Showing posts with label Namkin. Show all posts
Showing posts with label Namkin. Show all posts

25 July 2019

मेथी नमकीन (Methi Napkin)

2 comments :
संध्याकाळच्या वेळी चहासोबत कांहीतरी चटपटीत तोंडात टाकावे वाटते तसेच मुलांना तर येता -जाता कांहीतरी खायला हवेच असते. तर बाजारी फरसाण, चिप्स खाण्यापेक्षा घरीच कांही पौष्टीक व खमंग असे करून ठेवले तर जास्तच चांगले ना..  म्हणून मी आज हे खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' केले. कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• गव्हाचे पीठ १ कप
• बारीक रवा २ टेस्पून
• मैदा १ कप
• तेल ४ टेस्पून
• कसूरी मेथी ४ टीस्पून
• तिळ १ टीस्पून
• ओवा १ टीस्पून
• मिर्यांची भरड २ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तळण्यासाठी तेल

कृती :-

प्रथम एका बाऊलमधे गव्हाचे पीठ, मैदा, रवा एकत्र करून घ्यावे. नंतर त्यामधे मीठ,ओवा,कसूरी मेथी,तीळ,मिर्यांची भरड घालून सर्व एकत्र करावे.

आता या मिश्रणामधे मोठे चार चमचे तेल घालून हाताने चोळून चांगले मिक्स करावे. कोरडे पीठ मुठीत घेऊन दाबले तर मुटका होतो का पहावे. नाहीतर अजून एखादा चमचा तेल घालावे.

नंतर अंदाज घेत -घेत पाणी घालून घट्ट पीठ मळावे.   दिलेल्या पीठाच्या प्रमाणासाठी साधारण अर्धा कप पाणी लागते.  १० मिनीटे पीठ झाकून ठेवावे.

आता खूप जाड नाही का खूप पातळ नाही अशी पोळी लाटून लांबट पट्टया कापाव्यात. गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळावेत.

थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. पाहीजे तेव्हा गरमा-गरम चहासोबत खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' चा आस्वाद घ्या.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.




20 April 2017

तांदुळाचे कुरकूुरे ( Rice Chips)

No comments :

उन्हाळ्याच्या दिवसात वाळवणाचे साठवणी पदार्थ बरेच केले जातात. उपवासाचे,  बिन उपवासाचे कुरडई, विविध प्रकारचे सांङगे ,पापड इत्यादी...की,जेणेकरून येणार्या पावसाळ्याची बेगमी झाली.एखादे दिवशी भाजी नसेल तरी तोंडीलावण्याची उणीव भासू नये. तसेच उपवासाचे काही पापड्या, चिवडा असेल तर फराळाला सोयीचे होते. आणि ते सर्व राहूदे,  तळलेले चटपटीत पदार्थ चहासोबत खायला कोणाला नाही आवडत?  सर्वानाच आवडतात. तर उन भरपूर आहे. "तांदुळाचे कुरकुरे" करून वाळवून ठेवा. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तांदुळाची पीठी मोठ्या २ वाट्या (3 दिवस तांदुळ भिजत घालून केलेली)
* पाणी २.५ + २ वाट्या
* मीठ चविनूसार (सपाट १ टीस्पून)
* ओवा, जीरे प्रत्येकी १/२ टीस्पून
* मिरची पावडर किंवा हिरवी मिरची वाटून प्रमाण आवडीनुसार (ऐच्छिक)

कृती :-
प्रथम तांदुळाची पीठी २. ५ वाट्या पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यावी. पंधरा मिनिट झाकून ठेवावी.

नंतर गँसवर २ वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे व पाण्यात तिखट,मीठ, जीरे, ओवा घालावे. पाण्याला उकळी आली की, आधी भिजवून तयार केलेल्या पीठाची धार हळू एकसारखी  त्या पाण्यात सोडावी व उलथन्याच्या टोकाने एकसारखे ढवळत रहावे. जेणेकरून गुठळी होणार नाही. पांच मिनिट झाकून वाफ आणावी. नंतर गँस बंद करून तसेच झाकून १५ मिनिट राहू द्यावे.

पंधरा मिनिटानंतर तयार पीठ घोटावे व चकली पात्रात घालून त्याच्या लांब लांब सरळ रेषा ताटात किंवा कापडावर घालाव्यात. चकली पात्राला चकली ऐवजी गाठीयाची चकती बसवावी.

उन्हात ३-४ दिवस चांगले कडकडीत वाळू द्या. नंतर हवाबंद डब्यात ठेवून द्यावे. खावे वाटेल तेव्हा तेलात तळावे व आवडत असल्यास वरून चाटमसाला, लाल मिरचीपूड शिंपडावे व खावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 February 2017

मसाला शेंगदाणे (Masala Peanuts)

No comments :

चटपटीत "मसाला शेंगदाणे" करायला व खायला अगदी सहज व सोपा प्रकार आहे. हे मसाला शेंगदाणे खासकरून "दाबेली" हा रोडसाईड स्नँक्सचा पदार्थ बनविताना त्यामधे वापरले जातात . नुसतेही येता-जाता तोंडात टाकायला चालते.तर हे घरच्या -घरीच कसे करायचे? साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* कच्चे टपोरे शेंगदाणे १ बाऊल
* तेल १-२ टेस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* चाट मसाला अर्धा टीस्पून

* सैंधव मीठ पाव टीस्पून 

कृती :-
प्रथम शेंगदाणे मंद आचेवर गुलाबी भाजून घ्यावेत. व गार होऊ द्यावेत.

नंतर व्यवस्थित सोलून, पाखडून घ्यावेत.

आता कढईमधे तेल गरम करून गँस बंद करावा. गरम तेलात, साहित्यामधे दिलेला सर्व मसाला घालून एकत्र कालवावा व सोललेले शेंगदाणे त्यामधे घालावेत. सर्व शेंगदाण्यांना मसाला लागेल असे एकत्र हलवावे. आता गँस चालू करून पाच मिनिट परतावे व गँस बंद करावा.थोडावेळ गरम कढईतच शेंगदाणे राहू द्यावेत. चांगले कडक होतात.

नंतर थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.केव्हाही खा.

टिप :-
* शेंगदाणे ओवनमधे भाजले तर अधिक चांगले. डागविरहीत व एकसारखे छान गुलाबी भाजले जातात.

* शेंगदाणे वेचून चांगले टपोरे घ्यावेत. सरमिसळ बारीक मोठे असले तर बारीक दाणे करपतात व खाताना मधे - मधे कडू लागतात. तसेच टपोरे एकसारखे दिसायलाही छान दिसतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 July 2016

दडपे पोहे (Dadpe Pohe)

No comments :

दडपे पोहे हा एक महाराष्ट्रीयन नाष्ट्याचा पदार्थ आहे. कांदा पोहे, उपमा हे पदार्थ कसे गरमा-गरम खावे लागतात तर अधिक चवदार लागतात. तसे याचे नसते हे थंडच खातात. त्यामुळे जास्त सोईचे होते.छोटेसे पिकनिक असेल तरी डब्यात नेणे सोईचे आहे. तर कसे करायचे साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* पातळ पोहे २ वाट्या
* ओलं खोबरं १/२ वाटी
* मीठ चविनूसार
* साखर १/२ लहान चमचा
* मेतकूट २ टीस्पून
* भाजलेले/तळलेले शेंगदाणे
* तळणीची मिरची १ किंवा हिरवी मिरची तुकडे
* कांदा बारीक चिरून १
* कोथंबिर, लिंबू
* फोडणी साहीत्य मोहरी, जीरे, हींग,हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-

प्रथम पोहे चाळून, निवडून एका पसरट भांड्यात घ्या. त्यावर मीठ, साखर, मेतकूट  घाला.

आता तेल गरम करून फोडणी करून घ्या. फोडणीमधे निम्मा कांदा, कढीपत्ता, मिरची घालून भाजा व तयार फोडणी थंड होऊ द्या.

आता थंड केलेली फोडणी पोह्यावर घाला व हाताने व्यवस्थित पोह्याना चोळा.

शेवटी शिल्लक अर्धा कांदा, ओलं खोबरं, लिंबू, कोथिंबिर व भाजलेले/ तळलेले शेंगदाणे घाला परत एकदा हातानेच एकत्र करा. पोहे तयार!

तयार पोहे वरून शोभेला खोबरं, कोथिंबिर घालून खायला द्या.

टीप: या पोह्यामधे आवडीनुसार कांद्याऐवजी किंवा सोबत काकडी कोचून, कोबी बारीक चिरून सुध्दा घातले तरी चवदार लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

31 October 2015

पालकाचे खारे शंकरपाळे ( Spinach Namkin)

No comments :


गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो. आज मी थोडा बदल म्हणून 'पालकाचे खारे शंकरपाळे ' बनवले. तांबूस,पोपटी रंगाचे व खमंग खुसखूषीत असे शंकरपाळे छानच लागतात.

असे कुठे आहे की दरवर्षी दिवाळीला एकच प्रकारचे पारंपारीक पदार्थ बनवावेत यावर्षी पालक शंकरपाळे करून बघा. नक्की आवडतील तूम्हालापण. कसे केले बघा.

साहीत्य :

* मैदा २ वाट्या

* रवा १/४ वाटी

* पालक प्यूरी १/२ वाटी ( कमी-अधिक होऊ शकते)

* मोहन २ टेस्पून

* मीठ चविनूसार

* हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून

* ओवा १/४ टीस्पून

* धना-जीरा पावडर १ टीस्पून

* हींग चिमूटभर

* तिळ ऐच्छिक

* तळणीसाठी तेल

कृती :-

प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यात घ्या. त्यामधे रवा व  वरील इतर सर्व कोरडे साहीत्य घालून नीट मिक्स करा.

आता मोहन घाला. परत मिश्रण हाताने नीट सगळीकडे चोळून घ्या .

आता शेवटी पालक प्यूरी अंदाज घेऊन बघत बघत मिश्रणात घालावी.पुरीच्या किवा नेहमी शंकरपाळ्या करतो,त्या कणकेप्रमाणे घट्ट कणिक मळावी. पंधरा मिनिट झाकून ठेवा.

पंधरा मिनिटानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. फार जाड अथवा पातळ नको.सुरीने अथवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे कापून गरम तेलात खरपूस तळा.

खुसखूषीत कलरफूल खारे शंकरपाळे तयार ! थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.केव्हाही नुसते किवा चहासोबत खा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 July 2015

बाॅम्बे खारे शेंगदाणे ( Bpmbay Salted Peanut)

3 comments :
मला काय किवा घरातसुध्दा सर्वाना खारे शेंगदाणे अतिशय आवडतात. खारे म्हणजे नुसते साधे मीठ लावून भाजलेले खारे शेंगदाणे नव्हे बरं का ! हे विशिष्ट पध्दतीने भाजलेले असतात व छान सोललेले गुलाबी रंगाचेअसतात. हे 'बाॅम्बे शेंगदाणे' म्हणून पण ओळखले जातात. येता-जाता तोंडात टाकायला, मुलांना खिशात भरायला छानच लागतात. मी असेच माझ्या भावाबरोबर  बोलत होते.तोच तो एकदम बोलला ,' अगं एकदम सोपे आहेत ! ' परवाच माझा एक दोस्त की ज्याच्या शेंगदाणे,पोहे ,चिरमुरे असे तयार करण्याच्या भट्ट्या आहेत.त्याचा तो व्यवसायच आहे.त्याने मला असेच बोलता बोलता बाॅम्बे शेंगदाणे कसे करतात ते सांगितलेय व मी करून पाहीलेत तू पण कर सांगतो तसे.मी पडत्या फळाची आज्ञा !  लगेच शेंगदाणे भिजत टाकले व केले छानच जमले अगदी हुबेहूब बाहेरून आणतो तसे जमले. कसे केले पहा !

साहीत्य :-
* टपोरे व वेचलेले शेंगदाणे २५० ग्रॅम
* मीठ १ टीस्पून
* पाणी शेंगदाणे भिजतील इतकेच

कृती :-
प्रथम पाणी एका बाऊलमधे घ्यावे व त्यात मीठ टाकून विरघळावावे. व त्यात शेंगदाणे भिजत टाकावेत. पाणी बेताचेच ठेवावे म्हणजे खारे पाणी पूर्ण शेंगदाणे ओढून घेतात व शेंगदाण्याना छान खारी चव येते. किमान ४-५ तास भिजू द्यावेत.

आता शेंगदाणे एका चाळणीवर काढा. शिल्लक पाणी पूर्ण निथळू द्यावे.नंतर एका स्वच्छ कपड्यावर अर्धा तास पसरावेत व सुकू द्यावेत.
आता हे शेंगदाणे मायक्रोवेव ओवनला मायक्रो मोडला हाय टेपरेचरला ७-८ मि.भाजावेत.मधेच एकदा चेक करावे हलवून. वेळ कमी-अधिक लागू शकतो.कारण प्रत्येक कंपनीनुसार ओवनचे तापमान काही प्रमाणात वेगवेगळे असू शकते.
थंड झाले की सोलून स्वच्छ करून हवाबंद बरणीमधे भरून ठेवा. खुसखूषीत खमंग 'बाॅम्बे शेंगदाणे' तयार ! वाचून झाले की तुम्हीपण पट्कन करून बघा,बरं !ओवन नसेल तरी नेहमीच्या वापरातल्या पण जाड बुडाच्या कढईत सुध्दा वाळू घालून भाजता येतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 June 2015

क्रिस्पी कारले चिप्स ( Crispy Bitter gourd Chips)

No comments :

कारल ही भाजी सर्वांच्याच परिचयाची आहे. बर्याच घरी ती कडू असते या कारणास्तव सहसा केली जात नाही.मुलांना तर अजिबातच आवडत नाही. पण कारले औषधी आहे. शक्तीवर्धक, पित्तनाशक व सारक आहे. त्यात इन्शुलीन सारखा पदार्थ असल्याने ते मधू मेहावर उपयोगी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधूमेही रूग्णानी कारल्याचा रस, बियांची पूड, किवा कारली उकडून काढाही घ्यावा. तसेच कारल्याच्या सेवनाने रक्तदाब,मेंदूचे विकार, डोळ्याच्या तक्रारी,रक्तदोष इ. पण दूर होणेस मदत होते.अशा या गुणी कारल्याला,' तूपात तळा,साखरेत घोळवा कडू ते कडूच' असे म्हणले जाते.पण मी आज जे चिप्स सांगणार आहे ते अजिबात कडू न लागता खमंग लागतात. मुलेसुध्दा आनंदाने खातात.कसे करावेत पूढे कृती बघा.

साहीत्य:-

1) पांढरी कारली 3-4
2) लाल मिरचीपूड, मीठ,चाट मसाला,आमचूर पावडर व हळद
3) तळणीसाठी तेल

कृती :-

    प्रथम कारली धुवून पुसून त्याच्या बिया काढून बोटाएवढ्या लांबीचे पातळ उभे काप करून घ्या.

नंतर हे काप मीठ व हळद घातलेल्या उकळत्या पाण्यात टाकावेत.तसेच पाच मिनिट खळखळ उकळू द्यावेत. पाच मिनीटानी गॅस बंद करून खाली उतरवा.

आता हे काप चाळणीवर काढावे व वरून थंड पाणी ओतावे.तसेच चाळणीवर निथळत राहू द्यावेत. पाणी पूर्ण निथळल्यावर कापडावर किवा पेपरवर पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्यावेत.

नंतर तेल तापत ठेवावे व गरम तेलात मंद आचेवर छान तांबूस गुलाबी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढावेत.

सगळे तळून झाले की त्यावर तिखट, मीठ, मसाला व आमचूर पावडर आपल्याचवीनुसार वरून भुरभूरावी आणि अलगद हातानी चिप्स मोडू न देता हलवावे. मस्त कुरकरीत चिप्स तयार. जेवणात साईड डीश म्हणून किवा नुसतेही चहासोबत तोंडात टाकता येते. 

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 November 2014

होममेड कुरकुरे (Homemade Kurkure)

No comments :
साहित्य:-

* मैदा २ वाट्या
* कडीपत्ता पाने १ वाटी
* हिरवी मिरची,मीठ चवीनुसार
* तेल तळण्यासाठी
* पाणी
* चाट मसाला

कृती :-
प्रथम मैदा स्वच्छ चाळून एका पसरट भांड्यामध्ये घ्यावा.नंतर कडीपत्ता,मिरची व मीठ एकत्र भरड वाटावे आणि मैदयामध्ये घालावे.दोन चमचे तेल घालावे व मैदा पाण्याने घट्ट मळून घ्यावा.अर्धा तास झाकून ठेऊन द्यावा.

अर्ध्या तासानंतर मळलेल्या पीठाचा लहान गोळा  घेऊन त्याची पातळ पोळी लाटावी व सुरीने त्याच्या बोटभर रुंदीच्या पट्ट्या कापून गरम तेलामध्ये.मंद तळाव्यात .

गार झाल्यावर.त्यावर चाट मसाला भुरभुरवा व एयरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवा.मुलांना येता-जाता तोंडात टाकण्यासाठी व मोठ्यांना सुद्धा चहा बरोबर खाण्यास छान लागतात .

बाजारी चिप्स,कुरकुरे अशा पदार्थांना उत्तम पर्याय होऊ शकतो .तसेच कडीपत्ता मध्ये calcium पण भरपूर असते .घरच्या घरी बनविले असल्याने शुध्द्ध व पौष्टिक पण झाले.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

18 October 2014

क्रिस्पी मसाला हार्टस् (Crispy masala hearts )

No comments :
दिवाळीच्या फराळात आपण नेहमीचे पारंपारिक पदार्थ बनवतोच,पण त्यात थोडाफार बदल केला तर फराळ करताना थोडी मजा येते.तर यासाठी पुढे दिल्याप्रमाणे क्रिस्पी मसाला हार्टस्  ट्राय करा.

साहीत्य :-
* मैदा १ वाटी
* गव्हाचे पिठ १/२ वाटी
* मक्याचे पिठ २ टेस्पून
* मिरची पेस्ट आवडीनुसार
* मीठ
* तिळ १ टीस्पून
* ओवा अर्धा टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून 
* कसूरी मेथी चिमूटभर
* कोथिंबीर
* गरम तेल २ टेेस्पून (मोहन)
* तळणीसाठी तेल
* चिमूटभर सोडा

कृती:-
प्रथम मैदा,कणिक मका पिठ एका पसरट भांड्यात एकत्र घ्यावे.नंतर त्यामधे वर सांगितलेला सर्व मसाला घालावा.दोन चमचे तेल गरम करून घालावे.आधि सर्व कोरडे मिश्रण हाताने सारखे करावे.नंतर पाणी घेऊन नेहमीच्या कणिकेप्रमाणे कणिक मळावी. व दहा मिनिटे झाकून ठेवावे.

दहा मिनिटानी कणकेचा लहान गोळा घेऊन,थोडी जाडसर पोळी लाटावी व हार्ट शेपच्या कटलेट मोल्डने छोटे-छोटे हार्ट कापून गरम तेलात तळावेत.

थंड झाल्यावर खुसखूषीत होतात .नंतर चहाबरोबर सर्व्ह करावेत.

टीप :- मिरची पेस्ट ऐवजी मिरची पावडर वापरली तरी चालते. किंवा आवडत असेल तर आले लसूण पेस्ट घालावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

15 October 2014

पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohyacha Chiwada)

5 comments :
ज्यांना कमी तेलकट चिवडा आवडतो त्यांच्यासाठी पातळ पोह्यांचा चिवडा हा उत्तम प्रकार आहे.तो पुढील प्रकारे करावा.

साहीत्य:-
* पातळ पोहे अर्धा किलो
* शेंगदाणे १ वाटी
* फुटाण्याची डाळ १/२ (अर्धी) वाटी
* सुक्या खोबर्याचे पातळ काप १/ ४ वाटी
* कढीपत्ता एक वाटी
* हिरवी मिरची तुकडे करून ८-१० 
*,मिठ चवीनूसार
* पिठीसाखर ऐच्छीक
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* तेल एक वाटी फोडणीसाठी
* जिरे,मोहरी,हींग,तिळ फोडणीसाठी

कृती:-
प्रथम पोहे नीट चाळून ,स्वच्छ करून कडकडीत उन्हात वाळवावेत.मिरचीचे पोट चिरून तुकडे करावेत.कढीपत्ता पाने धुवून पुसून कोरडी करून घ्यावीत .फुटाण्याची डाळ निवडून घ्यावी. खोबर्याचे पातळ काप करावेत.

आता संपूर्ण पूर्वतयारी झाली की ,गॅसवर कढई अथवा जाड बुङाचे पातेले तापत घालून तेल घालावे. तेल तापल्यावर तेलात मोहरी,जिरे तिळ व हींग हळद घालून फोडणी तडतडवून घ्यावी.फोडणीमध्ये सग्ळ्यात आधी शेंगदाणे टाकावेत. ते थोडे तांबूस झाले की, अनुक्रमे   फुटाणा डाळ,मिरची व कडीपत्ता  असे सर्व टाकावे. गॅस बंदच करावा व मीठ,साखर धना-जिरा पावडर घालावी.सर्व व्यवस्थित हलवावे. शेवटी पोहे घालावेत.नीट हलवावे. जेणेकरून सर्व मिठ मसाला पोह्याना लागावा.

आता  कढई परत गॅसवर ठेवावी.गॅस एकदम बारीक ठेवावा किंवा कढईखाली तवा ठेवावा म्हणजे खालून करपण्याची शक्यता रहात नाही व मंद आचेवर मधून-मधून चिवडा परतत रहावा.पंधरा-वीस मिनीटानी गॅस बंद करून टाकावा.
आता तयार चिवडा व्यवस्थित गार होऊ द्यावा म्हणजे छान कुरकरीत होतो.मग हवाबंद डब्यात भरावा.

टीप्स :- 
*पोहे ऊन्हात वाळविणे सोयिचे नसेल तर पातेले गरम करून घ्यावे(गॅस बंद करावा) व त्यात आधि चिमूटभर मिठ टाकावे व नंतर पोहे टाकावेत व हलवून पंधरा मिनीट त्यातच ठेवावेत म्हणजे चिवडा कुरकूरीत होतो.मिठामूळे  पोहे आकसण्याचा धोका रहात नाही.
* तेलात सर्व मसाला मिठ घातल्याने नीट विरघळते व सगळीकडे व्यवस्थित लागते
*खोबर्याचे काप पातळ व सहज करता यावेत म्हणून खोबर्याच्या वाट्या पंधरा मिनिट कोमट पाण्यात टाकाव्यात.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 October 2014

चकली (Chakali)

No comments :

दसरा झाला की,दिवाळीचे वेध लागतात.आता
दिवाळी म्हणले की फराळ आलाच.आणि फराळात लाडू पाठोपाठ चकली जास्त आवडीची .आता अशा या चकलीचे नाव निघाले की,मात्र चकलीच्या आधि करणारीच्या अंगावर काटा उभा रहतो.तिच्या प्राप्ती साठी  भाजणे-दळणे-मळणे-तळणे असा चक्कर येणारा वळणांचा प्रवास असतो. एखाद्या वळणावर थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर ती रूसलीच म्हणून समजा .कधी खाणार्याच्या दातांची सत्व परिक्षा नाहीतर ,कधी कपडे वाळत घालायच्या दोरीचे रूप घेते.मग तिला  लाईनवर आणण्यासाठी घाल, पाणी घाल,भाजाणी असे करत-करत परातभर चकल्यांचे विविध नमुने तयार होतात.अशी फजीति टाळायची असेल तर,भाजाणीपासून सर्व क्रिया लक्षपूर्वक कराव्यात.चकल्या बर्याच प्रकारे करता येतात.त्यापैकी भाजाणीच्या चकलीचा प्रकार खाली दिला आहे.भाजाणीची कृती या आधिच्या "चकलीची भाजाणी" या रेसिपी मधे आहेच.

साहीत्य:-
* चकलीची भाजाणी २ वाट्या 
* तेलाचे मोहन ४ टीस्पून
* पाणी १ वाटी
* मिरची पूड १ टीस्पून
* मिठ १ टीस्पून
* तिळ १ टीस्पून           
* ओवा १ टीस्पून
* हींग १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* तळणीसाठी तेल

कृती:-
 प्रथम एका पसरट भांड्यामधे भाजणीचे पीठ घ्यावे.त्यामध्ये वरील सर्व कोरडा मसाला घालावा व नीट मिक्स करावे.

नंतर तेल गरम करून (मोहन) घालावे.परत नीट मिक्स करावे.सगळीकडे पीठाला नीट चोळावे.
शेवटी पाण्यात मीठ टाकून ते विरघळून उकळलेले गरम पाणी घालून सर्व पीठ हलवून दडपून दहा ते पंधरा मिनीटे झाकून ठेवावे.

आता पंधरा मिनिटानी थोडे-थोडे पीठ घेऊन थंड पाण्याने मळावे व चकलीच्या साच्यातून चकल्या पाडाव्यात व गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात.
तळून झाल्यावर चाळणीवर काढाव्यात.पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

टीप्स :-
* पीठ हाताने चांगले मळावे.नाहीतर चकल्या तुटतात.
* चकल्या तेलात सोडताना तेल चांगले गरम असावे,मात्र चकली तेलात सोडल्यावर गॅस थोडा कमी करावा.म्हणजे चकली न जळता पोटातून छान तळते व कुरकूरीत होते.
फार गरम तेलात चकल्या वरून करपतात व पोटात मऊ रहातात  व फार गार कमी तापलेल्या तेलात टाकताच विरघळतात.म्हणून योग्य तापमान ठेवावे.
* चकलीमधे हळद घालू नये.चकलीचा रंग काळा येतो.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 September 2014

कटकट्या (Katkatya )

No comments :
कटकट्या हा एक स्नँक्स चा खारा व चटपटीत पदार्थ आहे. करायला एकदम सोपा व कमी साहित्यात होतो. एकमात्र आहे याचे की टिकत मात्र अजिबात नाही. चविला इतका छान असतो की खाऊन लगेच संपतो. चला तर साहित्य व कृती पहा.

साहित्य:-
* मैदा ५०० ग्रॅम (६ मध्यम वााटी)
* तिळ ३ टीस्पून 
* हिरवी मिरची बारीक चिरून,कढीपत्ता चिरून
* खवलेले ओले खोबरे १वाटी
* मीठ, ३ टीस्पून
* हिंग १ टीस्पून
* मोहन ४ टेस्पून
* पाणी १ १/२ (दीड) वाटी
* तेल तळणीसाठी 

कृती:-
 सर्वप्रथम मैदा चाळुन एका पसरट भांङ्यामधे घ्यावा. त्यामधे वरील सर्व साहीत्य घालून गरम तेल घालावे व पाणी घेऊन घट्ट गोळा मळावा.  पंधरा मिनिटे झाकून ठेवा.

नंतर तयार पीठाचे ,आपण उन्हाळी साठवणीचे भाजीचे  सांङगे जसे हाताने तोङतो,त्याप्रमाणे हातानेच लहान-लहान तूकङे तोङावेत व गरम तेलात मंद आचेवर तळून काढावे.

गार झाल्यावर छान कुरकूरीत होतात.हवाबंद डब्यात भरून ठेवावे.केव्हाही चहा बरोबर अथवा नुसते पण स्नॅक म्हणून खाण्यास छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

09 September 2014

खमंग कुरकूरे /स्ट्रीप्स ( Tasty strips/kurkure )

No comments :


साहीत्य:-

1) उङीद ङाळ 1 वाटी
2) मूग ङाळ 1 वाटी
3) बेसनपिठ 1वाटी
4) तिखट, मीठ, हींग, हळद, लिंबू रस, तळून वाटलेली पुदीना, कङीपत्ता पाने, भाजलेले तिळ
5) तेल

कृती:-

     दोन्ही ङाळी भाजून रवाळ दळून घ्याव्यात.बेसन पिठ घेऊन त्यामधे हा रवा व वरील मसाले घालावे.गरम तेल घालून थोङे घट्टच असे पिठ मळावे. दहा मिनीटानी पोळी लाटून त्याच्या पट्या कापा व गरम तेलात  तळाव्यात.

लहान मुलाना ह्या पौष्टीक व चटपटीत स्ट्रीप्स खूप आवङतात. व चहा बरोबर पण छान  लागतात.