शिंगाडा ही एक पाणथळजागी येणारी तृणवर्गीय वनस्पती आहे. याचे कंद खाद्य म्हणून वापरतात.काहीशी गोडसर चव असते. या फळाची वरून साल काळपट रंगाची असते व आत पांढरा भाग ,गाभा जो असतो तो खाण्यासाठी वापरतात. पीठ तांबूस, गुलाबी रंगाचे असते. हे पीठ उपवासाला चालते. उपवासाचे काही पदार्थ करायचे असतील म्हणजे कटलेट, कचोरी इ.तर बाईंडींग साठी काॅर्नफ्लोअर सारखे वापरतात. काहीसा चिकटपणा असतो. तसेच शिंगाडा पीठाचे थालीपीठ, पुर्याही, केल्या जातात. कंद बारीक चिरून शाबूदाण्या सारखी खिचडीही केली जाते.शिंगाडा अतिशय पौष्टीक असतो.चला तर आज 'शिंगाडा पिठाचा पौष्टीक हलवा' करूया. साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* शिंगाडा पीठ 1 वाटी
* साखर 1 वाटी
* तूप मोठे 4 चमचे ( टेस्पून)
* वेलचीपूड अर्धा टीस्पून
* ड्रायफ्रूट्स
* पाणी
कती :-
प्रथम पॅन/कढई मधे तूप घाला. गरम झाले की, त्यामधे शिंगाडा पीठ घाला.बेसन लाडूचे बेसन जसे भाजतो तसे पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या.
आता साखरेत अर्धा ते पाऊण वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या व हे पाणी भाजलेल्या पीठात, गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन कलथ्याने पीठ हलवत त्यात घाला. हलवत रहा.
पांच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल व कडेने तूप सुटू लागेल. गॅस बंद करा व वेलचीपूड , ड्रायफ्रूट्स घालून खाली उतरवा. हा हलवा साधारण सैलच असतो.
गरम लुसलूशित असा हलवा खाण्यास अतिशय उत्कृष्ठ लागतो. मुख्य म्हणजे उपवासालाही चालतो. तूम्हालाही आवडेल जरूर करून बघा व प्रतिक्रिया कळवायला विसरू नका .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment