15 December 2016

बाँम्बे-कराची हलवा (Bombay-Karachi Halawa)

No comments :
"बाँम्बे -कराची हलवा " हा सिंधी मिठाईचा एक प्रकार आहे. साधारण जेलीसारखा दिसतो व लुसलू़शित पण chewy असा अाहे. मिठाईच्या दुकानात खूप आकर्षकरीत्या अशी ही रंगी -बिरंगी मिठाई सजवून ठेवलेली असते. फार गोडही नाही. सणासुदीला किंवा पाहुणे येणार असतील तर करायला सोपी अन् दिसायला छान दिसते. कशी केली, साहित्य व कृती-
साहित्य :-
* काँर्नफ्लोअर १/२ कप (measuring cup)
* पाणी १ १/२ कप
इतर-
* साखर १ १/२ कप
* पाणी १ कप
* लिंबू रस १ टीस्पून
* तूप ४ टेस्पून
* फूडकलर आवडीचा कोणताही, ४-५ थेब
* वेलचीपूड
* काजू -बदाम काप १ टेस्पून

कृती :-
प्रथम एका नाँनस्टीक पँनमधे साखर व पाणी एकत्र करून, लहान गँसवर ठेऊन द्या. साखर विरघळे पर्यंत मधे -मधे हलवत रहा.
तोपर्यंत एका बाऊलमधे काँर्नफ्लोअर घ्यावे व त्यामधे दीड वाटी पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. गुठळ्या अजिबात राहू देऊ नयेत.

आता साखर विरघळली असेल तर त्यामधे ही तयार काँर्नफ्लोअर पेस्ट घालावी व सतत हलवत रहावे. तळापासून हलवावे. खाली लागण्याची शक्यता असते.

पांच मिनिटानी मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल तर त्यामधे लिटेस्पून व रंगही घालावा व हलवत रहावे. ५-५ मिनिटानी हलवत हलवतच १-१ चमचा तूप घालावे. असे २० मिनिटे सतत हलवत रहावे.

आता मिश्रण पारदर्शी दिसू लागलेले असते. आताच त्यामधे काजू-बदामचे काप व वेलचीपूड घालावी. एकत्र सर्व हलवावे व असेल तर शक्यतो काचेच्या ट्रेमधे किंवा कोणत्याही ट्रेमधे तूपाचा हात चोळावा व तयार मिश्रण त्यावर ओतावे. वरून थोडे काजू -बदाम काप पेरावेत व मिश्रण १५ मिनिट गार होऊ द्यावे.
थंड झाले की बोट लावून पहावे. रबरासारखे मऊ लागते हाताला. नंतर तयार मिश्रणाच्या सुरीने कापून वड्या काढाव्यात.

या रंगीत वड्या खूप आकर्षक दिसतात तसेच इतर मिठाईच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

टिप :-
* काँर्नफ्लोअर पेस्ट तयार करताना अजिबात गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर हलवा व्यवस्थित होत नाही.

* साखर फक्त विरघळवायची आहे. कोणताही एकतारी, दोनतारी पाक करायचा नाही.

* तूप दिलेल्या प्रमाणातच घालावे. कोणतीही तडजोड नको.

* सर्वात महत्वाचे दिलेल्या प्रमाणातच सर्व साहित्य मोजून घ्यावे.

* ही पाककृती करताना पूर्णपणे मंद गँसवर करावी. वाढवू नये.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment