28 July 2015

वरी तांदळाची भजी (Rice Pakoda)

No comments :

एखादा मोठा उपवास म्हणजे आषाढी-कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र असेल तर घरात लहान-थोर सर्वचजण करतात. आपणही मग त्यानिमित्ताने चार उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण होते काय शाबू वडा, थालीपिठ, वेफर्स असे चटपटीत पदार्थ लगेच संपतात व एखाद वेळी वरीचा भात (भगर) शिल्लक रहातो. परंतू दुसर्या दिवशी आधिच शिळे व त्यात परत उपवासाचे असे काही खायला नकोसे होते. व या महागाईच्या दिवसात वाया घालवणे पटत नाही. कालच एकादशी झाली. थोडा वरीचा भात उरला , विचार केला व द्वादशीच्या इतर साग्रसंगीत जेवणासोबत त्याची भजी करून टाकली ! मी-तू करून सर्वानी फस्त केली...कशी केली बघा.

साहीत्य :-

1) शिजलेला वरीचा भात(भगर) 2 वाट्या
2) मिरची, आल-लसूण पेस्ट
3) कोथंबिर बारीक चिरून
4) चना डाळ पिठ 2 टेस्पून
5) तांदूळ 1 टेस्पून
6) मीठ चवीला
7) धना-जिरा पावडर 1टीस्पून
8) हिंग चिमूटभर
9) तेल तळणीसाठी

कृती :-

    प्रथम वरीचा भात हातानेच चूरून घ्यावा. पण जर भात कोरडा व फडफडीत असेल तर पाण्याचा हबका मारून कुकरला एक वाफ आणून घ्या किवा मिक्सरला एकदा थोडे फिरवून घ्या.

नंतर मऊ केलेल्या भातात वर दिलेल्या साहीत्यातील सर्व मसाला व पीठं घालावित व हातानेच नीट एकजीव करावे. हाताने तेलात भजी सोडता येतील इतपत सैलसर पीठ ठेवावे. गरज वाटली तर डाळ किवा तांदुळचे पीठ कमी-जास्त करा किवा पाणी घाला.

आता तयार मिश्रणाची लहान-लहान भजी गरम तेलात सोडून मंद आचेवर तळा. तळून टिश्यू पेपरवर काढा.

मस्त कुरकरीत भजी तयार. कशीही खा ! जेवणात खा किंवा चटणी- साॅस काही घेऊन नुसतीच खा. मस्तच लागतात.

टिप :- या भजीला सोडा किवा गरम तेल पोटात घालण्याची अजिबात गरज नाही. तांदुळच असल्याने अतिशय हलकी व कुरकूरीत होतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

26 July 2015

व्हेज ओट्स कटलेट ( Veg Oats Cutlet)

No comments :

पोळी-भाजी खायचे म्हणले की, मुलांच्या अगदी जीवावर येते. कशी बशी थोडीशी भाजी खाल्ली जाते. त्यातून आवडीची भाजी म्हणजे बटाटा, फ्लाॅवर किंवा मटकीची उसळ असेल तर जरा ठिक. पण शेंगवर्गीय भाज्या किवा भोपळा वगेरा तर अजिबातच नको. परंतू याच भाज्या वापरून पावभाजी केली तर खाल्ली जाते. म्हणून तोच विचार करून व सर्वच भाज्या थोड्या-थोड्या होत्या तर, मी थोडे पौष्टीक पण चटपटीत व्हेज ओट्स कटलेट केले. कसे पहा.

साहीत्य

1) कोबी किसून 1 वाटी
2) सिमला मिरची मध्यम 2-3
3) बिन्स बारीक चिरून 1 वाटी
4) दुधी फोडी चिरून 1 वाटी
5) गाजर किसून 2नग
6) मध्यम आकाराचे बटाटे उकडून दोन
7) हिरवी मिरचो, आले-लसूण पेस्ट
8) कांदा बारीक चिरून
9) तेल एक टेस्पून
10) मीठ चवीला
11) पावभाजी मसाला 2 टीस्पून
12) चाट मसाला अर्धा टीस्पून
13) हळदपूड अर्धा टीस्पून
14) प्लेन ओट्स एक वाटी
15) शॅलो फ्राय करण्यासाठी बटर किवा तेल आवडीनुसार

कृती :-

      प्रथम सर्व भाज्या व बटाटे वाफवून घ्यावे.
वाफवलेल्या भाज्या एका चाळणीवर ओतून त्यातील जादाचे पाणी काढून टाकावे.

आता एक टेस्पून तेल गरम करा व आलं-लसूण पेस्ट हळद घाला मग त्यात कांदा टाकून मऊ होईपरेंत परतावा.

नंतर उकडून घेतलेल्या सर्व भाज्या व बटाटा हातानेच किवा मॅशरने मॅश करून त्यावर घाला. नंतर त्यामधे मीठ, चाट मसाला, पावभाजी मसाला सर्व घालून एक-दोन परतण्या देऊन गॅस बंद करा.

थंड झाले की त्यात ओट्स घालून हाताने चांगले एकजीव करावे.ओट्समुळे पौष्टीक तसेच चिकटपणा येतो व सर्व भाज्या नीट एकत्र गोळा होण्यासपण मदत होते. ओट्स नसतील तर पातळ पोहे वापरले तरी चालतात. मळून दहा मिनीट झाकून ठेवा. मिश्रण आळून घट्टसर होते.

आता वरील मिश्रणाचे लिंबाएवढे लहान गोळे करून कटलेटचे साचे मिळतात. हव्या त्या आकारात थापून घ्या. किवा हातानेच लहान साधारण चपटे गोळे केले तरी चालते.

नंतर तयार गोळे पॅनमधे थोडे-थोडे बटर सोडून उलटे-पालटे तांबूस रंगावर शॅलोफ्राय करा.

असे गरमा-गरम तयार कटलेट हिरवी-लाल चटणी किवा साॅस सोबत सर्व्ह करा

टीप :- भाज्या आपल्या आवडीने व उपलब्द असतील त्या घ्याव्यात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 

25 July 2015

सुशिला (Sushila)

No comments :

माझी आई मोठी सुगरण होती. वारसाहक्काने काहीशा प्रमाणात तो गुण आम्हा मुलींकडे आला. माझी आई जशी सुगरण तसे वडील खवैय्ये! त्यामुळे आईला नवनवे पदार्थ करण्याला प्रोत्साहन मिळत गेले. कुठेही बाहेर किवा कोणाकडे नविन एखादा पदार्थ खाल्ला आणि आवडला तर आई शक्य असेल तर लगेच रेसिपि जाणून घेत असे. नसेल शक्य म्हणजे हाॅटेल वगेरे असेल तर चवि वरून त्यात काय-काय पदार्थ वापरेत ओळखून हुबेहूब चव साधत असे.लगेच घरी दुसरे दिवशी प्रयोग होत असे. तसेच हा 'सुशिला' नावाचा साधारण आपल्या कांदापोह्या सारख्या चविचा पण चिरमुर्याचा पदार्थ आहे. जास्त करून कर्नाटकमधे केला जाणारा पदार्थ आहे. आम्ही लहानपणी कर्नाटक, रायचूर येथे  वडीलांच्या नोकरी निमित्त होतो. तेव्हा आईला शेजारणी कडून माहीत झाला. तेव्हापासून चिरमुरे उरून मऊ पडले की वाया जाऊ नयेत म्हणून नेहमीच आमच्याकडे केला जातो. कसा केला जातो कृती पहा.

साहीत्य :-

1) चिरमुरे
2) कांदा, मिरची, कडीपत्ता,
3) ओलं खोबरे खवून, लिंबू
4) कोथंबिर
5) मिठ चविला व साखर ऐच्छिक
6) शेंगदाणे आवडत असल्यास
7) तेल
8) फोडणी साहीत्य

कृती :-

      चिरमूरे चाळून स्वच्छ करून चाळणीत घ्यावेत. त्यावर अगदी थोडे पाणी शिंपडून म्हणजे चिरमुरे शोषून घेतिल इतकेच पाणी शिपडून मऊ करावेत.

आता कढईत तेल गरम करून फोडणी करा. नंतर त्यात शेंगदाणे तळा व आता चिरलेला कांदा , मिरची व कडीपत्ता घालून परतावे.

परतून कांदा साधारण मऊ झाला की , आता त्यात भिजलेले चिरमुरे घाला व चविला मीठ, साखर घालून नीट हलवा.झाकण ठेवून एक वाफ आणा.

आता गॅस बंद करून वरून सजावटी साठी लिंबू, खोबरे व कोथंबिर घालून गरमा-गरम खायला द्या .

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 July 2015

बाॅम्बे खारे शेंगदाणे ( Bpmbay Salted Peanut)

3 comments :
मला काय किवा घरातसुध्दा सर्वाना खारे शेंगदाणे अतिशय आवडतात. खारे म्हणजे नुसते साधे मीठ लावून भाजलेले खारे शेंगदाणे नव्हे बरं का ! हे विशिष्ट पध्दतीने भाजलेले असतात व छान सोललेले गुलाबी रंगाचेअसतात. हे 'बाॅम्बे शेंगदाणे' म्हणून पण ओळखले जातात. येता-जाता तोंडात टाकायला, मुलांना खिशात भरायला छानच लागतात. मी असेच माझ्या भावाबरोबर  बोलत होते.तोच तो एकदम बोलला ,' अगं एकदम सोपे आहेत ! ' परवाच माझा एक दोस्त की ज्याच्या शेंगदाणे,पोहे ,चिरमुरे असे तयार करण्याच्या भट्ट्या आहेत.त्याचा तो व्यवसायच आहे.त्याने मला असेच बोलता बोलता बाॅम्बे शेंगदाणे कसे करतात ते सांगितलेय व मी करून पाहीलेत तू पण कर सांगतो तसे.मी पडत्या फळाची आज्ञा !  लगेच शेंगदाणे भिजत टाकले व केले छानच जमले अगदी हुबेहूब बाहेरून आणतो तसे जमले. कसे केले पहा !

साहीत्य :-
* टपोरे व वेचलेले शेंगदाणे २५० ग्रॅम
* मीठ १ टीस्पून
* पाणी शेंगदाणे भिजतील इतकेच

कृती :-
प्रथम पाणी एका बाऊलमधे घ्यावे व त्यात मीठ टाकून विरघळावावे. व त्यात शेंगदाणे भिजत टाकावेत. पाणी बेताचेच ठेवावे म्हणजे खारे पाणी पूर्ण शेंगदाणे ओढून घेतात व शेंगदाण्याना छान खारी चव येते. किमान ४-५ तास भिजू द्यावेत.

आता शेंगदाणे एका चाळणीवर काढा. शिल्लक पाणी पूर्ण निथळू द्यावे.नंतर एका स्वच्छ कपड्यावर अर्धा तास पसरावेत व सुकू द्यावेत.
आता हे शेंगदाणे मायक्रोवेव ओवनला मायक्रो मोडला हाय टेपरेचरला ७-८ मि.भाजावेत.मधेच एकदा चेक करावे हलवून. वेळ कमी-अधिक लागू शकतो.कारण प्रत्येक कंपनीनुसार ओवनचे तापमान काही प्रमाणात वेगवेगळे असू शकते.
थंड झाले की सोलून स्वच्छ करून हवाबंद बरणीमधे भरून ठेवा. खुसखूषीत खमंग 'बाॅम्बे शेंगदाणे' तयार ! वाचून झाले की तुम्हीपण पट्कन करून बघा,बरं !ओवन नसेल तरी नेहमीच्या वापरातल्या पण जाड बुडाच्या कढईत सुध्दा वाळू घालून भाजता येतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

05 July 2015

मायक्रोवेव ओवन किचन टिप्स (Microwave Oven Kitchen Tips)

5 comments :
*मायक्रोवेव ओवन किचन टिप्स*




मायक्रोवेव मध्ये एखादा पदार्थ करायचा म्हंटले की सामान्यपणे  आपल्याला फार मोठे व अवघड काम वाटते. त्याबाबत आपल्या मनात भिती बसलेली असते त्यामुळे सहसा तो खरेदी करणे वापरणे टाळले जाते. तरीपण एखादे वेळी हौसेपोटी किंवा सगळ्या वस्तु घरात आहेत तोच तेवढा घेण्याचा राहिला आहे म्हणून घेतला जातो. परंतु त्याची फारशी माहीती नसल्याने व भिती पोटी तो वापरला जात नाही व एक अडगळ म्हणून जागा अडवून राहतो. बर्‍याच घरी फक्त राहिलेले अन्न गरम करण्याइतकाच त्याचा वापर केला जातो. पण खरा त्याचा वापर स्वयंपाकघरात केला तर गृहिणीचा अत्यंत उपयोगी मदतनीस आहे. पदार्थ कमी तेलात न जळता, करपता व झटपट तय्यार होतात.

मायक्रोवेव ही एक प्रकार ची ईलेक्ट्रोंनिक एनर्जि आहे. जसे नॉर्मल गॅस वर अन्न शिजवतो त्यात गॅस एनर्जि असते व ही ईलेक्ट्रोंनिक एनर्जि असते. मायक्रोवेव मध्ये इन्फ्रारेड  रेडिएशन व मायक्रोवेव अशी एनर्जि असते. हे मायक्रोवेव आपल्या मोबाइल मध्ये पण असतात. आज काल बाजारात मायक्रो + कन्वेक्शन + ग्रिल असे कोम्बि ओवेन येतात. कन्वेक्शन मोडला केक बेक करताना अॅल्युमिनियम चे केक भांडे चालते पण स्टील नाही. चकचकीत धातू चालत नाही. मायक्रो मोड ला मात्र कोणता ही धातू चालत नाही. तसेच पदार्थ ग्रिल करण्यासाठी सोबत ग्रिल स्टँड येते तेच वापरावे.

मायक्रोवेव मध्ये कधी धातू ची भांडी वापरायची नसतात कारण मेटल अॅंटेना सारखे काम करते. लहरी खेचते पण आत न घेता रिफ्लेक्ट करते व त्या वेळी स्पार्क होते. म्हणून चकचकीत शाईनी मेटल वापरात नाहीत. मायक्रोवेव मध्ये फक्त मायक्रो सेफ भांडी वापरावीत. उदा : काच, प्लॅस्टिक. खरेदी करताना नीट पाहून घ्यावे. त्यावर मायक्रो सेफ असे लिहिलेले असते किंवा ओवन चे चित्र असते. मायक्रो सेफ भांडी अत्यंत पातळ असल्याने आतल्या पदार्थाला लवकर उष्णता पोहोचते तसेच ही भांडी अतिशय गरम होतात म्हणून भांडी बाहेर काढताना नेहमी हातमोजे (ग्लोवस) चा वापर करावा. नाहितर अत्यंत वाईट रीतीने हात भाजतो. ओवन चे सामान्य तापमान हे बोईलिंग वॉटर चे जे असते तेवढे असते त्या पुढे शिजण्याचे उच्च  तापमान असते. मग विचार करा !

ओवन मध्ये कोणताही पदार्थ शिजवताना पहील्या वेळी आपण आपल्या गरजे इतके पदार्थ घेऊन वस्तु चे आकारमान पाहून अंदाजे वेळ व तापमान हे सेट करावे व हे निरीक्षण वहीत नोंदवून ठेवावे नंतर दर वेळी तेच तापमान, वेळ सेट केली की झाले कारण पदार्था च्या quantity अनुसार वेळ कमी-जास्त लागतो.

ओवन मध्ये जरी पदार्थ करत असलो तरी मधूनच एक दोनदा उघडून हलवावा लागतो. बरेच जणांचा असा समज आहे की पदार्थ आत ठेवला की काम झाले. पदार्थ तयार परंतु तसे नाही पदार्थ व्यवस्थित तयार व्हायचा असेल तर एनर्जि त्या पदार्थाला सम:प्रमाणात लागते. उदा: जसे की 200 ग्रॅम शेंगदाणे भाजायचे असतील तर हाय टेम्परेचर ला तीन मिनीट वेळ लागतो. तर नुसते तीन मिनीट टाइमिंग लावून आत ठेवून चालत नाही ते एकाच भागात जास्त भाजले जातील व दुसरिकडे कच्चे राहतील म्हणून मध्येच एकदा हलवावे लागते. सतत गॅस सारखे हलवावे लागत नाही व लवकर भाजते इतकाच फरक. कोणताही पदार्थ शिजत ठेवला तर एक दोनदा हलवावा लागतोच.

मायक्रोवेव मध्ये पदार्थ गरम करताना शक्यतो फ्रीज मधून काढून लगेच त्यात ठेवू नये. पदार्थ रूम टेम्परेचर ला येऊ द्यावा मगच ओवन मध्ये ठेवावा. तसेच ओवन मध्ये ब्रेड, फळे, बटर डीफ्रोस्ट करू शकतो.

*लिंबू वर्गीय फळे संत्री, मोसंबी हाय टेम्परेचरला 30 सेकंद आत ठेवली तर रस जास्त निघतो. *तयार सँडविच पेपर नॅप्किन गुंडाळून गरम करावे. *तसेच बाहेरून आणलेली चिप्स बिस्किटे मऊ झाली तर पेपर मध्ये गुंडाळून 30-40 सेकंद आत ठेवल्यावर कुरकुरीत होतात. *टोमटो व बटाटे शिजवताना त्याला भोकं पाडवीत कारण त्याची सालं जाड असतात. भोकं पाडली असता आतून नीट शिजते. *साखरेत खडे झाले असतील तर दमट पेपर मध्ये गुंडाळावी व आत ठेवावी त्यातली आद्राता शोषली जाते व साखर पूर्ववत मोकळी होते. *पापड नुसते तेलाचा हात चोळून (ब्रशिंग) एका वेळी 2-4 ठेवावे. फक्त 30 सेकंदात भाजले जातात छान तळल्यासारखा पापड मिळतो. *तसेच रोजच्या भाज्या, भरलेली वांगी, दोडका अशा अतिशय छान न करपता पाणी न घालता शिजतात. *तसेच इतर फळ भाज्या, शेंग भाज्या एकाच आकारात चिरून घ्याव्यात, नीट शिजतता. *अंडी ,पॉपकॉर्न असे पदार्थ त्यामध्ये शक्यतो उकडणे किंवा भाजणे टाळावे. कारण ते तडकतात. ओवन मध्ये शिजवणे, भाजणे, उकडणे या क्रिया होतता. तळणे नाही. *इडली ढोकळे कडधान्य उत्तम रीतीने वाफावले जातात.


सर्वात शेवटी, ओवन मध्ये आपण सर्वच पदार्थ तयार करू शकतो.फक्त योग्य ती माहिती पाहिजे व वापर करता आला पाहिजे. एकदा प्रार्थमिक गोष्टी समजावून घेतल्या तर घाई च्या वेळी खूपच उपयोगी आहे व हे सर्व रोजच्या सवयीने उत्तम जमू शकते. पण मी म्हणेन की गरज असेल तरच ओवन चा वापर करावा रोजच्या जेवणासाठी उगाच वापर करू नये त्यातील लहरी अन्नावर परिणाम करतात व असे अन्न आरोग्याल घातक असते. शेवटी एखादा पदार्थ गॅस वर शिजताना, भाजताना जो त्याचा खमंग स्वाद घरभर दरवळतो व आपली भूक प्रज्वलित होते तसे ओवन मधे होत नाही. त्यामुळे अशा वस्तूंचे सर्व फायदे-तोटे लक्षात घेऊन योग्य तितका वापर करणे शहाणे पणाचे लक्षण आहे.