24 July 2017

रवा टोस्ट (Rava Toast)

No comments :

"रवा टोस्ट " यालाच "एगलेस फ्रेंच टोस्ट" ही म्हणतात. रवा टोस्ट झटपट होणारा रोडसाईड स्नँक्स चा प्रकार आहे. तसेच सकाळचा नाष्टा किंवा संध्याकाळचे स्नँक्स अथवा मुलांना डब्यात देण्यासाठी पण उपयुक्त पदार्थ आहे. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ब्रेड स्लाइस ६
* बारीक रवा १ वाटी
* दही १/२ वाटी
* कांदा लहान १ बारीक चिरून
* शिमला मिरची लहान १ बारीक चिरून
* टोमँटो १ बारीक चिरून
* कोथिंबिर चिरून
* आलं, चिरून
* हिरवी मिरची बी काढून बारीक च्रिरलेली १
* मीठ चविनुसार
* चिमुटभर साखर
* शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी
* बटर

कृती :-
प्रथम रवा एका बाऊलमधे घेऊन त्यामधे दही घालावे व एकत्र ढवळावे. आता  मिश्रण भिजेपर्यंत कांदा, टोमँटो, मिरची, कोथिंबिर, आलं सर्व बारीक चिरून घ्यावे. आधीच चिरून ठेवलेले असेल तरी चालते.

एव्हाना रवा भिजला असेल. आता त्यामधे चिरलेल्या भाज्या,कांदा, कोथिंबीर, मीठ, साखर सर्व साहित्य मिसळावे व मिश्रण तयार करावे.

आता गँसवर तवा गरम करायला ठेवावा व गरम होंईपर्यंत ब्रेड चा एक स्लाईस घ्यावा. त्यावर शेजवान चटणी लावावी व रव्याचे तयार मिश्रण त्यावर व्यवस्थित पसरावे. असे एकावेळी दोन स्लाईस तयार करायचे.

आता गरम तव्यावर थोडे बटर पसरून ब्रेडची मिश्रण लावलेली बाजू तव्याला चिकटेल अशा पध्दतीने ब्रेड स्लाईस तव्यावर ठेवावे. ब्रेडला वरच्या बाजूने पण बटर लावावे. व मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजावे. मधेच उलटे-पालटे करावे. करपू देऊ नये. भाजेपर्यंत दुसरे स्लाईस मिश्रण लावून तयार करावेत.

आता तयार टोस्ट कटरने मधून तिरके कापावा व  साँस किंवा हिरव्या चटणी सोबत खायला द्यावे.

खुसखूषीत गरम टोस्ट नाष्ट्याला एकदम चविष्ट लागतो व झटपट होतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.

टिप्स :-
* आपल्या आवडीनुसार बारीक चिरून पालक,कांदापात गाजर, बीट काकडी रव्याच्या मिश्रणात घातले तरी चालते.
* मिश्रण फार पातळ करू नका. घट्टच असावे.
* दही खूप आंबट असू नये. ताजे असावे.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 July 2017

ब्रेड पकोडा (Bread Pakoda)

No comments :

"ब्रेड पकोडा " रोड साईड स्नँक्स चा प्रकार आहे. करायला सोपा, पट्कन होणारा व तसा इतर भजी प्रकारांच्या तुलनेत पोटभरीचा आहे. साहित्य व कृती-👇

साहित्य :- कव्हर साठी
* ब्रेड स्लाइस ६
* चणा डाळ पीठ १ वाटी
* तांदुळाचे पीठ २ चमचे
* लाल मिरची पावडर
* हळद
* मीठ
* ओवा
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* लिंबू रस १ टीस्पून
* सोडा चिमुटभर
* तेल तळण्यासाठी
आतील सारण साहित्य :-
* उकडलेले बटाटे ४
* कांदा १
* टोमँटो १
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* कोथिंबिर बारीक चिरून
* मोहरी, हींग, हळद
* तेल
* मीठ
* साखर चिमूटभर

कृती :-
प्रथम उकडलेले बटाटे मँश करून घ्यावेत. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा. टोमँटो बारीक चिरून घ्यावा. तेल गरम करून हींग, मोहरी हळद फोडणी करून त्यावर कांदा, आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट, टोमँटो घालून परतावे. त्यावर मँश केलेला बटाटा, चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर  घालून परतावे. शेवटी ओलसरपणासाठी  चमचाभर पाणी  व कोथंबिर घालावी . हलकी वाफ काढून गँस बंद करावा. भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावी.

आता एका बाऊलमधे डाळीचे पीठ, तांदुळ पीठी व तिखट-मीठ, हळद, ओवा, धना-जिरा पावडर सर्व मसाला घालून व्यवस्थित एकत्र करावे व गरजेनुसार पाणी घालून सरसरीत पीठ भिजवावे. फार पातळ अथवा धट्ट नको.

नंतर तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम होईपर्यंत दोन ब्रेड स्लाईस घ्यावेत. एकावर तयार भाजी सारण पसरावे. दुसरा स्लाईस त्यावर ठेवून हलकेच दाबून बंद करा. आता चाकूने मधून तिरके कापून दोन भाग करावेत. असे सर्व स्लाईस तयार करून घ्यावेत.

आता तेल गरम झाले असेल. पीठाच्या घोळमध्ये लिंबू व सोडा घालून ढवळावे. आता ब्रेडस्लाईस पीठाच्या घोळात बुडवून तेलात सोडावा व मध्यम आचेवर तांबूस तळावे. गरम-गरम खायला द्यावेत.

कोणताही पदार्थ गरम चांगलाच लागतो तरीही खासकरून भजी हा प्रकार कढईतून काढून लगेच प्लेटमध्ये आला तर मजा काही औरच. कारण गरम असताना कुरकुरीत लागतात. थंड झाल्यावर लगेच मऊ पडतात.

टीप्स :-
* लिंबू रस व सोडा ऐत्यावेळीच घालावा.
* ब्रेड स्लाइस पीठात बुडवताना कडे कडेने फिरवत आधी कडा बुडवाव्यात. भाजी बाहेर येत नाही.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 July 2017

मसाला पापड ( Masala Papad)

No comments :

आपण कधीतरी बाहेर हाँटेलमधे जेवायला गेलो तर जेवण येईपर्यंत टाईमपास म्हणून किंवा सूप सोबत हमखास कांहीतरी स्टार्टर मागवतो. त्यातलाच हा एक पदार्थ 'मसाला पापड '. पण काय होते, आपण मागवतो मसाला पापड व आपण कडे-कडेने मोडून खाईपर्यत मऊ पडतो व मध्यभागी ओला मसाला.. मऊ पडलेला पापड सर्व मिळुन कोशिंबिरच होते. म्हणून मसाला पापड घरात करायचा असेल तर पुढे दिलेल्या पध्दतिने केला तर शेवटी शेवटी कोशिंबिर न होता मसाला पापड खाण्याचा आनंद शेवटपर्यंत मिळतो कसा करायचा पहा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मिनी /डिस्को पापड २० -२५
* कांदा बारीक चिरून १
* लाल टोमँटो बारीक चिरून १
* हिरवी मिरची, कोथिंबिर बारीक चिरून
* बारीक शेव
* चाट मसाला
* लाल मिरचीपूड
* मीठ
* तेल पापड तळण्यासाठी

कृती,:-
प्रथम पापड तळून टीश्यू पेपरवर काढावेत.

नंतर एका बाऊलमधे चिरलेला कांदा, टोमँटो, मिरची कोथिंबीर, तिखट मीठ सर्व एकत्र करून मसाला तयार करावा.

आता तळलेले पापड एका मोठ्या प्लेटमध्ये गोलाकृती लावून घ्यावेत व त्या प्रत्येक पापडावर तयार मसाला चमच्याने थोडा -थोडा ठेवावा. शेवटी वरून चाटमसाला भुरभूरावा व बारीक शेव घालून खायला द्यावे.

अशा पध्दतीने केलेले मसाला पापड खाई खाईपर्यंत मऊ पडत नाही. व शेवपुरी सारखे अखंड उचलून एकेक तोंडात घालता येतात.

या मसाल्यात आपण विविधता आणू शकतो. जसे की कांदा, टोमँटो व मोड आलेले हिरवे मूग घेऊ शकतो. उकडलेले चणे, कांदा, लिंबू घेऊ शकतो.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 July 2017

कोल्हापुरी तांबडा -पांढरा रस्सा (Kolhapuri Rassa)

1 comment :

रस्सा म्हटले की डोळ्यासमोर मस्त लालभडक नाँनवेज झणझणीत कोल्हापुरी रस्सा येतो. पण मी वेज तांबडा व पांढरा रस्सा बनवलाय. कारण शाकाहारी लोकांनाही मस्त चमचमीत खायला आवडते मात्र फक्त शाकाहारामधे. मग काय करावे?  खरे पहाता मांसाहारी व शाकाहारीमधे जे मसाले वापरले जातात ते सारखेच असतात. फक्त तयार रस्यामधे मटण वापरले तर मांसाहारी व बटाटे, भाज्या, कडधान्य वापरले तर शाकाहारी रस्सा. तर आता रस्सा कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
तांबडा रस्सा
* मोठे कांदे २
* उकडलेला बटाटा २
* लसूण पाकळ्या ८ -१०
* आलं १ इंच
* सुकं खोबरं १ /४ वाटी
* तिळ १ टेस्पून
* खसखस १/२ टेस्पून
* काळे मिरे ७-८
* लवंगा ४
* दालचिनी २ इंच
* धणे १ टीस्पून
* जीरे १/२ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टेस्पून
* हळद १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* तेल १ वाटी (जास्त कट/तवंग पाहीजे असेल तर जास्त)
* पाणी गरजेनुसार

साहित्य
पांढरा रस्सा :-
* कांदे २
* आलं-लसूण
* नारळाचे दूध २ वाट्या
* खसखस १ टेस्पून
* तिळ १ टेस्पून
* काजू ८ -१०
* काळी मिरी ४+४
* लवंगा २+२
* दालचिनी २ इंच
* तमालपत्रं मोठी दोन
* जीरे फोडणी साठी
* मोठी वेलची दाणे १ वेलचीचे
* हिरवी वेलची २
* तेल २ टेस्पून
* पाणी गरजेनुसार

कृती :-
तांबडा रस्सा
प्रथम कांदा पातळ उभा चिरून घ्यावा. नंतर कढईत आधी कोरडेच तिळ,खसखस, खोबरे भाजून घ्यावे. नंतर सुके खोबरे परतावे. शेवटी किंचित तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. सर्व थंड होऊ द्यावे.

नंतर मिक्सरमधे भाजून घेतलेले साहित्य  व  आलं लसूण, मिरी, लवंग दालचिनी सर्व मिक्सरमधे वाटून पेस्ट तयार करावी.

आता तेल गरम करून हळद, लाल मिरचीपूड घालावे. त्यावर तयार पेस्ट घालावी. गरजेनुसार पाणी घालावे. उकळी आली की चविनुूसार,मीठ घालावे व शेवटी बटाट्याच्या मोठ्या फोडी घालाव्यात. चांगले उकळवावे. तांबडा रस्सा तयार. भाकरी, भातासोबत किंवा अगदी ब्रेडसोबतही मस्तच लागतो. आवडत असल्यास सोबत कांदा, लिंबू घ्यावे.

पांढरा रस्सा -
हा सूप प्रमाणे जेवणाच्या आधी पितात. अँक्च्युली यामधे मटण शिजवताना जे पाणी वापरतात ते पाणी स्टाँक म्हणून वापरतात. पण मी साधे पाणी व नारळाचे दूध वापरून वेज पांढरा रस्सा बनवलाय.

प्रथम कांदा सोलून उकळत्या पाण्यात टाकून उकडून घ्यावा. नारळाचे दूध मिक्सरमधे तयार करून घ्यावे. तिळ, खसखस व काजू आधीच पाण्यात भिजत टाकून घ्यावेत.

आता उकडलेला कांदा, आलं-लसूण, तिळ, खसखस, काजू यांची एकदम मऊ पेस्ट करून घ्यावी. पेस्ट तयार करताना बाकी मसाले लवंग, दालचीनी, काळे मिरे, वेलची सर्व घालावेत.

नंतर एका पातेल्यात तेल गरम करावे व जीरे लवंगा, दालचिनी मिरे व तमालपत्रं फोडणीत घालावे. त्यावर वाटून तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट घालावी व थोडेच परतून २ वाट्या पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून चांगले उकळून घ्यावे.

सर्वात शेवटी नारळाचे दूध घालावे व एकच उकळी आणून गॅस बंद करावा. जास्त उकळले तर नारळाचे दूध फाटते.

गरमा-गरम सूप प्रमाणे प्यावा. सर्व मसाल्यांचा मस्त सुगंध येत असतेा. नुसतेच प्यायला खूप छान लागतो.

टिप्स :-
आपल्या आवडीनुसार तांबड्या रश्यामधे बटाच्याऐवजी मोडाची मटकी,सोया चंक्स किंवा इतर कडधान्ये पण वापरू शकतो.

पांढरा रस्सा फोडणी अगदी कमी तेल वापरावे.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 July 2017

भाताचे थालीपीठ (Rice Thalipith)

No comments :

आपण घरात रोज शक्यतो मापात गरजेइतकाच स्वयंपाक करतो. तरीही एखादे दिवशी घरातले नोकरी -उद्योगानिमित्त बाहेर  गेलेले मेंबर कांही कारणाने म्हणजे आँफीस मधील सहकार्यांचे वाढदिवस, निरोप संमारंभ किंवा इतर कांही कारणाने बाहेरून खाऊन येतात. मग घरी जेवायला भुक नसते. परिणामत: अन्न शिल्लक रहाते व या शिल्लक अन्नाचे करायचे काय प्रश्न पडतो. बरं शिळे अन्न खाऊ नये म्हणतात. एकतर ते पचायला जड, दुसरे म्हणजे शिळ्या अन्नात कांही सत्व नसतात. नुसता चोथाच असतो. त्यामुळे शरीराला याचा कांहीच उपयोग नाही. झाला तर अपायच! इतके सर्व माहीत असूनही आपल्या हातून अन्न फेकून देणे, वाया घालवणे जमत नाही. बरं खावे तर ती शिळं अन्न संपवण्याची जवाबदारी एकटया गृहीणीवरच पडते. मला तर गार, शिळं अन्न अजिबात आवडत नाही. मग कधी पोळी उरली तर फोडणीची कर,लाडू कर किंवा भात असेल तर फोडणीचा किंवा दहीभात कालव असे  करायचे व घरातील सर्वानाच खाऊ घालायचे. असे केले की सर्वजण आवडीने खातात. पण कधी -कधी हेही करून किंवा खाऊन कंटाळा येतो. तर मी यांत बदल म्हणून भाताची थालीपीठं केली. अतिशय खमंग व खुसखूषीत होतात. आपल्या नेहमीच्या नुसत्या पीठाच्या थालीपीठापेक्षाही जास्त चांगले लागते. व गंमत म्हणजे यालाच घरात जास्त मागणी वाढली.. एकेकदा तर मी मुद्दाम ताजा भात शिजवून अशी थालीपीठे करते. ☺ तुम्हीही करून बघा. आणी हो, अजून एक म्हणजे मोठे उपवास असले की त्यादिवशी उपवासाचे बरेच पदार्थ केले जातात. त्यामुळे जर वरीचा भात शिल्लक राहिल्यास दुसरे दिवशी कोण खाणार? तर तो ही वापरला तरी चालतो. मी शिल्लक वरीचा भात वापरूनच फोटोतील थालीपीठं केलीत. तर ही खमंग थालीपीठं कशी करायची साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* शिजवलेला मऊ भात
* थालीपिठाची भाजणी पीठ
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* धना-जिरा पावडर
* हळद, हिंग
* मीठ
* कांदा बारीक चिरून
* कोथंबिर चिरून
* तेल भाजण्यासाठी

कृती :-

प्रथम, भात जर फडफडीत असेल तर पाण्याचा हबका मारून कुकरला एक शिट्टी काढून मऊ करून घ्यावा.

नंतर आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट व भात एकत्र मिक्सरमधे फिरवून काढावे.

नंतर ताटात काढून त्यामधे गोळा होण्या इतपत, मावेल तेवढे भाजणीचे पीठ, हळद, मीठ, हिंग, धना-जिरा पावङर व बारीक चिरलेला कांदा, कोथंबिर सर्व मसाला घालून मळावे. पीठ मळताना हाताला चिकटू नये म्हणून फक्त पाण्याचा ओला हात घ्यावा. पीठात पाणी घालू नये.

आता गार तव्याला तेल लावून, पीठाचा लहान गोळा त्यावर थापावा. थोडे जाडसर ठेवावे. मधे छिद्र करून तेल सोडावे. कडेने पण तेल सोडून झाकून ठेवावे. दोन मिनिटानी उघडून खरपूस भाजू द्यावे. एक बाजू झाली की दुसरी बाजूही तेल सोडून खरपूस भाजावी. थालीपीठ भाजताना गँस मंद ठेवावा. नाहीतर फक्त वरवर भाजले जाते व मऊ लागते. तेल जरा सढळ हातानेच सोडावे. मस्त खरपूस व खुसखूषीत होतात. लगेच गरमा-गरम खमंग थालीपीठ दही, लोणी, लोणच्यासोबत खायला द्या.

आता लगेच दुसरे थालीपीठ लावायला घ्यावे. मात्र आता तवा गरम असणार आहे. तर पहिले थालीपीठ भाजत असतानाच प्लास्टिक पिशवी, कागदाला तेल लावून त्यावर थालीपीठ थापून तयार करा व पहिले काढले की गरम तव्यावर तेल सोडून दुसरे टाका व पहिल्याप्रमाणेच भाजून घ्यावे.

अशा पध्दतीने तुम्हीही "भाताची थालीपीठं" करून बघा. नक्की आवडतील.

टिप्स :-
* भात शिळा, फडफडीत असेल तरच परत शिट्टी घेऊन, मिक्सरमधून काढावा. ताजा घेणार असाल तर मऊच शिजवावा व हाताने मळावा.
* भाजणीचे पीठ नसेल तर ज्वारीचे, गव्हाचे, बाजरी, तांदुळ किंवा सर्व पीठं थोडी- थोडी घेतली तरी चालते .
*  बारीक चिरून पालक, मेथी किंवा कसूरी मेथी पीठात घातली तर अजून एक छान वेगळी चव लागते.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 July 2017

उपवासाचे डोसे -२ (Fasting Dosa)

No comments :

उपवास, व तो ही मोठा म्हणजे आषाढी, कार्तिकी एकादशी किंवा महाशिवरात्री म्हटले की दुसरे दिवशी सुटणारा. तर दिवसभरच उपवासाचे पदार्थ लागतात.त्यामुळे शाबुूदाणा खिचडी व्यतिरीक्त नवनवे पदार्थ हवे असतात तसेच ते खमंगही हवेत, तेलकट नको..! अशावेळी सकाळच्या नाष्ट्याला किंवा संध्याकाळच्या खाण्याला हे डोसे करावेत. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* उपवासाची भाजाणी २ वाट्या
* भिजवलेला शाबुदाणा अर्धी वाटी
* उकडलेला बटाटा मध्यम आकार १
* आंबट ताक अर्धी वाटी किंवा पातळ दही
* हिरवी मिरची पेस्ट
* जीरे
* मीठ चवीनुसार
* इनो पावडर १ टीस्पून
* तेल किंवा तूप
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम शाबुदाणा, जीरे, मिरची पेस्ट थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. उकडलेला बटाटा किसून घ्यावा.

आता एका बाऊलमधे भाजाणी घेऊन त्यामधे वाटलेले मिश्रण, उकडलेला बटाटा, ताक व चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण डावाने एकत्र करावे. गरजेनुसार पाणी घालावे. फार पातळ अथवा धट्ट नको.नेहमीच्या डाळ -तांदूळ डोशा पीठाप्रमाणे असावे. अर्धा तास झाकून ठेवावे.

अर्ध्या तासानंतर  तवा तापत ठेवावा व पीठ परत एकदा डावाने हलवून इनो पावडर घालावी व ढवळावे.

आता तवा तापला असेल तर तव्यावर पाणी शिंपडावे व नैपकिनने पुसून हलकेच तेल लावावे. आता तवा तयार झाला. त्यावर डावाने पीठ घालून गोल फिरवावे व झाकून ठेवावे.

खरपूस वास सुटला की झाकण उघडून थोडे तेल सोडावे व उलटून दुसरी बाजूही तांबूस भाजून घ्यावी.

आता हिरवी मिरची-खोबर्याची किंवा उपवासाची लाल चटणी सोबत खायला द्यावे. आवडत असल्यास सोबत दही, शेंगा घ्याव्यात.

डोसा अतिशय खमंग व खुसखूषीत लागतो.

टिप्स :-
* उपवासाची भाजाणी ऐवजी वरी तांदुळ घेतले तरी चालते. ते रात्रीच ताकात भिजवून दुसरे दिवशी शाबुदाण्या सोबत वाटून घ्यावे.

*.मिश्रणात आपल्याला उपवासाला चालत असेल तर आलं व कोथिंबिर घालावी.

* इनो पावडर शेवटी, डोसे काढायच्या वेळी अगदी आयत्यावेळी घालावी.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 July 2017

तिळ-गुळाच्या वड्या (Til-Gul Wadi)

No comments :

संक्रांत ! आपल्या सर्व सणापैकी हा एकच सण असा आहे की,तो कायम 14 जानेवारीलाच येतो क्वचित 15 जानेवारीला.या दिवसात थंडी भरपूर असते व हवेमधे कोरडेपणा अधिक असतो व थंडीत आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थांची अधिक गरज असते.म्हणूनच  तिळ,गुळ,खोबरे तूप हे सर्व आपल्या पोटात जावे अशा योजनेने या वड्या करण्याची प्रथा पडली आहे.त्यातही कोणी लाडू बनविते तर कोणी वड्या.पूर्वी तर तिळ भाजून त्यात गुळ मिसळून वाटीत ठेवत असत.वड्या सुध्दा बर्याच पध्दतीने बनवितात कडक, मऊ, कुरकूरीत,चिक्की ! तर मी आज मऊ वड्या बनविणार आहे.कशा प्रकारे ते पहा.

साहीत्य :-

१) तिळ २ वाट्या
२) शेंगदाणे २ वाट्या
३) गूळ चिरून २ वाट्या
४) डेसिकेटेड कोकोनट पाव वाटी
५) वेलची पूड स्वादासाठी (ऐच्छीक)
६) तूप २ चमचे

कृती :-
प्रथम तिळ व शेंगदाणे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावेत.थंड होऊ द्यावेत.

नंतर शेंगदाणे सोलून, पाखडून, कुटून घ्यावेत.एकूण तिळापैकी अर्धे तिळ भरड कुटावेत.व अर्धे तसेच ठेवावेत.(दाताखाली तिळ आले की वडी खूप खमंग लागते)

आता शेंगदाण्याचे कूट,तिळाचे कूट व शिल्लक ठेवलेले तिळ आणि वेलची पूड सर्व नीट मिक्स करून तयार ठेवावे.एका ताटाला तूपाचा हात चोळून ताट पण तयार ठेवावे.

नंतर गॅसवर एक जाड बुडाचे ठेवून पातेल्यात गुळ घालावा व गरज असेल तरच म्हणजे गुळ फार कोरडा किवा टणक असेल तरच दोन चमचे पाणी घालावे व विरघळेपर्यंत हलवावे.

पाक करू नये फक्त गुळ विरघळून फेसाळून वर आला की गॅस बंद करावा व झटपट तयार करून ठेवलेले मिश्रण त्यात घालावे.सर्व मिश्रण नीट हलवावे आणि आधिच तूप लावलेल्या ताटाला मिश्रणओतून वाटीने थापावे.(ही सर्व क्रिया झटपट करावी)

गरम असेपर्यंतच वरून थोडे डेसिकेटेड कोकोनट भुरभुरून पसरावे व किंचित दाबावे .चाकूने हव्या त्या आकाराच्या वड्या कापण्यासाठी रेषा पाडून ठेवावायात.

थंड झाल्यावर वड्या काढाव्यात व व्यवस्थित डब्यात भरून ठेवाव्यात.

संक्रांती दिवशी आधि देवाला नैवेद्य दाखवून व नंतर आपल्या नातेवाईक,मित्र-मैत्रिणीना हातावर गोड व खमंग वडी ठेउन, 'तिळगुळ घ्या गोड बोला ' असे म्हणावे.

मला खात्री आहे की अशा पध्दतीने जर ,वड्या बनविल्या तर नक्कीच ,खाणारा खूष होईल व आपोआपच गोड बोलेल !

टीप :- तिळ व शेंगदाण्याचे कूट याचे जे कोरडेमिश्रण  तयार करतो त्याचे निम्मे गुळ घ्यावा. वर दिलेल्या प्रमाणा पेक्षा कमी-अधिक लागू शकतो.कारण शेगदाणे कुटले की कमी होणार!

डेसिकेटेड कोकोनट वरून सजावटी साठी न लावता आतच मिसळले तरी चालते.