15 December 2017

चिंच गुळाची आमटी ( Chinch Gulachi Aamti)

1 comment :

तूर डाळीची चिंच गुळाची आमटी खास करून महाराष्ट्रीयन ब्राम्हण समाजात केली जाते . रोजच्या जेवणात भातासोबत वरण,आमटी, कढी,सार, किंवा पालक, मेथीची पातळ भाजी असे कांही ना कांही पातळ पदार्थ असतोच. यापैकीच हा एक प्रकार. पावसाळ्यात किंवा थंडीमधे गरमा-गरम मोकळा भात, आमटी, वर तुपाची धार  व सोबत पापड आणि लोणच्याची फोड अहाहा.. अप्रतिम लागते. या आमटीचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तूर डाळ १ वाटी
* मेथी दाणे ७-८
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची पावडर एक टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* गूळ सुपारी एवढा खडा
* मीठ चवीनुसार
* कढीपत्ता, कोथंबिर, ओले खोबरे
* फोडणीसाठी मोहरी, हींग, हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.नंतर डाळीत चिमूटभर हळद, हिंग, मेथी दाणे व शिजण्यापुरते पाणी घालावे आणि कुकरला मऊ शिजवावी.

आता एका पातेल्यात तेल घालून हींग, मोहरी, हळद व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यात एक वाटीभर पाणी घालावे. म्हणजे फोडणी जळत नाही. आता त्यात एक एक साहित्य म्हणजे मसाला, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचाकोळ घालावे. शेवटी शिजलेली डाळ थोडे पाणी घालून, पळीने घोटून एकजीव करावी व फोडणी मधे घालावी. आपल्या आवडीनुसार घट्ट, पातळ करण्यास पाणी घालावे. चांगली उकळावी. म्हणजे सर्व मसाल्यांचे स्वाद उमटतात.

उकळताना थोडे खोबरं, कोथंबिर घालावे व राहीलेले शेवटी वरून सजावटीसाठी घालावे. जेवणात गरमा-गरम भातासोबत वाढावी.

टीप्स :
* आमटीची डाळ चांगली मऊ मेणासारखी शिजवावी. आमटी एकसंध होते.
* डाळीमधे मेथी दाणे शिजवतानाच घालावे. आमटीला जास्त खमंग चव लागते.
* चिंचेऐवजी ४ आमसुले घातली तरी चालते.
* महत्वाचे म्हणजे आमटी नेहमी गरमच वाढावी.
* या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात.

1 comment :

  1. Hi.. I am new to your blog. This is the first recipe I tried n it turned out very tasty. Thanks for all the tips n tricks
    -- Sanjivani

    ReplyDelete