23 August 2016

चिरोटे (Chirote)

No comments :

"चिरोटे" हा एक पारंपरिक पक्वान्नाचा प्रकार आहे. दिवाळी फराळात करंजीच्या जोडीला हमखास बनवले जायचे. मात्र दिवाळीला फराळात जे चिरोटे केले जातात त्यावर पीठीसाखर पेरली जाते. तसेच जेवणात पक्वान्न म्हणून चिरोटे करायचे असतील तर जिलेबी प्रमाणे साखरेच्या पाकात बुडवून काढले जातात. आणि जर का आपल्याला गोड नको असतील तर खरपूस तळून झाल्यावर तसेच ठेवले तरी खारी बिस्कीट सारखे चहा सोबत खायलाही मस्त खुसखूषीत लागतात. ज्यांना जास्त गोड आवडत नाही किंवा साखर खायची नाही त्याच्यासाठी हा उत्तम प्रकार आहे. घरच्या घरी उपलब्ध सामग्रीतून बनविता येते.एकदम सहज सोपी पाककृती आहे. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य:-
* मैदा १ १/२ वाटी
* रवा १/२ वाटी
* तूप / तेल मोहनासाठी ४-५ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* दुध १/२कप
* कॉर्न फ्लोअर ४ टेस्पून + तूप २ टेस्पून
* तूप /तेल चिरोटे तळण्यासाठी
* पीठीसाखर साखर १/२ वाटी

कृती:-

प्रथम रवा आणि मैदा एका पसरट भांङ्यामधे घ्या व त्यामधे कडकडीत गरम तूप व चिमूटभर मीठ घालून एकत्र करा. सर्व पीठाला हाताने मोहन चोळून घ्या.  कोरडे पीठ मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.

नंतर अंदाज घेत थोडे -थोडे दूध घालून घट्ट असा मिश्रणाचा गोळा भिजवा. अर्धा तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावा. तोपर्यंत,

दोन चमचे तुप हाताने फेटून पातळ करावे व त्यामधे काँर्नफ्लोअर घालून परत फेटून पेस्ट तयार करावी. याला 'साटा' म्हणतात.

आता अर्ध्या तासानंतर तयार पीठाचा गोळा फूड प्रोसेसर मधून किंवा मिक्सरमधे फिरवून काढावा व मऊ करून घ्यावा. 

नंतर एकत्र केलेल्या पीठाचे एकाच आकाराचे सारखे भाग करावेत. ( इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या सहा पोळ्या झाल्या)

आता त्यातील तीन गोळ्याची  वेगवेगळया तीन पातळसर पोळ्या लाटाव्यात .प्रत्येक पोळीला तयार साटा लावून घडी करून बाजूला ठेवावी.

आता शेवटी तिसरी लाटलेली पोळी पोळपाटावर तशीच ठेवून त्यावर साटा लावून आधीच्या घडी करून ठेवलेल्या दोन पोळ्या बरोबर एकावर एक पसराव्यात.

आता या तीनही पोळ्यांची मिळून घट्ट दाबून सुरळी करावी. तयार सुरळीचे एक-एक इंचाचे तुकडे करावेत व ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावेत. 

नंतर एकेक गोळी घ्यावी व लेयर असलेली बाजू वर ठेवून हाताने दाबून गोळी चपटी करून घ्यावी व हलक्या हाताने जाङसर पुरी लाटावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे तयार करून घ्यावेत. 

आता तयार झालेले चिरोटे मंद आचेवर, गुलाबी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे ताटाच्या कडेने तिरके उभे करावेत. म्हणजे तूप निथळते. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा त्यावर आवडीनुसार पीठीसाखर भुरभुरावी. मस्त खुसखूषीत चिरोटे खाण्यास तयार!

हे चिरोटे पुर्णपणे गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.केव्हाही मुलांना किंवा अचानक कोणी घरी आलेच तर चहासोबत बिस्कीट सारखे खायला देऊ शकतो.

टीप्स :-
* मोहन कडकडीत गरम असावे . 

*  पाकातील चिरोटे करायचे असल्यास साखर २ वाट्या घेऊन साखर बुडेल इतपत पाणी घालून साखरेचा गोळीबंद पाक करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चिरोट्यात पाक शोषला जावून चिरोटे मऊ पडतात. पाक सतत उबेशी ठेवावा. तळून साधारण गार, कोमट झाले की गरम पाकात बुडवून काढावेत.

* काँर्नफ्लोअर ऐवजी तांदुळाची पीठी घेतली तरी चालते. मात्र साट्याची जास्त घट्ट पेस्ट नको. पातळच असावी. अन्यथा चिरोटे खाताना तोंडात पीठ पीठ लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment