27 August 2016

पुरणपोळी (Puran Poli)

No comments :

अहाहा...पुरणपोळी म्हटले की, लगेच डोळ्यासमोर लुसलू़शित, खमंग घरच्या शुध्द तूपाची धार सोडलेली टम्म फुगलेली पोळी येते. पुरणपोळी महाराष्ट्रातील एक पारंपारिक पक्वान्न आहे. पूर्वी कोणताही सण-समारंभ असेल तरी पुरणपोळीच असायची. आजच्यासारखे श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी अशी वेगवेगळी पक्वान्न नसायची. त्याला कारणही तसेच होते घरच्या डाळी, गूळ असायचे! आजकाल स्त्रीया पण नोकरी करतात, धावपळ असते. पुरणपोळी करणे म्हणजे वेळखाऊ व कष्टाचे काम आहे. तरीपण ठराविक दिवशी तरी, म्हणजे होळी, गौरी-गणपती किंवा श्रावण महीन्यात तरी हमखास घरोघरी केली जाते. कशी करायची साहीत्य व कृती,

साहीत्य :-

* चना डाळ ४ वाट्या
* गूळ ४ वाट्या
* कणिक ४ वाट्या
* वेलची, जायफळ पावडर करून
* पाणी ८ वाट्या
* तेल /तूप
* चिमुटभर हळद
* चिमुटभर मीठ
* तांदुळाची पीठी लाटण्यासाठी

कृती :-

प्रथम चणाडाळ दुप्पट पाणी घालून कुक तीन शिट्या काढून शिजवून घ्यावी. कुकर थंड होऊ द्या.

आता तोपर्यंत कणिक मीठ,हळद व तेल घालून मळून ठेवावी. गूळ चिरून घ्यावा. जायफळ किसून घ्यावे. वेलची सोलून बारीक पूड करावी.

आता शिजलेली डाळ चाळणी एखाद्या पसरट भांङ्यावर ठेवावी व चाळणीत काढावी. डाळीतील सर्व पाणी गळू द्यावे.

नंतर पाणी काढलेली डाळ व गूळ एकत्र करून, जाड बुङाच्या कढईत शिजत ठेवावे. कडेने कोरडे होउन गोळा झाले की शिजले असे समजावे.

आता तयार पूरण, यंत्राभधून वाटून घ्यावे. बरेचजण मिक्सरमधे पण वाटतात. पूर्वी पाटा-वरवंट्यावर वाटत असत.

आता शेवटी भिजवून ठेवलेली कणिक तेल व पाण्याचा हात लावून चांगली, थोडी सैल अशी किवचून घ्यावी.

नंतर तवा तापत ठेवा. लिंबाएवढी कणिक घेऊन त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यावा व कणिकेचा उंडा करावा व त्यात भरावे. अलगद हाताने पोळी पीठी लावून लाटावी. तूप सोडून खरपूस भाजून घ्या.

गरमा-गरम पोळी कणिदार तूप घालून दूधासोबत खायला द्या.

टीप :-
* पोळीसाठी शक्यतो गूळच वापरावा.
* कणिक मळताना निम्मे दूध व निम्मे पाणी घेतले तर पोळी जास्त लुसलू़शित होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

उपवासाचा बटाटा वडा (Fasting Batata Vada)

No comments :

उपवास असला तरी आज आपण बटाटे वडे खाणार आहोत !पण उपवासाचे बर का! कसे करायचे साहीत्य व कृती,

साहित्य :-

* उकडलेले बटाटे ३-४
* कच्चा बटाटा किंवा १ लहान रताळे किसून
* हिरवी मिरची पेस्ट
* जिर्याची पूड १ टीस्पून
* मीठ चविनुसार
* साखर चिमूटभर
* लिंबू रस १/२ टेस्पून
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट २ टेस्पून
* खोवलेला ओला नारळ २ टेस्पून
* तेल तळण्यासाठी

वरील आवरणासाठी साहित्य :-

* राजगिरा पीठ अर्धी वाटी
* शिंगाडा पीठ अर्धी वाटी
* मीठ
* लाल मिरचीपूड
* जिरे पूड

कृती:-

प्रथम उकडलेले बटाटे मँश करून घ्या. नंतर
त्यामधे चवीप्रमाणे मिरची पेस्ट, मीठ,साखर, जिरे पूड, दाण्याचे कुट, खोवलेला नारळ, घाला.
नंतर त्यात लिंबाचा रस घाला व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.

आता तयार मिश्रणाचे तळहाताला थोडे पाणी लावून,साधारणपणे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या.

नंतर वरील आवरणासाठी शिंगाडा,राजगिरा पीठ व किसलेले रताळे एकत्र करुन त्यामधे मीठ, मिरची पूड व जिर्याची पूड घाला. गरजेइतके पाणी घालून भजीपीठा सारखा घोळ तयार करा.

आता कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तयार मिश्रणाचा एकेक गोळा घेऊन पीठाच्या घोळात बुडवावा व तापलेल्या तेलात सोडा. तांबूस रंगावर तळून घ्यावे.

गरमा-गरम खुसखूषीत वडे शेंगदाण्याच्या किंवा खोबर्याच्या चटणी सोबत खायला द्या.

टीप :-
* वरील आवरणासाठी शिंगाडा व राजगिरा पीठ सोबत शाबूदाणा पीठ पण उपलब्ध असेल तर तेही वापरले तरी चालते.

* कोथंबिर व आलं तुम्हाला उपवासाला चालत असेल तर  आतील सारणात वापरा .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

अनारसे (Anarase)

No comments :
अनारसे हा पदार्थ थोडी दीर्घ कृती असल्याने व गोड असल्याने दिवाळी व्यतिरीक्त एरव्ही सहसा केला जात नाही. तसेच अनारसे जाळीदार असल्याने अधिक मासामधे जावयाला वाण म्हणून द्यायची पण पध्दत आहे.तेव्हाही केले जातात. पण कितीही वेळखाऊ पदार्थ असला तरी दिवाळीला फराळाच्या ताटाला अनारसे असल्याशिवाय शोभा नाही. तर असे हे नाजुक अनारसे कसे करायचे साहित्य व कृती,

साहित्य :-
* पटणीचा जाड, जुना तांदुळ  १/२ किलो
* स्वच्छ, पिवळा गुळ १/२ किलो
* साजुक तूप १-२ टेस्पून
* वेलची, जायफळ पावडर आवडीनुसार
* खसखस १०० ग्रँम
* पिकलेले केळ १ (ऐच्छीक)
* तूप तळणीसाठी

कृती:-
प्रथम तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत.पाणी रोज बदलावे.अन्यथा तांदळाला कुजकट वास येऊ शकतो.

तिसर्या दिवशी पाणी निथळून, सुती कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पीठ चाळावे व बारीक पीठी करावी.

नंतर गुळ किसणीने किसून किंवा बारीक कुटून  घ्यावा व चाळलेल्या पिठाीमधे मिसळावा. साजुक तूपाचे मोहन व वेलदोडे, जायफळची पूड घालून हलक्या हाताने मळून गोळा तयार करावा .

आता हा तयार पीठाचा गोळा प्लास्टिक किंवा  अल्युमिनिअम च्या डब्यात घालून ७ ते ८ दिवस मुरण्यासाठी ठेवावे. पीठ चांगले मुरले तर अनारशाला जाळी पडते व अनारसे जाळीदार,  कुरकूरीत होतात.

नंतर जेव्हा अनारसे करायचे असतील तेव्हा गरजेइतकेच पीठ घेऊन पिकलेल्या केळाचा हात लावून मळावे व त्याचे साधारणपणे  पेढ्याएवढे चपटे गोळे करावेत व पोळपाटावर खसखस थोडी -थोडी पसरून पिठाची एकेक गोळी घेऊन बोटाने हलकेच दाब देऊन अनारसा खसखशीवर फिरवत गोल थापावा

आता कढईमधे तूप गरम करावे. खसखशीची बाजू वर येइल अशा पध्दतीने अनारसा कढईमधे अलगद सोडावा.झार्‍याने त्यावर तूप घालत अनारसा मंद आचेवर तळावा. अनारसा उलटवू नये. सोनेरी रंगावर तळावा.

असा हा खमंग तळलेला कुरकुरीत अनारसा खायला खूप चविष्ट लागतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.

टिप्स :-
* तयार पीठ स्टीलच्या डब्यात ठेऊ नये. काळे पडते.
* तयार पिठ बरेच दिवस म्हणजे अगदी महिनाभर सुध्दा टिकते. खराब होत नाही.
* तांदुळ शक्यतो जूना व जाडाच वापरावा.पीठ फुलून जाळी चांगली पडते.
* एकाच बाजूने तूप झार्याने उडवून तळावा. अन्यथा खसखस तूपामधे सुटते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


23 August 2016

चिरोटे (Chirote)

No comments :

"चिरोटे" हा एक पारंपरिक पक्वान्नाचा प्रकार आहे. दिवाळी फराळात करंजीच्या जोडीला हमखास बनवले जायचे. मात्र दिवाळीला फराळात जे चिरोटे केले जातात त्यावर पीठीसाखर पेरली जाते. तसेच जेवणात पक्वान्न म्हणून चिरोटे करायचे असतील तर जिलेबी प्रमाणे साखरेच्या पाकात बुडवून काढले जातात. आणि जर का आपल्याला गोड नको असतील तर खरपूस तळून झाल्यावर तसेच ठेवले तरी खारी बिस्कीट सारखे चहा सोबत खायलाही मस्त खुसखूषीत लागतात. ज्यांना जास्त गोड आवडत नाही किंवा साखर खायची नाही त्याच्यासाठी हा उत्तम प्रकार आहे. घरच्या घरी उपलब्ध सामग्रीतून बनविता येते.एकदम सहज सोपी पाककृती आहे. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य:-
* मैदा १ १/२ वाटी
* रवा १/२ वाटी
* तूप / तेल मोहनासाठी ४-५ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* दुध १/२कप
* कॉर्न फ्लोअर ४ टेस्पून + तूप २ टेस्पून
* तूप /तेल चिरोटे तळण्यासाठी
* पीठीसाखर साखर १/२ वाटी

कृती:-

प्रथम रवा आणि मैदा एका पसरट भांङ्यामधे घ्या व त्यामधे कडकडीत गरम तूप व चिमूटभर मीठ घालून एकत्र करा. सर्व पीठाला हाताने मोहन चोळून घ्या.  कोरडे पीठ मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.

नंतर अंदाज घेत थोडे -थोडे दूध घालून घट्ट असा मिश्रणाचा गोळा भिजवा. अर्धा तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावा. तोपर्यंत,

दोन चमचे तुप हाताने फेटून पातळ करावे व त्यामधे काँर्नफ्लोअर घालून परत फेटून पेस्ट तयार करावी. याला 'साटा' म्हणतात.

आता अर्ध्या तासानंतर तयार पीठाचा गोळा फूड प्रोसेसर मधून किंवा मिक्सरमधे फिरवून काढावा व मऊ करून घ्यावा. 

नंतर एकत्र केलेल्या पीठाचे एकाच आकाराचे सारखे भाग करावेत. ( इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या सहा पोळ्या झाल्या)

आता त्यातील तीन गोळ्याची  वेगवेगळया तीन पातळसर पोळ्या लाटाव्यात .प्रत्येक पोळीला तयार साटा लावून घडी करून बाजूला ठेवावी.

आता शेवटी तिसरी लाटलेली पोळी पोळपाटावर तशीच ठेवून त्यावर साटा लावून आधीच्या घडी करून ठेवलेल्या दोन पोळ्या बरोबर एकावर एक पसराव्यात.

आता या तीनही पोळ्यांची मिळून घट्ट दाबून सुरळी करावी. तयार सुरळीचे एक-एक इंचाचे तुकडे करावेत व ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावेत. 

नंतर एकेक गोळी घ्यावी व लेयर असलेली बाजू वर ठेवून हाताने दाबून गोळी चपटी करून घ्यावी व हलक्या हाताने जाङसर पुरी लाटावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे तयार करून घ्यावेत. 

आता तयार झालेले चिरोटे मंद आचेवर, गुलाबी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे ताटाच्या कडेने तिरके उभे करावेत. म्हणजे तूप निथळते. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा त्यावर आवडीनुसार पीठीसाखर भुरभुरावी. मस्त खुसखूषीत चिरोटे खाण्यास तयार!

हे चिरोटे पुर्णपणे गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.केव्हाही मुलांना किंवा अचानक कोणी घरी आलेच तर चहासोबत बिस्कीट सारखे खायला देऊ शकतो.

टीप्स :-
* मोहन कडकडीत गरम असावे . 

*  पाकातील चिरोटे करायचे असल्यास साखर २ वाट्या घेऊन साखर बुडेल इतपत पाणी घालून साखरेचा गोळीबंद पाक करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चिरोट्यात पाक शोषला जावून चिरोटे मऊ पडतात. पाक सतत उबेशी ठेवावा. तळून साधारण गार, कोमट झाले की गरम पाकात बुडवून काढावेत.

* काँर्नफ्लोअर ऐवजी तांदुळाची पीठी घेतली तरी चालते. मात्र साट्याची जास्त घट्ट पेस्ट नको. पातळच असावी. अन्यथा चिरोटे खाताना तोंडात पीठ पीठ लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

सत्यनारायण प्रसाद /शिरा ( Halawa)

No comments :
हा रव्याचा शिरा एक पौष्टीक पदार्थ आहे.नाष्टा म्हणून खाता येतो.तसेच जेवणात पक्वान्न म्हणून पण करता येतो.सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे प्रसाद म्हणून करतात.खास करून "सत्यनारायण पूजा " या पूजेचा प्रसाद म्हणून रव्याचा शिराच लागतो.प्रसाद असल्याने कोणी नावे ठेवत नाही पण चवदार कसा बनवावा ? ते पहा. साहीत्य व कृती,
साहित्य:-
* बारीक गव्हाचा रवा १ १/४ (सव्वा) वाटी
* साखर १ १/४ वाटी
* तूप १ १/४ वाटी
* पाणी व दुध मिक्स २ १/२ वाट्या (दोन्ही निम्मे-निम्मे )
* वेलची पावङर,ङ्राय फ्रूट्स आवङीप्रमाणे
* एका पिकलेल्या केळाचे काप
* ङाळींबाचे दाणे आवङीनूसार
कृती:-
प्रथम कढईत तूप गरम करा. त्यात रवा घालून तांबूस होई पर्यंत खमंग भाजून घ्या.रव्याचा  छान वास सुटला कि, त्यात केळाचे काप घाला आणि परता.
नंतर गरम दुध-पाणी घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा. रवा फुलेल व साखरही विरघळते.
गॅस बंद करा. त्यात साखर व ड्राय फ्रूट्स घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवा व एक वाफ काढा. शिरा तयार.

सजावटीसाठी वरून ङाळींबाचे दाणे घालून शिरा बाप्पाला नैवेद्य दाखवा . आणि जर नाष्टा म्हणून केला असेल तर अजून थोडी तूपाची धार वरून सोडा व खायला द्या. छान लागतो.
टिप:- 
केळाने स्वाद छान येतो.
केळ रवा भाजत आल्यावर घालावे.शेवटच्या दोन परतण्या द्या. काळे पडत नाही.
प्रसादाचा शिरा करताना सर्व साहीत्य सव्वा पटीत घेतात.तसेच पाण्या ऐवजी सर्व दूधच वापरावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 August 2016

झणझणीत कोल्हापूरी मिसळ-पाव (Misal-pav)

No comments :
दिवाळी झाली की, फराळाचे तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्याना कंटाळा आलेला असतो. त्यामुळे डब्यामध्ये थोडे-थोडे चिवडा,शेव तसेच पडते व नवीन झणझणीत काहीतरी खावे वाटते.तेव्हा मस्त कोल्हापूरी झणझणीत मिसळ-पाव पूढील पध्दतीने करावे.म्हणजे डबे पण मोकळे होतात व घरची मंडळी पण खुष!

साहित्य:-
कटाचे साहित्य -
* तिळ १ टेस्पून
* खसखस १ टेस्पून
* किसून सुके खोबरे २ टेस्पून
* लवंगा चार-पाच
* दालचिनी दोन इंच
* मिरे पाच-सहा
* जिरे एक टीस्पून
* मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून
* लसूण ८-१० पकळ्या
* हिरवी मिरची
* आले एक इंच
* तेल १०० मि.लि
* लाल मिरची पावडर आवडीनुसार
* हळद पावडर
* मीठ चवीनुसार 
इतर साहित्य;-
* मीठ घालून वाफवलेली मोडाची मटकी व उकडलेले बटाटे  पाव किलो
* फरसाण
* बारीक चिरलेला कांदा
* लिंबू चिरून
* लादी पाव किंवा सॅडविच स्लाइज्ड ब्रेड
* वरून घालण्यासाठी ओले खोवलेले खोबरे व चिरलेली कोथिंबिर

कृती 
कट
प्रथम एका पॅनमध्ये तिळ,खसखस,खोबरे  कोरडेच भाजावे.नंतर थोड्या तेलावर कांदा भाजावा.
आता हे कटाचे भाजलेले साहीत्य व वर दिल्यापैकी राहीलेले मसाल्याचे साहीत्य सर्व एकत्र वाटून त्याचे चांगले वाटण तयार करून घ्यावे .वाटताना गरजेनूसार थोडे-
डे पाणी घाला.

नंतर जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवून तेल घालावे.तेल गरम झाले की त्यात आधि थोडा चिरलेला कांदा टाकावा व नंतर तयार वाटण घालावे व तेल सूटेपर्यंत भाजावे.भाजत आल्यावर लाल मिरचीपावडर,हळद घालावी व थोडे परतावे.शेवटी अंदाजे एक ते दीड लिटर पाणी घालावे व मीठ टाकून पाच मिनीट ऊकळू द्यावे.

कटानंतरची कृती 
आता सर्व्हींग प्लेट घेऊन त्यामध्ये आधि वाफविलेली मटकी थोडी,उकडलेला बटाटा चार फोडी मग फरसाण अशा क्रमाने थर घालून शेवटी गरमा-गरम उकळता तयार कट दोन डाव घालावा.
आता तयार डीश वर वरून खोबरे कोथिंबिर,कच्चा कांदा घालून लिंबूची फोड ठेवावी व पावाबरोबर झणझणीत मिसळ सर्व्ह करावी.

टीप्स:-
१) जास्त तेलकट कट नको असेल तर तेल थोडे कमी घ्यावे.आवडीनूसार कमी-जास्त करावे.
२) मटकीची उसळ करून घेतली तरी चालते.परंतू तयार कटामधे मटकी घालू नये.कटाचा स्वाद चव बदलते. तसेच नुसता कट असेल तर दोन दीवस आरामात छान टिकू शकतो.
३) फरसाणच्या जोडीला डब्यात शिल्लक असेल तर शेव चिवडा पण घ्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
मिसळ पाव 
भाजलेले मसाला साहित्य 
तेलात परतलेला मसाला 

तयार कट 
 त
तयार मिसळीचे साहित्य 

08 August 2016

बेळगावी कुंदा ( Belgaon Kunda)

No comments :
बेळगावी कुंदा आमच्याकडे सर्वानाच खूप आवडतो. पण आम्ही नेहमी विकत आणूनच खात होतो. टीव्हीवर एका फूड शोमधे मला ही रेसिपी मिळाली, मी लगेच करून पाहीली मस्त जमली मग आता तूम्हाला सांगते. बघा साहीत्य व कृती,

साहीत्य :-
* साखर अर्धा वाटी
* डिंक १ टेस्पून
* रवा १ टेस्पून
* तूप १ टेस्पून
* दही १ टेस्पून
* दूध १/२ लिटर
* जायफळ, वेलची पावडर आवडीनुसार

कृती :-

प्रथम साखर कँरेमल करायला एका पॅनमधे घालून बारीक गँसवर ठेवा.

आता कँरेमल तयार होईपर्यंत तूपामधे डिंक फुलवून घ्या.

नंतर राहीलेल्या तूपामधे रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या.

नंतर त्यामधे तळलेला डिंक घाला. त्यातच कच्चे दूधही घाला. दूध उकळू दे, उकळत असताना दही घाला. हलवत रहा. दूध फाटेल. 

शेवटी तयार झालेले कँरेमल उकळत्या दूधामधे घाला व व्यवस्थित ढवळा. ढवळून जवळपास अर्धा तास उकळत राहू दे.

अर्ध्या तासाने घट्ट गोळा तयार होतो. जायफळ, वेलची घाला व एका खोलगट बाऊलमधे काढा. थंड  होऊ दे. अगदी विकतच्या सारखा तांबूस रंगाचा मस्त कुंदा तयार.

तयार कुंद्यावर चांदीचा वर्ख आवडत असेल तर लावा व खायला द्या.

खूप सोपा व कमी साहीत्यात तयार होतो. छान होतेा. तूम्हीही करून बघा. तूम्हाला नक्की आवडेल.

टीप:- कँरेमल करताना साखर विरघळून तांबूस रंग आला की गँस बंद करा. जास्त करपवले की चव कडवट होते. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 August 2016

उपवासाचे दहीवडे (Fasting Dahivada)

No comments :

उपवास आहे म्हणून काय झाले? काहीतरी सकस, पण खमंग खायला पाहीजेच ना. मग चला उपवासाचे दहीवडे बनवूया. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहीत्य :-

* शिजवलेला वरी तांदुळाचा मऊ भात १ वाटी
* भिजलेला शाबूदाणा अर्धा वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट २ टेस्पून
* राजगिरा पीठ २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* हिरवी मिरची पेस्ट
* तेल तळण्यासाठी
* दही
* भाजलेल्या जिर्याची पूड

कृती :-

प्रथम एका पसरट बाऊलमधे भिजलेला शाबूदाणा व वरीचा भात एकजीव करून घ्या.

आता त्यामधे दाण्याचे कूट,राजगिर्याचे पीठ, मिरची पेस्ट, थोडी भाजलेल्या जिर्याची भरड पूड व चविनूसार मीठ घालून सर्व मिश्रण हाताने एकजिव मळावे. आवश्यकता भासल्यास राजगिर्याचे पीठ कमी-जास्त करू शकता. जेणेकरून मिश्रणाचा खुटखूटीत गोळा बनवता आला पाहीजे. मिश्रण कडेला ठेवून द्या व वडे तळायच्या आधि २ चमचे दह्यामधे पाणी घालून पातळ ताक वडे बुडवण्यासाठी तयार करा.

तसेच वड्यवर घालण्यासाठी घट्ट दही घुसळून त्यामधे चविला साखर व मीठ घालून एकत्र ढवळून घ्या.

आता कढईत तेल गरम करा व आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटसर गोळे करून तांबूस रंगावर तळून टिश्यू पेपरवर काढा.

नंतर खायला देतेवेळी आधि पातळ ताकामधे बुडवा. दोन -तीन मिनिटानी पाण्यातून काढून हलकेच हाताने दाबून पाणी काढा. व सर्व्हींग प्लेट मधे ठेवा व वरून तयार केलेले घट्ट दही घाला. त्यावर मिरचीपूड व जीरपूड भुरभूरा व खायला द्या.

उपवासादिवशी असे थंड दहीवडे खायला खूपच छान लागतात. तेलकटही वाटत नाही. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील.

टीप्स - 
१) वरीचा भात एकदम मऊ शिजवलेला असावा.
२) राजगिर्याच्या ऐवजी शिंगाडा पीठ किवा दोन्ही पीठ एकत्र घालू शकता.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

खिचडा ( Masala Rice with Sprout)

No comments :

साहीत्य :-
* मोड आलेली मिश्र कडधान्ये १ वाटी
* बासमती तांदुळ १ वाटी
* ओले खोबरे १ वाटी
* लवंगा
* दालचिनी
* शहाजिरे
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची, कढीपत्ता
* कोथंबिर
*  मीठ चविनूसार
* तेल २ टेस्पून
* हींग, मोहरी, हळद
* पाणी गरजेनुसार

कृती :-

प्रथम कुकरमधे तेल घालून ही, मोहरी, हळद फोडणी करा. फोडणी तडतडल्यावर त्यामधे मिरची, कढीपत्ता व लवंग, दालचिनी शहाजिरे घाला.

नंतर त्यामधे कडधान्ये व तांदुळ घाला. थोडे परतून, त्यामधे गोडा मसाला व मीठ घाला. ओले खोबर, कोथंबिर घाला. परत थोडे परतून एकत्र करा.

शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घाला व झाकण बंद करून ४-५ शिट्ट्या काढा. (कडधान्ये शिजायला वेळ लागतो.)

आता वाफ जिरल्यावर डिशमधे काढा वरून खोबरं कोथंबिर व तूप घाला. व गरमा-गरमच सर्व्ह करा.

रात्रीच्या जेवणात फारशी भूक नसते पण थोडेफार खाण्याची इच्छा असते व काही जास्त करण्याचा कंटाळा आलेला असतो. अशावेळी हा खिचडा वन डिश मिल म्हणून उत्तम पर्याय आहे. तूम्हीही करून बघा. नक्की आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 August 2016

उपवासाचा ढोकळा (Fasting Dhokala)

No comments :
उपवास म्हटले की, हमखास काहीतरी खायची इच्छा होते. पण नेहमीचीच शाबूदाणा खिचडी, वेफर्स नको असते. तर पुढील प्रकारे उपवासाचा ढोकळा करा. साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* वरी तांदुळ १ वाटी
* शेंगदाणे कूट १/२ वाटी
* आंबट ताक
* मीठ, चविनुसार
* हिरवी मिरची, आले पेस्ट
* फ्रूटसाँल्ट इनो एक टीस्पून

कृती :-
प्रथम वरी ताकामधे किमान एक तास भिजत घालावी. नंतर मिक्सरमधे वाटून घ्या. साधारण भजीच्या पीठाइतपत पातळ असावे. पाणी शक्यतो नकोच. जे भिजवलेले ताक आहे त्यातच वाटावे.

नंतर त्यामधे मीठ, मिरची व आले पेस्ट व दाण्याचे कूट घालावे. एकजीव हलवावे. शेवटी ऐनवेळी इनो पावडर घालून हलवावे.

आता लगेच तेल लावलेल्या ढोकळा पात्रात घालून १५ मिनट शिट्टी न लावता वाफवा.

शेवटी तेलामधे जीरे व हिरवी मिरची तुकडे घालून फोडणी करा व तयार ढोकळ्यावर पसरवा.

उपवासा दिवशी हा ढोकळा एकदम पोटभरीचा होतो. वरी असल्याने भूक लागत नाही. व चविला ही छान लागतो. तुम्हीही नक्की करून घा.

टीप :-  वरील तांदुळ रात्रीच भिजत घातले तर ढोकळा जास्त हलका होतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

इडली ढोकळा (Idly Dhokala)

No comments :
नेहमी तेच ते पदार्थ खाउन कंटाळा आला की, काहीतरी नविन खावे वाटते. पण ते पौष्टिक ही पाहीजे, तेलकट नको झटपट होणारे ही पाहीजे,  मग काय एखाद्या जून्याच पदार्थातील घटक थोडे बदलायचे आकार बदलायचा व नविन पदार्थ करायचा. तर हा इडली ढोकळा तसाच पदार्थ आहे कसा केला साहीत्य व कृती,
साहित्य :-
* डाळीचे पीठ २ वाट्या
* रवा १ वाटी
* आंबट दही किंवा ताक १ वाटी
* पाणी गरजेनुसार
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर
* हींग चिमूटभर
* हळद
* हिरवी मिरची व आल्याची पेस्ट १टीस्पून
* इनो फ्रूटसाँल्ट दीड ११/२ टीस्पून
* कढीपत्ता, कोथिंबिर व एक हिरवी मिरची
* फोडणीसाठी तेल व हींग, मोहरी, तिळ
कृती :-
प्रथम एका पसरट भांड्यात डाळीचे पीठ व रवा एकत्र करावा. नंतर त्यामधे वर दिल्यापैकी इनो व फोडणीचे साहीत्य सोडून बाकी सर्व घाला व गुठळ्या न होऊ देता एकजीव करावे. १५ मिनिट झाकून ठेवा.
पंधरा मिनिटा नंतर गरज वाटली तर अजून थोडे पाणी घालावे. पीठ नेहमीच्या इडली मिश्रणाइतकेच सैल ठेवावे. जास्त पातळ ठेवले तर इडली फुगत नाही व घट्ट ठेवले तर इडल्या कडक होतात. शेवटी इनो पावडर घालावी व परत एकदा मिश्रण हलवावे आणि तेल लावलेल्या इडली पात्रात भरावे.
इडली पात्र प्रेशरकुकर मधे ठेउन (शिट्टी काढून) इडल्या दहा मिनिट वाफवाव्यात. ओवनमधे वाफवणार असाल तर हाय टेम्परेचरला ३ मिनिट वाफवावे.
आता इडल्या शिजेपर्यंत तेल तापवून फोडणी करून ठेवा. फोडणीमधे हींग मोहरी तिळ आधि घाला व तडतडल्यावर उभी चिरलेली मिरची व कढीपत्ता घाला.
आता तयार इडल्या डिशमधे काढा. वरून फोडणी व कोथंबिर घाला. गरमा-गरम खायला द्या. आवडीनुसार चटणी लाल, हिरवी चटणी किंवा साँस काहीही घ्या अथवा नुसतेच खा. कसेही चांगलेच लागते. तूम्हीही नक्की करून बघा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

01 August 2016

उपवासाची भजी (Pakoda)

No comments :

उपवास असला की हमखास चटपटीत काहीतरी खावे वाटते. अशावेळी ही एकदम सोपी व पट्कन होणारी भजी करा. साहीत्य व कृती,

साहित्य :-
* बटाटे २
* राजगिर्याचे पीठ अर्धा वाटी
* आरारूट पावडर १ टेस्पून
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड /हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* जीरे पूड
* तेल तंळणीसाठी

कृती :-

प्रथम बटाटे साल काढून पातळ गोल चकत्या करा व नंतर त्या चकतीच्या उभ्या बारीक स्ट्रिप कापा. (उभ्या चिरलेल्या कांद्याप्रमाणे दिसतील)

नंतर त्यावर मिरचीपूड, मीठ व जीरपूड घालून चोळा व दहा मिनिट झाकून ठेवा.

दहा मिनिटानी बटाट्याला पाणी सुटलेले असेल, आता त्यात राजगिरा पीठ व आरारूट घाला व एकत्र करा.  गरजेनुसार राजगिरा पीठ कमी -अधिक करा. मिश्रण सुटसूटीत झाले पाहीजे.  साधारण कांद्याची खेकडा भजी करतो त्याप्रमाणे असावे.

आता गरम तेलात हाताने लहान लहान भजी सोडा व कुरकुरीत तळा.

मस्त कुरकुरीत भजी नुसतीच अथवा चटणी सोबत खा.

टीप :- आरारूट पावडर नसेल तर बाईंडींग साठी शिंगाडा पीठ वापरले तरी चालते.

चकत्या जितक्या पातळ कापला येतील तितक्या पातळ कापा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.