04 July 2020
आम्रखंड (Mango Shrikhand)
श्रीखंड हा पदार्थ गुजरात मधून आला. आता मात्र जगभरात स्वीटडीश म्हणून खाल्ला जातो. श्रीखंड श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ असल्याने त्याच्या नैवेद्यासाठी सुध्दा वापरतात. थंडगार, मलईदार गोड श्रीखंड जेवणात पक्वान्न म्हणून पण केले जाते. तसे तर एरव्ही विकतचे निरनिराळ्या कंपन्यांचे तयार श्रीखंड आणून खाल्ले जातेच. परंतु खास मराठी नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे गुढीपाडव्याला आमच्याकडे हमखास धरी चक्का बांधून. श्रीखंड केले जाते. अगदी चक्यासाठीचे दहीपण घरीच केले जाते. तसेच आंब्याच्या सिझन मधे 'आम्रखंडही' केले जाते.मी आंब्याचा सिझन संपता संपता थोडा आमरस फ्रिजरला साठवला होता. तर मी आम्रखंड केले.मलईदार,मधुर चवीचे 'आम्रखंड' कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• फुल क्रीम दूध ३ लिटर
• दही पाव कप
• साखर १ किलो
• पिकलेल्या आंब्याचा रस - १कप
• वेलची पावडर १०-१२ वेलचीची
• मीठ पाव टीस्पून
कृती :-
प्रथम दूध एका मोठ्या पातेल्यात ओतून फक्त कोमट करून घ्यावे. ( पुर्ण तापवून, त्यावरची साय काढून नंतर कोमट करून घेऊ नये)
आता कोमट केलेल्या दुधामध्ये पाव कप दही ( फार आंबट ,शिळे नसावे) घालावे व डावाने हलवून घ्यावे व साधारण ६-८ तास ताटली झाकून कडेला ठेऊन द्यावे. विरजण लागते.
आता ६ तासांनी भांडे थोडेसेच हलवून पहावे, घट्ट दही लागलेले असेल. किंवा छोटा चमचा दह्यात एका बाजूला घालून चमच्याने दही काढून बघावे. त्याजागी लगेच पाणी दिसते. दही तयार झाले.
आता दही एका मलमलच्या स्वच्छ सुती कापडावर मोठ्या डावाने काढावे.त्याआधी एका भांड्यावर पीठाची चाळणी ठेवावी व त्यावर कापड पसरावे आणी त्यावर दही काढावे व कापडाची गाठ मारून त्यावर वजन ठेवावे. म्हणजे दह्यातील पाणी गळण्यास सोपे होते.
आता साधारण ६-१०तासांनी दह्यातील पाणी पुर्णपणे निथळते व घट्ट चक्का तयार होतो. ३ लिटर दुधाचा १ ते १.२५० किलो चक्का होतो. दुधाच्या घट्टपणावर चक्क्याचे प्रमाण अवलंबून असते. दूध जितके चांगले घट्ट, तेवढा चक्का अधिक होतो. जेवढा चक्का तेवढीच साखर घ्यावी.
आता चक्का कापडातून काढून चाळणीवर घासून घ्यावा. किंवा पुरण यंत्रातून फिरवून घ्यावा. म्हणजे गुठळ्या रहात नाहीत व एकसंध चक्का तयार होतो. आत्ताच आंब्याचा रस सुध्दा चाळणीवर चमच्याने घासून गाळून घ्यावा.
नंतर तयार चक्क्यामधे ,साखर मिक्सरमधून फिरवून मग मिसळावी.( साखर थोडी बारीक केली की लवकर विरघळते) मीठ, वेलची पावडर घालावे व चक्का चांगला डावाने घोटावा .म्हणजे साखर, मीठ व्यवस्थित मिसळून विरघळते .अर्धा तास चक्का तसाच झाकून ठेवावा.
अर्ध्या तासानंतर आपले मस्त मलाईदार तयार 'आम्रखंड' लहान -लहान दोन तीन डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.
गरजेनुसार एक एक आम्रखंडाचा डबा फ्रिजमधून काढून पोळी /पुरी सोबत फस्त करावा. किंवा आईस्क्रीम सारखे नुसतेच स्वीटडीश म्हणूनही खाता येते. पाहुणे मंडळी येणार असतील किंवा सणवार असेल तर त्या हिशेबाने आधीच तयार करून ठेवले तरी चालते.
घरचे अवीट गोडीचे 'आम्रखंड' तुम्हीही लगेच करून बघा. एकदा घरच्या मलईदार श्रीखंड किंवा आम्रखंडाची चव जिभेला लागली तर विकतचे कोणत्याही कंपनीचे आवडणार नाही. याची खात्री देते तुम्हाला.
टिप्स :
• एकदा चक्का तयार झाला की आवडीनुसार केशर, ड्रायफ्रूट्स किंवा निरनिराळ्या फळांचे गर/ क्रश इसेन्स मिसळून कोणत्याही स्वादाचे श्रीखंड तुम्ही घरी बनवू शकता.
• दूध फुल फँटचेच घ्यावे.
• हवामानानुसार दही लागण्याला कमी-अधिक वेळ लागतो.
• साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी. अथवा शुगरफ्री पावडर वापरावी.मधुमेही पेशंटना खाता येते.
• दह्यातून निथळलेले पाणी अतिशय पौष्टिक असते. (व्हे प्रोटीन असते) ते टाकून न देता फ्रिजमधे ठेऊन रोजच्या स्वयंपाकात कणिक मळताना, भाजी,डाळ शिजवताना वापर करावा. किंवा ताकात मिसळून प्यावे. कढी करावी.
आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
19 June 2020
पँनकेक(Pancake)
साहित्य:-
• मैदा १ कप
• साखर २ टेस्पून
• बेकींग पावडर १ टीस्पून
• सोडा १/२ टीस्पून
• मीठ चिमुटभर
• बटर २ टेस्पून
• वँनिला इसेन्स १टीस्पून
• दूध १ कप
• पिकलेले केळे २ नग
• मध १ टेस्पून
कृती :-
प्रथम एका बाऊलमधे बटर घ्यावे व त्यामध्ये साखर, मीठ घालून फेटून घ्यावे. नंतर पिकलेली केळी दुधामध्ये मँश करून घालावीत व सर्व मिश्रण एकसंध घुसळून घ्यावे.
आता शेवटी तयार बँटरमधे इसेन्स,बेकींग पावडर, सोडा घालावे. शेवटी मैदा घालून गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेऊन सर्व मिश्रण एकसारखे हलवावे.आवश्यकता वाटली तर बँटर मधे दुध घालावे.डावाने ओतले तर पडण्यासारखे असावे.
आता सपाट नाँनस्टीक किंवा बीडाचा जाड तवा गँसवर मध्यम आचेवर तापवून लहान लहान आकाराचे पँनकेक घालावेत. पँनवर केकचे बँटर घालताना, बँटर पळीने फक्त ओतावे. ते आपोआप पसरेल इतपतच पातळ असूद्या. डोस्या सारखे पळीने अजिबात पसरायचे नाही .
एक बाजू झााली की दुसरीही भाजून घ्यावी.
तयार पँनकेक वरून मध घालून खायला द्यावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
04 February 2020
पाईनँपल हलवा ( Pineapple Halawa)
साहित्य :
• रवा - १ कप
• साखर - १ १/२ कप
• अननसाचे बारीक तुकडे - १ कप
• अननसाचा गर - १ कप
• साजुक तूप - १ कप
• गरम पाणी - २ कप
• चिमुटभर मीठ
• वेलची पावडर - १टीस्पून
• काजू,बेदाणे
कृती :-
प्रथम रवा साजुक तुपावर खमंग भाजून घ्यावा.
ऩंतर त्यामधे सावकाशपणे गरम पाणी घालून दोन मिनीट वाफवावा म्हणजे रवा फुलतो.
नंतर त्यामधे साखर,मीठ,अननसाचा गर व तुकडे घालून साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,कडेने थोडे तूप सोडून परत दोन मिनिटे वाफ काढावी.
अननसाचा गर व लहान तुकडे
शेवटी वेलचीपूड व काजू, बेदाणे घालून गरमा-गरम लुसलुशीत 'पाईनँपल हलवा' डीशमधून खायला द्यावा व प्रतिसादाची वाट पहावी. 'व्वा मस्तच!' असे उद्गगार नक्कीच कानी पडतील. तुम्हीही नक्की करून बघा व प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.
टिप्स :
• अननस छान पिकलेला मधूर वासाचा आणावा.
• हलव्यामधे पाण्याच्या जागी दुधाचा वापर अजिबात करू नये.
• तूप दिलेल्या प्रमाणातच वापरावे. नाहीतर हलवा मोकळा, लुसलुशीत होण्याऐवजी चिकट होतो.
• हलव्याचा गडद पिवळा रंग हवे असल्यास केशर किंवा खाद्यरंग वापरावा. मी नाही वापरला. ऐच्छिक आहे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
11 January 2019
फ्रेश स्ट्राँबेरी -कोकोनट बर्फी ( Fresh Strawberry -Coconut Burfi)
हिवाळ्यात सर्व भाज्या,फळे भरपूर प्रमाणात येतात.अन् खाल्लेही जातात. तर याच दिवसात लाल चुटूक रंगाच्या व हिरवे देठ असणार्या स्ट्राँबेरी बाजारात येतात.आंबट - गोड चवीच्या पिकलेल्या खूप छान लागतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी पण उत्तम फळ आहे. यामधे विटामिन बी व सी भरपूर असते. शिवाय प्रोटीन, फाइबर, पोट्याशियम, मैग्नीशियम, फास्फोरस,आयोडीन अशीही तत्वे आहेत. स्ट्राँबेरी अनेक रोगाशी लढण्याची ताकद देते. जसे उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, कँंन्सर, डायबिटीज.शिवाय स्ट्राँबेरी सेवनाने पोट साफ रहाण्यास मदत होते. स्मरणशक्ति चांगली रहाते. डिप्रेशन कमी होते. महत्वाचे म्हणजे वजन घटण्यास मदत होते. म्हणून स्ट्राँबेरी ला सुपर फुड असेही म्हटले जाते. हे सर्व फायदे पाहून मी बाजारातून नेहमीच स्ट्राँबेरी आणते.पण नुसती खाऊन कंटाळा आला.म्हणून क्रश,बर्फी असे पदार्थ केले. या आधी च्या रेसिपीमधे क्रश केलाय. तेच वापरून ही बर्फी केली. कशी केली साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• खोवलेले ओले खोबरे २ कप
• साखर २ कप
• स्ट्राँबेरी क्रश १/२ कप
• मिल्क पावडर १/२ कप
• फ्रेश क्रिम १ कप
• तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी
कृती :-
प्रथम खोवलेले खोबरे +साखर मिक्सरमधून वाटून घ्यावी.
आता जाड बुडाच्या कढईत वाटलेले मिश्रण घालून मध्यम आचेवर शिजत ठेवावे.सतत ढवळत रहावे. अन्यथा मिश्रण तळाला करपू शकते.
आता मिश्रण अर्धे शिजले की फ्रेश क्रिम घालावे व सतत ढवळत रहावे.
आता कढईच्या कडेने मिश्रण कोरडे होण्यास सुरवात झाली की मिल्क पावङर घालावी. गँसची आच मंद करावी व सतत ढवळत रहावे. पांच ते दहा मिनिटानी मिश्रणाचा गोळा होतो व कढईपासून सुटू लागतो. आता गँस बंद करावा. मिश्रणाचे दोन भाग करावेत व एक भाग तूप लावलेल्या ताटात पसरवून वाटीने दाबावा. दुसरा कढईत तसाच राहू द्यावा. ही सर्व क्रिया झटपट करावी. अन्यथा मिश्रण खळखळीत कोरडे होते व वडी थापली जात नाही.
आता कढईमधे मिश्रणाचा जो अर्धा भाग आहे, त्यामधे स्ट्राँबेरी क्रश घालावे व पुन्हा पाच मिनिट गँस चालू करून शिजवावे.
नंतर आधीच जे पांढरे मिश्रण ताटात पसरलेय त्यावर हे स्ट्राँबेरी चे मिश्रण पसरावे. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित थापून घ्यावे. थोडे सेट झाले की चाकूने आडव्या उभ्या रेषा पाडाव्यात.
आता पुर्ण गार झाल्यावर ही आकर्षक व सुंदर चवीची बर्फी डब्यात भरून ठेवावी.
टीप्स :
*,फ्रेश क्रिम च्या ऐवजी घरच्या एक लिटर दूधावरची जाड साय व एक कप दूध घेतले तरी चालते.
• साखरेचे प्रमाण थोडे कमी-जास्त केले तरी चालते.
° खोबरे कायम खवणीने खोवून नंतरच मिक्सरमधे वाटावे.अन्यथा बर्फीला अपेक्षित आकर्षक रंग येत नाही.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
09 January 2019
स्ट्राँबेरी क्रश ( Strawberry Crush)
सध्या बाजारात छान आंबट-गोड चवीच्या लालबुंद स्ट्राँबेरी येताहेत. सहाजिकच बघितले की घ्यावे वाटतात. घेतोही आपण पण घरी आणले की त्याचे काय करावे? प्रश्न पडतो. थोड्या नुसत्या खाल्या, कांही मिल्कशेक मधे गेल्या तर काही फ्रूट सलाडला गेल्या.राहीलेल्या वाया नको जायला म्हणून त्याचे क्रश करून ठेवले.कधीही मिल्कशेक, केक, हलवा, बर्फी बनविता येते. तर स्ट्राँबेरी क्रश कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• स्ट्राँबेरी ५०० ग्रॅम
• साखर २५० ग्रँम
• व्हिनेगर १ टीस्पून
कृती :-
प्रथम स्ट्राँबेरी देठ काढून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी.
नंतर स्ट्राँबेरीचेे चाकूने मोठे -मोठे तुकडे करावेत.
आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व स्ट्राँबेरी एकत्र घालून मंद आचेवर ठेवावे व सतत साखर विरघळेपर्यंत ढवळत रहावे.
साखर विरघळली की, व्हिनेगर घालून दोन मिनिट मिश्रण उकळू द्यावे. एकतारी पाक होतो. गँस बंद करावा.
आता थंड झाल्यावर ब्लेडरने घुसळावे. तयार क्रश काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे.
हे क्रश फ्रिजमधे ठेवले तर दोन महीन्यापर्यंत टिकते. हवे तेव्हा काढून वापरता येते.अगदी रेडीमेड ज्यूस पिण्यापेक्षा एक भाग क्रश व तीन भाग थंड पाणी घालून झटपट ज्यूस करता येतो, मुले आवडीने पोळीबरोबर सुध्दा खातात.
टीप: स्टाँबेरी एकदम गोड नसतील तर साखरेचे प्रमाण वाढवावे. ५०० ग्रॅम स्ट्राँबेरी असेल ४०० ग्रँम साखर घ्यावी.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
26 December 2018
मोरावळा (Amla Murabba)
मोठा आवळा! यालाच डोंगरी आवळा असेही म्हणतात.औषधी व अतिशय गुणकारी असा हा आवळा,दिवाळी नंतर साधारण तुळशीच्या लग्नापासून बाजारात यायला लागतो. ते डिसेंबर पर्यंत असतो.डिसेंबर मधे एकदम परिपक्व म्हणजे वर्षाचे लोणचे,सुपारी,मोरावळा करण्यास योग्य असे आवळे असतात. आयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.आवळ्यामधे लोह व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.कोणत्याही रुपात आवळा खाल्ला तर तो आरोग्यदायी आहे.परंतु वर्षभर मिळत नसल्याने वेगवेगळ्या स्वरूपात साठविला जातो.आवळा खाल्याने दृष्टि तेज होते. पित्त, कफ कमी होते. त्वचेला चमक येते व त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच ह्रदयासाठी पण आवळा उत्तम आहे. रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. आवळ्यापासून बरेच पदार्थ करून वर्षभरासाठी साठविले जातात. जसे की, सुपारी,आवळा कँडी, लोणचे, सरबत, मुरांबा. केस काळेभोर रहाण्यासाठी केसांनाही लावण्यासाठी आवळा सुकवून पावडर करून ठेवली जाते. अशा बहूगुणी आवळ्याचा 'मुरंबा' म्हणजेच 'मोरावळा' कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* आवळे १/२ किलो
* साखर १/२ किलो
* वेलचीपूड ऐच्छीक
* सुंठ पावडर ऐच्छीक
* सैंधव मीठ चिमूटभर
कृती :-
मोरावळ्यासाठी आवळे घेताना साधारण तांबूस छटा असलेले, न डागाळलेले चांगले कडक व ताजे आवळे निवडून, वेचून घ्यावेत. असे आवळे चांगले रसाळ व आंबट -तुरट चवीचे असतात.
प्रथम बाजारातून आणलेले निवडक आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.
नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला *आतपर्यंत टोचून भोके पाडावीत.
आता टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच मिनीट उकळून द्यावे. आवळे पांढरट दिसू लागतात.*आता पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच साखर मिसळून घ्यावी.*एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी साखर विरघळून पाणी सुटलेले असेल तर आता मंद गँसवर पातेले ठेवावे.(वेगळे पाणी घालू नये) सतत ढवळत रहावे. साखरेचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील तर आताच वेलची पूड, मीठ घालावे व गँस बंद करावा. साधारणपणे अर्धा तास तरी लागतो. पाक मधासारखा असावा. अति घट्ट किंवा पातळ नको.
गार झाल्यावर मोरावळा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. तीन- चार दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य आंबट -गोड - तुरट चवीचा होतो. पाक आतपर्यंत मुरला जातो. हा मोरावळा फ्रिजशिवाय बर्षभर टिकतो.
असा मुरलेला एक आवळा रोज सकाळी अनशापोटी खाल्ला व वरून कोमट पाणी प्याले तर अतिशय आरोग्यदायी असते. ज्यांना पित्त किंवा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो त्यानी आवर्जून हा उपाय करावा.
टिप्स :
* जर वेळ नसेल तर साखर मिसळून एक रात्र न ठेवता, साखरेचा दोनतारी पाक करून त्यामधे उकडलेले आवळे घालावे. परंतु या पध्दतीत पाण्याचा वापर असल्याने मोरावळा जास्त कालावधीपर्यत टिकण्यात साशंकता निर्माण होते.
* आवळे आतपर्यंत नीट टोचून घ्यावेत.पाक चांगला मुरतो.
* आवळे उकडलेले पाणी टाकून न देता, त्यात मीठ, साखर घालून सरबत करून प्यावे. अथवा आमटी, भाजी, पराठे करताना वापरावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
30 October 2018
रवा बेसन लाडू (Rawa Besan Ladu)
लाडवाचे बरेच प्रकार आहेत. बेसन लाडू, ओले खोबरे घालून रवा लाडू,मावा घालून रवा लाडू, तर आज मी रवा बेसन लाडू केलेत. खायला खमंग व रवाळ लागतात. ओले खोबरे किंवा मावा घातलैल्या लाडू पेक्षा हे जास्त दिवस टिकतात. घरात उपलब्ध साहीत्यात होतात व करायला सोपे आहेत. साहित्य व कृती-
साहित्य :-
* बेसन पीठ १ कप (१०० ग्रँम)
* रवा ३/४ कप (१०० ग्रँम)
* साखर ३/४ कप (१२५ ग्रँम)
* तूप १/२ कप (५० ग्रँम)
* पाणी १/४ कप + २ टेस्पून
* वेलची पूड
* बेदाणे सजावटीसाठी
कृती :-
प्रथम कढईत तूप घालून रवा व बेसन वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. नंतर दोन्ही एकत्र करून त्याच कढईत गँस बंद करून ठेवावे.
आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून पुर्ण एकतारी म्हणजे दोनतारी च्या अलिकडचा सुरवातीचा पाक तयार करून भाजलेल्या मिश्रणामधे घालावा.
सर्व मिश्रण पाकात व्यवस्थित एकत्र करावे व गँस चालू करून परत थोडे परतावे व एकत्र गोळा व्हायला सुरवात झाली की गँस बंद करावा. मिश्रण थंड होऊ द्यावे. मधून मधून हलवत रहावे. पंधरा मिनिटानंतर मिश्रण कोमट झाले की गोळा होऊ लागतो.
आता वेलचीपूड घालून मिश्रण कोमट असतानाच हव्या त्या आकारमानाचे लाडू बेदाणे लावून वळावेत.
वरील साहित्यात फोटोतील आकाराचे १२ लाडू होतात. हे लाडू फ्रिज शिवाय १५ दिवस चांगले रहातात.
टिप: आपल्या आवडीनुसार तूप दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घेतले तरी चालते. परंतु लाडू किंचित कोरडा होतो.
तुम्हीही करून बघा सहज व सोपे आहेत.नक्की आवडतील. मात्र अभिप्राय द्यायला विसरू नका.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
21 September 2018
बेसन बर्फी ( Besan Burfi)
घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल अथवा स्वताला कांही गोड खाण्याची इच्छा झाली तर घरातील उपलब्ध साहीत्यात ही बेसन बर्फी पटकन् करता येते. तसेच चविलाही उत्तम लागते. कशी करायची साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* बेसन १ कप (१०० ग्रँम)
* साखर १/२ कप ( ७५ ग्रँम)
* तूप १/४ कप ( ५० ग्रँम)
* बदाम, पिस्ता काप
* वेलची पूड
कृती :-
प्रथम पॅनमधे तूप घालून त्यावर बेसनपीठ घालावे व छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.भाजल्यावर थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून ठेवावे.
आता त्याच पँनमधे साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.पाक एकतारी किंवा दोनतारी असा कोणताही नको, तर फक्त साखर विरघळून बोटाला चिकट लागण्याइतपतच म्हणजे एकतारीच्याही अलिकडचा झाला की गँस बंद करावा.त्यामधे वेलचीपूड घालावी व दोन मिनिट थंड करावा.
आता तयार पाकामधे भाजून ठेवलेले बेसनपीठ घालून सर्व मिश्रण एकत्र हलवावे. गँस बंदच असावा. मिश्रण घट्ट व्हायला लागते. नंतर आधीच तूप लावून ठेवलेल्या थाळीत मिश्रण ओतावे. वरून बदाम, पिस्ता लावावे व मिश्रण पंधरा मिनिट थंड होऊ द्यावे.
आता सुरीने आडव्या उभ्या, लाईन्स मारून ठेवावे.नंतर अजून पंधरा मिनिटानंतर पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.
टिप्स :-
* भाजलेले बेसन व पाक दोन्हीही गरम असेल तर बर्फी कडक होते. म्हणून दोन्हीही साधारण गार करून मगच एकत्र करावे.
* प्रमाणापेक्षा जास्त तूप घातल्यास बर्फी खूपच मऊ लिबलिबीत होते.
* बेसन छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे. अन्यथा चवीला पीठ पीठ लागते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या.आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
24 July 2018
सांजोरी (Sanjori)
'सांजोरी' यालाच सारनोरी, साठोरी असेही म्हणतात.हा पारंपारिक व पौष्टीक पदार्थ आहे. गणेश चतुर्थी मधे गणपतीच्या,महालक्ष्मीच्या नैवेद्याला, दिवाळीच्या लक्ष्मीपुजना दिवशी नैवेद्याला केला जातो.तसेच मुलांना मधल्या वेळचे खाणे, शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात न्यायला सोयीचा प्रकार आहे.तीन-चार दिवस सहज टिकतो.घरात नेहमी उपलब्ध असणार्या साहित्यात होतो.साहित्य व कृती 👇
साहित्य :-
वरील पारीसाठी
* बारीक रवा १ कप
* मैदा २ टेस्पून
* तेल २ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* चिमुटभर साखर
* पाणी गरजेनुसार
आतील सारणासाठी
* बारीक रवा १/२ कप
* पीठीसाखर १/२ कप
* तूप २ टेस्पून
* मिल्क पावडर १/४ कप ( ऐच्छीक)
* खसखस १ टीस्पून
* वेलची पूड
* पाणी गरजेनुसार
* तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम रवा,मैदा मीठ,साखर घालून एकत्र करून घ्यावे. नंतर तेल गरम करून त्यामधे घालून हाताने चोळून घ्यावे.आता गरजे इतकेच थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळावे.जास्त सैल नको व अती घट्टही नको.मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे.
आता सारण तयार करावे. पँनमधे घेतलेल्या एकूण तूपामधले १ टेस्पून तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.भाजून ताटलीत काढून त्यावर थोडे पाणी शिंपडावे व पांच मिनिट झाकावे. पांच मिनिटानंतर कोमट असतानाच पीठीसाखर,वेलची पूड घालून सारण हाताने एकजीव करावे. आत्ताच सारणात शिल्लक १ चमचा तूप व मिल्क पावडरही घालून मळावे.सारण फार कोरडे वाटले तर किंचित पाण्याचा हात घेऊन मळावे.मिश्रणाचे मुठीत दाबले तर लाडू व्हावेत इतपत ओलसर असावे. आता सारणाचेे हलक्या हाताने साधारण लाडू करून घ्यावे. दाबून फार घट्ट लाडू करू नये.
नंतर आधीच मुरून तयार असलेले पीठ परत एकदा मळून घ्यावे अथवा कुटून घ्यावे. मिक्सर मध्ये थोडे-थोडे घेऊन फिरवून काढावे. या पीठाच्या थोड्या लहान आकाराच्या म्हणजे सारणाचेे लाडू केलेत त्या आकाराचे समान गोळे करून घ्यावेत व एकेक गोळी घेऊन त्यामधे सारणाचा लाडू भरून व्यवस्थित बंद करावे. हलक्या हाताने फार पातळ नाही अशी किंचित जाडसर मोठी पुरी लाटावी व अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावी.तळताना सारखी उलटवू नये.अलगद तळावी,जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
थंड झाल्यावर अतिशय खुसखूषीत खमंग अशी सांजोरी खायला उत्तम लागते. बाजारी पदार्थ आणण्यापेक्षा घरीच असा एखादा सहज सोपा पौष्टीक पदार्थ मुलांना खायला करून ठेवावा.
वर दिलेल्या साहित्या मधे फोटोतल्या आकाराच्या ८ साठोऱ्या होतात.
टिप्स :-
* सारण तयार करताना किंवा पारीसाठी कणिक मळताना पाण्याचाच वापर करावा,दूध नको. दूधामुळे नंतर वास येण्याची शक्यता असते.
* सारणामधे भाजलेला खवा अथवा शिल्लक पेढा घातला तरी चालते.
* सांजोरी तूपावर शॅलोफ्राय केली तरी चालते. तसेच आधी तव्यावर थोडी भाजून नंतर तेलात तळल्यास तेल कमी लागते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
21 April 2018
मँगो फिरनी (Mango Firani)
साधारण ख्रीरीसारखाच हा पदार्थ आहे. आजकालच्या पध्दतीनुसार डेजर्ट म्हणून थंड स्वरूपात खाल्ला जातो. मात्र आमच्याकडे गरम व खीर म्हणून जेवणात पोळीसोबत खायला आवडते. आपल्या आवडीनुसार कसेही खावे. आहे मात्र झकास पदार्थ. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* बासमती तांदुळ १/४ कप
* दूध अर्धा लिटर
* मँगो पल्प २ आंब्याचा
* साखर अर्धा कप (आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ
* काजू, बदाम काप
कृती :-
प्रथम दूध एका पातेल्यात गरम करण्यास ठेवावे. दूध उकळू लागल्यावर मधे मधे ढवळत रहावे.
दूध उकळून थोडे घट्ट होईपर्यंत दोन आंब्याचा गर काढून ब्लेडरने घुसळून तयार करावा. तसेच तांदुळ धुवून, तूपावर थोडे परतून मिक्सरमधे भरड वाटून घ्यावेत.
आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल त्यामधे वाटलेले भरड तांदुळ घालून पांच मिनिट उकळू द्यावे. शिजले की त्यामधे साखर, वेलचीपूङ घालून गँस बंद करावा. पांच मिनिटानंतर तयार केलेला मँगो पल्प घालावा व एकत्र ढवळावे. शेवटी वरून काजू, बदाम चे काप घालावेत. मँगो फिरनी तयार!
आवडीनुसार थंड अथवा गरम खा.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
मँगो फालुदा (Mango Falooda)
उन्हाळ्याचे दिवसात थंडगार सरबत, लस्सी, निरनिराळे ज्यूस, फ्रूटशेक अशी पेयं प्यायला छान वाटतात. पण बाजारी पेये पिण्याऐवजी घरच्या घरी केली तर खूपच उत्तम. अन् थोडी पुर्वतयारी ठेवली तर घरी झटपट करणेही अवघड नसते. बर्याच निरनिराळ्या स्वादामधै फालुदा बनवला जातो. जसे केसर बदाम, कस्टर्ड फालुदा, शाही फालुदा फ्रूट फालुदा इत्यादी..!तर आज मी मँगो फालुदा केला साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तापवून गार केलेले दूध अर्धा लिटर
* पिकलेले आंबे २+२
* भिजवलेले सब्जा बी २ टेस्पून
* फालुदा शेवया किंवा साध्या शेवया अर्धा कप
* रोज सिरप अर्धा कप
* साखर २ टेस्पून
* व्हँनिला किंवा मँगो आईस्क्रीम
* टुटीफ्रूटी सजावटीसाठी
* ड्रायफ्रूट्स ऐच्छिक
इतक्या साहित्यामधे फोटो मधील साईजचे ५ ग्लास फालुदा होतो.
कृती :-
प्रथम दोन आंब्याचा पल्प तयार करून घ्यावा. व राहीलेले दोन आंबे साल काढून लहान चौकोनी तुकडे करावेत. यातील थोडे सजावटीसाठी बाजूला ठेवून बाकीचे तुकडे व साखर गार दूधामधे घालून ब्लेडर ने घुसळावे व मिल्कशेक तयार करून घ्यावा.
आता शेवया साध्या असतील तर गरम पाण्यात टाकून मऊ करून ध्याव्यात. नंतर वरून गार पाणी घालून गाळून घ्याव्यात.
आता सर्व साहित्याची जमवा जमव झाली असेल तर छानपैकी एक मोठा काचेचा ग्लास घ्यावा. त्यामधे सर्वात आधी तळाला एक चमचा रोज सिरप नंतर अनुक्रमे एकेक चमचा सब्जा बी, शेवया, मँगो पल्प घालावे. परत असाच अजून एक लेयर तयार करून मग ड्रायफ्रूट्स व मिल्कशेक घालावा. शेवटी आईस्क्रीम घालून वर टुटीफ्रूटी व आंब्याचे क्यूब सजावटीसाठी घालावे.
थंडगार सर्व्ह करावे.
टिप :-
* सर्व साहित्य आधीच तयार करून फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावे ऐनवेळी ग्लास मधे सर्व साहित्य एकत्र करून द्यावे.
* साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
04 April 2018
खरबूज मिल्कशेक ( Musk Melon Milkshake)
खरबूज हे फळ खास करून उन्हाळ्यात येते. रसाळ, गोड चवीचे व गुणधर्माने थंड असते. याचा मिल्कशेक अतिशय उत्तम चवीचा लागतो. कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* खरबूज लहान आकाराचे १ नग ( साधारण ५०० ग्रॅम)
* थंड दूध अर्धा लिटर
* साखर ४ टेस्पून
* वेलचीपूड १/४ टीस्पून
* बदामाचे काप सजावटीसाठी
कृती :-
प्रथम खरबूज मधून कापून दोन भाग करावेत व आतील बीया काढून स्वच्छ करावे. नंतर साल काढून लहान चौकोनी तुकडे करावेत.
आता मिक्सर जारमधे खरबूजाचे तुकडे, साखर, वेलचीपूङ घालून मऊ पेस्ट करावी. नंतर सर्व पेस्ट झालीय का, कुठे तुकडे राहीले नाहीत ना याची खात्री करून नंतर दूध घालावे व परत एकदा सर्व एकजीव करावे.
आता तयार खरबूज शेक ग्लास मधे घालून वरून बदामाचे काप घालून सर्व्ह करावा. थंड हवे असेल तर आधीच करून फ्रिजमधे ठेवावा. बर्फ अजिबात वापरू नये.
टिप :- वेलचीपूङ आवर्जून घालावी. स्वाद खूप छान येतो व वेलची प्रकृतीला थंड असते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
17 March 2018
साखर माळ/गाठी (Sakhar Maal/ Gathi)
गुढीपाढवा एक पारंपरिक मराठी सण व साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त. मोठ्या थाटा-माटाने साजरा केला जातो. गोडाचा नैवेद्य, गुढी सजविण्यासाठी साठी रेशमी वस्त्र, कलश, चाफ्याच्या फुलाची माळ व जोडीला साखर माळ लागते. तर ही सहज सोपी पटकन् होणारी साखरमाळ कशी करायची साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* साखर अर्धी वाटी
* पाणी साखर बुडेल इतकेच,पाव वाटी
* बेकिंग पावडर पाव टीस्पून
* तूप १ टीस्पून
* आवडीचा खाद्यरंग २ थेंब
कृती :-
प्रथम फोटत दाखवल्याप्रमाणे कप केकचे मोल्ड एका ताटात ठेवून त्यात दौरा ठेवावा.
नंतर गँसवर साखर व पाणी एकत्र करून पाक करण्यास ठेवावा. सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की त्यात रंग व तूप घालावे. कडक गोळीबंद पाक करावा. शेवटी बेकींग पावडर घालावी.
नंतर झटपट गरम पाक मोल्डमधे चमच्याने घालावा. पंधरा मिनिटानंतर कडक झाले की मोल्ड मधून सहजच साखर माळ निघते.
घरच्या घरी आपली साखर माळ तयार. आदले दिवशीच करून, अलगद डब्यात घालून ठेवावी. दुसरे दिवशी गुढीला घालावी.
टिप:
* कपकेक मोल्ड नसतील तर ताटाला तूपाचा हात चोळून त्यावर दोरा ठेवून ठराविक अंतराने पाक टाकावा.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
11 March 2018
11 January 2018
तिळाची कुरकुरीत वडी (Crispy Til Burfi)
* तिळ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ ऐच्छिक
* काजू, बदाम काप ऐच्छिक
प्रथम तिळ स्वच्छ निवडून चाळून ध्यावेत. पोळपाट- लाटण्याला तूपाचा हात चोळून घ्यावा.
* तिळ तांबूस रंगाचे वापरावेत. पांढरे पाँलीशचे नको. तांबूस तिळ चविला अधिक खमंग असतात. मी तेच वापरलेत.
13 December 2017
ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake)
07 October 2017
बालूशाही (Balushahi)
बालूशाही हा पक्वान्नाचा किंवा हवे तर मिठाई चा पदार्थ म्हणावे. कारण ८ -१० दिवस टिकतोही. करायला एकदम सोपा. खायलाही मस्तच. कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
(अंदाजे १५-१६ नग)
* मैदा ३ कप
* तूप अर्धा कप
* दही पाव कप
* मीठ चिमूटभर
* सोडा अर्धा टीस्पून
* साखर २ कप
* पाणी १ कप
* वेलचीपूङ
* रोज इसेन्स
* बदाम पिस्ता काप सजावटीला
* तूप किंवा रिफाइंड तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम मैदा चाळून एका बाऊलमधे घ्यावा.त्यामधे तूप, सोडा व मीठ घालून आधी कोरडेच हाताने चोळून घ्यावे. मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.
आता दही व गरजेनुसार पाणी घालून पीठ फक्त एकत्र करावे. खूप मळून तुकतूकीत गोळा करण्याची आवश्यकता नाही.ओबड-धोबडच राहू द्या. अशाने बालूशाही वर छान लेयर येतात व खुसखूषीत होते. १५ मिनिट झाकून ठेवावे.
आता पीठाचे लहान -लहान पेढ्यासारखे चपटे गोळे बनवून अंगठ्याने मधे दाब देऊन खळगा करावा. व गरम तूपामधे अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावेत. तळून थंड होऊ द्यावे.
आता साखर पाणी एकत्र करून पाक करावा. साखर विरघळून उकळू लागले की साधारण दाट होईपर्यंत, एकतारीच्या किंचित अलिकडे म्हणजे एकतारीला सुरवात झाली की पाक झाला. आता वेलचीपूड व इसेंन्स घालावे.
आता पाकामधे, तळलेली बालूशाही सोडावी किंवा बालूशाही पसरट भांङ्यामधे घेऊन वरून पाक ओतावा. ५-१० मिनिट ठेऊन अलगदपणे चिमट्याने एकेक बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवावे व वर बदाम, पिस्ता काप लावावेत.
गार झाल्यावर एकदम खुसखूषीत लागते. अतिशय छान आतून पदर सुटलेले असतात वरून पांढरट साखरेचा थर दिसतो. एकूणच मस्त!
टिप्स:
* मंद आचेवरच तळावे. वेळ लागतो पण आतून छान तळली जाते.
* दही ताजे वापरावे. खूप आंबट व वास येणारे नसावे.
* पाकात थोडा केशर टाकला तर मार्केटप्रमाणे केशरी रंग येतो.
* पाक कच्या ठेवला तर बालूशाही नरम पडते व पक्का केला तर आत पर्यंत मुरत नाही.
* पीठ फार मळू नये.
* तळताना काळजी घ्यावी. खूप खुसखूषीत असल्याने फूटू शकतात. अलगदपणे उलट-सुलट करावे.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.









