18 July 2018

केक करताना लक्षात घेण्याच्या गोष्टी (Cake Tips)

No comments :

आजकाल घरात छोट्या -मोठ्या प्रसंगासाठी म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, किंवा न्यू इयर अगदी कांही नसले तरी मुलांना आवडतो म्हणून केक विकत आणला जातो. सहसा केक रोजच्या खाण्यातल्या इतर पदार्थाप्रमाणे घरी करण्याचा कोणी विचार करत नाही. एकतर सामान्य व्यक्ति च्या डोक्यात केक म्हणजे कांहीतरी अवघड पदार्थ आहे,त्यामधे अंडी घालतात त्याशिवाय केक होतच नाही असे व इतर अनेक गैरसमज बसलेले असतात. तसेच आमच्याकडे मायक्रोवेव ओवन नाही ही पण एक समस्या असते. अाणखी मी केलेला केक फुगत नाही, कडक होतो, जाळी पडत नाही असे बरेच मुद्दे येतात. मग त्या वाटेला जायलाच नको. केक म्हणजे केव्हातरी खायचा पदार्थ, अन् कशाला पाहीजे झंझट असे विचार होतात. कारण आपण केक बनविताना त्यातील बारकावे लक्षात न घेता ढोबळमानाने कुठूनतरी वाचून,बघून करतो.मग हवा तसा मनासारखा होत नाही. शेवटी आपण नाद सोडून देतो.

परंतु खरं सांगू? घरात केक बनवायचा तर यातील एकही समस्या येत नाही. फक्त त्याची आपल्याला व्यवस्थित माहीती व कृतीचे बेसिक पक्के नीट माहीत असले पाहीजे. बस्स! कोणतीही अडचण येत नाही.आपण सर्व प्रकारचे केक अगदी वरील आईसिंग सह घरी बनवू शकतो.

आपल्याला जर विकतच्या सारखा मऊ लुसलू़शित स्पाँजी अन् कमी खर्चात ताजा, हायजेनिक केक घरातच करता आला तर मस्तच ना? तर पुढे सांगितलेले कांही बारकावे लक्षपूर्वक वाचा. नक्की तुम्हीसुध्दा घरच्या-घरी मनात येईल तेव्हा केक करू शकाल.अन् खाताना किंवा खिलवताना स्वत: केलेल्या केकचे कौतुक व टेस्ट कांही औरच.

* सर्वात आधी हे लक्षात घ्यावे की, केक बिना अंड्याचाही होऊ शकतो.

* केक करण्यासाठी घरात मायक्रोवेव ओवनच असला पाहीजे असे नाही.कुकरमधे अथवा कढई मधे केक करता येतो.कुकर/ कढईच्या तळाला वाळू किंवा बारीक मीठ पसरावे व त्यावर गोल स्टील रींग किंवा टेबलवर गरम भांडी ठेवण्यासाठीचे स्टँड ठेवावे व त्यावर केक टीन ठेवावा.कढईवर मापाचे जड झाकण ठेवावे.जर कुकर असेल तर शिट्टी काढावी व ओवनप्रमाणे १० मिनिट प्रीहीट करावे.देशी ओवन तयार!

आता केकची सुरवात -

* आता सर्वात प्रथम केक रेसिपी काळजीपूर्वक वाचून/ऐकून घ्यावी. त्यामधे दिलेले सर्व साहित्य दिलेल्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे का? याची खातरजमा करावी. कांही पदार्थ पुरेसे नसतील किंवा उपलब्ध नसतील तर आधीच  त्या साहित्याची जुळवाजुळव करावी.तडजोड अजिबात नको. नाहीतर अपेक्षेप्रमाणे केक होत नाही.

* केकसाठी लागणारे सर्व पदार्थ ताजेच असावेत. खासकरून मैदा,बेकींग पावडर, सोडा.

* केकसाठी लागणारे बटर,दूध,मिल्कमेड रूम टेंपरेचरचे असावे. फ्रिजमधले गार नको.

* आपण ज्या प्रकारचा केक करणार आहे, त्याला लागणारे सर्व साहित्य आधी एका ठिकाणी एकत्र काढून घ्यावे. म्हणजे एखादा पदार्थ विसरत नाही. नेमका सोडाच विसरला बघा... बाकी सर्व सांगितल्याप्रमाणे केले हो! ☺ असे होत नाही.

* रेसिपीत सांगितल्याप्रमाणेच अचूक मोजून मापून सर्व पदार्थ घ्यावेत. केेकमधे प्रमाणाला खूप महत्व आहे. अंदाजे कांही नको.

* आता साहित्याची इतकी सर्व जमवाजमव केल्यावर बँटर तयार करण्याआधी केकचा डबा बटर पेपर लावून किंवा मैद्याचे डस्टींग करून तयार करून ठेवावा.म्हणजे तयार बँटर पट्कन ओतता येते.

* मायक्रोवेव ओवन असेल तर त्यामधे लोअर रँक ठेवून 180 ° तापमानाला प्रीहीटला लावावा.  कढई /कुकर असेल तर ते ही मध्यम आचेवर १० मिनिटे गरम करण्यास लावावे. केक  बेक करण्यासाठी ओवन आधी गरम करणे गरजेचे असते. जसे पोळी भाजताना तवा आधी गरम असावा लागतो तसे.

* आता एका योग्य आकाराच्या बाऊलमधे केक साहित्यातील कोरड्या वस्तु चाळून घ्या. यामुळे कांही कचरा, गुठळ्या,साखरेतील मोठे कण असतीेल तर निघते व मैद्यामधे हवा गेल्याने केक हलका होतो. 

* ओले साहित्य म्हणजे बटर,दूध इत्यादी वेगळ्या बाऊलमधे एकत्र करावे.मात्र जेव्हा कोरडे व ओले साहित्य एकत्र करतो तेव्हा मिश्रण गरजेपेक्षा जास्त वेळ न ढवळता पटकन् आधीच तयार केलेल्या केक डब्यात घालून ओवनला लावावे. नाहीतर फुलण्याची क्रिया बाहेरच होते व प्रत्यक्षात बेक केल्यावर फुलत नाही.

* रेसिपीत सांगितलेल्या वेळेनंतरच ओवन किंवा कुकर उघडावा मधे- मधे उघडून बघू नये.केक बसतो.

* केक तयार झाल्यानंतर एकदा टूथपिकने चेक केल्यावर पांच मिनिट केक आतच राहू द्यावा. वाफ मुरू द्यावी.याला स्टँडींग टाईम म्हणतात. याने केक चिकट रहात नाही.

* बाहेर काढल्यावर केकचे भांडे गार झाल्यावर, कडा सुरीने सोडवून नंतर वायर रँकवर, व  नसेल तर घरातील पीठाच्या चाळणीवर काढून ठेवावा व पुर्णपणे गार होऊ द्यावा. म्हणजे खालून चिकट न रहाता सर्व बाजूने हवेने गार होतो.नंतर कापावा.

* या केकवर आईसिंग करायचे असेल तर केक फ्रिजमधे ठेवून चांगला गार करावा अथवा शक्य असल्यास आदल्यादिवशी करून फ्रिजमधे ठेवावा. तरच केकचे डेकोरेशन आकर्षक होते. नाहीतर क्रिम पघळते डिजाइन नीट होत नाही.

आपण वरील सर्व मुद्दे विचारात घेऊन जर काळजीपूर्वक केक केला तर अतिशय उत्कृष्ट केक घरी होतो व एकदा जमला की आत्मविश्वास वाढतो. मग आपण हौसेने वरचेवर केक करतो व सराईतपणा येतो.

स्वादान्न 🙏

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment