04 February 2020
पाईनँपल हलवा ( Pineapple Halawa)
साहित्य :
• रवा - १ कप
• साखर - १ १/२ कप
• अननसाचे बारीक तुकडे - १ कप
• अननसाचा गर - १ कप
• साजुक तूप - १ कप
• गरम पाणी - २ कप
• चिमुटभर मीठ
• वेलची पावडर - १टीस्पून
• काजू,बेदाणे
कृती :-
प्रथम रवा साजुक तुपावर खमंग भाजून घ्यावा.
ऩंतर त्यामधे सावकाशपणे गरम पाणी घालून दोन मिनीट वाफवावा म्हणजे रवा फुलतो.
नंतर त्यामधे साखर,मीठ,अननसाचा गर व तुकडे घालून साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,कडेने थोडे तूप सोडून परत दोन मिनिटे वाफ काढावी.
अननसाचा गर व लहान तुकडे
शेवटी वेलचीपूड व काजू, बेदाणे घालून गरमा-गरम लुसलुशीत 'पाईनँपल हलवा' डीशमधून खायला द्यावा व प्रतिसादाची वाट पहावी. 'व्वा मस्तच!' असे उद्गगार नक्कीच कानी पडतील. तुम्हीही नक्की करून बघा व प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.
टिप्स :
• अननस छान पिकलेला मधूर वासाचा आणावा.
• हलव्यामधे पाण्याच्या जागी दुधाचा वापर अजिबात करू नये.
• तूप दिलेल्या प्रमाणातच वापरावे. नाहीतर हलवा मोकळा, लुसलुशीत होण्याऐवजी चिकट होतो.
• हलव्याचा गडद पिवळा रंग हवे असल्यास केशर किंवा खाद्यरंग वापरावा. मी नाही वापरला. ऐच्छिक आहे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
03 July 2017
तिळ-गुळाच्या वड्या (Til-Gul Wadi)
संक्रांत ! आपल्या सर्व सणापैकी हा एकच सण असा आहे की,तो कायम 14 जानेवारीलाच येतो क्वचित 15 जानेवारीला.या दिवसात थंडी भरपूर असते व हवेमधे कोरडेपणा अधिक असतो व थंडीत आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थांची अधिक गरज असते.म्हणूनच तिळ,गुळ,खोबरे तूप हे सर्व आपल्या पोटात जावे अशा योजनेने या वड्या करण्याची प्रथा पडली आहे.त्यातही कोणी लाडू बनविते तर कोणी वड्या.पूर्वी तर तिळ भाजून त्यात गुळ मिसळून वाटीत ठेवत असत.वड्या सुध्दा बर्याच पध्दतीने बनवितात कडक, मऊ, कुरकूरीत,चिक्की ! तर मी आज मऊ वड्या बनविणार आहे.कशा प्रकारे ते पहा.
साहीत्य :-
१) तिळ २ वाट्या
२) शेंगदाणे २ वाट्या
३) गूळ चिरून २ वाट्या
४) डेसिकेटेड कोकोनट पाव वाटी
५) वेलची पूड स्वादासाठी (ऐच्छीक)
६) तूप २ चमचे
कृती :-
प्रथम तिळ व शेंगदाणे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावेत.थंड होऊ द्यावेत.
नंतर शेंगदाणे सोलून, पाखडून, कुटून घ्यावेत.एकूण तिळापैकी अर्धे तिळ भरड कुटावेत.व अर्धे तसेच ठेवावेत.(दाताखाली तिळ आले की वडी खूप खमंग लागते)
आता शेंगदाण्याचे कूट,तिळाचे कूट व शिल्लक ठेवलेले तिळ आणि वेलची पूड सर्व नीट मिक्स करून तयार ठेवावे.एका ताटाला तूपाचा हात चोळून ताट पण तयार ठेवावे.
नंतर गॅसवर एक जाड बुडाचे ठेवून पातेल्यात गुळ घालावा व गरज असेल तरच म्हणजे गुळ फार कोरडा किवा टणक असेल तरच दोन चमचे पाणी घालावे व विरघळेपर्यंत हलवावे.
पाक करू नये फक्त गुळ विरघळून फेसाळून वर आला की गॅस बंद करावा व झटपट तयार करून ठेवलेले मिश्रण त्यात घालावे.सर्व मिश्रण नीट हलवावे आणि आधिच तूप लावलेल्या ताटाला मिश्रणओतून वाटीने थापावे.(ही सर्व क्रिया झटपट करावी)
गरम असेपर्यंतच वरून थोडे डेसिकेटेड कोकोनट भुरभुरून पसरावे व किंचित दाबावे .चाकूने हव्या त्या आकाराच्या वड्या कापण्यासाठी रेषा पाडून ठेवावायात.
थंड झाल्यावर वड्या काढाव्यात व व्यवस्थित डब्यात भरून ठेवाव्यात.
संक्रांती दिवशी आधि देवाला नैवेद्य दाखवून व नंतर आपल्या नातेवाईक,मित्र-मैत्रिणीना हातावर गोड व खमंग वडी ठेउन, 'तिळगुळ घ्या गोड बोला ' असे म्हणावे.
मला खात्री आहे की अशा पध्दतीने जर ,वड्या बनविल्या तर नक्कीच ,खाणारा खूष होईल व आपोआपच गोड बोलेल !
टीप :- तिळ व शेंगदाण्याचे कूट याचे जे कोरडेमिश्रण तयार करतो त्याचे निम्मे गुळ घ्यावा. वर दिलेल्या प्रमाणा पेक्षा कमी-अधिक लागू शकतो.कारण शेगदाणे कुटले की कमी होणार!
डेसिकेटेड कोकोनट वरून सजावटी साठी न लावता आतच मिसळले तरी चालते.
09 February 2017
तिळाचे लाडू ( Til Laddu)
"तिळ लाडू "संक्रांतिला करतात.. कारण या दिवसात थंडी असते व थंडीत शरीराला तिळ व गुळ अतिशय लाभदायक असते. तिळातून शरीराला स्निग्धांश मिळतात. तसेच हाडे मजबूत होतात. यात कँल्शियम असते. गुळापासून शरीराला उष्णता व लोह मिळते. तर असे बहूगुणी लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
° तिळ २ वाट्या
° गुळ १ वाटी
° भाजून सोललेले शेंगदाणे अर्धा वाटी
° वेलचीपूड
कृती :-
प्रथम तिळ खमंग गुलाबी भाजून घ्याव्येत. गुळ चिरून घ्यावा.
नंतर भाजलेल्यापैकी निम्मेच तिळ भरड कुटावेत.
आता गँसवर जाड बुडाच्या भांड्यात गुळ घालावा व चमच्याने हलवत गुळ फक्त विरघळून एक चटका आणून घ्यावा. पाक करू नये.
आता झटपट, वितळलेल्या गुळात तिळ,कुटलेले तिळ, शेंगदाणे व वेलचीपूड घालून एकत्र करावे. हाताला सोसवेल इतपत गरम असतानाच गरम गरम, सुपारीच्या आकाराचे लाडू वळावेत.
थंड झाले की डब्यात भरून ठेवावे.
टिप :- मी यासाठी नेहमीचाच मऊ गुळ वापरला आहे. त्यामुळे लाडू छान मऊ होतात. अन्यथा चिक्की गुळ वापरला तर कडक व चिवट होतात.
नुसत्या तिळाऐवजी निम्मे तिळ व निम्मे शेंगदाणे कूट वापरले तरी चालते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

