आपल्या आहारातील "साजुक तूप" हा अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे व स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. तुपामुळे बुध्दी कुशाग्र होते. तसेच हाडं, स्नायु, डोळे, त्वचा यासाठी शक्तिवर्धक आहे. प्रथिनयुक्त पदार्थासोबत तूप खाल्याने त्या पदार्थातील प्रथिने जास्त उपयुक्त ठरतात. उदा.वरण-भातावर तूप घेतले तर अधिक पौष्टीक होते. तुपाशिवाय प्रोटीनयुक्त पदार्थ तितकेसे लाभदायक ठरत नाहीत. जुने तूप सुध्दा फार उपयोगी असते. मात्र या सर्वासाठी तूप नेहमी शुध्द व शक्यतो घरचे असेल म्हणजे, विरजण-मंथन-अग्नी पचन या तीन संस्कारातून पार पडलेले असेल तरच उपयोगी ठरते. तर असे "साजुक तूप" घरच्या-घरी कसे बनवायचे?
कृती:-
आपण घरातील रोजच्या वापरासाठी जे दूध घेतो ते प्रथम जाड बुडाच्या स्वच्छ भांङ्यामधे तापवावे. नंतर मंद गँसवर किंवा खाली जाळी ठेवून पाच मिनिट उकळवावे व नंतर थंड होऊ द्यावे.
नंतर थंड दूधावरची साय चमच्याने कडेने खरडून,खालच्या थोड्या दूधासोबत(साका) एका वेगळ्या भांड्यात काढून फ्रिजमधे ठेवावी. असे सलग ३-४ दिवसाची साय साठली की, भांडे फ्रिजमधून काढून साय कोमट करावी व विरजण म्हणजे लहान चमचाभर दही घालून विरजावी. म्हणजे विरजण संस्कार झाला.
दुसर्या दिवशी या विरजलेल्या सायीच्या दह्याला रवीने अथवा मिक्सरमधे घुसळावे व लोणी काढावे. खालचे ताक जेवणात पिणयासाठी वापरावे. (रवीने घुसळलेले असेल तर ताकही जास्त चवदार लागते) ही झाली मंथन प्रक्रिया!
शेवटी मंथन करून काढलेले लोणी १०-१५ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व जाड बुडाच्या भांड्यात कढायला तापत ठेवावे. सुरवातीला दूघासारखे वर येते तेव्हा गँस बारीक ठेवावा व चमच्याने ढवळत रहावे.
नंतर कांहीवेळाने ढवळायचाी गरज रहात नाही. तुप उकळत रहाते. फक्त लक्ष ठेवायचे. कडेने तांबूस दिसायला लागले व उकळताना येणारा कडकड असा आवाज थांबला,उकळी कमी झाली की तुप कंढले, तयार झाले समजावे. गँस बंद करावा व त्यामधे विड्याचे पान हाताने चुरगळून टाकावे व तूप थंड होऊ द्यावे.
आता असे थंड झालेले खमंग वासाचे "घरगुती साजुक तूप" गाळून स्वच्छ काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे व दररोजच्या जेवणात थोडे -थोडे खावे.
टीप्स ;-
* आपल्या घरात दूध किती घेतो , त्यामानाने साय साठवावी. एक लिटरपेक्षा जास्त म्हणजे दोन लिटर घेत असू तर दोन दिवसातच विरजावे. एकूण काय तर साय ३-४ दिवसाच्यावर साठवू नये. वास येतो.
* लोणीसुध्दा काढल्यावर थोडेच असेल तर लगेच न कढवता एका कुंड्यामधे घालून मीठाच्या पाण्याने घुवून फ्रिजमधे साठवून ठेवावे व आठवड्याचे किवा पंधरा दिवसातून एकदा कढवावे. जास्त सोयीचे होते. मी स्वता असेच करते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment