शेंगदाण्याची कोरडी चटणी एकदम सोपी, सर्वाना आवडणारी आहे. मुलांना डब्यात पोळीला तूप लावून त्यावर चटणी पसरून रोल करून देता येते.तसेच ऐत्यावेळी पाहुणे आल्यास ताटात डाव्या बाजूला वाढता येते. रोजच्या जेवणात दही घालून खाता येते. घाईच्यावेळी एखाद्या रस्साभाजाीमधे चमताभर टाकली असता रस्सा दाट व चवदार होतो. अशा अनेक प्रकारांनी उपयोगी येणारी चटणी कशी केली पहा. साहित्य व कृती ,
साहित्य :-
* भाजून सोललेले शेंगदाणे १ वाटी
* सोललेल्या लसूण पाकळ्या १० -१२
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड २ टीस्पून (आवडीनुसार कमी-जास्त)
* जीरे १/२ टीस्पून
कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे भरड वाटले तरी चालते परंतु मी नेहमी ही चटणी खलबत्त्यात कुटून करते. चव अधिक चांगली लागते व कुटून केल्याने शेंगदाण्यांचे तेल सुटून एक ओलसरपणा चटणीला येतो व मुद्दा होते. कोरडे कुट होत नाही.
कुटताना सुध्दा सर्वात आधि खलबत्त्यात जीरे, लसूण, मीठ कुटून घेउन वाटीत काढावे. नंतर शेंगदाणे चांगले चेचून -चेचून तेल सुटेपर्यंत भरड कुटावेत.
नंतर त्यामधे मीठ चविनूसार, लाल तिखट व आधि कुटून ठेवलेला लसूण घालावा व एकत्र करून थोडे कुटावे. सर्व साहित्य एकजीव झाल्याची खात्री करून नंतर लहान बाटलीमधे भरून ठेवावी. आठ दिवस आरामात टिकते.
प्रवासात नेण्यासाठी पण उत्तम आहे.बरेचजण यामधे सुके खोबरेही कुटून मिसळतात. परंतु खोबरे घातले असता जास्त टिकत नाही. वास येतो.
तसेच मी मिरचीपूड घेतली आहे. पण ऐवजी सुक्या लाल मिरच्याही घेतात. अशी चटणी खूप तिखट होते. कारण मिरचीचे बी सुध्दा त्यामधे कुटले जाते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment