31 December 2016

गाजराचे लोणचे ( Carrot Pickle)

No comments :

रोजच्या जेवणात एखादे चटकदार लोणचे, चटणी ताटात डाव्या बाजूला असेल तर जेवणाची रंगत वाढते. मग एखादी भाजी कमी आवडीची असली तरी चालते. कैरी,लिंबू, मिरची, माईनमुळे,आवळा अशी बरीच लोणची वर्ष भरासाठी करून ठेवायची पध्दत आहे. पण खरं सांगू का, लोणचं ताजं असताना जितक्या आवडीने खाल्ले जाते तितके जुने झाल्यावर नाही खाल्ले जात. नंतर -नंतर तर फोडी मऊ होतात, रंग काळपट होतो.. त्यामुळे मला तरी जूनी लोणची अजिबात आवडत नाहीत. म्हणतात की, लोणचे मुरेल तसे चविला छान लागते. पण मला हे फक्त लिंबू लोणच्याचे बाबतीत खरे वाटते. म्हणून मी लिंबू लोणचे तेवढे जास्तीचे करते.मुरावे या हेतूने, पण बाकी मिरची,कैरी लोणचे ताजे -ताजे १५ दिवस ते महीन्या पर्यंतचेच करते. मिरच्या तर १२ महीने बाजारात असतात व मुंबई मधे कैरीसुध्दा एक-दोन महीने वगळता१२ ही महीने मिळते. व तसेही मधून मधून निरनिराळ्या सिझनेबल भाज्यांची लोणची, ठेचा, कोरड्या चटण्या, ओल्या चटण्या,मेतकूट असे बरेच प्रकार असतात. तर असेच आज सिझनचे "गाजराचे लोणचे " केले. भाज्यांची लोणची सहसा तीन-चार दिवस व फ्रिजमधे ठेवली तर ८ दिवस टिकतात. पण आपण फ्रिजमधे ठेवण्याइतके जास्त करायचेच कशाला?  ताजे-ताजे करू व लगेच संपवून टाकू! पण आधी करायला तरी पाहीजे ना? कसे केले साहित्य व कृती 👇

साहित्य ;-
° ताजी करकरीत लाल गाजरे ३-४
° मोहरीडाळ २ टेस्पून
° मेथीदाणे १/४ टीस्पून
° लाल मिरचीपूड २ टीस्पून
° लिंबू एक
° मीठ चविनुसार
° तेल २ टेस्पून
° फोडणीसाठी हिंग,मोहरी, हळद

कृती :-
प्रथम लहान कढल्यात तेल गरम करून त्यातून मेथीदाणे तांबूस करून काढून घ्यावेत व त्याच तेलात हिंग,मोहरी, हळद घालून फोडणी करून, गार होण्यासाठी कडेला ठेउन द्यावी.

नंतर गाजरे धेऊन,पुसून साल काढून घ्यावीत. नंतर उभी चिरून त्यातील मधला पांढरा भाग काढून साधारण १-१ इंचाचे उभे काप करून घ्यावेत.

आता चिरलेल्या गाजरामधे, मोहरीडाळ व आधी भाजून ठेवलेली मेथी कुटून घालावी. तसेच मीठ, लाल तिखटही घालावे व वरून लिंबू रस घालावा. सर्व साहित्य एकत्रीत कालवावे. शेवटी आधी करून ठेवलेली व गार झालेली तेलाची फोडणी वरून घालावी व पुन्हा एकदा व्यवस्थित हलवावे.

मस्त लालभडक, ताजे करकरीत चटकदार लोणचे काचेच्या सटात काढून जेवणात घ्यावे. खूप मस्त लागते. जेवणात तर चांगले लागतेच पण पराठे, ब्रेडला लावून खायलाही सुंदर लागते.

टिप:-या लोणच्यामधे बारीक चिरून आलं-लसूण चे तुकडे घातले तरी छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment