वांग्याचे भरीत हा पदार्थ फार पुर्वीपासून केला जाणारा जुनाच व सर्वाना माहीत असणारा पदार्थ आहे. फक्त प्रत्येक प्रांतानुसार किंवा आवडीनुसार करण्याची पध्दत निरनिराळी आहे.
कुठे भरीतात दही घातले जाते तर कुठे दाण्याचे कुट किंवा काही घरात नुसते भाजलेल्या वांग्याचा गर,मीठ,मिरची फोडणी घालून केले जाते . आज मी माझ्या घरात ज्या पध्दतिचे आवडते व केले जाते, त्याची साहित्य व कृती सांगते,
साहित्य :-
* मोठ भरताचे वांग १ नग
* लाल टोमँटो मध्यम २
* मोठा कांदा १
* लसूण पाकळ्या ६-७
* हिरवी मिरची २-४ किंवा आवडीनुसार
* कोथंबिर
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हळद, हिंग, मोहरी फोडणीसाठी
* तेल २ टेस्पून
कृती :-
प्रथम वांगे स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करावे व थोडे तेल चोळावे. मंद गँसवर जाळी ठेउन सर्व बाजूनी व्यवस्थित भाजावे.
वांगे भाजेपर्यंत कांदा, टोमँटो, लसूण, मिरची व कोथंबिर बारीक चिरून घ्यावे.
आता भाजलेले वांगे गार झालेले असेल तर अलगद हाताने सर्व साल सोलून काढावे व गार पाण्याने स्वच्छ धुवावे. म्हणजे भाजलेली काळी साल पुर्णपणे निघून जाईल.
आता धुतलेले वांगे चाँपिंग बोर्डवर ठेवून सुरीने कापावे व नंतर बाउलमधे ठेउन मँशरने अथवा हाताने मँश करावे.
नंतर तेल गरम करून हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी. फोडणीमधे कांदा (थोडा कच्चा गरात मिसळा),लसूण मिरची घालून परतावे. कांदा मऊ झाला की, चिरलेला टोमँटो घालावा व परतून मऊ झाला की लाल मिरचीपूड, मीठ व चिमूटभर साखर घालावी. शेवटी वांग्याचा गर व थोडी कोथंबिर घालावी व सर्व नीट एकजीव करावे, पाण्याचा हबका मारावा व झाकून एक वाफ आणावी.
तयार भरीत बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर घालावी. गरमा-गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खावे. अतिशय रूचकर लागते. आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment