Showing posts with label Diwali. Show all posts
Showing posts with label Diwali. Show all posts

25 August 2022

प्रोटीन बार (Protine Bar)

No comments :
                     प्रोटीन बार 
आजकाल आपण खुप health concious झालेलो आहोत. त्यात धावपळीचे आयुष्य आहे, स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ नसतो.कारण घाई,वेळ कमी व खुप काम! अशावेळी एखादा पट्कन खाता येणारा,पोषणमूल्ये जास्त असणारा पदार्थ हाताशी असेल तर सोयीचे होते. तर असा पदार्थ  कोणता ? तो आहे 'प्रोटीन बार ' सगळ्या निकषांमध्ये बसतो. Sugar free, healthy, खायला व साठवायला सोईचा, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येतो. तर कसा करायचा? साहित्य व कृती पाहा,👇 

साहित्य:-
• खजूर - २०० ग्रॅम
• बदाम बी- २००ग्रॅम
• काजू - २०० ग्रॅम
• अक्रोड - १०० ग्रॅम
* डिसिकेटेड कोकोनट - ५०ग्रॅम
• मगज बी - ५० ग्रॅम
• सूर्यफूल बी -५० ग्रॅम
• वॉटर मेलन बी -५० ग्रॅम
• जवस -५० ग्रॅम 
• तीळ - २५ ग्रॅम
• खसखस - १५ ग्रॅम
• ओट्स पावडर - दोन tsp
* बटर पेपर/अल्युमिनियम फॉइल 

कृति:-
प्रथम खजूर बुडेल इतके कोमट पाणी घेऊन त्यामध्ये खजूर अर्धा तास भिजत ठेवावा.

खजूर भिजेपर्यंत काजू, बदाम,अक्रोड अर्धे-अर्धे कापून घ्यावेत.ओट्स ची भरड पावडर करून घ्यावी. 
आता कापलेले काजू,बदाम,  सर्व बिया साधरण गरम करून घ्यावे.भाजायाचे नाही फक्त कुरकुरीत व्हावे इतपतच. तीळ,खसखस,खोबरे,जवस खमंग भाजून घ्यावे. स्वाद छान येतो. 

आता भाजलेले साहित्य गार होईपर्यंत खजूर भिजला असेल, त्याची मिक्सर मधे पेस्ट करावी. पेस्ट पॅनमध्ये घेउन मिळून येईपर्यंत परतावी. Pan सोडायला लागला की, आधी तयार करून ठेवलेले सर्व साहित्य मिसळावे. व्यवस्थीत हलवून एकत्र गोळा करावा व काठाच्या थाळीला किंव्हा ट्रे ला थापावे. थंड झाले की आवडीच्या आकारात वड्या कापाव्यात.

कापलेल्या वड्या/बार बटर पेपर कीव्हा फॉइल मधे एक एक गुंडाळून डब्यात भरुन ठेवा. हवे तेंव्हा खा, मुलाना डब्यात द्या. वयस्क मंडळींना सकाळी एक वडी कप भर दूध द्या. 

टीप:-
• Dry fruits आवडीप्रमाणे कोणतेही घ्यावेत.


आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


02 November 2018

शेव (Shev)

No comments :

दिवाळीचा फराळ म्हटले की, चिवड्याच्या जोडीला शेव पाहीजेच.शेवेचे बरेच प्रकार बनविले जातात. बारीक, मोठी, पालक शेव, लसूण शेव..  पण मला सहसा मसाला शेवेचा प्रकार आवडतो. कशी करायची साहित्य व कृती-

साहित्य :-
* डाळीचे पीठ १/२ किलो
* तेल ५० मिली.
* पाणी ५० मिली.
* मीठ २ टीस्पून
* लाल मिरचीपूड ४-५ टीस्पून
* हिंग २ टीस्पून
* ओवा १ टीस्पून
* जीरे १ टीस्पून
* हळद १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम बेसनपीठ चाळून घ्यावे. म्हणजे त्यामधे गुठळ्या रहात नाहीत. नंतर ओवा व जिर्याची बारीक पावडर करून घ्यावी.

आता एका बाऊलमधे तेल व पाणी एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये वरील साहित्यात दिलेला मसाला घालावा व हेड ब्लेंङरने सर्व चांगले फेटावे.असे फेटल्यामुळे मसाला नीट विरघळतो व फेटल्यामुळे शेव हलकी खुसखूषीत होते.सोडा वापरण्याची गरज रहात नाही.

आता फेटलेल्या मिश्रणात डाळीचे पीठ घालावे व गरजेनुसार पाणी घालून मळावे. साधारण 200 मिली. पाणी लागते. पीठ फार सैल किंवा घट्ट नको. पीठ अति घट्ट ठेवल्यास घालायला त्रास होतो व शेव कडक होते.तसेच पीठ सैल ठेवल्यास शेवेची प्लेन काडी न येता एकमेकाला चिकटल्याने नागमोडी आकार येतो. पीठ मळून दहा मिनिटे सेट होण्यासाठी झाकून ठेवावे.

दहा मिनिटा नंतर गरम तेलामधे शेव तळून काढावी.तेल अती गरम नको.शेव लाल होते. फार गारही नको मध्यम असावे. शेव लवकर तळली जाते.तेलात घातल्यावर बुडबुडे थांबले की पलटावी व दुसरीकडून तळून घ्यावे.

शेव गार झाली की हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

30 October 2018

रवा बेसन लाडू (Rawa Besan Ladu)

No comments :

लाडवाचे बरेच प्रकार आहेत. बेसन लाडू, ओले खोबरे घालून रवा लाडू,मावा घालून रवा लाडू, तर आज मी रवा बेसन लाडू केलेत. खायला खमंग व रवाळ लागतात. ओले खोबरे किंवा मावा घातलैल्या लाडू पेक्षा हे जास्त दिवस टिकतात. घरात उपलब्ध साहीत्यात होतात व करायला सोपे आहेत. साहित्य व कृती-

साहित्य :-
* बेसन पीठ १ कप (१०० ग्रँम)
* रवा ३/४ कप (१०० ग्रँम)
* साखर ३/४ कप (१२५ ग्रँम)
* तूप १/२ कप (५० ग्रँम)
* पाणी १/४ कप + २ टेस्पून
* वेलची पूड
* बेदाणे सजावटीसाठी

कृती :-
प्रथम कढईत तूप घालून रवा व बेसन वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. नंतर दोन्ही एकत्र करून त्याच कढईत गँस बंद करून ठेवावे.

आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून पुर्ण एकतारी म्हणजे दोनतारी च्या अलिकडचा सुरवातीचा पाक तयार करून भाजलेल्या मिश्रणामधे घालावा. 

सर्व मिश्रण पाकात व्यवस्थित एकत्र करावे व गँस चालू करून परत थोडे परतावे व एकत्र गोळा व्हायला सुरवात झाली की गँस बंद करावा.  मिश्रण थंड होऊ द्यावे.  मधून मधून हलवत रहावे. पंधरा मिनिटानंतर मिश्रण कोमट झाले की गोळा होऊ लागतो. 

आता वेलचीपूड घालून मिश्रण कोमट असतानाच हव्या त्या आकारमानाचे लाडू बेदाणे लावून वळावेत.

वरील साहित्यात फोटोतील आकाराचे १२ लाडू होतात. हे लाडू फ्रिज शिवाय १५ दिवस चांगले रहातात.

टिप: आपल्या आवडीनुसार तूप दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घेतले तरी चालते. परंतु लाडू किंचित कोरडा होतो.

तुम्हीही करून बघा सहज व सोपे आहेत.नक्की आवडतील. मात्र अभिप्राय द्यायला विसरू नका.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

21 September 2018

बेसन बर्फी ( Besan Burfi)

No comments :

घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल अथवा स्वताला कांही गोड खाण्याची इच्छा झाली तर घरातील उपलब्ध साहीत्यात ही बेसन बर्फी पटकन् करता येते. तसेच चविलाही उत्तम लागते. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बेसन १ कप (१०० ग्रँम)
* साखर १/२ कप ( ७५ ग्रँम)
* तूप १/४ कप ( ५० ग्रँम)
* बदाम, पिस्ता काप
* वेलची पूड

कृती :-
प्रथम पॅनमधे तूप घालून त्यावर बेसनपीठ घालावे व छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.भाजल्यावर थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून ठेवावे.

आता त्याच पँनमधे साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.पाक एकतारी किंवा दोनतारी असा कोणताही नको, तर फक्त साखर विरघळून बोटाला चिकट लागण्याइतपतच म्हणजे एकतारीच्याही अलिकडचा झाला की गँस बंद करावा.त्यामधे वेलचीपूड घालावी व दोन मिनिट थंड करावा.

आता तयार पाकामधे भाजून ठेवलेले बेसनपीठ घालून सर्व मिश्रण एकत्र हलवावे. गँस बंदच असावा.  मिश्रण घट्ट व्हायला लागते. नंतर आधीच तूप लावून ठेवलेल्या थाळीत मिश्रण ओतावे. वरून बदाम, पिस्ता लावावे व मिश्रण पंधरा मिनिट थंड होऊ द्यावे.

आता सुरीने आडव्या उभ्या, लाईन्स मारून ठेवावे.नंतर अजून पंधरा मिनिटानंतर पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.

टिप्स :-
* भाजलेले बेसन व पाक दोन्हीही गरम असेल तर बर्फी कडक होते. म्हणून दोन्हीही साधारण गार करून मगच एकत्र करावे.
* प्रमाणापेक्षा जास्त तूप घातल्यास बर्फी खूपच मऊ लिबलिबीत होते.
* बेसन छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.   अन्यथा चवीला पीठ पीठ लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या.आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

24 July 2018

सांजोरी (Sanjori)

1 comment :

'सांजोरी' यालाच सारनोरी, साठोरी असेही म्हणतात.हा पारंपारिक व पौष्टीक पदार्थ आहे. गणेश चतुर्थी मधे गणपतीच्या,महालक्ष्मीच्या नैवेद्याला, दिवाळीच्या लक्ष्मीपुजना दिवशी नैवेद्याला केला जातो.तसेच मुलांना मधल्या वेळचे खाणे, शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात न्यायला सोयीचा प्रकार आहे.तीन-चार दिवस सहज टिकतो.घरात नेहमी उपलब्ध असणार्या साहित्यात होतो.साहित्य व कृती 👇

साहित्य :-
वरील पारीसाठी
* बारीक रवा १ कप
* मैदा २ टेस्पून
* तेल २ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* चिमुटभर साखर
* पाणी गरजेनुसार
आतील सारणासाठी
* बारीक रवा १/२ कप
* पीठीसाखर १/२ कप
* तूप २ टेस्पून
* मिल्क पावडर १/४ कप ( ऐच्छीक)
* खसखस १ टीस्पून
* वेलची पूड
*  पाणी गरजेनुसार
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम रवा,मैदा मीठ,साखर घालून एकत्र करून घ्यावे. नंतर तेल गरम करून त्यामधे घालून हाताने चोळून घ्यावे.आता गरजे इतकेच थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळावे.जास्त सैल नको व अती घट्टही नको.मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे.

आता सारण तयार करावे. पँनमधे घेतलेल्या एकूण तूपामधले १ टेस्पून तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.भाजून ताटलीत काढून त्यावर थोडे पाणी शिंपडावे व पांच मिनिट झाकावे. पांच मिनिटानंतर कोमट असतानाच पीठीसाखर,वेलची पूड घालून सारण हाताने एकजीव करावे. आत्ताच सारणात शिल्लक १ चमचा तूप व मिल्क पावडरही घालून मळावे.सारण फार कोरडे वाटले तर किंचित पाण्याचा हात घेऊन मळावे.मिश्रणाचे मुठीत दाबले तर लाडू व्हावेत इतपत ओलसर असावे. आता सारणाचेे हलक्या हाताने साधारण लाडू करून घ्यावे. दाबून फार घट्ट लाडू करू नये.

नंतर आधीच मुरून तयार असलेले पीठ परत एकदा मळून घ्यावे अथवा कुटून घ्यावे. मिक्सर मध्ये थोडे-थोडे घेऊन फिरवून काढावे. या पीठाच्या थोड्या लहान आकाराच्या म्हणजे सारणाचेे लाडू केलेत त्या आकाराचे समान गोळे करून घ्यावेत व एकेक गोळी घेऊन त्यामधे सारणाचा लाडू भरून व्यवस्थित बंद करावे. हलक्या हाताने फार पातळ नाही अशी किंचित जाडसर मोठी पुरी लाटावी व अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावी.तळताना सारखी उलटवू नये.अलगद तळावी,जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्यावी.

थंड झाल्यावर अतिशय खुसखूषीत खमंग अशी सांजोरी खायला उत्तम लागते. बाजारी पदार्थ आणण्यापेक्षा घरीच असा एखादा सहज सोपा पौष्टीक पदार्थ मुलांना खायला करून ठेवावा.

वर दिलेल्या साहित्या मधे फोटोतल्या आकाराच्या ८ साठोऱ्या होतात.

टिप्स :-
* सारण तयार करताना किंवा पारीसाठी कणिक मळताना पाण्याचाच वापर करावा,दूध नको. दूधामुळे नंतर वास येण्याची शक्यता असते.

* सारणामधे भाजलेला खवा अथवा शिल्लक पेढा घातला तरी चालते.

* सांजोरी तूपावर शॅलोफ्राय केली तरी चालते.  तसेच आधी तव्यावर थोडी भाजून नंतर तेलात तळल्यास तेल कमी लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

07 October 2017

बालूशाही (Balushahi)

No comments :

बालूशाही हा पक्वान्नाचा  किंवा हवे तर मिठाई चा पदार्थ म्हणावे. कारण ८ -१० दिवस टिकतोही. करायला एकदम सोपा. खायलाही मस्तच. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
(अंदाजे १५-१६ नग)
* मैदा ३ कप
* तूप अर्धा कप
* दही पाव कप
* मीठ चिमूटभर
* सोडा अर्धा टीस्पून
* साखर २ कप
* पाणी १ कप
* वेलचीपूङ
* रोज इसेन्स
* बदाम पिस्ता काप सजावटीला
* तूप किंवा रिफाइंड तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम मैदा चाळून एका बाऊलमधे घ्यावा.त्यामधे  तूप, सोडा व मीठ घालून आधी कोरडेच हाताने चोळून घ्यावे. मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.

आता दही व गरजेनुसार पाणी घालून पीठ फक्त एकत्र करावे. खूप मळून तुकतूकीत गोळा करण्याची आवश्यकता नाही.ओबड-धोबडच राहू द्या. अशाने बालूशाही वर छान लेयर येतात व खुसखूषीत होते. १५ मिनिट झाकून ठेवावे.

आता पीठाचे लहान -लहान पेढ्यासारखे चपटे गोळे बनवून अंगठ्याने मधे दाब देऊन खळगा करावा. व गरम तूपामधे अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावेत. तळून थंड होऊ द्यावे.

आता साखर पाणी एकत्र करून पाक करावा. साखर विरघळून उकळू लागले की साधारण दाट होईपर्यंत, एकतारीच्या किंचित अलिकडे म्हणजे एकतारीला सुरवात झाली की पाक झाला. आता वेलचीपूड व इसेंन्स घालावे.

आता पाकामधे, तळलेली बालूशाही सोडावी किंवा बालूशाही पसरट भांङ्यामधे घेऊन वरून पाक ओतावा. ५-१० मिनिट ठेऊन अलगदपणे चिमट्याने एकेक बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवावे व वर बदाम, पिस्ता काप लावावेत.

गार झाल्यावर एकदम खुसखूषीत लागते. अतिशय छान आतून पदर सुटलेले असतात वरून पांढरट साखरेचा थर दिसतो. एकूणच मस्त! 

टिप्स:
* मंद आचेवरच तळावे. वेळ लागतो पण आतून छान तळली जाते.
* दही ताजे वापरावे. खूप आंबट व वास येणारे नसावे.
* पाकात थोडा केशर टाकला तर मार्केटप्रमाणे केशरी रंग येतो.
* पाक कच्या ठेवला तर बालूशाही नरम पडते व पक्का केला तर आत पर्यंत मुरत नाही.
* पीठ फार मळू नये.
* तळताना काळजी घ्यावी. खूप खुसखूषीत असल्याने फूटू शकतात. अलगदपणे उलट-सुलट करावे.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 October 2016

रवा लाडू ( Rawa Ladu )

No comments :
लाडू आपण एरव्हीही मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा कोणी आले गेले तर खायला देण्यासाठी सोयीचे होते म्हणून करतो. तसेच दिवाळी आली की खास फराळाच्या ताटातला पदार्थ म्हणून त्याची हक्काची जागा असतेच. यात सुध्दा कोणी रवा-बेसन लाडू करतो तर कोणी खवा घालून करतो. मी ओला नारळ घालून केलेत. कसे ते पहा साहित्य व कृती, 

साहीत्य:-

१) बारीक रवा ४ वाट्या
२) साखर ३ वाट्या
३) एका नारळाचे खवून खोबरे 
४) वेलची पूड दोन चमचे
५) काजू,बदामाचे काप,बेदाणे आवडीनुसार
६) साजूक तूप १ वाटी
७) गुलकंद २ टेस्पून

कृती:

प्रथम कढई तापत ठेवून त्यामधे तूप घालावे व त्यावर रवा खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.रवा  भाजत आल्यावर शेवटी -शेवटी ओले खोबरे घालावे व चार परतण्या देऊन गॅस बंद करावा.

दुसर्या एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे.साखर विरघळून पाच-दहा मिनीटे ऊकळू द्यावे. एकतारी पाक तयार तयार झाला का पहावे.झाला असेल तर तयार पाकामधे वर भाजलेला रवा,वेलची पूड सुकामेवा व गुलकंद घालावे .नीट हलवावे व मिश्रण आळून येण्यासाठी झाकून ठेवून द्यावे.मधून मधून हलवून बघावे.

साधारण दोन ते तिन तासानी मिश्रण आळून येते.मग त्याचे आपल्या आवडीनुसार हव्या त्या साइजचे  लाडू वळावेत.वळताना वर एक-एक बेदाणा लावावा.

छान मऊ व रवाळ लाडू तयार होतात.

या लाडूमधे ओले खोबरे असल्याने  आठ-दहा दिवसापेक्शा जास्त दिवस ठेवू नये.लवकर संपवावेत.वास येण्याची शक्यता असते अन्यथा फ्रीजमधे ठेवावेत व खाण्याच्या आधि थोडावेळ बाहेर काढून ठेवावेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

21 October 2016

करंजी (Karanji)

No comments :

करंजी हा पदार्थ महाराष्ट्रामधे खास दिवाळीला केला जाणार पारंपारिक पदार्थ आहे. दिवाळीचा फराळ तयार करायला सुरवात करायची तर गोड करंजी सर्वात आधि करायची पध्दत आहे. त्यामुळे करंजीला "शुभाची करंजी " असे म्हणतात. करंजी मधे सहसा चकली प्रमाणे बिघडण्याचा धोका नसतो परंतु लाटणे, भरणे,तळणे अशासाठी किमान दोघींची मदत असेल तर करणे कंटाळवाणे होत नाही.  दिवाळीत शाळांना सुट्टया लागलेल्या असतात. मग घरातली चिल्लर कंपनीसुध्दा करंजा भरण्याच्या, भरलेल्या चिरण्याने कातरायच्या कामाला हौसेने येते .किंवा शेजारणी सुध्दा दिवस ठरवून आज तुझ्याकडे, उद्या माझ्याकडे असे ठरवून पदार्थ करत असत. बाकी काहीही असो परंतु दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण नाहीच.तर अशी "करंजी" कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
वरच्या पारीसाठी -
* मैदा २ वाट्या
* बारीक रवा २ वाट्या
* मोहन २ टेस्पून
* दूध १ कप
* मीठ चिमूटभर
* पाणी गरजेनुसार

साहित्य :-
सारणासाठी -
* किसलेले सुके खोबरे १ १/२ वाट्या
* रवा १ /४ वाटी
* पिठी साखर १ १ /२ वाट्या
* खसखस १/४ वाटी
* वेलची पूड
* बेदाणे, चारोळी काजू,बादाम तुकडा आवडीनुसार
तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती :-

प्रथम रवा व मैदा एकत्र करून त्यामधे चविला मीठ व गरम तूप (मोहन) घालून चोळावे. नंतर दूध घालावे व गरजेनुसार पाणी घेऊन घट्ट मळावे. मळलेले पीठ ओल्या कपड्याखाली अर्धा ते एक तास झाकून ठेवावे. तोपर्यंत सारण तयार करावे.

सारण कृती -
आता कढईत खसखस कोरडीच भाजून घ्यावी. नंतर रवा भाजावा. आता किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर खोबरे हाताने चुरडावे. त्यामधे रवा, साखर, वेलचीपूङ, ड्रायफ्रूट्स कापून घालावे.सारण तयार.

आता करंजी करण्यासाठी आधी मळून ठेवलेले पीठ कुटून किवा फूड प्रोसेसर मधून फिरवून काढावे. मळलेल्या पीठाच्या लहान -लहान गोळ्या करून पुरीसारखे लाटून घ्यावे. नंतर चमच्याने सारण भरावे व पारी दूधाचे बोट लाऊन बंद करावी. नक्षीदार चिरण्याने कापावी. अशा १५ -२0 करंजा करून ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे. नंतर कढईत तेल गरम करून मंद गँसवर गुलाबी रंगावर तळावे.

खुसखूषीत तयार करंजा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

टिप्स :-
* सारणात साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी.
* खोबर्याच्या वाट्या थोडावेळ कोमट पाण्यात टाकाव्यात व नंतर त्याची काळी पाठ काढावी व किसावे. किस पांढराशुभ्र होतो.करंजीसुध्दा स्वच्छ रंगाची दिसते. अथवा सारणामुळे काळपट रंग येतो.
* सारण आदले दिवशीच करून ठेवले असता जास्त सोयीचे होते. म्हणून आदले दिवशीच सवडीनुसार निगुतीने करून ठेवावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 August 2016

अनारसे (Anarase)

No comments :
अनारसे हा पदार्थ थोडी दीर्घ कृती असल्याने व गोड असल्याने दिवाळी व्यतिरीक्त एरव्ही सहसा केला जात नाही. तसेच अनारसे जाळीदार असल्याने अधिक मासामधे जावयाला वाण म्हणून द्यायची पण पध्दत आहे.तेव्हाही केले जातात. पण कितीही वेळखाऊ पदार्थ असला तरी दिवाळीला फराळाच्या ताटाला अनारसे असल्याशिवाय शोभा नाही. तर असे हे नाजुक अनारसे कसे करायचे साहित्य व कृती,

साहित्य :-
* पटणीचा जाड, जुना तांदुळ  १/२ किलो
* स्वच्छ, पिवळा गुळ १/२ किलो
* साजुक तूप १-२ टेस्पून
* वेलची, जायफळ पावडर आवडीनुसार
* खसखस १०० ग्रँम
* पिकलेले केळ १ (ऐच्छीक)
* तूप तळणीसाठी

कृती:-
प्रथम तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत.पाणी रोज बदलावे.अन्यथा तांदळाला कुजकट वास येऊ शकतो.

तिसर्या दिवशी पाणी निथळून, सुती कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पीठ चाळावे व बारीक पीठी करावी.

नंतर गुळ किसणीने किसून किंवा बारीक कुटून  घ्यावा व चाळलेल्या पिठाीमधे मिसळावा. साजुक तूपाचे मोहन व वेलदोडे, जायफळची पूड घालून हलक्या हाताने मळून गोळा तयार करावा .

आता हा तयार पीठाचा गोळा प्लास्टिक किंवा  अल्युमिनिअम च्या डब्यात घालून ७ ते ८ दिवस मुरण्यासाठी ठेवावे. पीठ चांगले मुरले तर अनारशाला जाळी पडते व अनारसे जाळीदार,  कुरकूरीत होतात.

नंतर जेव्हा अनारसे करायचे असतील तेव्हा गरजेइतकेच पीठ घेऊन पिकलेल्या केळाचा हात लावून मळावे व त्याचे साधारणपणे  पेढ्याएवढे चपटे गोळे करावेत व पोळपाटावर खसखस थोडी -थोडी पसरून पिठाची एकेक गोळी घेऊन बोटाने हलकेच दाब देऊन अनारसा खसखशीवर फिरवत गोल थापावा

आता कढईमधे तूप गरम करावे. खसखशीची बाजू वर येइल अशा पध्दतीने अनारसा कढईमधे अलगद सोडावा.झार्‍याने त्यावर तूप घालत अनारसा मंद आचेवर तळावा. अनारसा उलटवू नये. सोनेरी रंगावर तळावा.

असा हा खमंग तळलेला कुरकुरीत अनारसा खायला खूप चविष्ट लागतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.

टिप्स :-
* तयार पीठ स्टीलच्या डब्यात ठेऊ नये. काळे पडते.
* तयार पिठ बरेच दिवस म्हणजे अगदी महिनाभर सुध्दा टिकते. खराब होत नाही.
* तांदुळ शक्यतो जूना व जाडाच वापरावा.पीठ फुलून जाळी चांगली पडते.
* एकाच बाजूने तूप झार्याने उडवून तळावा. अन्यथा खसखस तूपामधे सुटते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


22 December 2015

बीटाची बर्फी ( Beetroot Burfi)

No comments :

बीट हे एक रसाळ कंद आहे. गडद लाल-किरमिजी रंग असतो व आतून एकदम लालभडक असते. बीटापासून खाद्यरंग तयार केला जातो. साॅस, सरबते, जेलि, आईस्क्रीम इत्यादी मधे वापरतात. तसेच बीटामधे आयर्न भरपूर प्रमाणात असते.बीट रोजच्या आहारात वापरल्यास शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. शक्तिवर्धक व रक्तवर्धक आहे. बीटमधे नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते.तरीसूध्दा कॅलरीज कमी असतात. पाश्चिमात्य देशात बीटापासून साखर तयार केली जाते.बीटाला तशी काही स्वताची अशी खास चव नसते.काहीसे गोडसर लागते. मात्र याचा रंगच अधिक मोहक असतो. बीट सॅलडमधे कच्चे, उकडून भरीत तसेच किसून कोशिंबीर, सूप , पराठे, पूर्या, हलवा इ. अशा अनेक प्रकारे वापरता येते. बीट जास्तीत- जास्त कसे पोटात जाईल ? हा विचार करून ही बीटरूट बर्फी केली. कशी केली ती कृती व साहीत्य,

साहीत्य :-
* उकडून साल काढून बीटाचा किस 1 वाटी
* साखर 1 वाटी
* ओल्या नारळाचा चव 1 वाटी
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* अर्धा कप दूधावरची जाड साय/ खवा पाव  
   वाटी
* पाव कप दूध
* वेलचि पाडर अर्धी टीस्पून
* सजावटीसाठी काजू-बदामाचे काप ऐच्छिक

कृती :-

प्रथम खोबरे व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून शिजत ठेवा.

नंतर साखर विरघळून खोबर शिजत आले की, त्यातच किसलेला बीट घाला.सतत हलवत रहा. हलवत-हलवतच आधी साय व दूध घाला. नंतर मिल्क पावडर घाला. एकसारखे हलवत रहा.

आता  काही वेळाने मिश्रण आटत येते व एकत्र गोळा होऊन कढई पासून सुटत येते.वेलची पूड घालून परत एकदा हलवा. गॅस बंद करा व मिश्रण एका ट्रेमधे किंवा थाळीमधे ओता. वरून काजू/बदामाचे पातळ काप पसरवा व हाताने किवा प्लास्टीक शीट ठेवून वाटीने वरून अलगद थापा. गरम असतानाच सूरीने वड्या कापून म्हणजे रेषा मारून ठेवा.

साधारण दीड-दोन तासानी वड्या सुकतात. आता त्या वड्या ट्रे मधून सुट्टया करून काढा व डब्यात भरून ठेवा. कोरडी थंड हवा असेल तर साधारण हवामानात चार दिवस सहज टिकतात. किवा मग फ्रीजमधे ठेवा. सिझन नूसार ठेवा.

आपल्या घरी कोणी येणार असेल किवा लहान मुलांचा वाढदिवस असेल तर अथवा दिवाळीत फराळाच्या ताटात रंगीत वड्या छान दिसतात. यांचा रंगच खूप सुंदर दिसतो.अतिशय रूचकर, पौष्टीक व सोप्या आहेत. तूम्हीही करून बघा  व प्रतिक्रीया द्यायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

31 October 2015

पालकाचे खारे शंकरपाळे ( Spinach Namkin)

No comments :


गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो. आज मी थोडा बदल म्हणून 'पालकाचे खारे शंकरपाळे ' बनवले. तांबूस,पोपटी रंगाचे व खमंग खुसखूषीत असे शंकरपाळे छानच लागतात.

असे कुठे आहे की दरवर्षी दिवाळीला एकच प्रकारचे पारंपारीक पदार्थ बनवावेत यावर्षी पालक शंकरपाळे करून बघा. नक्की आवडतील तूम्हालापण. कसे केले बघा.

साहीत्य :

* मैदा २ वाट्या

* रवा १/४ वाटी

* पालक प्यूरी १/२ वाटी ( कमी-अधिक होऊ शकते)

* मोहन २ टेस्पून

* मीठ चविनूसार

* हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून

* ओवा १/४ टीस्पून

* धना-जीरा पावडर १ टीस्पून

* हींग चिमूटभर

* तिळ ऐच्छिक

* तळणीसाठी तेल

कृती :-

प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यात घ्या. त्यामधे रवा व  वरील इतर सर्व कोरडे साहीत्य घालून नीट मिक्स करा.

आता मोहन घाला. परत मिश्रण हाताने नीट सगळीकडे चोळून घ्या .

आता शेवटी पालक प्यूरी अंदाज घेऊन बघत बघत मिश्रणात घालावी.पुरीच्या किवा नेहमी शंकरपाळ्या करतो,त्या कणकेप्रमाणे घट्ट कणिक मळावी. पंधरा मिनिट झाकून ठेवा.

पंधरा मिनिटानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. फार जाड अथवा पातळ नको.सुरीने अथवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे कापून गरम तेलात खरपूस तळा.

खुसखूषीत कलरफूल खारे शंकरपाळे तयार ! थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.केव्हाही नुसते किवा चहासोबत खा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 September 2015

स्ट्राॅबेरी बर्फी ( Strawberry Burfi)

No comments :

स्ट्राॅबेरी म्हणले की मस्त लाल-गुलाबी रंग व रसाळ ,साधारण आंबटगोड चवीचे फळ डोळ्यासमोर येते. मात्र हे फळ हिवाळ्यातच येते. तसे आजकाल बाराही महीने सर्व मिळते. स्ट्राॅबेरी क्रश, जाम, विविध मिठाया तसेच आईसक्रीम, असे बरेच प्रकार बनवले जातात. आजकाल लहान मुलांची बरीच औषधे, खोकल्यावरच्या गोळ्या ...एकंदरीत त्याचा स्वाद व मोहक रंग सगळ्यांनाच आवडतो. तुम्हालाही आवडेल कशा करायच्या साहीत्य व कृती ...

साहीत्य ;-

* ओल्या नारळाचे खवलेले खोबरे 2 वाट्या
* साखर 1 1/2 (दीड) वाटी
* स्ट्राॅबेरी क्रश पाव ते अर्धी वाटी किवा जाम 2 टेस्पून
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* पिठी साखर 2 टेस्पून
* रोज किवा स्ट्राॅबेरी इसेन्स 5-6 थेंब

कृती :-

प्रथम जाड बुडाची कढई किवा नाॅनस्टीक पॅन घ्या. वर दिलेल्या साहीत्यापैकी पिठीसाखर व इसेंन्स सोडून बाकी सर्व साहीत्य एकत्र करा व मंद आचेवर शिजत ठेवा.

सतत ढवळत रहा.खाली लागण्याची शक्यता असते. करपले तर बर्फीचा रंग व चव बदलते. म्हणून काळजी घ्यावी.

आता पंधरा मिनिटांनी सर्व मिश्रण कढईपासून सुटायला लागेल. मिश्रण आळून येईल. तर आता शेवटी पिठीसाखर व इसेंन्स घालून, गॅस बंद करून चांगले घोटा. कोणत्याही वडीचे मिश्रण जितके जास्त घोटाल, तितके बर्फी चिकट न होता खुटखुटीत होते व लवकर सुकते.

नंतर मिश्रण ताटात घाला व प्लॅस्टीक शिट किवा पिशवी त्यावर घालून हाताने व्यवस्थित थापा. थोडे थंड झाले की सुरीने रेषा पाडून ठेवा.

अर्धा तासाने पुर्ण थंड होईल, मग वड्या काढा व डब्यात ठेवा.

खुप छान गुलाबी लाल रंग येतो व आकर्षक दिसतात. तसेच चवीला पण उत्कृष्टच लागतात.

04 September 2015

शाही लाडू (Shahi Laddu)

No comments :

याच्या नावातच शाहीपण असलेने यात सर्व शाहीच  वस्तू वापरल्या आहेत. सामान्यपणे नुसते ड्रायफ्रूट्स काही रोज आपल्या आहारात खाल्ले जात नाहीत. मुलं तर अजिबात खात नाहीत. फक्त बेदाणे मनुके इतकेच वेचून खातात . तर मग काजू, बदाम,अक्रोड,पिस्ते इ.असे सर्वच ड्रायफ्रूट कसे पोटात जातील ? मुलांच्या व आपल्यापण ! तसेच नैवेद्याला व उपवासालापण चालतात. पुढे सांगितल्या प्रमाणे लाडू करून ठेवा. एकदम सोपे व पौष्टीक असेआहेत. रोज एक जरी खाल्ला तरी पुरेसे आहे.

साहीत्य :-

* काजू
* बदाम
* अक्रोड
* पिस्ता सर्व प्रत्येकी एक वाटी
* खारीक पूड 1 वाटी
* काळा अरेबियन खजूर10-15 बिया
* सुके अंजिर 10-15 नग
* बेदाणे 1 वाटी
* मनुका 1 वाटी
* खसखस भाजून 2 टीस्पून
* वेलचीपूड
* जायफळ अर्धे पुड करून
* चांदीचा वर्ख ऐच्छिक

कृती :-

प्रथम सर्व सुकामेवा एका प्लेटमधे वेगवेगळा काढावा .बेदाणे ,मनुक्याच्या असतील तर देठ, खजुराच्या बिया असे सर्व काढून साफ करून घ्या.अंजिराचे तुकडे करा.अक्रोड फोडून घ्या.

आता मिक्सरमधे  आधीकाजू, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची भरड करून घ्या. बाजूला काढून ठेवा.

आता अंजिर,मनुका व बेदाणे मिक्सरमधे घालून वाटा. लगदा तयार होईल.

आता या लगद्यात आधिची भरड व खारिक पावडर मिसळा. खसखस, वेलची,जायफळ पुड घाला व व्यवस्थित हाताने किवा मिक्सरमधेच थोडे फिरवून एकजीव करा. मिश्रण कोरडे वाटले तर थोडे शुध्द तूप घालू शकता.अन्यथा नकोच.

आता तयार मिश्रणाचे लहान-लहान लिंबाच्या आकाराचे लाडू बनवा. शोभेसाठी वरून चांदीचा वर्ख लावा. नाही लावला तरी चालतो.

हवाबंद डब्यात भरून ठेवा.बरेच दिवस टिकतात.

टीप :- सुकामेवा आवडीनुसार कोणताही कमी-अधिक करू शकता. फक्त सुकामेव्याची व खारकेची मिळून भरड, ही तयार लगद्याच्या दुप्पट असावी. तर लाडू वळता येतात.

यामधे आवडत असेल तर डींक पण तुपात तळून घातला तर पौष्टीकपणा अजून वाढतो.

17 November 2014

काजू कतली (Kaju Katali)

No comments :
काजू कतली घरी बनविणे एकदम सोपे आहे.वेळ पण फारसा लागत नाही. सर्व साहित्य तयार असेल तर फक्त दहा मिनिटे लागतात. तर कशाला भेसळयुक्त बाजारी काजूकतली आणायची ? कशी करायची ते पहा....
साहीत्य:-
* काजू १कप
* मिल्क पावडर १/४कप
* साखर ३/४ कप
* पाणी १/४ कप +२ टेस्पून
* तूप १ टीस्पून 
* वेलचीपूड ऐच्छीक 
* चांदी वर्ख ऐच्छिक 

कृती:-
प्रथम काजूची मिक्सर मधून पावडर करून घ्यावी.नंतर बाऊलमधे काढून मिल्क पावडर त्यामधे मिसळून घ्यावी. 

नंतर साखरेमधे पाणी घालून एकतारी पाक करावा. साधारणपणे ४ ते ५ मिनिटात पाक होतो. 

आता तयार पाकामधे काजू पावडर व वेलचीपूड घालून गोळा होइपर्यंत हलवत रहावे.ती कढईपासून मिश्रण सुटत येते.होत आल्यावर शेवटी तूप घालावे. 

तयार मिश्रणाचा गोळा  ताटामधे काढावा व साधारण गरम असतानाच मळून पोळपाटावर तूपाचा हात लावून जाडसर पोळी लाटावी. थंड झाले की चाकूने रेषा पाडाव्यात व वड्या काढाव्यात . 

अशी काजू कतली आठ दिवस आरामात टिकते. गावी जाताना करून नेंण्यास किंवा काही कार्यक्रम असेल तर आधीच करून ठेवता येते.

टीप्स :
* काजू पावङर मिक्सर चालू -बंद करत करावी. नाहीतर तेल सुटते. 
* काजू पावङर चाळून घ्यावी.
* गोळा तयार करताना फार मळू नये, तूप सुटते. 

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.







18 October 2014

क्रिस्पी मसाला हार्टस् (Crispy masala hearts )

No comments :
दिवाळीच्या फराळात आपण नेहमीचे पारंपारिक पदार्थ बनवतोच,पण त्यात थोडाफार बदल केला तर फराळ करताना थोडी मजा येते.तर यासाठी पुढे दिल्याप्रमाणे क्रिस्पी मसाला हार्टस्  ट्राय करा.

साहीत्य :-
* मैदा १ वाटी
* गव्हाचे पिठ १/२ वाटी
* मक्याचे पिठ २ टेस्पून
* मिरची पेस्ट आवडीनुसार
* मीठ
* तिळ १ टीस्पून
* ओवा अर्धा टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून 
* कसूरी मेथी चिमूटभर
* कोथिंबीर
* गरम तेल २ टेेस्पून (मोहन)
* तळणीसाठी तेल
* चिमूटभर सोडा

कृती:-
प्रथम मैदा,कणिक मका पिठ एका पसरट भांड्यात एकत्र घ्यावे.नंतर त्यामधे वर सांगितलेला सर्व मसाला घालावा.दोन चमचे तेल गरम करून घालावे.आधि सर्व कोरडे मिश्रण हाताने सारखे करावे.नंतर पाणी घेऊन नेहमीच्या कणिकेप्रमाणे कणिक मळावी. व दहा मिनिटे झाकून ठेवावे.

दहा मिनिटानी कणकेचा लहान गोळा घेऊन,थोडी जाडसर पोळी लाटावी व हार्ट शेपच्या कटलेट मोल्डने छोटे-छोटे हार्ट कापून गरम तेलात तळावेत.

थंड झाल्यावर खुसखूषीत होतात .नंतर चहाबरोबर सर्व्ह करावेत.

टीप :- मिरची पेस्ट ऐवजी मिरची पावडर वापरली तरी चालते. किंवा आवडत असेल तर आले लसूण पेस्ट घालावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

बेसन लाडू (Besan ladu)

No comments :
दिवाळीच्या फराळतला शेलका व बहुतेक सर्वाना आवडणारा लाडू म्हणजे बेसन लाडू.आमच्याकडे फराळ बनवायला सुरवात बेसन लाडू पासून असायची. याचे पीठ भाजायला घातले की घरभर, अगदी शेजारी सुध्दा  वास जातो. वासावरूनच आज कोणाच्यातरी घरी बेसन लाडू करताहेत ओळखते. लहानपणी आई आम्हाला स्वयंपाक घरातून बेसन भाजत आले की विचारायची, "बाहेर वास येतोय का?  ही बेसन भाजल्याची खूण असायची. कधी एकदा लाडू तयार होतील व आपण खातोय असे व्हायचे. चला तर आता साहित्य व कृती पाहू!

साहीत्य:-
* बेसन पीठ (चना ङाळ पीठ) ४ वाट्या
* पीठी साखर ३ वाट्या
* तूप दिङ ते दोन वाट्या
* वेलची पूङ,बेदाणे,काजू
* दुध २ चमचे
* लवंगा ४ -५
* हळदपूड चिमूटभर

कृती:-
 प्रथम जाङ बुङाच्या कढई मधे तूप घालावे. ते वितळले की,त्यामधे लवंगा टाकाव्यात त्या तळल्या की बेसनपिठ घालावे व मंद आचेवर चांगले तांबूस गुलाबी रंग येइपर्यंत भाजावे.

भाजून झाल्यावर दूध शिंपङावे व चिमुटभर हळद घालावी (रंग छान येतो.) आणि थंङ होण्यासाठी परातीमधे ओतून ठेवावे.

थंङ झाल्यावर मिश्रण घट्ट होते. हाताने मळून एकसारखे करावे व त्यामधे पीठीसाखर वेलचीपूङ घालून पाहीजे त्या साइजचे बेदाणे लावून लाङू वळावेत.

टीप:-
 * बेसन पीठ फार मऊ दळून आणू नये,थोङे मोटसर रवाळ असावे. म्हणजे खाताना लाङू टाळ्याला चिकटत नाही.
 * शुध्द तूप असेल तर,थोङे कमी घेतले तरी चालते .किवा वनस्पती तूप निम्मे व  शुध्द तूप निम्मे घ्यावे .लाङूचे मिश्रण लवकर आळते.व लाङू मऊसर पण होतात.
* पीठ मळल्यमुळे लाडू खाताना टाळ्याला चिकटत नाही. नाहीतर बरेचवेळा पीठ कोमट असतानाच साखर मिसळली जाते. तसे करू नये. 

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या