22 October 2016

रवा लाडू ( Rawa Ladu )

No comments :
लाडू आपण एरव्हीही मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा कोणी आले गेले तर खायला देण्यासाठी सोयीचे होते म्हणून करतो. तसेच दिवाळी आली की खास फराळाच्या ताटातला पदार्थ म्हणून त्याची हक्काची जागा असतेच. यात सुध्दा कोणी रवा-बेसन लाडू करतो तर कोणी खवा घालून करतो. मी ओला नारळ घालून केलेत. कसे ते पहा साहित्य व कृती, 

साहीत्य:-

१) बारीक रवा ४ वाट्या
२) साखर ३ वाट्या
३) एका नारळाचे खवून खोबरे 
४) वेलची पूड दोन चमचे
५) काजू,बदामाचे काप,बेदाणे आवडीनुसार
६) साजूक तूप १ वाटी
७) गुलकंद २ टेस्पून

कृती:

प्रथम कढई तापत ठेवून त्यामधे तूप घालावे व त्यावर रवा खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.रवा  भाजत आल्यावर शेवटी -शेवटी ओले खोबरे घालावे व चार परतण्या देऊन गॅस बंद करावा.

दुसर्या एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे.साखर विरघळून पाच-दहा मिनीटे ऊकळू द्यावे. एकतारी पाक तयार तयार झाला का पहावे.झाला असेल तर तयार पाकामधे वर भाजलेला रवा,वेलची पूड सुकामेवा व गुलकंद घालावे .नीट हलवावे व मिश्रण आळून येण्यासाठी झाकून ठेवून द्यावे.मधून मधून हलवून बघावे.

साधारण दोन ते तिन तासानी मिश्रण आळून येते.मग त्याचे आपल्या आवडीनुसार हव्या त्या साइजचे  लाडू वळावेत.वळताना वर एक-एक बेदाणा लावावा.

छान मऊ व रवाळ लाडू तयार होतात.

या लाडूमधे ओले खोबरे असल्याने  आठ-दहा दिवसापेक्शा जास्त दिवस ठेवू नये.लवकर संपवावेत.वास येण्याची शक्यता असते अन्यथा फ्रीजमधे ठेवावेत व खाण्याच्या आधि थोडावेळ बाहेर काढून ठेवावेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

21 October 2016

करंजी (Karanji)

No comments :

करंजी हा पदार्थ महाराष्ट्रामधे खास दिवाळीला केला जाणार पारंपारिक पदार्थ आहे. दिवाळीचा फराळ तयार करायला सुरवात करायची तर गोड करंजी सर्वात आधि करायची पध्दत आहे. त्यामुळे करंजीला "शुभाची करंजी " असे म्हणतात. करंजी मधे सहसा चकली प्रमाणे बिघडण्याचा धोका नसतो परंतु लाटणे, भरणे,तळणे अशासाठी किमान दोघींची मदत असेल तर करणे कंटाळवाणे होत नाही.  दिवाळीत शाळांना सुट्टया लागलेल्या असतात. मग घरातली चिल्लर कंपनीसुध्दा करंजा भरण्याच्या, भरलेल्या चिरण्याने कातरायच्या कामाला हौसेने येते .किंवा शेजारणी सुध्दा दिवस ठरवून आज तुझ्याकडे, उद्या माझ्याकडे असे ठरवून पदार्थ करत असत. बाकी काहीही असो परंतु दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण नाहीच.तर अशी "करंजी" कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
वरच्या पारीसाठी -
* मैदा २ वाट्या
* बारीक रवा २ वाट्या
* मोहन २ टेस्पून
* दूध १ कप
* मीठ चिमूटभर
* पाणी गरजेनुसार

साहित्य :-
सारणासाठी -
* किसलेले सुके खोबरे १ १/२ वाट्या
* रवा १ /४ वाटी
* पिठी साखर १ १ /२ वाट्या
* खसखस १/४ वाटी
* वेलची पूड
* बेदाणे, चारोळी काजू,बादाम तुकडा आवडीनुसार
तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती :-

प्रथम रवा व मैदा एकत्र करून त्यामधे चविला मीठ व गरम तूप (मोहन) घालून चोळावे. नंतर दूध घालावे व गरजेनुसार पाणी घेऊन घट्ट मळावे. मळलेले पीठ ओल्या कपड्याखाली अर्धा ते एक तास झाकून ठेवावे. तोपर्यंत सारण तयार करावे.

सारण कृती -
आता कढईत खसखस कोरडीच भाजून घ्यावी. नंतर रवा भाजावा. आता किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर खोबरे हाताने चुरडावे. त्यामधे रवा, साखर, वेलचीपूङ, ड्रायफ्रूट्स कापून घालावे.सारण तयार.

आता करंजी करण्यासाठी आधी मळून ठेवलेले पीठ कुटून किवा फूड प्रोसेसर मधून फिरवून काढावे. मळलेल्या पीठाच्या लहान -लहान गोळ्या करून पुरीसारखे लाटून घ्यावे. नंतर चमच्याने सारण भरावे व पारी दूधाचे बोट लाऊन बंद करावी. नक्षीदार चिरण्याने कापावी. अशा १५ -२0 करंजा करून ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे. नंतर कढईत तेल गरम करून मंद गँसवर गुलाबी रंगावर तळावे.

खुसखूषीत तयार करंजा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

टिप्स :-
* सारणात साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी.
* खोबर्याच्या वाट्या थोडावेळ कोमट पाण्यात टाकाव्यात व नंतर त्याची काळी पाठ काढावी व किसावे. किस पांढराशुभ्र होतो.करंजीसुध्दा स्वच्छ रंगाची दिसते. अथवा सारणामुळे काळपट रंग येतो.
* सारण आदले दिवशीच करून ठेवले असता जास्त सोयीचे होते. म्हणून आदले दिवशीच सवडीनुसार निगुतीने करून ठेवावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 October 2016

वेज दम बिर्याणी (Veg Dum Biryani)

No comments :

बिर्याणी ही एक भाताची,मुघलाई पारंपारिक पाककृती आहे. वेज व नाँनवेज दोन्ही प्रकारामध्ये करता येते. मी वेज बिर्याणी केली आहे. ही लहान -थोर सर्वांच्या आवडीची अशी आहे. साहित्य पाहिले की,वाटते खूप अवघड, किचकट कृती आहे. परंतु तसे अजिबात नाही! एकदम सहज,सोपी व चविष्ट पाककृती आहे.तसेच पौष्टीक व "वन डिश मिल" म्हणून एकदम झकास डिश आहे. क़़शी केली "वेज दम बिर्याणी " साहित्य व कृती, 👇

साहित्य :-

भातासाठी लागणारे-
* बासमती तांदुळ २ वाट्या
* लवंगा २-४
* हिरवी वेलची ४
* मोठी मसाला वेलची २
* तमालपत्रं मध्यम १
* दालचिनी २ इंच
* काळे मिरे ४
* मीठ
* तूप २ टेस्पून

ग्रेवीसाठी साहित्य :-
* फ्लाॅवर १ वाटी
* गाजर १/२ वाटी
* शिमला मिरची १ /२ वाटी
* बीन्स १/२ वाटी
* मटार १ /२ वाटी. या सर्व भाज्या मोठ्या चौकोनी चिरून घ्याव्यात.
* कांदा १ पातळ उभा चिरून
* टोमँटो १ बारीक चिरून
* कोथिंबिर चिरून
* आलं-लसूण पेस्ट २ टीस्पून
* हिरवी मिरची उभी चिरून,बिया काढून २
* कोथिंबिर बारीक चिरून
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* मिरे ४-५ 
* लवंगा २-३
* तमालपत्रं १ मध्यम
* हिरवी वेलची २
* मसाला वेलची १
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* जीरे १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* तेल ४ टेस्पून
* फेटलेले दही १ वाटी

शेवटी वाफ म्हणजे दम आणण्यावेळी,
* उभा चिरून तळलेला कांदा अर्धा वाटी
* १०-१५ केशर काड्या पाव वाटी दूधामधे भिजवलेल्या
* कोथिंबिर चिरून
* पुदीना पाने १५-२०
* तूप २ टेस्पून

कृती :-

प्रथम भात मीठ व साहित्यामधे दिलेले सर्व मसाले अखंडच घालून मोकळा व नव्वद टक्कपर्यंतच शिजवून घ्यावा. शिजल्यावर ताटात काढून वरून तूप घालून हलवून गार होण्यासाठी ठेवावा. तूप घातल्याने शितं एकमेकाला न चिकटता सुटी रहातात.

आता ग्रेवीसाठी,पँनमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत.नंतर त्यावर कांदा, आलं-लसूण पेस्ट, मिरची टाकावी. गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. नंतर टोमँटो घालून मऊ होईपर्यंत परतावा. थोडे पाणी घालून परतले तरी चालते. नंतर ग्रेवीसाठी दिलेले सर्व मसाले, हळद, तिखट व मीठ घालून परतावे. शेवटी सर्व भाज्या घालून परतावे व थोडे पाणी घालून झाकून भाज्या शिजवाव्यात. भाज्या जास्त शिजवू नयेत. थोडे दाताखाली येणार्या क्रंची रहाव्यात. परत शेवटी दम देताना पण थोड्या शिजतात हे लक्षात घ्यावे.

आता तयार ग्रेवी थोडी थंड झाली की, फेटलेले दही व कोथिंबिर घालून एकसारखे करावे.

आता सर्वात शेवटी वाफ आणायची म्हणजेच "दम" द्यायचा . त्यासाठी एका जड बुङाच्या पसरट भांङ्यामधे  तळाला १ टेस्पून तूप घालावे. त्यावर तयार अर्ध्या ग्रेवीचा थर पसरवावा,  त्यावर तयार अर्ध्या भाताचा थर पसरवावा. त्यावर केशर दूध अर्धे टाकावे. नंतर कोथिंबिर व पुदीना घालावा.आता राहीलेल्या ग्रेवी व भाताचा असाच दुसरा थर पसरवावा. वरून केशरदूध शिंपडावे. हाताने किंवा चमच्याने सर्व भात थोडा दाबावा. १ टेस्पून तूप कडेने सोडावे व घट्ट झाकण लावून आधी गँसवर तवा ठेवावा व त्यावर भांडे ठेवावे. मंद गँसवर १५-२० मिनिट दणदणित वाफ आणावी.

शेवटी सर्व्हींगच्या वेळी वरून कोथिंबिर व तळलेला कांदा पसरावा व गरमा-गरम द्यावे.

टिप्स :-
* भाज्या व त्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे.
* आवडीनुसार तळलेले काजू वरून घालावेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 October 2016

रताळ्याचा हलवा ( Sweet Potato Halawa)

No comments :

उपवास असला तरी पुृूर्णपणे पोट रिकामे ठेवणे आरोग्याला वाईटच.मग काय?  आपण शाबूदाणा खिचडी किंवा इतर कांही पदार्थ जे शेगदाण्याचे कूट वापरून केले जातात ते खातो. परंतु त्याने पित्त वाढते. रताळ्यामधे फाइबर भरपूर असते. सहज उपलब्ध असते त्यामुळे उपवासाला रताळे खाणे केव्हाही इष्टच. तर आज रताळ्याचा हलवा केला.कसा केला? साहित्य व कृती,

साहित्य :-
* रताळी मोठी २ (उकडून गर अंदाजे २ वाट्या)
* साखर १वाटी
* दूध १ कप
* तूप २ टेस्पून
* वेलचीपूड
* ड्रायफ्रूट्स

कृती :-

प्रथम रताळी स्वच्छ धुवून,मोठे तुकडे करावेत व कुकरमधे उकडून घ्यावे.

थंड झाल्यानंतर साल काढून आधि सुरीने कापून तुकडे करा व नंतर हाताने मँश करावे. आधि कापून घेतल्याने त्यातील तंतू किंवा शीरा ज्या असतात त्या कापल्या जातात व हलवा खाताना तोंडामधे  धागे येत नाहीत.

नंतर पँनमधे तूप गरम करून त्यामधे मँश केलेले रताळे घालावे व गुलाबी परतावे.

परतून झाल्यावर, नंतर त्यामधे दूध, साखर व वेलचीपूड घालावी. साखर विरघळून तूप सुटेपर्यंत ५ मिनिट परतावे व गँस बंद करावा.

शेवटी ड्रायफ्रूट्स घालावेत. खायला देताना वरून थोडे साजूक तूप सोडावे व खायला द्यावे.

अत्यंत पौष्टीक,सात्विक व लुसलू़शित असा हा "रताळ्याचा हलवा" चविला खूप छान लागतो. तूम्हीही करून बघा नक्की आवडेल.

टिप :- साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी. मी घेतलेल्या प्रमाणाने हलवा बर्यापैकी गोड होतो. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

02 October 2016

उपवासाचे भाजणीे पीठ ( Fasting Bhajani)

No comments :

उपवास म्हटले की नेहमी तीच ती शाबूदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. तर भाजणी पीठ तयार असेल तर, थालीपीठ, पुर्या किंवा कधी भाकरी व भोपळा बटाट्याची उपवासाची भाजी करता येते. याच पीठात उकडलेला बटाटा, रताळी,कच्ची केळी मिसळून कटलेट, वडे असे पदार्थ करता येतात. एकंदरीत उपवासाची भाजणी घरात ठेवणे सोयीचे असते. ऐनवेळी उपयोगी पडते.तर कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-

* वरी तांदुळ ५०० ग्रँम
* शाबूदाणा २५० ग्रँम
* राजगिरा २५० ग्रँम
* तेल किवा तूप १/२ टीस्पून 

कृती :-

प्रथम राजगिरा व वरी तांदुळ व्यवस्थित निवडून स्वच्छ करावे. शाबूदाणाही मोठ्या चाळणीतून चाळून घ्यावा म्हणजे त्यातील पीठ भाजताना कढईला चिकटत नाही.

आता सर्वात आधि राजगिरा भाजावा. याला कढई कमी तापलेली लागते. नाहीतर एकदम लाल होतो. नंतर वरी तांदुळ भाजावे. शेवटी शाबूदाणा कढईत किंचित तेल घालून भाजावा.  तेलामुळे शाबूदाणा भाजताना कढईला चिकटत नाही. अथवा तेल आधीच शाबूदाण्याला चोळून ठेवावे.

भाजलेले पदार्थ थंड होऊ द्यावेत. नंतर मिक्सरमधे, घरगुती अाटा चक्कीवर अथवा गिरणीतून दळून आणावे.

तयार पीठामधे थालीपीठ  करण्याच्या वेळी मीठ, मिरची, जीरे, दाण्याचे कूट घालून थालीपीठ करावे. थालीपीठ दही, उपवासाचे गोड लिंबू लोणचे घेऊन खावे.

टिप:
* भाजणी बेतशीरच भाजावी. अन्यथा थालीपीठ काळपट रंगाची,कडवट चवीची होतात व पीठाचा चिकटपणाही थोडा कमी होतो.

* भाजणी  हवाबंद डब्यात व कोरड्या जागी ठेवल्यास महिनाभर सहज टीकते.

* जीरे, भाजणी दळताना घातले तर त्याचा वास कमी होतो. म्हणून पदार्थ करण्यावेळी कच्चेच अाख्खे किंवा भरड घालावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.