Showing posts with label Halawa. Show all posts
Showing posts with label Halawa. Show all posts

04 February 2020

पाईनँपल हलवा ( Pineapple Halawa)

No comments :


पाईनँपल हलवा म्हणजे तेच ते हो, आपला अननसाचा शिरा! तसे पाहिले तर करायला एकदम सोपा. पण नेहमीच्या शिर्यापेक्षा थोडा वेगळा भन्नाट आंबट -गोड चवीचा,स्वाद बदल म्हणून मस्त लागतो. अन्  दुसरे म्हणजे पाहुणे मंडळी घरी आली तर वेगळे काहीतरी केले म्हणून ते खूष. तर कसा केला ते साहित्य व कृती पहा.

साहित्य :
• रवा - १ कप
• साखर - १ १/२ कप
• अननसाचे बारीक तुकडे - १ कप
• अननसाचा गर - १ कप
• साजुक तूप - १ कप
• गरम पाणी - २ कप
• चिमुटभर मीठ
• वेलची पावडर - १टीस्पून
• काजू,बेदाणे

कृती :-
प्रथम रवा साजुक तुपावर खमंग भाजून घ्यावा.

ऩंतर त्यामधे सावकाशपणे गरम पाणी घालून दोन मिनीट वाफवावा म्हणजे रवा फुलतो.

नंतर त्यामधे साखर,मीठ,अननसाचा गर व तुकडे घालून साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,कडेने थोडे तूप सोडून परत दोन मिनिटे वाफ काढावी.
             अननसाचा गर व लहान तुकडे

शेवटी वेलचीपूड व काजू, बेदाणे घालून गरमा-गरम लुसलुशीत 'पाईनँपल हलवा' डीशमधून खायला द्यावा व प्रतिसादाची वाट पहावी.  'व्वा मस्तच!' असे उद्गगार नक्कीच कानी पडतील. तुम्हीही नक्की करून बघा व प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.

टिप्स :
• अननस छान पिकलेला मधूर वासाचा आणावा.
• हलव्यामधे पाण्याच्या जागी दुधाचा वापर अजिबात करू नये.
• तूप दिलेल्या प्रमाणातच वापरावे. नाहीतर हलवा मोकळा, लुसलुशीत होण्याऐवजी चिकट होतो.
• हलव्याचा गडद पिवळा रंग हवे असल्यास केशर किंवा खाद्यरंग वापरावा. मी नाही वापरला. ऐच्छिक आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


05 May 2017

आटा हलवा (Aata Halawa)

No comments :

'आटा हलवा' पौष्टीक व करायला एकदम सोपा आहे. खायलाही रूचकर लागतो. हा हलवा पंजाबी लंगरमधे,गुरूद्वारामधे प्रसाद म्हणून दिला जातो. याला 'कडा प्रसाद' असे न्हणतात. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* गव्हाचे पीठ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ वाटी
* पाणी किंवा दूध ३ वाट्या
* वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स

कृती :-
प्रथम गव्हाचे पीठ तूपावर तांबूस, गुलाबी रंगावर भाजून घ्यावे.

आता पाणी गरम करून साखर घालावी. विरघळेपर्यंत हलवावे व हे गरम पाणी भाजलेल्या पीठामधे घालावे. पाणी आटेपर्यत एकसारखे हलवावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

शेवटी वेलचीपूड घालावी व वरून ड्रायफ्रूट्स घालून खायला द्यावे. आवडत असल्यास अजून चमचाभर घरचे तूप वरून घालावे व गरमा-गरम द्यावे.

टिप्स :-
*तुपामध्ये काटकसर अजिबात करू नये.
*साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.
*शक्यतो गव्हाचे पीठ थोडे जाडसर दळलेले घ्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

11 February 2017

लाल भोपळ्याची रबडी (Pumpkin Rabadi)

No comments :

"लाल भोपळ्याची रबडी " झटपट होणारा व  पौष्टीक असा गोड पदार्थ आहे. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* लाल भोपळा पाव किलो
* दूध १ लिटर
* साखर अर्धी वाटी
* वेलचीपूङ
* बदाम सजावटीला
* तूप १ टेस्पून

कृती :-
प्रथम भोपळा साल काढून मोठ्या फोडी चिरून घ्याव्यात व प्रेशर कुकर मधे वाफवून घ्याव्यात.

आता भोपळा शिजेपर्यंत दूध उकळवायला ठेवावे.

नंतर वाफवलेल्या फोडी मँशरने मँश करून घ्याव्यात. थोड्या तूपावर मँश केलेला भोपळा पांच मिनिट परतावा.

आता परतलेला भोपळा आधिच उकळत असलेल्या दूधामधे घालावा. पांच मिनिट उकळवावे.

शेवटी साखर व वेलचीपूड घालावी. व्यवस्थित ढवळावे. साखर विरघळली की, गँस बंद करावा.

गरमा-गरम रबङी वरून बदाम बी ची सजावट करून खायला द्यावी.

टिप :- साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

15 December 2016

बाँम्बे-कराची हलवा (Bombay-Karachi Halawa)

No comments :
"बाँम्बे -कराची हलवा " हा सिंधी मिठाईचा एक प्रकार आहे. साधारण जेलीसारखा दिसतो व लुसलू़शित पण chewy असा अाहे. मिठाईच्या दुकानात खूप आकर्षकरीत्या अशी ही रंगी -बिरंगी मिठाई सजवून ठेवलेली असते. फार गोडही नाही. सणासुदीला किंवा पाहुणे येणार असतील तर करायला सोपी अन् दिसायला छान दिसते. कशी केली, साहित्य व कृती-
साहित्य :-
* काँर्नफ्लोअर १/२ कप (measuring cup)
* पाणी १ १/२ कप
इतर-
* साखर १ १/२ कप
* पाणी १ कप
* लिंबू रस १ टीस्पून
* तूप ४ टेस्पून
* फूडकलर आवडीचा कोणताही, ४-५ थेब
* वेलचीपूड
* काजू -बदाम काप १ टेस्पून

कृती :-
प्रथम एका नाँनस्टीक पँनमधे साखर व पाणी एकत्र करून, लहान गँसवर ठेऊन द्या. साखर विरघळे पर्यंत मधे -मधे हलवत रहा.
तोपर्यंत एका बाऊलमधे काँर्नफ्लोअर घ्यावे व त्यामधे दीड वाटी पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. गुठळ्या अजिबात राहू देऊ नयेत.

आता साखर विरघळली असेल तर त्यामधे ही तयार काँर्नफ्लोअर पेस्ट घालावी व सतत हलवत रहावे. तळापासून हलवावे. खाली लागण्याची शक्यता असते.

पांच मिनिटानी मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल तर त्यामधे लिटेस्पून व रंगही घालावा व हलवत रहावे. ५-५ मिनिटानी हलवत हलवतच १-१ चमचा तूप घालावे. असे २० मिनिटे सतत हलवत रहावे.

आता मिश्रण पारदर्शी दिसू लागलेले असते. आताच त्यामधे काजू-बदामचे काप व वेलचीपूड घालावी. एकत्र सर्व हलवावे व असेल तर शक्यतो काचेच्या ट्रेमधे किंवा कोणत्याही ट्रेमधे तूपाचा हात चोळावा व तयार मिश्रण त्यावर ओतावे. वरून थोडे काजू -बदाम काप पेरावेत व मिश्रण १५ मिनिट गार होऊ द्यावे.
थंड झाले की बोट लावून पहावे. रबरासारखे मऊ लागते हाताला. नंतर तयार मिश्रणाच्या सुरीने कापून वड्या काढाव्यात.

या रंगीत वड्या खूप आकर्षक दिसतात तसेच इतर मिठाईच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

टिप :-
* काँर्नफ्लोअर पेस्ट तयार करताना अजिबात गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर हलवा व्यवस्थित होत नाही.

* साखर फक्त विरघळवायची आहे. कोणताही एकतारी, दोनतारी पाक करायचा नाही.

* तूप दिलेल्या प्रमाणातच घालावे. कोणतीही तडजोड नको.

* सर्वात महत्वाचे दिलेल्या प्रमाणातच सर्व साहित्य मोजून घ्यावे.

* ही पाककृती करताना पूर्णपणे मंद गँसवर करावी. वाढवू नये.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 October 2016

रताळ्याचा हलवा ( Sweet Potato Halawa)

No comments :

उपवास असला तरी पुृूर्णपणे पोट रिकामे ठेवणे आरोग्याला वाईटच.मग काय?  आपण शाबूदाणा खिचडी किंवा इतर कांही पदार्थ जे शेगदाण्याचे कूट वापरून केले जातात ते खातो. परंतु त्याने पित्त वाढते. रताळ्यामधे फाइबर भरपूर असते. सहज उपलब्ध असते त्यामुळे उपवासाला रताळे खाणे केव्हाही इष्टच. तर आज रताळ्याचा हलवा केला.कसा केला? साहित्य व कृती,

साहित्य :-
* रताळी मोठी २ (उकडून गर अंदाजे २ वाट्या)
* साखर १वाटी
* दूध १ कप
* तूप २ टेस्पून
* वेलचीपूड
* ड्रायफ्रूट्स

कृती :-

प्रथम रताळी स्वच्छ धुवून,मोठे तुकडे करावेत व कुकरमधे उकडून घ्यावे.

थंड झाल्यानंतर साल काढून आधि सुरीने कापून तुकडे करा व नंतर हाताने मँश करावे. आधि कापून घेतल्याने त्यातील तंतू किंवा शीरा ज्या असतात त्या कापल्या जातात व हलवा खाताना तोंडामधे  धागे येत नाहीत.

नंतर पँनमधे तूप गरम करून त्यामधे मँश केलेले रताळे घालावे व गुलाबी परतावे.

परतून झाल्यावर, नंतर त्यामधे दूध, साखर व वेलचीपूड घालावी. साखर विरघळून तूप सुटेपर्यंत ५ मिनिट परतावे व गँस बंद करावा.

शेवटी ड्रायफ्रूट्स घालावेत. खायला देताना वरून थोडे साजूक तूप सोडावे व खायला द्यावे.

अत्यंत पौष्टीक,सात्विक व लुसलू़शित असा हा "रताळ्याचा हलवा" चविला खूप छान लागतो. तूम्हीही करून बघा नक्की आवडेल.

टिप :- साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी. मी घेतलेल्या प्रमाणाने हलवा बर्यापैकी गोड होतो. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 June 2016

मँगो हलवा (Mango Halawa)

No comments :

अंबा फळांचा राजा!वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे भाव पण जादा खातों.महीनाभर मनसोक्त खाल्ला जातो. तरीही त्याचे परतायचे दिवस आले की,थोडे वाईटच वाटते. मग वर्षभर चाखता यावा म्हणून मुरांबा, जाम, छुंदा करून ठेवला जातो. तसेच अंब्याची पोळी, साठा असेही केले जाते. मी तर शेवटी -शेवटी आम्रखंड, आंब्याच्या वड्या, आईस्क्रिम, फालुदा, मँगो शेक असे बरेच अंब्याचे पदार्थ एकदा एकदा करतेच. आज 'आंब्याचा शिरा' केला. कसा केला साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* रवा १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १/२ वाटी
* पाणी १ वाटी
* आंब्याचा रस १ वाटी
* वेलचीपूड
* काजू सजावटीला

कृती :-

प्रथम कढईत तूप गरम करावे व रवा छान गुलाबी भाजून घ्या.

आता गरम पाणी घाला. हलवत-हलवत च अंब्याचा रस घाला. मोकळे होईपर्यंत हलवत रहा.

शेवटी साखर घाला. गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन साखर विरघळे पर्यंत हलवत रहा.

शेवटी गँस बंद करून वेलचीपूड घाला. खायला देताना वरून तूप एक चमचा सोडा व काजू घालून गरम खायला द्या.

त्याचा रंग व स्वाद इतका सुंदर आहे की बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटते.  तूम्हीही  करून बघा. नक्की आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

20 December 2015

शिंगाड्याचा हलवा (Chestnut Halawa)

No comments :

शिंगाडा ही एक पाणथळजागी येणारी तृणवर्गीय  वनस्पती आहे. याचे कंद खाद्य म्हणून वापरतात.काहीशी गोडसर चव असते. या फळाची वरून साल काळपट रंगाची असते व आत पांढरा भाग ,गाभा जो असतो तो खाण्यासाठी वापरतात. पीठ तांबूस, गुलाबी रंगाचे असते. हे पीठ उपवासाला चालते. उपवासाचे काही पदार्थ करायचे असतील म्हणजे कटलेट, कचोरी इ.तर बाईंडींग साठी काॅर्नफ्लोअर सारखे वापरतात. काहीसा चिकटपणा असतो. तसेच शिंगाडा पीठाचे थालीपीठ, पुर्याही,  केल्या जातात. कंद बारीक चिरून शाबूदाण्या सारखी खिचडीही केली जाते.शिंगाडा अतिशय पौष्टीक असतो.चला तर आज 'शिंगाडा पिठाचा पौष्टीक हलवा' करूया. साहीत्य व कृती,

साहीत्य :-
* शिंगाडा पीठ 1 वाटी
* साखर 1 वाटी
* तूप मोठे 4 चमचे ( टेस्पून)
* वेलचीपूड अर्धा टीस्पून
* ड्रायफ्रूट्स
* पाणी

कती :-

प्रथम पॅन/कढई मधे तूप घाला. गरम झाले की, त्यामधे शिंगाडा पीठ घाला.बेसन लाडूचे बेसन जसे भाजतो तसे पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या.

आता साखरेत अर्धा ते पाऊण वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या व हे पाणी भाजलेल्या पीठात, गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन कलथ्याने पीठ हलवत त्यात घाला. हलवत रहा.

पांच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल व कडेने तूप सुटू लागेल. गॅस बंद करा व वेलचीपूड , ड्रायफ्रूट्स घालून खाली उतरवा. हा हलवा साधारण सैलच असतो.

गरम लुसलूशित असा हलवा खाण्यास अतिशय उत्कृष्ठ लागतो. मुख्य म्हणजे उपवासालाही चालतो. तूम्हालाही आवडेल जरूर करून बघा व प्रतिक्रिया कळवायला विसरू नका .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 October 2014

बिटरूट हलवा (Beet root halawa )

No comments :
बिट हे एक रसाळ कंद आहे.यात नैसर्गिक साखर विपूल प्रमाणात असूनही कॅलरीज कमी असतात.बिटाच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.तसेच अँनिमिया,मुळव्याध,बध्दकोष्टता या विकारात अत्यंत गुणकारी आहे.अशा या बिटाचा उपयोग विविध प्रकारानी आपल्या आहारात करावा.म्हणून सर्वाना आवडेल अश्या बिटरूट हलव्याची कृती पुढे दिली आहे.

साहीत्य:-
* मध्यम आकाराचे  बिट २
* साखर १ वाटी
* सायीसह दूध १ कप
* वेलची पावडर
* ड्राय फ्रूट्स आवडीप्रमाणे
* तूप १ टेस्पून

कृती:-
प्रथम बिट साल काढून किसून घ्यावे.किस हाताने दाबून त्यातीरस पिळून काढावा.
आता गॅसवर पॅन ठेवून त्यात आधि तूप घालावे व त्यावर किस टाकून परतावा.
परतून साधारण मऊ झाल्यावर त्यामधे दूध घालावे व आटेपर्यंत शिजवावे.
शेवटी साखर घालून विरघळेपर्यंत हलवावे.
आता तयार हलव्यामधे वेलचीपूड ड्रायफ्रूट्स घालून खायला द्यावे.
टीप :- पिळून काढलेला रस टाकून न देता मिठ मिरपूड घालून पिणास द्यावा अथवा सूपसाठी वापरावा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

30 September 2014

गव्हाच्या पिठाचा पौष्टीक हलवा(Wheat Halawa)

No comments :

साहित्य:
* गव्हाचे पीठ १ वाटी
* साखर १ वाटी
*  तूप १ वाटी
* वेलची पूड,ड्रायफ्रूट्स ऐच्छीक

कृती:-
प्रथम एका भांड्यामधे साखर घालून ती बुडेल इतकेच पाणी घालावे व साखर विरघळेपर्यंतच गॅसवर ठेवून हलवावे.साखर विरघळली की गॅसवरून खाली ठेवावे.

नंतर एक जाड बुडाची पातेली अथवा कढई घेऊन त्यामधे तूप घालावेतूप गरम झाले की त्यामधे गव्हाचे पीठ घालावे.बेसनाच्या लाडवाला बेसन भाजतात तसे पीठ तांबूस गुलाबी होईपर्यंत भाजावे.

आता भाजून झाल्यावर त्यामधे साखर विरघळविलेले पाणी घालावे.सतत ढवळावे पाणी आटून साधारण घट्ट होत आले की गॅस बंद करावा.खाली उतरवून वेलचीपूड व ड्रायफ्रूट्स घालून सजवावे.

पौष्टीक हलवा तयार !

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

13 September 2014

गाजर हलवा(Carrot Halawa)

No comments :

साहित्य:-
* गाजर एक किलो
* साखर २ कप
* मलईसह दुध २-३ कप
* साजूक तूप १/२ कप
* ५-६ लवंगा 
* वेलचीपूङ, सुकामेवा

कृती:-
प्रथम गाजरे सालं काढून खिसून घ्यावीत,खिस हाताने दाबून रस काढून घ्यावा.हा खिस तूपावर लवंगा फोङणी टाकून चांगला मऊ होइपरेंत परतावा.

परतून झाल्यावर त्यामधे मलईसह गरम दूध घालावे व आटेपर्यत हलवावे.दूध पूर्ण आटल्यावर ,साखर व सुकामेवा ,वेलची घालावी व साखर विरघळली की गॅस बंद करावा.

टीप:- पिळून जो रस काढला आहे तो टाकून न देता प्यावा .त्यामधे व्हिटामिन 'ए'असते.
याप्रमाणेच गाजराच्या ऐवजी दुधी घेऊनपण , दुधी हलवा बनविता येतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

मुगडाळ हलवा / शिरा(Moong Dal Halawa)

No comments :

साहित्य:-
* दोन-तीन तास भिजवलेली मूगङाळ १ वाटी
* साखर १वाटी
* साजूक तूप १वाटी
* खवा १ वाटी
* दूध व पाणी २ वाटी ( दोन्ही निम्मे-निम्मे )
* वेलचीपूङ ,सुकामेवा

कृती:-
प्रथम ङाळ मिक्सरचर  वाटून घ्यावी.नंतर पॅनमधे खवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा .त्याच पॅनमधे तूप घालून वाटलेली ङाळ चांगली तांबूस गुलाबी रंगावर तूप सूटेपर्यत भाजावी.

नंतर त्यात गरम दूध व पाणी घालून आटेपर्यत हलवावे शेवटी साखर व सुकामेवा घालून नीट हलवून गॅस बंद करावा.

टीप:-  खवा नसला तरी चालतो.असेल तर जास्तच राजस बनतो .मात्र या हलव्याला तूप कमी बिलकूल चालत नाही.


आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.