17 September 2015

स्ट्राॅबेरी बर्फी ( Strawberry Burfi)

No comments :

स्ट्राॅबेरी म्हणले की मस्त लाल-गुलाबी रंग व रसाळ ,साधारण आंबटगोड चवीचे फळ डोळ्यासमोर येते. मात्र हे फळ हिवाळ्यातच येते. तसे आजकाल बाराही महीने सर्व मिळते. स्ट्राॅबेरी क्रश, जाम, विविध मिठाया तसेच आईसक्रीम, असे बरेच प्रकार बनवले जातात. आजकाल लहान मुलांची बरीच औषधे, खोकल्यावरच्या गोळ्या ...एकंदरीत त्याचा स्वाद व मोहक रंग सगळ्यांनाच आवडतो. तुम्हालाही आवडेल कशा करायच्या साहीत्य व कृती ...

साहीत्य ;-

* ओल्या नारळाचे खवलेले खोबरे 2 वाट्या
* साखर 1 1/2 (दीड) वाटी
* स्ट्राॅबेरी क्रश पाव ते अर्धी वाटी किवा जाम 2 टेस्पून
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* पिठी साखर 2 टेस्पून
* रोज किवा स्ट्राॅबेरी इसेन्स 5-6 थेंब

कृती :-

प्रथम जाड बुडाची कढई किवा नाॅनस्टीक पॅन घ्या. वर दिलेल्या साहीत्यापैकी पिठीसाखर व इसेंन्स सोडून बाकी सर्व साहीत्य एकत्र करा व मंद आचेवर शिजत ठेवा.

सतत ढवळत रहा.खाली लागण्याची शक्यता असते. करपले तर बर्फीचा रंग व चव बदलते. म्हणून काळजी घ्यावी.

आता पंधरा मिनिटांनी सर्व मिश्रण कढईपासून सुटायला लागेल. मिश्रण आळून येईल. तर आता शेवटी पिठीसाखर व इसेंन्स घालून, गॅस बंद करून चांगले घोटा. कोणत्याही वडीचे मिश्रण जितके जास्त घोटाल, तितके बर्फी चिकट न होता खुटखुटीत होते व लवकर सुकते.

नंतर मिश्रण ताटात घाला व प्लॅस्टीक शिट किवा पिशवी त्यावर घालून हाताने व्यवस्थित थापा. थोडे थंड झाले की सुरीने रेषा पाडून ठेवा.

अर्धा तासाने पुर्ण थंड होईल, मग वड्या काढा व डब्यात ठेवा.

खुप छान गुलाबी लाल रंग येतो व आकर्षक दिसतात. तसेच चवीला पण उत्कृष्टच लागतात.

15 September 2015

कच्चे केळ, बटाटा उपवास थालिपिठ

No comments :

उपवास आहे म्हटले की, नेमके काही खमंग असे खावे खावे वाटते. त्यातूनही तेलकट नको असे वाटत असते . खिचडी नेहमीच होते .फळांचा कंटाळा येतो. दूध आवडत नाही. मग खायचे काय ? हे सात्विक थालीपिठ करून बघा. उपवास रोजच करावा वाटेल ! कसे करायचे पहा.

साहीत्य :-

* कच्चे केळ 2 नग
* बटाटा 1 मध्यम
* भिजलेला शाबूदाणा 1 वाटी (ऐच्छिक)
* राजगिरा पिठ 1 वाटी
* शिंगाडा पिठ अर्धी वाटी
* भाजक्या शेंगदाण्याचे कूट पाव वाटी
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* जीरे एक टीस्पून
* भाजण्यासाठी तेल/तूप

कृती:-

प्रथम कच्चे केळ व बटाटा उकडून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढून खिसून घ्यावे.

खिसलेल्या लगद्यामधे वर दिलेले सर्व साहीत्य घाला.गरज वाटल्यास राजगिरा व शिगाड्याचे पिठ कमी-जास्त करा  व हातानेच नीट एकजीव करून गोळा तयार करा.

तयार पिठाचा साधारण मध्यम आकाराच्या पेरू इतका गोळा घ्या  व नाॅनस्टीक तव्यावर हाताने थापून घ्या. तेल/तूप सोडून उलट-सुलट खरपूस भाजून घ्या.

मस्त घट्ट दही किवा हिरवी मिरची भाजून दह्यात चुरडून टाका व चवीला मीठ घाला. मिरचीचा चटका तयार ! खा आरामात.

टीप :- बटाटा न घेता नुसते केळच वापरून केले तर जास्तच चांगले. केळात बटाट्यासारखे फॅट्स नसतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 September 2015

उकडीचे मोदक बनवताना कोणती खबरदारी घ्याल ?

No comments :

मोदक, म्हटले की गणपती बाप्पा ! असे समिकरणच आहे.त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. 'उकडीचे मोदक' करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते.  बर्याच गृहीणी 'उकडीचे मोदक' म्हटले की,करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे अजिबात अवघड नाही.

* मोदकासाठी पिठी तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती , आंबेमोहोर  व तोही नवा घ्यावा . त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखर्या(चुण्या) पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पिठी मिळते , खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावी.

* सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.

* आतल्या सारणासाठी नारळ  फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.

* नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा. म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.

* सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा .खारट नको.

*सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या. तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.

* सारण आदले दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. घाई-गडबड वाचेल.

* मोदक तयार करताना उकड गरम असावी . तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत. यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.

* उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही मोठे चविष्ट लागतात.घरगुती पांढरे लोणी वापरा.

* मोदक  तयार करताना त्याच्या कळ्या पाडणेचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.मुखर्या छान धारदार पाडता येतात . हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.

* पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. खालून फाटत नाहीत.

* मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे/करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुध्दा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल/ तूप चोळा .

* मोदक उकडायला ठेवताना आधि पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.

* तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिकटून फाटणार नाहीत.

आता इतके त्याचे नखरे संभाळून केलेले 'उकडीचे मोदक' बाप्पाला का नाही आवडणार ? नक्कीच आवडतील. व तुम्हाला पण आवडतील ! ते कसे करायचे , साहीत्य व कृतीसाठी पुढे दिलेल्या लिकवर क्लिक करा.

04 September 2015

शेवयाची खीर ( Sevai Kheer )

No comments :

शेवयाची खीर सर्वाच्याच परिचयाची आहे. ऐत्यावेळी कोण पाहुणा आला किवा नैवेद्याला पट्कन आपण करतो. पण त्यातसुध्दा प्रत्येकाची करण्याची पध्दत निरनिराळी असते. तसेच बरेचवेळा कोणाची पातळ ,अगदी शेवया तळाला व दुध वर असे होते. तर कधी उकडलेल्या शेवयाच जास्त, दूध कमी.इतके की शेवयाचा शिराच खातोय असे वाटते. पण खीर अशी असावी की, ती जास्त घट्ट नको,जास्त पातळ नको रूबरूबीत असावी. कशी करायची पहा.

साहीत्य :-

* बारीक बिना पाॅलिशच्या शेवया 1/2 वाटी
* दूध 1/2 लिटर
* साखर 1/4 वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* पाणी अर्धी वाटी
* तूप 1टेस्पून
* वेलची पूड
* ड्राय फ्रूट्स ऐच्छीक

कृती :-

प्रथम दूध उकळण्यास एका गॅसवर ठेवून द्या.
तोपर्यंत एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून शेवया चांगल्या तांबूस गुलाबी परतवून घ्या.

नंतर त्यामधे गरम पाणी अर्धी वाटी घाला व शेवया चांगल्या शिजून मऊ होऊ देत.

आता दूध उकळून घट्ट झाले का ते बघा. नसेल तर अजून चांगले उकळून आटू दे.मलईसह राहू दे.मलई काढू नका.

आता हे आटीव दूध आधि शिजवून ठेवलेल्या शेवयांमधे घाला. नंतर शेवयासह पाच मिनिट सर्व उकळू दे.

आता गॅस बंद करून साखर, वेलचीपूड ,ड्रायफ्रूट्स घाला.

खायला देताना वरून लोणकढी तूप टाकून गरम असतानाच द्या. नुसती खा किवा पोळी/पुरी सोबत खा . छानच लागते.

टीप :- घरामधे बरेचवेळा पेढे शिल्लक असतात. असतील तर कोणत्याही खीरीमधे एखादा पेढा चुरडून टाका.अजून छान रुबरुबीतपणा येतो.


पौष्टिक सलाद (Healthy Salad )

No comments :

नेहमीच आहारात कच्या भाज्या, मोड आलेली कडधान्य असावीत असे म्हणतात .पण या धकाधकीत कुठे सगळे रोज करणे व खाणे जमते ? तर हे सर्व  व झटपट कसे करून  पोटात जाईल ते बघा .

साहीत्य :-

* मूग मोड आलेले
* पातीचा कांदा
* कोबी
* टमाटा
* बीट
* एखादी बारीक चिरून हिरवी मिरची
* कोथिबिर
* लिंबू
* मीठ
* चाट मसाला

कृती :-

वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून , बारीक चिरून घ्याव्यात.

एका बाऊलमधे चिरलेले सर्व साहीत्य व मूग घ्या .त्यावर मीठ, लिंबू, चाट मसाला घाला व हलवा.शक्यतो ऐत्यावेळी मीठ लिंबू मसाला घाला.

जेवताना घ्या किवा आधीच जरी भुक लागल्यावर डिश मधे घेऊन खा किवा सकाळच्या नाष्ट्यात घ्या. यावरच संध्याकाळचे वेळी थोडा चिवडा किवा बारीक शेव घालून मुलांना दिले तरी भेळेसारखेपण होते.

भाज्या घरात असतातच .फक्त हिरवे मूग दोन-तीन दिवसातून मोड आणून ठेवा फ्रिजमधे ! केव्हाही खाता येते व पौष्टीक होते.

ज्या काही उपलब्ध असतील त्या भाज्या आपल्या आवडीच्या प्रमाणात घ्या. फक्त घेताना शक्यतो  रोज आलटून पालटून भाज्या घ्या. म्हणजे एक दिवस कोबी तर उद्या त्याजागी काकडी, टोमॅटो आज तर उद्या गाजर, कांदापात/ पालक , लेट्यूस सिमला एकूण काय तर थोडी रंगसंगती व सर्वच आलटून पालटून पोटात जाईल इकडे थोडे लक्ष द्या.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

शाही लाडू (Shahi Laddu)

No comments :

याच्या नावातच शाहीपण असलेने यात सर्व शाहीच  वस्तू वापरल्या आहेत. सामान्यपणे नुसते ड्रायफ्रूट्स काही रोज आपल्या आहारात खाल्ले जात नाहीत. मुलं तर अजिबात खात नाहीत. फक्त बेदाणे मनुके इतकेच वेचून खातात . तर मग काजू, बदाम,अक्रोड,पिस्ते इ.असे सर्वच ड्रायफ्रूट कसे पोटात जातील ? मुलांच्या व आपल्यापण ! तसेच नैवेद्याला व उपवासालापण चालतात. पुढे सांगितल्या प्रमाणे लाडू करून ठेवा. एकदम सोपे व पौष्टीक असेआहेत. रोज एक जरी खाल्ला तरी पुरेसे आहे.

साहीत्य :-

* काजू
* बदाम
* अक्रोड
* पिस्ता सर्व प्रत्येकी एक वाटी
* खारीक पूड 1 वाटी
* काळा अरेबियन खजूर10-15 बिया
* सुके अंजिर 10-15 नग
* बेदाणे 1 वाटी
* मनुका 1 वाटी
* खसखस भाजून 2 टीस्पून
* वेलचीपूड
* जायफळ अर्धे पुड करून
* चांदीचा वर्ख ऐच्छिक

कृती :-

प्रथम सर्व सुकामेवा एका प्लेटमधे वेगवेगळा काढावा .बेदाणे ,मनुक्याच्या असतील तर देठ, खजुराच्या बिया असे सर्व काढून साफ करून घ्या.अंजिराचे तुकडे करा.अक्रोड फोडून घ्या.

आता मिक्सरमधे  आधीकाजू, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची भरड करून घ्या. बाजूला काढून ठेवा.

आता अंजिर,मनुका व बेदाणे मिक्सरमधे घालून वाटा. लगदा तयार होईल.

आता या लगद्यात आधिची भरड व खारिक पावडर मिसळा. खसखस, वेलची,जायफळ पुड घाला व व्यवस्थित हाताने किवा मिक्सरमधेच थोडे फिरवून एकजीव करा. मिश्रण कोरडे वाटले तर थोडे शुध्द तूप घालू शकता.अन्यथा नकोच.

आता तयार मिश्रणाचे लहान-लहान लिंबाच्या आकाराचे लाडू बनवा. शोभेसाठी वरून चांदीचा वर्ख लावा. नाही लावला तरी चालतो.

हवाबंद डब्यात भरून ठेवा.बरेच दिवस टिकतात.

टीप :- सुकामेवा आवडीनुसार कोणताही कमी-अधिक करू शकता. फक्त सुकामेव्याची व खारकेची मिळून भरड, ही तयार लगद्याच्या दुप्पट असावी. तर लाडू वळता येतात.

यामधे आवडत असेल तर डींक पण तुपात तळून घातला तर पौष्टीकपणा अजून वाढतो.

पडवळचे भरीत (Snake Gourd Rayata)

No comments :

पडवळ ही एक वेल वर्गीय फळ भाजी आहे. बहुतेक सर्वांच्या परिचयाची आहे. पडवळ हे ह्रदयासाठी उत्तम टाँनिक आहे. कमी कँलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी सुध्दा खातात. पडवळाची पाने, रस व बियासुध्दा विविध तक्रारीवर उपयुक्त आहेत. सामान्यपणे आपण पडवळाची भाजीच करणे पसंत करतो पण, भरीत म्हणजेच रायते सुध्दा रूचकर लागते. पडवळाचे भरीत हा एक पारंपरिक पदार्थ आहे. कसा केला साहीत्य व कृती :-

साहीत्य :-

* पडवळ पाव किलो
* ताजे दही अर्धी वाटी
* चविनुसार मीठ व साखर
* फोडणीसाठी तेल व फोडणी साहीत्य
* हिरवी मिरची एखादी
* कोथंबिर

कृती :-

सर्वात आधि पडवळ स्वच्छ धुवून, चिरून त्याच्या मधील गर व बिया काढून टाका. (बियांची वेगळी चटणी होउ शकते) मोठे -मोठे एक एक इंचाचे तुकडे करून घ्या.

केलेली तुकडे कुकरमधे वाफवून घ्या. शक्यतो डाळ -भाताच्या कुकर सोबत वेगळ्या डब्यात वाफवले तरी चालते .

वाफवलेले तुकडे थंड झाल्यावर हाताने कुस्करावेत व त्यामधे दही, मीठ, साखर घालावे.

आता कढल्यात तेल गरम करून हींग, जिरे,  मोहरी व थोड़ी हळद घालून फोडणी करा. फोडणीमधेच मिरचीचे तुकडे घाला. फोडणी थंड होऊ दे.

आता थंड झालेली फोडणी तयार भरीतावर घालावी. वरून बारीक चिरलेली कोथंबिर घालून सर्व एकत्रित व्यवस्थित हलवा.

चटकदार तयार भरीत जेवणात डाव्या बाजूला वाढावे. जेवणाची लज्जत वाढवते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

भरली सिमला मिरची (Stuffed Simala )

No comments :

सिमला मिरची सर्वाच्या परीचयाची भाजी आहे. यालाच कोणी ढब्बू मिरची तर कोण ढोबळी मिरची पण म्हणतात. ही मिरची हाताशी असेल तर पट्कन कशातही म्हणजे मसाले भात ,पोहे, इ. मधे घालता येते. एक विशिष्ठ चव असते. ती सर्वानाच आवडते. सिमला मिरचीची तीन-चार प्रकारे भाजी बनविता येते. पण कोणत्याही भाजीचा,'मसाला भरलेला प्रकार सर्वाना जास्तच आवडतो. तर आज, "भरलेली सिमला" करू आपण

साहीत्य :-
* लहान आकाराची सिमला 1/4 किलो
* चणा डाळीचे पीठ पाव वाटी
* सुक खोबरे पाव वाटी
* ओले खोबरे पाव वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी
* भाजलेले तिळ एक टेस्पून
* गोडा मसाला 2 टीस्पून
* लाल मिरची पावडर 2 टीस्पून
* हळद
* मीठ चवीनुसार
* चवीला किचित साखर/गुळ
* फोडणी साहीत्य हिंग,जीरे,मोहरी
* तेल
* कोथिंबीर
* कांदा एक मोठा बारीक चिरून

कृती :

प्रथम मिरची धुवून पुसून अर्धे देठ कापून पोटात उभे चिरून घ्या. आरपार चिरू नका. पोटात मसाला भरता आला पाहीजे.

डाळीचे पीठ किंचित भाजून घ्या.कच्चेपणा जाण्यापुरतेच. सुके खोबरेही थोडे परता. एका डिशमधे काढा.

आता थंड झाल्यावर त्यामधे राहीलेले सर्व साहीत्य दाण्याचे कूट,ओले खोबरे,तिळकूट व मसाला, तिखट, मीठ, साखर सर्व घाला.हाताने नीट एकजीव करा.

नंतर चिरून ठेवलेल्या मिरची मधे मसाला भरून घ्या.

आता तेल गरम करून हिंग मोहरी फोडणी करा. त्यात कांदा गुलाबी परता. त्यावर भरलेल्या मिरच्या घाला व अलगद परता . वर ताटली झाकून त्यात पाणी घाला व वाफेवर शिजवा भाजी .दहा मिनिटात छान वाफ येते व शिजते . मधे एक-दोनदा हलवा. गॅस बंद करा. वरून कोथंबिर घाला.

तयार भाजी ,भाकरी  किवा पोळीसोबत वाढा. अतिशय रूचकर लागते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

डाळ,मेथी वडा (Dal, Methi Vada)

No comments :
संध्याकाळच्या खाण्यासाठी काही चटपटीत व पौष्टिक असे खाण्यास काय करावे असा प्रश्न पडला तर नक्कीच हे वडे करून बघा . करायला सोपे , घरातील सामानातच व थोडीशी पूर्व तयारी केली तर एकदम झटपट होणारे ! घरातली मंडळी पण खुष. कसे करायचे पहा .
साहित्य :-
१) दोन ते तीन तास भिजवलेलि चना डाळ २ वाटी +तूर डाळ १ वाटी
२) धुवून बारीक चिरलेली मेथी एक वाटी
३) कांदा  बारीक चिरून एक नग
४) कसुरी मेथी एक टीस्पून 
५) हिरवी मिरची ,आले ,लसूण पेस्ट
६) मीठ चवीनुसार
७) धना-जीरा पावडर एक टिस्पून
८) हळद ,हिंग
९) तेल टाळण्यासाठी
कृती :-
प्रथम भिजवलेलि चण्याची डाळ पाणी काढून  मिक्सरवर भरड वाटून घ्या
आता वाटलेल्या डाळी मधे वर दिलेले सर्व साहित्य घालावे. हातानेच सर्व मिश्रण नीट एकजीव करा.
आता तयार मिश्रणाचे  लहान- लहान गोळे घ्या व साधारण चपटा आकार द्या व तेलात घाला ,मंद आचेवर खरपूस तळा.
सॉस , हिरवी चटणी सोबत किवा नुसते पण चहा सोबत खाण्यास उत्कृष्ट लागतात . या वड्यांना मेथीचा एक वेगळाच खमंगपणा असतो . तुम्ही पण करून बघा .
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

02 September 2015

फराळी रोल (Fasting Roll)

No comments :

 याचे नांव "फराळी रोल" असे असले तरी हे फक्त उपवास असेल तरच करावे व खावे असे नाही. आपण इतर वेळी सुध्दा करू शकतो .. संध्याकाळचे वेळी खाण्यासाठी किंवा कोणी येणार असेल तर चहा सोबत देण्यासाठी. उपवास आहे म्हणले की नेहमीचीच तीच ती  खिचडी खाउन कंटाळा येतो . काही नवीन चटपटीत बरे वाटते जिभेला . तर असे हे खमंग व झट्पट रोल कसे करायचे बघू !

साहित्य :-

१ ) कच्चे बटाटे साल काढून किसून  २ नग
२ ) राजगिरा पीठ ४ टेस्पून
३ ) शिंगाडा पीठ २ टेस्पून
४ ) भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २ टेस्पून
५ ) मीठ व लाल तिखट / ही. मिरची चवीनुसार ६ ) जिर पूड १ टिस्पून
७ ) तेल तळणी साठी

कृति 
      प्रथम किसलेला बटाटा एका  बाऊल मधे घ्यावा .

नंतर त्या मधे वरील सर्व साहित्य घालावे व हाताने नीट एकजीव करावे . दहा मि. ठेवा ..

आत मिश्रणाचे लहान लहान गोळे घ्यावेत व हाताने त्याचे साधारण लांबट गोल रोल तयार करून राजगिरा पिठात घोळवा .

नंतर गरम तेलात तांबूस रंगावर तळून टीश्यु पेपर वर काढा .

हिरव्या चटणी सोबत किंवा दह्यात थोडे शेंगदाण्याचे कूट ,लाल तिखट व मीठ घालून एकत्र करा . उपवासाची चटणी तयार करा . रोल सोबत द्या .
आणी  जर उपवास नसेल तर टोमॅटो सॉस पण देऊ शकतो .

टिप्स :- बटाट्याच्या ऐवजी साबूदाणा जर भिजलेला तयार असेल तरी तोही वापरू शकतो .