12 June 2017

सूजी पकोडे (Sooji Pakode)

No comments :

भजी, पकोडे म्हटले की,आपल्या डोळ्यासमोर लगेच कांदा किंवा मिरची भजीच येतात. पण याशिवायही भजीचे बरेच विविध प्रकार आहेत. जसे की, पालकभजी , बटाटाभजी , मिक्स वेज भजी तसेच मुगडाळ, चणाडाळ भजी, भाताची भजी. अहो एक का दोन.. आपल्या कल्पना शक्तिचा वापर केला तर, घरात उपलब्ध साहीत्यात भजीचे विविध प्रकार बनवतात येतात. पाऊस पडयला लागला की आधी भजीचीच आठवण येते. तर नेहमी नेहमी एकाच प्रकारची भजी बनवण्यापेक्षा आज थोडी हटके व मस्त खमंग कुरकुरीत रव्याची भजी म्हणजेच "सूजी पकोडे" बनवले. कसे ते पहा साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* रवा (जाडसर) २ वाट्या
* पातळ दही १ वाटी
* कांदा १ बारीक चिरून
* कच्चा बटाटा १ किसून
* कोथंबिर , कढीपत्ता चिरून
* हिरवी मिरची व आलं चिरून आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* लाल मिरचीपूड अर्धा चमचा
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* बेकिंग सोडा पाव टीस्पून किंवा इनो पावडर १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम एका बाऊलमधे रवा घ्यावा. त्यामधे बेकींग सोडा सोडून वर दिलेले सर्व साहित्य घालावे व एकत्र ढवळून १५ मिनिट झाकून ठेवा.

पंधरा मिनिटानंतर मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळावे व गरज वाटली तर थोडे पाणी घालावे. कारण रवा फुलतो. नेहमीच्या भजी पीठा इतपतच घट्ट ठेवावे.

आता तयार मिश्रणात सोडा घालावा व ढवळून गरम तेलात मध्यम आकाराची भजी तळून काढावी. तेलात भजी सोडताना तेल एकदम गरम असावे. नंतर गँस कमी करावा व मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भजी तळावीत.

मस्त गरमा-गरम व कुरकुरीत भजी साँस सोबत किंवा नुसतीच मिरची सोबत खायला द्या.

अशी खमंग, कुरकुरीत भजी खायला स्वादिष्टच लागतात परंतु करायलाही सहज, सोपी व झटपट होतात. तुम्हीही करून बघा. तुम्हालाही नक्की आवडतील.

टिप :- आपल्या आवडीनुसार शिमला मिरची, गाजर, पालक, कोबी अशा भाज्यासुध्दा चिरून यात घालता येतात. चविला छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment