मेथी सर्वांच्या परिचयाचीच भाजी आहे. सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. मेथीची मेत्रूटे, मेथीलाडू करतात. दूधवाढीसाठी त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतात. तोंडाची चव गेली असल्यास या भाजीने रूची येते. मेथीची भाजी अनेक पध्दतिने केली जाते. तसेच पराठे, भजीही छान होतात. आज मी डाळवाली मेथीभाजी केली आहे. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* गोल पानांची ताजी मेथी जुडी १
* मुगाची डाळ १/२ वाटी
* लसूण ८-१0 पाकळ्या
* हिरवी मिरची ३-४
* मीठ चविनूसार
* तेल फोडणीसाठी
* हिंग-मोहरी, हळद
कृती :-
प्रथम मेथी निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरावी.मेथी निवडेपर्यंत मुगडाळ पाण्यात भिजत घालावी. मुगडाळ सहज व लवकर भिजते. वेळ लागत नाही.
आता कढईमधे (लोखंडी असेल तर जास्तच चांगले) तेल गरम करून हिंग,हळद मोहरीची फोडणी करून घ्या. फोडणीमधे लसूण ठेचून व हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत. अशा फोडणीचा खमंग वास घरात पसरला की, कधी एकदा भाजी होतेय व आपण खातोय असे होते.
तर आता फोडणीमधे आधी भिजलेली डाळ व त्यावर चिरलेली मेथी टाकावी. पाच मिनिट झाकण ठेवावे. भाजी खाली बसते. भाजीचा अंदाज येतो. आता चवीनुसार मीठ घालावे. आता झाकण न ठेवता, चमच्याने हलवत परतावे. भाजी सुकी झाली की गँस बंद करावा. या भाजीला वेळ लागत नाही. लोखंडी कढईत केली असेल तर लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावी.
अशी खमंग भाजी सोबत गरमा-गरम टम्म फुगलेली भाकरी, लोण्याचा गोळा, कांदा व मिरचीचा खर्डा अहाहा.. स्वर्गसुख म्हणतात ते हेच का ते असे वाटते. त्यात बाहेरही मुसळधार पाऊस कोसळत असावा व आपली माणसे संध्याकाळी घरट्यात परतलेली असावीत, सर्वजण मिळून, गप्पा करत अशा जेवणावर ताव मारायला छानच वाटते.
मेथीची भाजी बर्याच पध्दतिने केली जाते. परंतु अशा पध्दतीने केलेली भाजीच घरात सर्वाना खूप आवडते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment