22 December 2017

मिक्स डाळ पकोडे (Mix Dal Pakoda)

No comments :

पाऊस असो किंवा थंडी, गार वातावरण असेल तर चहासोबत कांही चटपटीत खायला हवेच. तसेही चटपटीत खायला कोणाला नाही आवडत?  तर आवडीनुसार सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेऊन मस्त डाळ पकोडे केले. पौष्टीक व चटपटीतही होते. एकदम सोपे आहेत. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* चणाडाळ १ वाटी
* छिलका मुगडाळ १/२ वाटी
* मसूरडाळ १/४ वाटी
* तूरडाळ १/४ वाटी
* उडीदडाळ मूठभर
* कांदा १ चिरून
* हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
* कोथिंबीर
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* हळद, तिखट, मीठ
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम सर्व डाळी धुवून २-३ तास पाण्यात भिजत घालाव्यात. नंतर पाणी निथळून काढून टाकावे व भरड वाटून घ्याव्यात.

आता वाटलेल्या डाळीमधे दिलेला सर्व मसाला व  कांदा, कोथिंबीर घालून एकत्र मिश्रण करावे. पाणी अजिबात घालू नये. धट्टच ठेवावे.

आता तेल गरम करून हातानेच लहान-लहान गोळे तेलात सोङावेत व मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळावे.

तयार मस्त गरमा-गरम कुरकुरीत "डाळ पकोडे " चहासोबत किंवा साँस बरोबर खायला द्या.

टिप :
यामधे आवडीनुसार पालक, मेथी चिरून घातले तर अधिक रूचकर लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

15 December 2017

चिंच गुळाची आमटी ( Chinch Gulachi Aamti)

1 comment :

तूर डाळीची चिंच गुळाची आमटी खास करून महाराष्ट्रीयन ब्राम्हण समाजात केली जाते . रोजच्या जेवणात भातासोबत वरण,आमटी, कढी,सार, किंवा पालक, मेथीची पातळ भाजी असे कांही ना कांही पातळ पदार्थ असतोच. यापैकीच हा एक प्रकार. पावसाळ्यात किंवा थंडीमधे गरमा-गरम मोकळा भात, आमटी, वर तुपाची धार  व सोबत पापड आणि लोणच्याची फोड अहाहा.. अप्रतिम लागते. या आमटीचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तूर डाळ १ वाटी
* मेथी दाणे ७-८
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची पावडर एक टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* गूळ सुपारी एवढा खडा
* मीठ चवीनुसार
* कढीपत्ता, कोथंबिर, ओले खोबरे
* फोडणीसाठी मोहरी, हींग, हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.नंतर डाळीत चिमूटभर हळद, हिंग, मेथी दाणे व शिजण्यापुरते पाणी घालावे आणि कुकरला मऊ शिजवावी.

आता एका पातेल्यात तेल घालून हींग, मोहरी, हळद व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यात एक वाटीभर पाणी घालावे. म्हणजे फोडणी जळत नाही. आता त्यात एक एक साहित्य म्हणजे मसाला, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचाकोळ घालावे. शेवटी शिजलेली डाळ थोडे पाणी घालून, पळीने घोटून एकजीव करावी व फोडणी मधे घालावी. आपल्या आवडीनुसार घट्ट, पातळ करण्यास पाणी घालावे. चांगली उकळावी. म्हणजे सर्व मसाल्यांचे स्वाद उमटतात.

उकळताना थोडे खोबरं, कोथंबिर घालावे व राहीलेले शेवटी वरून सजावटीसाठी घालावे. जेवणात गरमा-गरम भातासोबत वाढावी.

टीप्स :
* आमटीची डाळ चांगली मऊ मेणासारखी शिजवावी. आमटी एकसंध होते.
* डाळीमधे मेथी दाणे शिजवतानाच घालावे. आमटीला जास्त खमंग चव लागते.
* चिंचेऐवजी ४ आमसुले घातली तरी चालते.
* महत्वाचे म्हणजे आमटी नेहमी गरमच वाढावी.
* या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात.

06 December 2017

स्वयंपाकघरातील युक्ति

No comments :

भाजलेले शेंगदाणे पट्कन सोलायचे असतील तर, एका कापडी पिशवीत घालून घट्ट बांधून जमीनीवर हळू-हळू आपटावेत. एकदम सोलले जातात. नंतर पाखडावेत. 

04 December 2017

लाल मिरचीचा ठेचा (Red Chilli Chuttney)

No comments :

लाल मिरचीचा ठेचा हा झणझणीत व खमंग चटणीचा प्रकार आहे. हा फक्त ठराविक सिझनमधे म्हणजे साधारण नोवेंबर -डिसेंबर मधेच करता येतो. कारण याला झाडावरच पिकलेली मऊ म्हणजे गाभुळलेली अशी मिरची लागते. तरच हा ठेचा हवा तसा ओलसर, रसरशीत होतो. नाहीतर वाळका, चामट होतो. हा गावरान मेवा माझ्याकडे नुकताच गावाकडून आला. अन्यथा मुंबईच्या मंडईत अशा मिरच्या मिळत नाहीत. भाजीवाल्यांकडे शिळ्या होऊन पिकलेल्या वाळक्या लाल मिरच्या असतात. याचा ठेचा होतो पण हवा तसा नाही होत. हा ठेचा वर्षभर टिकतो. नंतर पाहिजे तेव्हा गरजे नुसार थोडा थोडा बाऊलमधे काढायचा व मस्त हिंग-मोहरीची ताजी फोडणी देऊन जेवणात घ्यायचा. खूपच चवदार लागतो. बरेचवेळा यात लसूणही घातला जातो. परंतु आमच्याकडे हिंग, मेथी मोहरीची फोडणी घातलेलाच आवडतो. व टिकण्याच्या दृष्टीतून पण विना लसणाचाच ठिक.  त्यातून कधी लसूण वाला खायची इच्छा झालीच तर बाऊलमधे काढून फोडणी देताना लसूण घालावा. पण जास्तीच्या सर्व ठेच्यात नकोच. तर अशा हा चटकदार ठेचा कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ओली लाल मिरची १/२ किलो
*  मीठ ६ टीस्पून
* लिंबू रस मोठ्या ४ लिंबाचा
* मेथी दाणे १ टीस्पून
* तेल फोडणीसाठी २ टेस्पून
* मोहरी, हिंग, हळद

कृती :-
प्रथम मिरच्या स्वच्छ थुवून पुसून कोरड्या कराव्यात.

नंतर त्यांची देठ काढावीत.

आता देख काढलेेली मिरची, मीठ मिक्सरमधे भरडच वाटावे.

नंतर त्यामधे मेथी तेलात लालसर तळून केलेली पूड व लिंबूरस घालून एकत्र करावे..

स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवावा. त्यातील थोडासा बाऊलमधे काढून घ्यावा . हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी.. गार झाल्यावर ठेच्याावर घालून जेवणात भाकरी, पोळीसोबत खावा. अतिशय रूचकर लागतो. भरल्या वांग्याची भाजी, ठेचा, कांदा, घट्ट दही व सोबत भाकरी.. अहाहा अप्रतिम चव लागते. तसेच एरव्ही थालीपीठ, पराठ्यासोबतही खाल्ला तरी चालते.

टिप: ठेचा गुळगूळीत मऊ अजिबात वाटू नये. भरडच ठेवावा. मधे मधे मिरचीचे बी दिसावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.