Showing posts with label Kitchen tips. Show all posts
Showing posts with label Kitchen tips. Show all posts

10 September 2018

उकडीचे मोदक करताना घ्यावयाची काळजी

3 comments :

बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय?  तर पुढील टीप्स
जरूर वाचा -
*******************************************
मोदक, म्हटले की गणपती बाप्पा ! असे समिकरणच आहे.त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. 'उकडीचे मोदक' करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते.  बर्याच गृहीणी 'उकडीचे मोदक' म्हटले की,करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे अजिबात अवघड नाही.

* मोदकासाठी पीठी तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती , आंबेमोहोर  व तोही नवा घ्यावा . फार जुना नसावा. त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखर्या(चुण्या) पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पीठी मिळते , खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावी.

* तांदुळ दळून पीठी करणार असाल तर तांदुळ आधी निवडून स्वच्छ धुवावा व पाणी निथळून नंतर सुती कपड्यावर पसरून आठ - दहा तास सावलीतच सुकवावा व नंतर दळून आणावा.  दळून आणल्यावर पीठी बारीक चाळणीने चाळून नंतर पीठी उकडीसाठी वापरावी.

* सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.मोदक खाताना पीठ तोंडात टाळ्याला चिकटते.

* आतल्या सारणासाठी नारळ  फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.

* नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा. म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.

* सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा .खारट नको.

*सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या. तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.

* सारण आदले दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. घाई-गडबड वाचेल.

* मोदक तयार करताना उकड गरम असावी . तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत. यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.

* उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही मोठे चविष्ट लागतात.घरगुती पांढरे लोणी वापरा.

* शक्य असेल तर उकड दूधामधे किंवा अर्धे दूध व अर्धे पाणी  वापरा उकड पांढरी, मऊ होते व मोदक अधिक स्वादिष्ट होतात.

* मोदक  तयार करताना त्याच्या कळ्या पाडणेचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.मुखर्या छान धारदार पाडता येतात . हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.

* उकड मळताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करावा.  तेलामुळे मोदक फुटतात.

* पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. खालून फाटत नाहीत.

* मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे/करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुध्दा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल/ तूप चोळा .

* मोदक उकडायला ठेवताना आधि पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.

* तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिकटून फाटणार नाहीत.

आता इतके त्याचे नखरे संभाळून केलेले 'उकडीचे मोदक' बाप्पाला का नाही आवडणार ? नक्कीच आवडतील. व तुम्हाला पण आवडतील ! ते कसे करायचे , साहीत्य व कृतीसाठी पुढे दिलेल्या लिकवर क्लिक करा.

http://swadanna.blogspot.in/2014/08/blog-post.html?m=0

18 July 2018

केक करताना लक्षात घेण्याच्या गोष्टी (Cake Tips)

No comments :

आजकाल घरात छोट्या -मोठ्या प्रसंगासाठी म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, किंवा न्यू इयर अगदी कांही नसले तरी मुलांना आवडतो म्हणून केक विकत आणला जातो. सहसा केक रोजच्या खाण्यातल्या इतर पदार्थाप्रमाणे घरी करण्याचा कोणी विचार करत नाही. एकतर सामान्य व्यक्ति च्या डोक्यात केक म्हणजे कांहीतरी अवघड पदार्थ आहे,त्यामधे अंडी घालतात त्याशिवाय केक होतच नाही असे व इतर अनेक गैरसमज बसलेले असतात. तसेच आमच्याकडे मायक्रोवेव ओवन नाही ही पण एक समस्या असते. अाणखी मी केलेला केक फुगत नाही, कडक होतो, जाळी पडत नाही असे बरेच मुद्दे येतात. मग त्या वाटेला जायलाच नको. केक म्हणजे केव्हातरी खायचा पदार्थ, अन् कशाला पाहीजे झंझट असे विचार होतात. कारण आपण केक बनविताना त्यातील बारकावे लक्षात न घेता ढोबळमानाने कुठूनतरी वाचून,बघून करतो.मग हवा तसा मनासारखा होत नाही. शेवटी आपण नाद सोडून देतो.

परंतु खरं सांगू? घरात केक बनवायचा तर यातील एकही समस्या येत नाही. फक्त त्याची आपल्याला व्यवस्थित माहीती व कृतीचे बेसिक पक्के नीट माहीत असले पाहीजे. बस्स! कोणतीही अडचण येत नाही.आपण सर्व प्रकारचे केक अगदी वरील आईसिंग सह घरी बनवू शकतो.

आपल्याला जर विकतच्या सारखा मऊ लुसलू़शित स्पाँजी अन् कमी खर्चात ताजा, हायजेनिक केक घरातच करता आला तर मस्तच ना? तर पुढे सांगितलेले कांही बारकावे लक्षपूर्वक वाचा. नक्की तुम्हीसुध्दा घरच्या-घरी मनात येईल तेव्हा केक करू शकाल.अन् खाताना किंवा खिलवताना स्वत: केलेल्या केकचे कौतुक व टेस्ट कांही औरच.

* सर्वात आधी हे लक्षात घ्यावे की, केक बिना अंड्याचाही होऊ शकतो.

* केक करण्यासाठी घरात मायक्रोवेव ओवनच असला पाहीजे असे नाही.कुकरमधे अथवा कढई मधे केक करता येतो.कुकर/ कढईच्या तळाला वाळू किंवा बारीक मीठ पसरावे व त्यावर गोल स्टील रींग किंवा टेबलवर गरम भांडी ठेवण्यासाठीचे स्टँड ठेवावे व त्यावर केक टीन ठेवावा.कढईवर मापाचे जड झाकण ठेवावे.जर कुकर असेल तर शिट्टी काढावी व ओवनप्रमाणे १० मिनिट प्रीहीट करावे.देशी ओवन तयार!

आता केकची सुरवात -

* आता सर्वात प्रथम केक रेसिपी काळजीपूर्वक वाचून/ऐकून घ्यावी. त्यामधे दिलेले सर्व साहित्य दिलेल्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे का? याची खातरजमा करावी. कांही पदार्थ पुरेसे नसतील किंवा उपलब्ध नसतील तर आधीच  त्या साहित्याची जुळवाजुळव करावी.तडजोड अजिबात नको. नाहीतर अपेक्षेप्रमाणे केक होत नाही.

* केकसाठी लागणारे सर्व पदार्थ ताजेच असावेत. खासकरून मैदा,बेकींग पावडर, सोडा.

* केकसाठी लागणारे बटर,दूध,मिल्कमेड रूम टेंपरेचरचे असावे. फ्रिजमधले गार नको.

* आपण ज्या प्रकारचा केक करणार आहे, त्याला लागणारे सर्व साहित्य आधी एका ठिकाणी एकत्र काढून घ्यावे. म्हणजे एखादा पदार्थ विसरत नाही. नेमका सोडाच विसरला बघा... बाकी सर्व सांगितल्याप्रमाणे केले हो! ☺ असे होत नाही.

* रेसिपीत सांगितल्याप्रमाणेच अचूक मोजून मापून सर्व पदार्थ घ्यावेत. केेकमधे प्रमाणाला खूप महत्व आहे. अंदाजे कांही नको.

* आता साहित्याची इतकी सर्व जमवाजमव केल्यावर बँटर तयार करण्याआधी केकचा डबा बटर पेपर लावून किंवा मैद्याचे डस्टींग करून तयार करून ठेवावा.म्हणजे तयार बँटर पट्कन ओतता येते.

* मायक्रोवेव ओवन असेल तर त्यामधे लोअर रँक ठेवून 180 ° तापमानाला प्रीहीटला लावावा.  कढई /कुकर असेल तर ते ही मध्यम आचेवर १० मिनिटे गरम करण्यास लावावे. केक  बेक करण्यासाठी ओवन आधी गरम करणे गरजेचे असते. जसे पोळी भाजताना तवा आधी गरम असावा लागतो तसे.

* आता एका योग्य आकाराच्या बाऊलमधे केक साहित्यातील कोरड्या वस्तु चाळून घ्या. यामुळे कांही कचरा, गुठळ्या,साखरेतील मोठे कण असतीेल तर निघते व मैद्यामधे हवा गेल्याने केक हलका होतो. 

* ओले साहित्य म्हणजे बटर,दूध इत्यादी वेगळ्या बाऊलमधे एकत्र करावे.मात्र जेव्हा कोरडे व ओले साहित्य एकत्र करतो तेव्हा मिश्रण गरजेपेक्षा जास्त वेळ न ढवळता पटकन् आधीच तयार केलेल्या केक डब्यात घालून ओवनला लावावे. नाहीतर फुलण्याची क्रिया बाहेरच होते व प्रत्यक्षात बेक केल्यावर फुलत नाही.

* रेसिपीत सांगितलेल्या वेळेनंतरच ओवन किंवा कुकर उघडावा मधे- मधे उघडून बघू नये.केक बसतो.

* केक तयार झाल्यानंतर एकदा टूथपिकने चेक केल्यावर पांच मिनिट केक आतच राहू द्यावा. वाफ मुरू द्यावी.याला स्टँडींग टाईम म्हणतात. याने केक चिकट रहात नाही.

* बाहेर काढल्यावर केकचे भांडे गार झाल्यावर, कडा सुरीने सोडवून नंतर वायर रँकवर, व  नसेल तर घरातील पीठाच्या चाळणीवर काढून ठेवावा व पुर्णपणे गार होऊ द्यावा. म्हणजे खालून चिकट न रहाता सर्व बाजूने हवेने गार होतो.नंतर कापावा.

* या केकवर आईसिंग करायचे असेल तर केक फ्रिजमधे ठेवून चांगला गार करावा अथवा शक्य असल्यास आदल्यादिवशी करून फ्रिजमधे ठेवावा. तरच केकचे डेकोरेशन आकर्षक होते. नाहीतर क्रिम पघळते डिजाइन नीट होत नाही.

आपण वरील सर्व मुद्दे विचारात घेऊन जर काळजीपूर्वक केक केला तर अतिशय उत्कृष्ट केक घरी होतो व एकदा जमला की आत्मविश्वास वाढतो. मग आपण हौसेने वरचेवर केक करतो व सराईतपणा येतो.

स्वादान्न 🙏

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

06 December 2017

स्वयंपाकघरातील युक्ति

No comments :

भाजलेले शेंगदाणे पट्कन सोलायचे असतील तर, एका कापडी पिशवीत घालून घट्ट बांधून जमीनीवर हळू-हळू आपटावेत. एकदम सोलले जातात. नंतर पाखडावेत. 

04 October 2017

तूपाची बेरी

2 comments :

आजकाल लोकांना 'तूप' म्हटले की च वजन वाढल्याचा भास होतो. तूप खाणे शक्यतो टाळले जाते त्यामुळे घरात तयार करून खाणे तर दूरच. तसेही तूप बनविण्याची प्रक्रिया खूप मोठी व वेळखाऊही आहे. परंतु घरी करायचे तितकेही अवघड नाही.. फक्त रोज नियमितपणेे दूधाची साय काढणे, विरजणे, घुसळणे, लोणी ठराविक दिवसानी कढविणे असे सर्व चिकाटीने करावे लागते. तूप अतिशय गुणकारी आहे. रोज सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा शुध्द तूप आहारात असावेच. आरोग्याला चांगले असते. घरी केलेल्या लोणकढ्या तूपाची चव व खमंग वास खूपच छान लागते. तसेच घरी केलेले असल्याने भेसळ नाही व असे घरचे शुध्द तूप अजिबात बाधत नाही. तसेच तूप कढविल्यावर खाली लागते त्या खरवडीला तूपाची बेरी म्हणतात. ही सुध्दा खूप पौष्टीक असते बरं..

लहानपणी आम्ही भावंडे ही खरवड व तूपात घातलेले विड्याचे पान खाण्यासाठी भांडत असू. यावरून लहानपणीचे एक गाणे आठवले. आई विचारायची तूप कसे तयार होते माहीत आहे का? मग आम्ही सुरू,
दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी , लोण्याचं तूप, तुपाची बेरी... 

बर्याच घरातील ही आजची पिढी या तूपाची बेरी खाण्याच्या आनंदाला... घरात तूप कढत असताना येणार्या दरवळाला मुकली आहे. आता या बेरीच्या वड्या, लाडू, केक सुध्दा बनविले जातात. आम्ही लहानपणी पातेले चमच्याने खरवडून खरवडून बेरी काढून त्यात साखर मिसळून खात असू. आजच तूप कढवले त्यावरून हे सर्व आठवले. आता मी तूप कढवले की बेरी काढून साखर मिसळून टेबलवर ठेवते व येता -जाता चमच्याने तोंडात टाकते. भांडायला भावंड नाहीत आता... प्रत्येकजण आपापल्या घरी! व आजच्या मुलांना है असले पदार्थ खायला आवडत नाहीत.

घरगुती शुध्द तूप कसे तयार केले जाते? खाली दिलेल्या लिंकवर वाचा.

http://swadanna.blogspot.in/2016/12/clarified-butter-ghee.html?m=1

21 June 2017

कढीपत्ता चटणी ( Curry leaves Chutney)

2 comments :

कढीपत्ता
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय
स्वयंपाक घरातले एक महाऔषध.

'कढीपत्ता' हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले. की, त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते.

कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.जंगलातला कढीपत्ता जास्त गडद
रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात...आणि झाड मोठे झाले कीत्याच्या बिया आजूबाजूला पडून,  कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.

कढीपत्त्याचे 'आहार' आणि 'औषध' अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.

२) जुलाब लागले असता,
कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
'पोटातल्या वेदना' आणि 'जुलाबाचे वेग' वेगाने नियंत्रणात येतात.

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत
करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो,
त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ
मिसळून खावीत.

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे.
नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.

५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर,
कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.

८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण 'केमो' आणि 'रेडियो' थेरपी घेत असताना,
त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते.
अशा रुग्णांना दिवसातून तीन
वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून
खायला लावावीत.
रुग्णाला बराच आराम मिळतो.

१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर,
अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे 'अमृत' आहे.
कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर,
कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर,
मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत.
याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.

कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.
...असा हा
'बहुगुणी' आणि 'आरोग्यसंपन्न'
कढीपत्ता आहारात नियमित ठेवा.
कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

above Info C/P

मात्र इतका बहुगुणी कढीपत्ता आपल्या रोजच्या खाण्यात कितीसा येतो? आपण पोहे, उपमा,आमटी, भाजीत असा किती वापरतो? चार-सहा पाने फक्त,! तेही ऐनवेळी हाताशी असला तर ठीक नाहीतर नसतोच. कारण आपण रोज काही कढीपत्ता आणत नाही. आठवड्यातून एकदा भाजीसोबत आणतो व तो दोन दिवसानी पाने गळून वांळून नाहीतर कुजून गेलेला असतो. तर जास्तीत - जास्त कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी मी आज कढीपत्याची 'ओली चटणी' केली आहे. 'कोरड्या चटणी'ची रेसिपी यापुर्वीच दिलेली आहे. ओल्या चटणीचे साहित्य व कृती 👇
साहित्य :-
* कढीपत्ता पाने एक मोठी वाटी
* चणाडाळ पाव वाटी
* उडीद डाळ मुठभर
* ओलं खोबरं २ चमचे
* चिंच सुपारी एवढी
* लाल सुक्या मिरच्या २
* जीरे लहान अर्धा चमचा
* मीठ चविनूसार
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टाँवेलवर पसरून कोरडा करावा.

आता गँसवर कढई ठेवून चणाडाळ, उडीद डाळ वेगवेगळी तांबूस भाजावी.

नंतर कढईत चमचाभर तेल घालून लाल मिरची, कढीपत्ता पाने व जीरे,चिंच भाजून घ्यावे.

भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर भाजके पदार्थ व ओले खोबरे, मीठ घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे. वाटताना गरजेनुसार थोडे पाणी घालावे. थोडी घटसरच ठेवावी.

आता वाटलेली चटणी काचेच्या सटात काढून वरून मोहरी, हींग -जीरे व कढीपत्ता घालून केलेली तेलाची थंड फोडणी घालावी.

अशी ही चटकदार चटणी जेवणात रूची आणते  भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा मधे मधे  चाखायला मस्तच लागते. तसेच कोणत्याही पराठे पुरी सोबत ही खाता येते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका हं ☺

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

25 February 2017

झटपट पुरण कसे तयार करावे?

No comments :

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात माणसांकडे वेळ अजिबात नसतो. तशात पुरणपोळी सारखे वेळखाऊ पदार्थ करायला तर अजिबात वेळ नसतो. परंतु काही ठराविक सणादिवशी नैवेद्यासाठी पुरण लागतेच. किवा कधी आपल्यालाही पोळी खावी वाटते. विकतची पोळी पसंतीला उतरत नाही व पुरवठ्यालाही येत नाही. अशावेळी असे झटपट पुरण तयार करावे. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* चणाडाळ १ वाटी
* पाणी २ १/२ (अडीच) वाट्या
* गूळ १ वाटी
* जायफळ
* वेलची पावङर

कृती :-
प्रथम डाळ स्वच्छ धुवून ६ तास भिजत घालावी.  भिजल्यानंतर त्यातील पाण्यासह कुकरला ४-५ शिट्टया काढून मऊ शिजवून घ्यावी.

आता शिकलेली डाळ मँशरने मँश करून घ्यावी. नंतर त्यामधे १ वाटी चिरलेला गुळ घालावा व एकत्र करून मायक्रोवेवला हाय पाँवरला ५ मिनिट ठेवावे. ५ मिनिटांनी एकदा हलवावे व परत ५ मिनिट ठेवावे.

शेवटी तयार पुरणामधे वेलचीपूड न जायफळ पूड घालून एकत्र करावे.

तीन स्टेपमधे मऊ लुसलू़शित पुरण तयार होते. तयार पुरणाच्या पोळ्या लाटाव्यात व खाव्यात.

टीप :-
ओवन नसेल तर जाड बुडाच्या कढईत शिजवावे. मात्र सतत हलवत रहावे. खाली करपण्याची शक्यता असते.याला वेळ थोडा जास्त लागतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


29 December 2016

फ्रोजन मटार(Frozen Green Peas)

No comments :

स्वयंपाक घरात हिरवे ताजे मटार हाताशी असतील तर, ऐत्यावेळी एखादी भाजी पट्कन करता येते.. मटर पनीर, मेथी मटर मलई, मटरची उसळ. तसेच मटार राईस, पुलाव, पोहे उपमा यामधे पण वापरता येते. साधारणपणे नोवेंबर ते फेब्रुवारी अखेर पर्यंत ताजे मटार बाजारात भरपूर व स्वस्त असतात. तर आताच जास्तीचे मटार आणून फ्रिजमधे साठवून ठेवावेत. म्हणजे जेव्हा पुढे महाग होतात व तितकेसे चांगलेही मिळत नाहीत तेव्हा उपयोगात आणता येतात. तर हे मटार दाणे कशा प्रकारे फ्रिजमधे साठवून ठेवावेत?

साहित्य :-
° ताज्या हिरव्या मटारच्या शेंगा २ किलो
° मीठ १ टेस्पून
° पाणी गरजेनुसार

कृती :-
आपल्या गरजेनुसार चांगले ताजे हिरव्या मिरच्या शेंगा बाजारातून घेऊन यावेत व सोलून दाणे काढावेत.

दाणे काढत असतानाच त्यातील बारीक दाणे वेगळ्या वाटीत काढावेत व एकसारखे मोठे टपोरे दाणे साठवणुकीसाठी घ्यावेत. बारीक दाणे लगेच पोहे, उपमा यात वापरून टाकावेत.

आता एका मोठ्या पातेल्यात मटार बुडतील इतके पाणी गँसवर उकळवायला ठेवून द्यावे.

पाणी उकळायला लागले की,थोडे मीठ व निवडून स्वच्छ केलेले मटारचे दाणे, पाण्यात सोङावेत. गँस बंद करावा. मटार दाणे तसेच पाण्यात ५ मिनिट राहू द्यावेत.

पांच मिनिटानंतर मटार चाळणीत काढावेत व वरून भरपूर गार पाणी ओतावे. चाळणीवरच थोडावेळ राहू द्यावेत.

पाणी पूर्ण निथळल्यावर मटार दाणे प्लास्टिक पिशवीत भरून, पँक करून फ्रिजरमधे ठेवावेत. सहा महीन्यापर्यंत छान टिकतात. गरजेप्रमाणे केव्हाही काढून वापरावेत.

टिप:- मटार शक्यतो लहान-लहान प्लास्टिक बँगमधे भरावेत. जेणेकरून एकावेळी एक बँग बाहेर काढून वापरून टाकता येते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.