई काढू नका.

आता हे आटीव दूध आधि शिजवून ठेवलेल्या शेवयांमधे घाला. नंतर शेवयासह पाच मिनिट सर्व उकळू दे.

आता गॅस बंद करून साखर, वेलचीपूड ,ड्रायफ्रूट्स घाला.

खायला देताना वरून लोणकढी तूप टाकून गरम असतानाच द्या. नुसती खा किवा पोळी/पुरी सोबत खा . छानच लागते.

टीप :- घरामधे बरेचवेळा पेढे शिल्लक असतात. असतील तर कोणत्याही खीरीमधे एखादा पेढा चुरडून टाका.अजून छान रुबरुबीतपणा येतो.


25 August 2015

तांदूळाची खीर (Rice kheer)

No comments :

श्रावण महीना म्हणजे सण-वार यांची रेलचेल असते. रोजच नैवेद्यासाठी काही गोड करायचे असते. तसेच बरेच जण श्रावणी धरतात म्हणजे की फक्त संध्याकाळीच जेवतात. तर जेवणात तिखट ,गोड ,खारट आंबट असे सर्वच चवीचे जेवण असेल तर जेवणात मजा येते व पोट पण भरते. तर आज तांदूळाची खीर करुया .काय साहित्य लागते व कशी करायची पहा.

साहित्य :-

१) बासमती तांदूळ अर्धी वाटी
२) साखर अर्धी वाटी
३) दूध अर्धा लिटर
४) लवंगा ४
५) वेलची , सुका मेवा
६) तूप  २ टेस्पुन

कृती :-

    प्रथम तांदूळ तूपामधे लवंगा टाकून त्यावर गुलाबी भाजून घ्या.ते थंड होऊ द्या . तोपर्यंत दूध एका बाजूला आटवत ठेवून द्या .

आता  तांदूळ मिक्सरवर रवाळ वाटून घ्या . नंतर आटवत ठेवलेल्या दूधामधे घाला. थोडे उकळू द्या . तांदूळ बारीक केले असलेने लगेचच शिजतात .

नंतर साखर, सुका मेवा व वेलची पूड घालून गॅस बंद करावा .

पुरी सोबत किंवा पोळी सोबत खाण्यास द्या.

टिप : खीरीसाठी तांदुळ शक्यतो आम्बेमोहोर किंवा बासमतीच वापरा .

आधी भात शिजवुन घेऊन नंतर दूध घालून पण ही खीर केली जाते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 



30 September 2014

तांदळाचे पायसम /खीर (Rice Kheer/ Paysome)

No comments :

साहित्य;-
* बासमती तांदूळ १/४ वाटी
* गूळ ३/४ वाटी
* नारळाचे दूध १ वाटी
* वेलची,जायफळपूड आवडीनुसार
* तूप १ चमचा
* लवंगा ४
* पाणी

कृती;-
प्रथम तूप पॅनमध्ये घालून त्यात लवंगा फोडणी टाकाव्यात. नंतर तांदूळ टाकून थोडे परतावे व गरम पाणी घालून भात चांगला मऊ शिजवून घ्यावा.

आता शिजलेल्या भातामध्ये गूळ ,वेलचीपूड घालावी व चांगले हलवावे.शेवटी नारळाचे दूध घालावे व एक वाफ आणावी.

गरमागरम पायसम (खीर) तयार !

टीप:- तुपावर तांदुळ परतून कुकरमध्ये भात शिजवून घेऊन,नंतर पुढील कृती वरीलप्रमाणे केली तरी चालते. झटपट तयार होते. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


29 September 2014

बिस्किटाची खीर (Biscuit Kheer)

No comments :
साहित्य:-
* पार्ले जी  बिस्किट्स ४ नग
* दूध २ कप 
* खारीक पावडर मोठे २ चमचे
* साखर आवडीप्रमाणे
* ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे

कृती:-
प्रथम दूध एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये उकळत ठेवावे.दुसरीकडे एका बशीमध्ये थोडे दुध घेऊन त्यामध्ये  बिस्किटे भिजत घालावीत.

दुध  चांगले उकळले की ,त्यामध्ये खारीक पावडर घालावी व पाच मिनिट उकळू द्यावे. खारीक पावडर दूधमध्ये उकळून एकजीव झाली की दूध थोडे दाटसार होईल मग त्यात भिजलेल्या बिस्किटाचा लगदा आणि साखर घालावी .शेवटी ड्राय फ्रूइट्स घालावेत .

झटपट गरमागरम खीर तयार ! ही खीर लहान मुलांना जास्त आवडते .
    

29 August 2014

ओल्या खोबर्याची झटपट रबङी/बासूंदी(Coconut Rubdi)

No comments :
ऐनवेळी गोड काय करावे,असा प्रश्न पडला व घरात ओले खोबरे व दूध असेल तर ही झटपट रबडी करून बघा. साहित्य व कृती, 

साहित्य:-
* दूध अर्धा लि.
* नारळाचा चव १ वाटी
* साखर १/२ वाटी
* वेलची पूङ,ङ्राय फ्रूट्स

कृती:-
प्रथम दूध गॅसवर उकळण्यास ठेवावे. आटून थोडे तांबूस रंगाचे झाले की, त्यामधे नारळाचा चव मिक्सरवर वाटून घालावा परत पाच मिनिट उकळू द्यावे.

नंतर गॅस बंद करावा व साखर,वेलचीपूङ ङ्रायफ्रूट्स घालावे.

गरमा-गरम रबङी तयार ! पुरी बरोबर खाण्यास द्यावी.नुसती पण छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

26 August 2014

लापशी रव्याची खीर/ गव्हाची हुग्गी ( Lapashi rawyachi kheer )

No comments :
आपल्याकङे खूपशा कुटूंबामध्ये गणपती अथवा गौरीच्या नैवेद्यासाठी ही खीर करण्याची पध्दत आहे. ऋतुमानानुसार शरिराला आवश्यक असणारे उष्मांक देणारी अशी ही पौष्टीक खीर आहे.

साहीत्य :-

*  लापशी रवा २ वाट्या
* गूळ/ साखर २ वाट्या अथवा आवङीप्रमाणे
* रवा भाजण्यासाठी साजूक तूप २ टेस्पून
* खवलेला  नारळ १ वाटी 
* भाजलेली खसखस , वेलची , काजू बदाम बेदाणे आपल्या आवङीनुसार
* पाणी १ वाटी
* दुध अर्धा लिटर 

कृती:-

प्रथम रवा तूपावर लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजावा व त्यामध्ये पाणी घालून वाफवून घ्यावा. 

नंतर त्यामध्ये गूळ/साखर , नारळाचा खव, खसखस वेलचीपूङ व निम्मे दूध घालून एक उकळी आणावी.
या खीरीमध्ये दूध जरा जास्त शोषले जाते म्हणून खीर थंङ झाल्यावर वाढताना ठेवलेले निम्मे दूध व  सूका मेवा घालावा.

गरमा-गरम खीर तूपाची धार सोडून एक बाऊलभर खाल्ली तर पोट एकदम भरते व दमदार असते. 

टीप:- काहीजण रवा भाजून उकङवण्यासाठी कूकरमध्ये ठेवतात पण त्यामूळे खीर फार गुळगूळीत होते . शक्यतो सुटीच वाफवावी.चव टिकून रहाते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.      

25 August 2014

ओल्या मटारची खीर(Green peas Kheer)

No comments :
आपण नेहमीच विविध प्रकारच्या खिरी करतो. शेवयाची, रव्याची,तांदुळाची, गव्हाची, खसखस, खारीक एक का दोन, नानाविध प्रकार आहेत. पण ही मटारची खिर थोडा हटके प्रकार आहे. पौष्टिक व झटपट होणारी अशी ही खीर आहे. या खिरीला हिरवट, पोपटी असा रंग खूप छान येतो व चविलाही सुंदर लागते. एकदम कमी साहीत्य लागते व पट्कन होते. कशी करायची साहीत्य व कृती, 

साहीत्य:-
* हिरवे ओले मटार २ वाटी
* आटीव (घट्ट ) दुध १/२ (half) लिटर
* तूप २ टेस्पून
* वेलची पूङ
* साखर अर्धी वाटी 

कृती:-
प्रथम मटार मिक्सरवर भरङ वाटून घ्यावे. 

नंतर वाटलेले मिश्रण तूपावर खमंग परतवून घ्यावे व त्यामधे दुध, साखर  व वेलचिपूङ घालून एक उकळी आणावी.

गरमा-गरम पौष्टीक खीर तयार! तूम्हीही नक्की करून बघा.व कसे झाले ते सांगायला विसरू नका. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.