31 December 2016

वेज उत्तप्पम ( Veg Uttappam)

1 comment :

"वेज उत्तप्पम" नाष्ट्याचा पदार्थ आहे. परंतु एखादे दिवशी फारशी भूक नसेल तर दोन उत्तप्पम खाल्ले तरी,वर भाज्या असल्याने पोटभरीचे होते. पीठ फ्रिजमधे तयार करून ठेवले व ऐत्यावेळी पट्कन भाज्या चिरून घेतल्या तर खूप कमी वेळेत नाष्टा तयार होतो. कसे करायचे, साहित्य व कृती 👇 👇 👇

साहित्य
बँटरसाठी-
° मोठा तांदुळ 3 वाट्या
° उडीद डाळ १ वाटी
° पातळ पोहे १ वाटी
° मेथीदाणे १/२ टीस्पून
° मीठ चविनुसार
° पाणी भिजविण्यासाठी
टाँपिंगसाठी
° कांदा उभा पातळ चिरून
° टोमँटो, शिमला, गाजर, बीन्स,कोबी, हिरवी मिरची व कोथंबिर सर्व बारीक चिरून घ्यावे. भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार.
° मीठ चविनुसार
° तेल

कृती :-
प्रथम तांदुळ, उडीद डाळ व मेथी ५-६ तास वेगवेगळे भिजवावे.

नंतर भिजलेली डाळ,मेथी पाणी निथळून वाटावी.बाऊलमधे काढावी. आता तांदुळ व पातळ पोहे एकत्र वाटावे. वाटलेल्या डाळीच्या मिश्रणातच एकत्र काढावे व सर्व मिश्रण ढवळावे. अंबण्यासाठी ७ -८ तास ठेवावे. अांबल्यानंतर तयार पीठात मीठ घालावे. बँटर तयार.

आता एका बाऊलमधे कांदा व चिरलेल्या भाज्या एकत्र करून त्यावर मीठ घालावे.टाँपिंग तयार.

नंतर गँसवर तवा गरम करावा. डोशा प्रमाणे तेल पाणी शिंपङून तवा तयार करावा व त्यावर तयार पीठाचे थोडे जाडसर मिश्रण डावाने पसरावे. त्यावर तयार भाज्याचे मिश्रण पसरावे. थोडे तेल सोडावे व खरपूस होईपर्यंत मंद आचेवर, वरून झाकण ठेवून भाजावे. नंतर उलटून दुसरी बाजूही थोडी भाजावी.

तयार "वेज उत्तप्पम" आवडीची कोणतीही चटणी, साँस बरोबर खायला द्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

गाजराचे लोणचे ( Carrot Pickle)

No comments :

रोजच्या जेवणात एखादे चटकदार लोणचे, चटणी ताटात डाव्या बाजूला असेल तर जेवणाची रंगत वाढते. मग एखादी भाजी कमी आवडीची असली तरी चालते. कैरी,लिंबू, मिरची, माईनमुळे,आवळा अशी बरीच लोणची वर्ष भरासाठी करून ठेवायची पध्दत आहे. पण खरं सांगू का, लोणचं ताजं असताना जितक्या आवडीने खाल्ले जाते तितके जुने झाल्यावर नाही खाल्ले जात. नंतर -नंतर तर फोडी मऊ होतात, रंग काळपट होतो.. त्यामुळे मला तरी जूनी लोणची अजिबात आवडत नाहीत. म्हणतात की, लोणचे मुरेल तसे चविला छान लागते. पण मला हे फक्त लिंबू लोणच्याचे बाबतीत खरे वाटते. म्हणून मी लिंबू लोणचे तेवढे जास्तीचे करते.मुरावे या हेतूने, पण बाकी मिरची,कैरी लोणचे ताजे -ताजे १५ दिवस ते महीन्या पर्यंतचेच करते. मिरच्या तर १२ महीने बाजारात असतात व मुंबई मधे कैरीसुध्दा एक-दोन महीने वगळता१२ ही महीने मिळते. व तसेही मधून मधून निरनिराळ्या सिझनेबल भाज्यांची लोणची, ठेचा, कोरड्या चटण्या, ओल्या चटण्या,मेतकूट असे बरेच प्रकार असतात. तर असेच आज सिझनचे "गाजराचे लोणचे " केले. भाज्यांची लोणची सहसा तीन-चार दिवस व फ्रिजमधे ठेवली तर ८ दिवस टिकतात. पण आपण फ्रिजमधे ठेवण्याइतके जास्त करायचेच कशाला?  ताजे-ताजे करू व लगेच संपवून टाकू! पण आधी करायला तरी पाहीजे ना? कसे केले साहित्य व कृती 👇

साहित्य ;-
° ताजी करकरीत लाल गाजरे ३-४
° मोहरीडाळ २ टेस्पून
° मेथीदाणे १/४ टीस्पून
° लाल मिरचीपूड २ टीस्पून
° लिंबू एक
° मीठ चविनुसार
° तेल २ टेस्पून
° फोडणीसाठी हिंग,मोहरी, हळद

कृती :-
प्रथम लहान कढल्यात तेल गरम करून त्यातून मेथीदाणे तांबूस करून काढून घ्यावेत व त्याच तेलात हिंग,मोहरी, हळद घालून फोडणी करून, गार होण्यासाठी कडेला ठेउन द्यावी.

नंतर गाजरे धेऊन,पुसून साल काढून घ्यावीत. नंतर उभी चिरून त्यातील मधला पांढरा भाग काढून साधारण १-१ इंचाचे उभे काप करून घ्यावेत.

आता चिरलेल्या गाजरामधे, मोहरीडाळ व आधी भाजून ठेवलेली मेथी कुटून घालावी. तसेच मीठ, लाल तिखटही घालावे व वरून लिंबू रस घालावा. सर्व साहित्य एकत्रीत कालवावे. शेवटी आधी करून ठेवलेली व गार झालेली तेलाची फोडणी वरून घालावी व पुन्हा एकदा व्यवस्थित हलवावे.

मस्त लालभडक, ताजे करकरीत चटकदार लोणचे काचेच्या सटात काढून जेवणात घ्यावे. खूप मस्त लागते. जेवणात तर चांगले लागतेच पण पराठे, ब्रेडला लावून खायलाही सुंदर लागते.

टिप:-या लोणच्यामधे बारीक चिरून आलं-लसूण चे तुकडे घातले तरी छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

29 December 2016

फ्रोजन मटार(Frozen Green Peas)

No comments :

स्वयंपाक घरात हिरवे ताजे मटार हाताशी असतील तर, ऐत्यावेळी एखादी भाजी पट्कन करता येते.. मटर पनीर, मेथी मटर मलई, मटरची उसळ. तसेच मटार राईस, पुलाव, पोहे उपमा यामधे पण वापरता येते. साधारणपणे नोवेंबर ते फेब्रुवारी अखेर पर्यंत ताजे मटार बाजारात भरपूर व स्वस्त असतात. तर आताच जास्तीचे मटार आणून फ्रिजमधे साठवून ठेवावेत. म्हणजे जेव्हा पुढे महाग होतात व तितकेसे चांगलेही मिळत नाहीत तेव्हा उपयोगात आणता येतात. तर हे मटार दाणे कशा प्रकारे फ्रिजमधे साठवून ठेवावेत?

साहित्य :-
° ताज्या हिरव्या मटारच्या शेंगा २ किलो
° मीठ १ टेस्पून
° पाणी गरजेनुसार

कृती :-
आपल्या गरजेनुसार चांगले ताजे हिरव्या मिरच्या शेंगा बाजारातून घेऊन यावेत व सोलून दाणे काढावेत.

दाणे काढत असतानाच त्यातील बारीक दाणे वेगळ्या वाटीत काढावेत व एकसारखे मोठे टपोरे दाणे साठवणुकीसाठी घ्यावेत. बारीक दाणे लगेच पोहे, उपमा यात वापरून टाकावेत.

आता एका मोठ्या पातेल्यात मटार बुडतील इतके पाणी गँसवर उकळवायला ठेवून द्यावे.

पाणी उकळायला लागले की,थोडे मीठ व निवडून स्वच्छ केलेले मटारचे दाणे, पाण्यात सोङावेत. गँस बंद करावा. मटार दाणे तसेच पाण्यात ५ मिनिट राहू द्यावेत.

पांच मिनिटानंतर मटार चाळणीत काढावेत व वरून भरपूर गार पाणी ओतावे. चाळणीवरच थोडावेळ राहू द्यावेत.

पाणी पूर्ण निथळल्यावर मटार दाणे प्लास्टिक पिशवीत भरून, पँक करून फ्रिजरमधे ठेवावेत. सहा महीन्यापर्यंत छान टिकतात. गरजेप्रमाणे केव्हाही काढून वापरावेत.

टिप:- मटार शक्यतो लहान-लहान प्लास्टिक बँगमधे भरावेत. जेणेकरून एकावेळी एक बँग बाहेर काढून वापरून टाकता येते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

23 December 2016

मसाला भेंडी (Masala Bhindi)

No comments :

भेंडी ही भाजी बर्याच जणांना त्यातील चिकटपणामुळे आवडत नाही. परंतु भेंडी ह्रदयासाठी चांगली आहे. तसेच रक्तदाब पण भेंडीमुळे नियंत्रणात रहतो. भेंडीची भाजी खूप प्रकारांनी बनविता येते. भरली भेंडी, चिंच-गुळातली भेंडी,परतून केलेली भेंडी अजून बर्याच प्रकारांनी बनविता येते. मी मसाला भेंडी केली आहे.साहित्य व कृती-👇 👇

साहित्य :-
° भेंडी २५० ग्रँम
° कांदा मोठा १
° टोमँटो २
° आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
° गरम मसाला १/२ टीस्पून
° लाल मिरचीपूड १ /२ टीस्पून
° आमचूर पावडर १ /२ टीस्पून
° मीठ चविनूसार
° हळद पाव चमचा
° जीरे १/४ टीस्पून
° तेल २ टेस्पून
° कोथंबिर चिरून

कृती :-
प्रथम भेंडी धुवून, पुसून कोरडी करून घ्यावी व शेंडा-बुडखा काढून उभी चिरून घ्यावी.

नंतर १ टेस्पून तेलावर परतून, भाजून घ्यावी.

आता कढईमधे १ टेस्पून तेल घालून जीरे तडतडवून घ्यावेत. हळद घालावी व वर कांदा घालून परतावे. परतत असताना आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून थोडे परतावे. शेवटी चिरलेला टोमँटो घालावा व मऊ होईपरेंत पपतावा.

परतलेल्या कांदा -टोमँटो मधे गरम मसाला, मिरची पूड, आमचूर पावडर, मीठ सर्व घालावे.मिश्रण  फार कोरडे वाटू लागले तर किंचित पाणी घालून परतावे.

शेवटी तयार मसाल्यामधे भाजलेली भेंडी घालावी व एकत्र परतावे

तयार "मसाला भेडी" भाजी गरमा-गरम पोळी किंवा फुलक्यासोबत खावी.

टीप: भेडीमधे आमचूर पावडर किंवा लिंबूरस घातल्यास भेडीचा चिकटपणा कमी होतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 December 2016

साजुक तूप (Clarified Butter, Ghee)

No comments :

आपल्या आहारातील "साजुक तूप" हा अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे व स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. तुपामुळे बुध्दी कुशाग्र होते. तसेच हाडं, स्नायु, डोळे, त्वचा यासाठी शक्तिवर्धक आहे. प्रथिनयुक्त पदार्थासोबत तूप खाल्याने त्या पदार्थातील प्रथिने जास्त उपयुक्त ठरतात. उदा.वरण-भातावर तूप घेतले तर अधिक पौष्टीक होते. तुपाशिवाय प्रोटीनयुक्त पदार्थ तितकेसे लाभदायक ठरत नाहीत. जुने तूप सुध्दा फार उपयोगी असते. मात्र या सर्वासाठी तूप नेहमी शुध्द व शक्यतो घरचे असेल म्हणजे, विरजण-मंथन-अग्नी पचन या तीन संस्कारातून पार पडलेले असेल तरच उपयोगी ठरते. तर असे "साजुक तूप" घरच्या-घरी कसे बनवायचे?

कृती:-

आपण घरातील रोजच्या वापरासाठी जे दूध घेतो ते प्रथम जाड बुडाच्या स्वच्छ भांङ्यामधे तापवावे. नंतर मंद गँसवर किंवा खाली जाळी ठेवून पाच मिनिट उकळवावे व नंतर थंड होऊ द्यावे.

नंतर थंड दूधावरची साय चमच्याने कडेने खरडून,खालच्या थोड्या दूधासोबत(साका) एका वेगळ्या भांड्यात काढून फ्रिजमधे ठेवावी. असे सलग ३-४ दिवसाची साय साठली की, भांडे फ्रिजमधून काढून साय कोमट करावी व विरजण म्हणजे लहान चमचाभर दही घालून विरजावी. म्हणजे विरजण संस्कार झाला.

दुसर्या दिवशी या विरजलेल्या सायीच्या दह्याला रवीने अथवा मिक्सरमधे घुसळावे व लोणी काढावे. खालचे ताक जेवणात पिणयासाठी वापरावे. (रवीने घुसळलेले असेल तर ताकही जास्त चवदार लागते) ही झाली मंथन प्रक्रिया!

शेवटी मंथन करून काढलेले लोणी १०-१५ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व जाड बुडाच्या भांड्यात कढायला तापत ठेवावे. सुरवातीला दूघासारखे वर येते तेव्हा गँस बारीक ठेवावा व चमच्याने ढवळत रहावे.

नंतर कांहीवेळाने ढवळायचाी गरज रहात नाही. तुप उकळत रहाते. फक्त लक्ष ठेवायचे. कडेने तांबूस दिसायला लागले व उकळताना येणारा कडकड असा आवाज थांबला,उकळी कमी झाली की तुप कंढले, तयार झाले समजावे. गँस बंद करावा व  त्यामधे विड्याचे पान हाताने चुरगळून  टाकावे व तूप थंड होऊ द्यावे.

आता असे थंड झालेले खमंग वासाचे "घरगुती साजुक तूप" गाळून स्वच्छ काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे व दररोजच्या जेवणात थोडे -थोडे खावे.

टीप्स ;- 
* आपल्या घरात दूध किती घेतो , त्यामानाने साय साठवावी. एक लिटरपेक्षा जास्त म्हणजे दोन लिटर घेत असू तर दोन दिवसातच विरजावे. एकूण काय तर साय ३-४ दिवसाच्यावर साठवू नये. वास येतो. 

* लोणीसुध्दा काढल्यावर थोडेच असेल तर लगेच न कढवता एका कुंड्यामधे घालून मीठाच्या पाण्याने घुवून फ्रिजमधे साठवून ठेवावे व आठवड्याचे किवा पंधरा दिवसातून एकदा कढवावे. जास्त सोयीचे होते. मी स्वता असेच करते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


आपल्या आहारातील तूप व लोणी याचे महत्व (Importance Of Ghee)

No comments :

तूप किंवा लोणी हे पदार्थ खावेत का नाही याबाबत खूप वेगवेगळी मते आहेत. बरेचजण वजनवाढीच्या भितीने तूप/लोणी या पदार्थापासून लांब रहातात. पण खरेच तुप/लोणी खाल्ल्याने वजन वाढते का? शरीराला ते उपयोगी आहे का? का अपायकारक हे, पुढील लेख वाचून तुम्हीच ठरवा.

लोणी
दूधाच्या साईचे दही लावून ते घुसळून बनवलेल्या ताकापासून काढलेले लोणी प्रकृतीस हितकर असते. त्यात प्रामुख्याने ‘अ’, ‘ई’ आणि ‘ड’ जीवनस’त्त्वे असतात. इतर अँटि ऑक्सिडंट्स देखील लोण्यात असून ते स्निग्ध गुणात्मक आहे. त्वचा, डोळे आणि हाडांच्या आरोग्यासाठीही लोणी उपयुक्त आहे. आयुर्वेदात काही औषधे लोण्याबरोबर दिली जातात. सांधेदुखीवरही त्याचा खूप फायदा होतो.

तूप
आरोग्यवर्धक समजले जाते. लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप वं असे तूप सवयंपाक घरातीलअविभाज्य घटक आहे. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये ‘राजेशाही’ स्थान आहे. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन लहान चमचे किंवा पळीभर साजूक तूप मोठयांच्या आहारात सुचवले जाते.

लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते. हे तूप गाळून घेतल्यावर खाली राहिलेला भाग म्हणजे तुपाची बेरी. लोण्यापासून अशा पद्धतीने तयार केलेले साजूक तूप औषधी असते. साजूक तुपातील ओमेगा- ६ व ओमेगा- ३ फॅटी अ‍ॅसिडस्चे प्रमाण असे असते की ते योग्य प्रमाणात खाल्ले गेल्यास त्याचा दुष्परिणाम न होता उलट हृदयाचे आरोग्य सांभाळले जाते. तुपातील ‘कोलीन’ हे तत्त्व स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असते. तूप हे उत्तम पाचक असल्याने जड जेवणात त्याचा वापर सयुक्तिक ठरतो. त्याने पाचकरसांचे उद्दीपन केले जाते.

साजूक तूपामध्ये रेटिनॉल व बेटाकेरोटीन हे घटक आहेत. हे पौष्टिक घटक डोळयांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. २०१० मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार साजूक तूप हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. तसेच, चांगले कोलेस्टेरॉल वाढवते.

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही. 

जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे फायदे... 

* शुद्ध, साजूक तुपामुळे बुध्दी कुशाग्र होते.कांती मऊ व तजेलदार होते.

* तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

* रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

* शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

* तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. दृष्टि चांगली होते.

* हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

* गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तूप खुप फायदेशीर ठरतं.

* उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.

* डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

* शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे. 

* तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे. 

* शुद्ध तुपामुळे चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं. चमकदार होतो.

* डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे. 

* तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते. 

* जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी. 

* कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.

* तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे. 

कसे खावे?
* सकाळी व रात्रीच्या रोजच्या जेवणात २ छोटे चमचे भरून तूप घ्यावे. तूप पातळ असल्यास त्याचे प्रमाण थोडेसे अधिक चालू शकेल. 

* मसालेभात, पुरणपोळी अशा जड पदार्थाच्या जेवणात थोडे अधिक तूप घेतलेले चालू शकेल. त्यामुळे जड पदार्थ पचायला मदत होते.

* मुलांना अधूनमधून तूप- मेतकूट भात द्यावा. 

* काही भाज्यांना तुपाची फोडणीही देता येईल.

* तुपातील गोड पदार्थ खाण्यावर मात्र र्निबध हवा.

* आजार असलेल्या व्यक्तींनी तूप खाण्यास सुरुवात करताना आपल्या डॉक्टरांशी बोलून घेणे गरजेचे आहे. 

* तूप योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा हृदयाला फायदा जरी होत असला तरी आपल्यासाठी ते प्रमाण काय असावे हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.  

* तूपही अति खाल्ल्यास मळमळते. 

सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे वरील सर्व फायदे तूप खरोखर शुध्द असेल व योग्य प्रमाणात खाल्ले तरच मिळू शकतात. अन्यथा फायद्या ऐवजी नुकसानच अधिक होईल.साईचं दही, ते घुसळून काढलेलं लोणी आणि त्या लोण्याचं कढवून केलेलं;  विरजण-मंथन-अग्नी पचन असे तीन संस्कार झालेलं तूप हे पचायला हलकं  असते. अशी प्रक्रिया करून घरी तयार केलेले तूप अत्यंत पौष्टीक व फायदेशीर असते.शक्यतो घरीच बनविलेले तूप खावे. बाजारी तुपात भेसळ असू शकते.

या लेखातील काही माहीती वाचकांना जास्तीत -जास्त,माहीती एकत्रित वाचनास मिळावी यासाठी गुगलवरून संग्रहीत केली आहे.

इतके उपयुक्त, गुणकारी "घरगुती साजुक तूप " कसे बनवावे याची सचित्र कृती पहाण्यासाठी येथे पहा 👇 👇 👇 👇 👇
http://swadanna.blogspot.in/2016/12/clarified-butter-ghee.html?m=1

15 December 2016

बाँम्बे-कराची हलवा (Bombay-Karachi Halawa)

No comments :
"बाँम्बे -कराची हलवा " हा सिंधी मिठाईचा एक प्रकार आहे. साधारण जेलीसारखा दिसतो व लुसलू़शित पण chewy असा अाहे. मिठाईच्या दुकानात खूप आकर्षकरीत्या अशी ही रंगी -बिरंगी मिठाई सजवून ठेवलेली असते. फार गोडही नाही. सणासुदीला किंवा पाहुणे येणार असतील तर करायला सोपी अन् दिसायला छान दिसते. कशी केली, साहित्य व कृती-
साहित्य :-
* काँर्नफ्लोअर १/२ कप (measuring cup)
* पाणी १ १/२ कप
इतर-
* साखर १ १/२ कप
* पाणी १ कप
* लिंबू रस १ टीस्पून
* तूप ४ टेस्पून
* फूडकलर आवडीचा कोणताही, ४-५ थेब
* वेलचीपूड
* काजू -बदाम काप १ टेस्पून

कृती :-
प्रथम एका नाँनस्टीक पँनमधे साखर व पाणी एकत्र करून, लहान गँसवर ठेऊन द्या. साखर विरघळे पर्यंत मधे -मधे हलवत रहा.
तोपर्यंत एका बाऊलमधे काँर्नफ्लोअर घ्यावे व त्यामधे दीड वाटी पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. गुठळ्या अजिबात राहू देऊ नयेत.

आता साखर विरघळली असेल तर त्यामधे ही तयार काँर्नफ्लोअर पेस्ट घालावी व सतत हलवत रहावे. तळापासून हलवावे. खाली लागण्याची शक्यता असते.

पांच मिनिटानी मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल तर त्यामधे लिटेस्पून व रंगही घालावा व हलवत रहावे. ५-५ मिनिटानी हलवत हलवतच १-१ चमचा तूप घालावे. असे २० मिनिटे सतत हलवत रहावे.

आता मिश्रण पारदर्शी दिसू लागलेले असते. आताच त्यामधे काजू-बदामचे काप व वेलचीपूड घालावी. एकत्र सर्व हलवावे व असेल तर शक्यतो काचेच्या ट्रेमधे किंवा कोणत्याही ट्रेमधे तूपाचा हात चोळावा व तयार मिश्रण त्यावर ओतावे. वरून थोडे काजू -बदाम काप पेरावेत व मिश्रण १५ मिनिट गार होऊ द्यावे.
थंड झाले की बोट लावून पहावे. रबरासारखे मऊ लागते हाताला. नंतर तयार मिश्रणाच्या सुरीने कापून वड्या काढाव्यात.

या रंगीत वड्या खूप आकर्षक दिसतात तसेच इतर मिठाईच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

टिप :-
* काँर्नफ्लोअर पेस्ट तयार करताना अजिबात गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर हलवा व्यवस्थित होत नाही.

* साखर फक्त विरघळवायची आहे. कोणताही एकतारी, दोनतारी पाक करायचा नाही.

* तूप दिलेल्या प्रमाणातच घालावे. कोणतीही तडजोड नको.

* सर्वात महत्वाचे दिलेल्या प्रमाणातच सर्व साहित्य मोजून घ्यावे.

* ही पाककृती करताना पूर्णपणे मंद गँसवर करावी. वाढवू नये.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 December 2016

मेथी भाजी (Methi Bhaji)

No comments :

मेथी सर्वांच्या परिचयाचीच भाजी आहे. सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. मेथीची मेत्रूटे, मेथीलाडू करतात. दूधवाढीसाठी त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात. तोंडाची चव गेली असल्यास या भाजीने रूची येते. मेथीची भाजी अनेक पध्दतिने केली जाते. तसेच पराठे, भजीही छान होतात. आज मी डाळवाली मेथीभाजी केली आहे. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* गोल पानांची ताजी मेथी जुडी १
* मुगाची डाळ १/२ वाटी
* लसूण ८-१0 पाकळ्या
* हिरवी मिरची ३-४
* मीठ चविनूसार
* तेल फोडणीसाठी
* हिंग-मोहरी, हळद

कृती :-
प्रथम मेथी निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरावी.मेथी निवडेपर्यंत मुगडाळ पाण्यात भिजत घालावी. मुगडाळ सहज व लवकर भिजते. वेळ लागत नाही.

आता कढईमधे (लोखंडी असेल तर जास्तच चांगले)  तेल गरम करून  हिंग,हळद मोहरीची फोडणी करून घ्या. फोडणीमधे लसूण ठेचून व हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत. अशा फोडणीचा खमंग वास घरात पसरला की, कधी एकदा भाजी होतेय व आपण खातोय असे होते.

तर आता फोडणीमधे आधी भिजलेली डाळ व त्यावर चिरलेली मेथी टाकावी. पाच मिनिट झाकण ठेवावे. भाजी खाली बसते.  भाजीचा अंदाज येतो. आता चवीनुसार मीठ घालावे. आता झाकण न ठेवता, चमच्याने हलवत परतावे. भाजी सुकी झाली की गँस बंद करावा. या भाजीला वेळ लागत नाही. लोखंडी कढईत केली असेल तर लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावी.

अशी खमंग भाजी सोबत गरमा-गरम टम्म फुगलेली भाकरी, लोण्याचा गोळा, कांदा व मिरचीचा खर्डा अहाहा.. स्वर्गसुख म्हणतात ते हेच का ते असे वाटते. त्यात बाहेरही मुसळधार पाऊस कोसळत असावा व आपली माणसे संध्याकाळी घरट्यात परतलेली असावीत, सर्वजण मिळून, गप्पा करत अशा जेवणावर ताव मारायला छानच वाटते.

मेथीची भाजी बर्याच पध्दतिने केली जाते. परंतु अशा पध्दतीने केलेली भाजीच घरात सर्वाना खूप आवडते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

शेंगदाणे लसूण चटणी ( Dry Chutney)

No comments :

शेंगदाण्याची कोरडी चटणी एकदम सोपी, सर्वाना आवडणारी आहे. मुलांना डब्यात पोळीला तूप लावून त्यावर चटणी पसरून रोल करून देता येते.तसेच ऐत्यावेळी पाहुणे आल्यास ताटात डाव्या बाजूला वाढता येते. रोजच्या जेवणात दही घालून खाता येते. घाईच्यावेळी एखाद्या रस्साभाजाीमधे चमताभर टाकली असता रस्सा दाट व चवदार होतो. अशा अनेक प्रकारांनी उपयोगी येणारी चटणी कशी केली पहा. साहित्य व कृती ,

साहित्य :-
* भाजून सोललेले शेंगदाणे १ वाटी
* सोललेल्या लसूण पाकळ्या १० -१२
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड २ टीस्पून (आवडीनुसार कमी-जास्त)
* जीरे १/२ टीस्पून

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे भरड वाटले तरी चालते परंतु मी नेहमी ही चटणी खलबत्त्यात कुटून करते. चव अधिक चांगली लागते व कुटून केल्याने शेंगदाण्यांचे तेल सुटून एक ओलसरपणा चटणीला येतो व मुद्दा होते. कोरडे कुट होत नाही.

कुटताना सुध्दा सर्वात आधि खलबत्त्यात जीरे, लसूण, मीठ कुटून घेउन वाटीत काढावे. नंतर शेंगदाणे चांगले चेचून -चेचून तेल सुटेपर्यंत भरड कुटावेत.

नंतर त्यामधे मीठ चविनूसार, लाल तिखट व आधि कुटून ठेवलेला लसूण घालावा व एकत्र करून थोडे कुटावे. सर्व साहित्य एकजीव झाल्याची खात्री करून नंतर लहान बाटलीमधे भरून ठेवावी. आठ दिवस आरामात टिकते.

प्रवासात नेण्यासाठी पण उत्तम आहे.बरेचजण यामधे सुके खोबरेही कुटून मिसळतात. परंतु खोबरे घातले असता जास्त टिकत नाही. वास येतो.

तसेच मी मिरचीपूड घेतली आहे. पण ऐवजी सुक्या लाल मिरच्याही घेतात. अशी चटणी खूप तिखट होते. कारण मिरचीचे बी सुध्दा त्यामधे  कुटले जाते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

दोडक्याचा कोरडा (Dodkyacha Korada)

No comments :

"दोडक्याचा कोरडा" ही पारंपारिक पाककृती आहे. दोडक्याची डाळ घालून, दोडका, बटाटा, कांदा मिक्स भाजी, रस्साभाजी.. . भरला दोडका असे बरेच प्रकार आहेत. आज थोडे वेगळ्या पध्दतिने भाजी करण्याचे ठरविले  व या पारंपारिक पध्दतिची भाजी केली साहित्य व कृती,

साहित्य :-
* दोडका पाव किलो
* कांदा १
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* कोथंबिर
* आमचूर पावडर किंवा लिंबूरस
* भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर
* तेल १ टेस्पून
* हळद,हिंग, मोहरी

कृति :-
प्रथम दोडके स्वच्छ धुवून साल काढून, खिसणीवर किसून घ्यावे. कांदा, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.

नंतर कढईमधे तेल गरम करून हळद, हिंग, मोहरीची फोडणी करून घ्यावी.

फोडणीमधे कांदा व आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी व चांगले परतून घ्यावे.

परतेल्या मसाल्यामधे दोडक्याचा किस घालावा. मीठ, साखर घालावी व परतावे. किस मऊ झाल्यावर शेंगदाण्यांचा कूट घालावा व वर झाकण ठेवून एक वाफ काढावी.

तयार भाजीमधे वरून लिंबू पिळून सारखी करावी व कोथंबिर घालावी. गरम भाकरी, चपाती सोबत खावी.

या भाजीला शिजण्यासाठी पाणी घालण्याची गरज पडत नाही म्हणून याला "कोरडा" असे   म्हणतात.


12 December 2016

दाल मखनी (Dal Makhani)

No comments :
"दाल मखनी" ही पंजाबी डिश आहे. हाँटेलमधली सर्वात जास्त खाल्ली जाणारी, सर्व वयोगटातल्या लोकांच्या आवडीची व करायला पण सोप्पी अशी आहे. कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
* अाख्खे काळे उडीद १ वाटी
* राजमा किंवा आख्खी मसूर १/४ वाटी
* मोठा कांदा १ बारीक चिरून
* टोमँटो २ मध्यम पेस्ट करून
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावङर १ टीस्पून
* आमचूर पावडर १/२ टीस्पून
* कसूरी मेथी २ टीस्पून (ऐच्छिक)
* मीठ चविनूसार
* फ्रेश क्रिम २-३ टेस्पून /दूध अर्धा कप
* बटर २ टेस्पून
* जीरे अर्धा टीस्पून
* कोथिंबिर बारीक चिरून
* हळद पूड अर्धा टीस्पून

कृती :-
प्रथम ६ ते ८ तास भिजलेले उडीद व राजमा कुकरला ३ -४ शिट्या काढून मऊ शिजवून घ्यावेत.
नंतर पँनमधे बटर गरम करून जीरे,हळद  घालावे. त्यावर चिरलेला कांदा व आलं -लसूण,मिरची पेस्ट टाकून परतावे.

आता टोमँटो पेस्ट घालावी. त्यावर लाल मिरचीपूड, गरम मसाला, मीठ, कसूरी मेरी घालून तूप सुटेपर्यंत परतावे. थोडे पाणी घालून, वर झाकणी झाकून पाच मिनिट शिजू द्यावे.

पाच मिनिटानी तयार मसाल्यामधे, मऊ शिजवून घेतलेले उडीद व राजमा /मसूर घालावे. आवडीनुसार अजून थोडे पाणी घालावे. परंतु जास्त पातळ करू मधे. घटसरच ठेवावे. घेतलेल्या पैकी निम्मे क्रिम घालावे व सर्व व्यवस्थित ढवळून गँस एकदम लहान करून किमान १० मिनिट झाकून शिजू द्यावे.महत्वाचे म्हणजे जितके जास्त शिजेल तितकी चव अधिक चांगली लागते. मोठ-मोठ्या रेस्टोरेंट मधे अधिक चांगल्या चविसाठी रात्रिच मंद आचेवर शिजत ठेवतात.

शेवटी बाऊलमधे काढून शिल्लक क्रिम व कोथंबिर वरून घालावे व गरमा-गरम फुलके, रोटी, चपाती आवडेल त्यासोबत खावे. खूप अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. कसे झाले कळवायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 December 2016

मसाला पाव (Masala Pav)

No comments :

"मसाला पाव " रोड साईड स्नँक्स चा प्रकार आहे. खायला चटपटीत व करायला पण सुटसूटीत. संध्याकाळी खाण्यासाठी एकदम मस्त. कसा करायचा साहीत्य व कृती,

साहित्य :-
* लादी पाव ६ नग
* मोठे कांदे २
* लाल टोमँटो २
* शिमला मिरच्या २
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
* कोथिंबिर
* लिंबू अर्धा
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १ /२। टीस्पून
* पावभाजी मसाला १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* चिमुटभर साखर
* आमचूर पावडर १ /२ टीस्पून
*  बटर

कृती :-

प्रथम कांदा, टोमँटो, शिमला मिरची, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.

नंतर पँनमधे थोडे बटर घालावे व त्यावर कांदा घालावा व मऊ परतावा. आता आलं-लसूण मिरची पेस्ट घालावी.नंतर त्यावर शिमला व पाठोपाठ टोमँटो घालून सर्व मऊ परतावे.

आता परतलेल्या साहीत्यामधे सर्व मसाले हळद, लाल मिरचीपूड,  पावभाजी मसाला, आमचूर पावडर, मीठ व साखर घालावे. एकजीव करावे गरज वाटली तर किंचित पाणी घालावे. व पांच मिनिट झाकून ठेवावे.

शेवटी लिंबू पिळून कोथंबिर घालावी व वाटल्यास मँशरने मँश करावे. हा मसाला तयार झाला.

पँनमधे बटर घालून पाव मधून कापून भाजावा व  भाजलेल्या पावाला तयार मसाला आत लावावा.वरूनही थोडा लावावा. वरून कोथिंबिर घालावी व खायला द्यावा. मस्त चटपटीत मसाला पाव.

टिप :- हाच मसाला थोडा शिल्लक राहीला. मी फ्रिजमधे ठेऊन दिला व दुसरे दिवशी दोन बटाटे उकडून घेतले. पँनमधे थोडेसे बटर घातले व बटाटा मँश करून घातला त्यावर थोडे तिखट, मीठ, मसाला घातले आणि शिल्लक मसाला मिसळला व सर्व एकत्रित करून भाजी केली. ही भाजी भाजलेल्या पावामधे भरून त्यामधे कांदा, कोथिंबिर घातली व मिनी पावभाजीच केली. तीही चविला छान झाली.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.