26 June 2017

शीर खुरमा (Shir Korma)

No comments :

शीर म्हणजे दूध व खुरमा म्हणजे सर्व सुका मेवा. रमजान ईद दिवशी आपल्या मुस्लिम बांंधवांच्या घरी हमखास केला जाताे व सर्व मित्र मंडळी, नातेवाईकां सोबत खाल्ला जातो. तर असा पौष्टीक व गोड "शीरखुरमा " चे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* दूध १ लिटर
* शेवया १ वाटी
* काजू, बदाम, चारोळी, बेदाणे, अंजीर सर्व मिळून २ वाट्या.
* साखर १ वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १/२ वाटी
* वेलचीपूङ
* केशर

कृती:-
प्रथम पँन मधे तूप गरम करून सर्व सुका मेवा तुकडे करून, तांबूस परतावा. तोपर्यंत दुसरिकडे दूध उकळत ठेवावे.

सुका मेवा भाजून झाला की त्याच राहीलेल्या तूपावर शेवया तांबूस परतून घ्या.

आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल. त्यात भाजलेल्या शेवया व सुकामेवा, केशर, वेलची घालावे . पांच मिनिट उकळू द्यावे.पाच मिनिटानी गँस बंद करावा.

शेवटी गँस बंद केल्यावर साखर घालावी व ढवळावे. गरम असल्याने साखर विरघळते.

आता गरमा-गरम शीर खुरमा सर्वासोबत फस्त करावा.

टीप :-  सुक्या मेव्यातील पिस्ता भाजून वेगळा ठेवावा व ऐनवेळी सर्व्ह करताना घालावा. कारण पिस्ता टिकण्यासाठी खारवतात व त्यातील मीठामुंंळे शीर खुरमा फाटतो.

आपल्या आवडीनुसार सुकामेवा घ्यावा. यात खजूर, खारीक पण घालतात. मी नाही घेतले.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

21 June 2017

कढीपत्ता चटणी ( Curry leaves Chutney)

2 comments :

कढीपत्ता
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय
स्वयंपाक घरातले एक महाऔषध.

'कढीपत्ता' हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले. की, त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते.

कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.जंगलातला कढीपत्ता जास्त गडद
रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात...आणि झाड मोठे झाले कीत्याच्या बिया आजूबाजूला पडून,  कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.

कढीपत्त्याचे 'आहार' आणि 'औषध' अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.

२) जुलाब लागले असता,
कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
'पोटातल्या वेदना' आणि 'जुलाबाचे वेग' वेगाने नियंत्रणात येतात.

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत
करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो,
त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ
मिसळून खावीत.

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे.
नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.

५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर,
कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.

८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण 'केमो' आणि 'रेडियो' थेरपी घेत असताना,
त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते.
अशा रुग्णांना दिवसातून तीन
वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून
खायला लावावीत.
रुग्णाला बराच आराम मिळतो.

१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर,
अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे 'अमृत' आहे.
कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर,
कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर,
मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत.
याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.

कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.
...असा हा
'बहुगुणी' आणि 'आरोग्यसंपन्न'
कढीपत्ता आहारात नियमित ठेवा.
कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

above Info C/P

मात्र इतका बहुगुणी कढीपत्ता आपल्या रोजच्या खाण्यात कितीसा येतो? आपण पोहे, उपमा,आमटी, भाजीत असा किती वापरतो? चार-सहा पाने फक्त,! तेही ऐनवेळी हाताशी असला तर ठीक नाहीतर नसतोच. कारण आपण रोज काही कढीपत्ता आणत नाही. आठवड्यातून एकदा भाजीसोबत आणतो व तो दोन दिवसानी पाने गळून वांळून नाहीतर कुजून गेलेला असतो. तर जास्तीत - जास्त कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी मी आज कढीपत्याची 'ओली चटणी' केली आहे. 'कोरड्या चटणी'ची रेसिपी यापुर्वीच दिलेली आहे. ओल्या चटणीचे साहित्य व कृती 👇
साहित्य :-
* कढीपत्ता पाने एक मोठी वाटी
* चणाडाळ पाव वाटी
* उडीद डाळ मुठभर
* ओलं खोबरं २ चमचे
* चिंच सुपारी एवढी
* लाल सुक्या मिरच्या २
* जीरे लहान अर्धा चमचा
* मीठ चविनूसार
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टाँवेलवर पसरून कोरडा करावा.

आता गँसवर कढई ठेवून चणाडाळ, उडीद डाळ वेगवेगळी तांबूस भाजावी.

नंतर कढईत चमचाभर तेल घालून लाल मिरची, कढीपत्ता पाने व जीरे,चिंच भाजून घ्यावे.

भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर भाजके पदार्थ व ओले खोबरे, मीठ घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे. वाटताना गरजेनुसार थोडे पाणी घालावे. थोडी घटसरच ठेवावी.

आता वाटलेली चटणी काचेच्या सटात काढून वरून मोहरी, हींग -जीरे व कढीपत्ता घालून केलेली तेलाची थंड फोडणी घालावी.

अशी ही चटकदार चटणी जेवणात रूची आणते  भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा मधे मधे  चाखायला मस्तच लागते. तसेच कोणत्याही पराठे पुरी सोबत ही खाता येते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका हं ☺

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 June 2017

वाफेवरचे भरले कारले (Steamed Karela)

No comments :

कारल्याची भाजी म्हटले की सहसा नाक मुरडले जाते. परंतु कारले जरी कडू असले तरी चविला खमंग लागते. व अशा पध्दतीने केले तर कारल्याची भाजी आहे हे सांगावे लागते. कडवडपणा पार निघून जातो. बघा कशी ते साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* पांढरी कारली पाव किलो
* बेसन पीठ ४ टेस्पून
* दाण्याचे कुट २ टेस्पून
* ओलं खोबरं २ टेस्पून
* गोडा मसाला १ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* हळद
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* तेल फोडणीसाठी
* हींग चिमूटभर
* मोहरी
* कोथंबिर

कृती :-
प्रथम कारली स्वच्छ धुवून चाकूने किंवा सालकाढण्याने खरडून घ्यावीत.नंतर मधे उभी चीर देऊन आतील बीया काढाव्यात व हळद, मीठाच्या पाण्यात १५ मिनिट टाकून ठेवावीत. तोपर्यंत मसाला तयार करून घ्यावा.

कढईत किंचित तेल घालून त्यावर बेसनपीठ भाजून घ्यावे फक्त पीठाचा कच्चेपणा जावा इतकेच भाजावे.

नंतर  भाजलेल्या पीठामधे सर्व मसाला, दाण्याचे कुट, ओले खोबरे घालून मिश्रण तयार करावे.

आता पाण्यात ठेवलेली कारली पाणी निथळून काढून घ्यावीत व त्यामधे तयार मसाला हाताने दाबून  भरावा.

नंतर भरलेली कारली चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावीत.

नंतर बोटाने दाबून कारली मऊ झालीत का तपासून पहावे व नंतर कढईमधे फोडणीसाठी तेल गरम करावे व हींग-मोहरीची फोडणी करून कारली त्यामधे घालून थोडे परतावे. तेल सुटायला लागले की गँस बंद करावा.

तयार भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खायला द्यावी. सुकी असल्याने डब्यात देण्यासाठी पण सोयीची आहे. आदले दिवशी भरून, वाफवून फ्रिजमधे ठेवावी. दुसरे दिवशी सकाळी पट्कन फोडणी करून परतावी.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 June 2017

सूजी पकोडे (Sooji Pakode)

No comments :

भजी, पकोडे म्हटले की,आपल्या डोळ्यासमोर लगेच कांदा किंवा मिरची भजीच येतात. पण याशिवायही भजीचे बरेच विविध प्रकार आहेत. जसे की, पालकभजी , बटाटाभजी , मिक्स वेज भजी तसेच मुगडाळ, चणाडाळ भजी, भाताची भजी. अहो एक का दोन.. आपल्या कल्पना शक्तिचा वापर केला तर, घरात उपलब्ध साहीत्यात भजीचे विविध प्रकार बनवतात येतात. पाऊस पडयला लागला की आधी भजीचीच आठवण येते. तर नेहमी नेहमी एकाच प्रकारची भजी बनवण्यापेक्षा आज थोडी हटके व मस्त खमंग कुरकुरीत रव्याची भजी म्हणजेच "सूजी पकोडे" बनवले. कसे ते पहा साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* रवा (जाडसर) २ वाट्या
* पातळ दही १ वाटी
* कांदा १ बारीक चिरून
* कच्चा बटाटा १ किसून
* कोथंबिर , कढीपत्ता चिरून
* हिरवी मिरची व आलं चिरून आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* लाल मिरचीपूड अर्धा चमचा
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* बेकिंग सोडा पाव टीस्पून किंवा इनो पावडर १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम एका बाऊलमधे रवा घ्यावा. त्यामधे बेकींग सोडा सोडून वर दिलेले सर्व साहित्य घालावे व एकत्र ढवळून १५ मिनिट झाकून ठेवा.

पंधरा मिनिटानंतर मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळावे व गरज वाटली तर थोडे पाणी घालावे. कारण रवा फुलतो. नेहमीच्या भजी पीठा इतपतच घट्ट ठेवावे.

आता तयार मिश्रणात सोडा घालावा व ढवळून गरम तेलात मध्यम आकाराची भजी तळून काढावी. तेलात भजी सोडताना तेल एकदम गरम असावे. नंतर गँस कमी करावा व मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भजी तळावीत.

मस्त गरमा-गरम व कुरकुरीत भजी साँस सोबत किंवा नुसतीच मिरची सोबत खायला द्या.

अशी खमंग, कुरकुरीत भजी खायला स्वादिष्टच लागतात परंतु करायलाही सहज, सोपी व झटपट होतात. तुम्हीही करून बघा. तुम्हालाही नक्की आवडतील.

टिप :- आपल्या आवडीनुसार शिमला मिरची, गाजर, पालक, कोबी अशा भाज्यासुध्दा चिरून यात घालता येतात. चविला छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 June 2017

मँगो पुडींग (Mango Pudding)

No comments :

"मँगो पुडींग" एक डेजर्ट चा प्रकार आहे. सहज सोपा व करायला सुटसूटीत आहे. सिझनमधे जेवणात रोज आमरस असतोच परंतु जेवणानंतर पण आंब्याचाच पदार्थ खायचा असेल तर असे "मँगो पुडींग" तयार करा. याआधी मी मँगो आईसक्रीम, मँगो कुल्फी, मँगो हलवा, मँगो फ्रूटी मँगो मस्तानी, मँगो केक मँगो बर्फी अशा विविध आंब्याच्या पदार्थाची कृती दिली आहेच. आज मँगो पुडींग कसे करायचे साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* मँगो पल्प २ आंब्याचा
* दूध १/२ लिटर
* कंडेन्सड् मिल्क अर्धा कप
* साखर २ टेस्पून
* आगार आगार /चायना ग्रास २ टेस्पून
* सजावटीसाठी चेरी, आंब्याचे क्यूब

कृती :-
प्रथम एकीकडे आगार आगार गरम पाण्यात पारदर्शक होईपर्यंत ढवळून विरघळून घ्यावे.

नंतर दूध गरम करून त्यामधे साखर घालून विरघळून घ्यावी. (दूध उकळण्यास आवश्यकता नाही)

आता आंब्याचे साल काढून तुकडे करून घ्यावेत. यातील चार-सहा तुकडे सजावटीसाठी ठेवावेत व राहीलेले तुकडे मिक्सरमधे घालून मँगो पल्प तयार करून घ्यावा.

शेवटी दूधामधे कंडेन्सड् मिल्क, मँगो पल्प व आगार -आगार घालून, सर्व साहित्य एकत्रीत ढवळून घ्यावे व लहान -लहान बाऊलमधे ओतून फ्रिजमधे ३-४ तास सेट होण्यासाठी ठेवावे.

जेवणानंतर मस्त थंडगार गोड 'मँगो पुडींग ' खायला द्यावे. खायला देताना वरून रेड चेरी व मँगो क्यूब घालावेत. आवडत असल्यास वरून अजून थोडे कंडेन्सड् मिल्क किवा फ्रेश क्रिम अथवा वँनिला आईसक्रीम घालावे.

टिप :
* आंबा एकदम गोड असेल व कंडेन्सड् मिल्क गोडच असते तर साखर नाही वापरली तरी चालते. अथवा आवडीनुसार कमी-जास्त करावी.
* मँगो पल्प तयार करताना आंबा जर केशरयुक्त असेल तर, पल्प गाळणीतून गाळून घ्यावा. अन्यथा पुडींग गुळगुळीत, मऊ न बनता खाताना तोंडामध्ये धागे येतात.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.