लाल मिरचीचा ठेचा हा झणझणीत व खमंग चटणीचा प्रकार आहे. हा फक्त ठराविक सिझनमधे म्हणजे साधारण नोवेंबर -डिसेंबर मधेच करता येतो. कारण याला झाडावरच पिकलेली मऊ म्हणजे गाभुळलेली अशी मिरची लागते. तरच हा ठेचा हवा तसा ओलसर, रसरशीत होतो. नाहीतर वाळका, चामट होतो. हा गावरान मेवा माझ्याकडे नुकताच गावाकडून आला. अन्यथा मुंबईच्या मंडईत अशा मिरच्या मिळत नाहीत. भाजीवाल्यांकडे शिळ्या होऊन पिकलेल्या वाळक्या लाल मिरच्या असतात. याचा ठेचा होतो पण हवा तसा नाही होत. हा ठेचा वर्षभर टिकतो. नंतर पाहिजे तेव्हा गरजे नुसार थोडा थोडा बाऊलमधे काढायचा व मस्त हिंग-मोहरीची ताजी फोडणी देऊन जेवणात घ्यायचा. खूपच चवदार लागतो. बरेचवेळा यात लसूणही घातला जातो. परंतु आमच्याकडे हिंग, मेथी मोहरीची फोडणी घातलेलाच आवडतो. व टिकण्याच्या दृष्टीतून पण विना लसणाचाच ठिक. त्यातून कधी लसूण वाला खायची इच्छा झालीच तर बाऊलमधे काढून फोडणी देताना लसूण घालावा. पण जास्तीच्या सर्व ठेच्यात नकोच. तर अशा हा चटकदार ठेचा कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ओली लाल मिरची १/२ किलो
* मीठ ६ टीस्पून
* लिंबू रस मोठ्या ४ लिंबाचा
* मेथी दाणे १ टीस्पून
* तेल फोडणीसाठी २ टेस्पून
* मोहरी, हिंग, हळद
कृती :-
प्रथम मिरच्या स्वच्छ थुवून पुसून कोरड्या कराव्यात.
नंतर त्यांची देठ काढावीत.
आता देख काढलेेली मिरची, मीठ मिक्सरमधे भरडच वाटावे.
नंतर त्यामधे मेथी तेलात लालसर तळून केलेली पूड व लिंबूरस घालून एकत्र करावे..
स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवावा. त्यातील थोडासा बाऊलमधे काढून घ्यावा . हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी.. गार झाल्यावर ठेच्याावर घालून जेवणात भाकरी, पोळीसोबत खावा. अतिशय रूचकर लागतो. भरल्या वांग्याची भाजी, ठेचा, कांदा, घट्ट दही व सोबत भाकरी.. अहाहा अप्रतिम चव लागते. तसेच एरव्ही थालीपीठ, पराठ्यासोबतही खाल्ला तरी चालते.
टिप: ठेचा गुळगूळीत मऊ अजिबात वाटू नये. भरडच ठेवावा. मधे मधे मिरचीचे बी दिसावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment