Showing posts with label Traditional. Show all posts
Showing posts with label Traditional. Show all posts

15 June 2020

उकडपेंडी (Ukadpendi)

No comments :



उकडपेंडी हा जुनाच, पारंपरिक न्याहरीचा पदार्थ आहे. काळाच्या ओघात मागे पडलाय. परंतु आमच्या कडे वरचेवर होतो व सर्व आवडीने खातातही. आजकाल पोहे, इडली, डोसे, वडा अशा पदार्थांची चलती असल्याने बर्याचजणाना माहीतही नाही. तर उकडपेंडी गव्हाच्या पीठाची, ज्वारी, नाचणी, तांदूळ, भाजणीच्या पीठाची केली जाते. आवडीनुसार व उपलब्धतेनुसार कोणतेही पीठ घ्यावे. मी ज्वारीचे घेतले. आता कशी करायची ते पाहू.

साहित्य :-
• ज्वारीचे पीठ २ वाट्या
• आंबट दही/ताक १ वाटी
• पाणी १ वाटी
•  कांदा बारीक चिरुन १
•  हिरवी मिरची, आलं पेस्ट १ टीस्पून
•  कढीपत्ता
•  मीठ चवीनुसार
•  तेल पाव वाटी
•  हिंग, जीरे, मोहरी
•  हळद, लाल तिखट
•  कोथंबीर

कृती :-
प्रथम ज्वारीचे पीठ मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे व एका थाळीत काढून ठेवावे.

आता त्याच कढईत तेल तापवून मोहरी,जीरे, हिंग घालून मस्त खमंग फोडणी करावी. फोडणीत कांदा, कढीपत्ता, आलं, मिरची पेस्ट घालून परतावे.

आता फोडणीमधे भाजून ठेललेले पीठ घालावे. तिखट, मीठ, हळद ही घालून, घ्यावे. ऩंतर हळू हळू हलवत दही व गरम पाणी घालावे. गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने सर्व जिन्नस एकत्र करावे . पांच मिनीटे मंद आचेवर वाफ येण्यास ठेवा.

पाच मिनीटात वाफ आल्यावर गरमागरम 'उकडपेंडी' डिशमधे खायला घ्यावी. वरून कोथंबीर घालावी. बरेचवेळा आवडीने वरून कच्चे तेलही घातले जाते.

सकाळच्या नाष्ट्याला अशी मस्त, खमंग गरमागरम उकडपेंडी खाल्ली की आत्मा तृप्त  होतो. अन् वरून पौष्टिक हं!  तर चला उद्या नाष्ट्याला तुम्हीही आवडीच्या पीठाची उकडपेंडीच करा. व कशी झाली ते सांगायला  विसरू नका.

टीप: उकडपेंडी ला तेल मात्र जरा सढळ हातानेच लागते बरं का! कंजूषी नको. नाहीतर उकडपेंडी चिकट होते व खाण्यातली मजाच जाते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

11 April 2020

प्रेशर कुकरमध्ये सुरळीच्या वड्या /खांडवी ( Surali vadi /Khandavi in Pressure Cooker)

No comments :
कुकरमध्ये सुरळीच्या वड्या / खांडवी (Surali vadi/ Khandavi)
                       

सुरळीच्या वडीला गुजराती बांधव खांडवी म्हणतात. करायला सोपा व खमंग चवीचा पदार्थ असल्याने सर्वजण करतात. बाहेर दुकानातून पण खांडवी, पात्रा ( अळूवडी)  असे पदार्थ विक्रीलाही असतात. परंतु आपल्या चवीचे,शुध्द ,कमी खर्चात व जास्त होणारे पदार्थ आपण घरीच केले तर?  तर अशीच 'सुरळीची वडी' घरी कशी करायची साहित्य व कृती पहा 👇👇

साहित्य :-
• चणा डाळीचे मऊ पीठ  - १ कप
• आंबट ताक/ पातळसर दही - १ कप
•  पाणी - २ कप
•  हळद- पाव टीस्पून
•  मीठ चवीनुसार
•  आल-हिरवी मिरची पेस्ट - १ टीस्पून
•  ओलं खोबरं, कोथिंबीर
•  हिंग, मोहरीची दोन टेस्पून फोडणी

कृती :-
प्रथम मऊ दळलेले बेसन पीठ एका बाऊलमधे घ्यावे, त्यामधे हळद, मीठ, आलं-मिरची पेस्ट घालून एकत्र करावे.

अाता त्यामधे दही व पाणी थोडे -थोडे घालत गुठळ्या न होऊ देता पातळ मिश्रण तयार करावे.

नंतर तयार मिश्रण गाळणीतून गाळून घ्यावे, म्हणजे आलं- मिरची पेस्टचे धागे रहात नाहीत व मिश्रण एकसंध होते.

आता गाळलेले मिश्रण कुकरच्या मोठ्या डब्यात किंवा पातेलीत घालून कुकरमध्ये ठेवून शिजायला ठेवावे. आपल्या घरच्या कुकरमध्ये रोजचा डाळ-भात शिजवताना जितका वेळ लागतो किंवा शिट्ट्या काढतो, तितक्याच शिट्ट्या काढाव्यात. प्रत्येक कुकरचा आकार, गँस वेग वेगळे असते म्हणून शिट्ट्या किंवा वेळ लिहीले नाही.

कुकर झाल्यानंतर ,वाफ गेल्यावर  मिश्रण कुकरमधून बाहेर काढावे व परत एकदा चांगले घोटावे व कलथ्याने पटापट स्टीलच्या ताटाला आतल्या व बाहेरच्या दोन्ही बाजूने पसरवून घ्यावे. ही कृती थोडी फास्ट करावी लागते कारण शिजवलेले मिश्रण जसे गार होईल तसे घट्ट व्हायला लागते व घट्ट मिश्रण पसरवता येत नाही.

                     

आता सर्वात शेवटी ताटाला पसरवलेल्या मिश्रणावर आवडीनुसार खोबरे,कोथिंबीर व थोडीशी फोडणीही घालावी .सुरीने उभ्या रेषा   माराव्यात व अलगद हाताने एक -एक पट्टीची सुरळी करून एका प्लेटमध्ये ठेवावी.
                   

नंतर सजावटीसाठी वरूनही थोडी फोडणी व खोबरे कोथिंबीर घालून खायला द्यावे.

टिप्स :
• डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले असावे.
• दही किंवा ताक किंचित आंबटसर असावे परंतु जुने,वास येणारे नसावे.वडीची चव बिघडू शकते.
• सुरळीच्या आतल्या बाजूला फोडणी पसरवताना अगदी कमी घालावी किंवा त्यातली मोहरी मोहरीच जास्त घालावी. तेलामुळे सुरळी सुटते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

08 January 2020

नायलाँन ढोकळा (Dhokala)

No comments :

ढोकळा हा एक  गुजराथी नाष्ट्याचा पदार्थ आहे. सर्वानाच खूप आवडतो. तसे पाहिले तर करायला एकदम सोपा... पण परफेक्ट मार्केट सारखा मुलायम,जाळीदार स्पाँंजी ढोकळा बनवायचा तर अचूक प्रमाणात साहित्य व योग्य कृती हवी.नाहीतर कधी मोकळे पिठले तर कधी बेसनाचे गोटे बनतात. म्हणून पुढील पध्दतीने ढोकळा करून बघा. अतिशय मऊ लुसलुशीत, जाळीदार ढोकळा होतो.
साहित्य :-
• बेसन पीठ - २०० ग्रँम(२कप)
•पाणी - १ १/४ कप
•तेल- ३ टे स्पून 
•मीठ -१ टीस्पून
•साखर - ३ टेबल स्पून
•सायट्रीक एसिड - १ टीस्पून
•सोडा -१/२ टीस्पून
•इनो फ्रूटसाँल्ट (निळे रेग्यूलर पॅकेट)-१/२ टीस्पून
•आलं- हिरवी मिरची पेस्ट १टेस्पून
•पिवळा खाद्यरंग /हळद पाव 

फोडणीसाठी साहित्य :-
* तेल - २ टेस्पून
• मोहरी - २ टीस्पून
• तिळ - १ टीस्पून
• कढीपत्ता पाने - १०ते१५
• हिरवी मिरची (उभे काप करून)- २-३
• हिंग पाव टीस्पून
• खोबरे ,कोथंबीर सजावटीसाठी
• साखर -३ टीस्पून
• पाणी -पाउण ते एक कप

कृती :-
प्रथम एका मोठ्या बाऊलमधे पाणी घ्यावे. त्यामध्ये सायट्रीक एसिड,साखर, आलं-मिरची पेस्ट व तेल घालून साखर विरघळेपर्यंत ढवळावे.

आता दुसर्‍या बाऊलमधे चाळलेले बेसनपीठ घेऊन त्यामधे मीठ,पिवळा रंग घालून एकत्र करून घ्यावे.

आता आधी तयार केलेल्या पाण्यामधे हे पीठ थोडे थोडे मिसळावे. गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेऊन बँटर तयार करावे.

नंतर गॅसवर जड पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवून, तयार बँटरमधे सोडा व इनो मिसळावे. पट्कन एकत्र करून तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात घालून १५-२० मिनिट वाफवून घ्यावे.

शेवटी फोडणी तयार करावी व त्यामध्ये पाणी व साखर घालून साखर विरघळवून घ्यावी. फोडणी थोडी कोमट असतानाच गार झालेल्या ढोकळ्यावर घालावी व खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

टिप :
• बेसन पीठ एकदम मऊ, मार्केटमध्ये मिळणारे तयार वापरावे.

• ढोकळा वाफण्यासाठी गॅसवर ठेवलेले पाणी उकळायला लागल्यावरच बँटरमधे सोडा व इनो मिसळावे व लगेच वाफण्यासाठी ठेवावे. फक्त सोडा घेणार असाल तर एक टी स्पून घ्यावा.

• ढोकळा तास ते दोन तास पूर्णपणे गार झाल्यावरच कापावा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

25 July 2019

कटाची आमटी (Katachi Aamti)

1 comment :
इस कटाची आमटी हा आमटीचा पारंपारिक प्रकार आहे. पुरणपोळीचे जेवण म्हणजे सोबत कटाची आमटी पाहीजेच.या आमटीला निरनिराळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. कुठे येळवणीची आमटी..  तर कुठे सार! तसेच करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या असतात. पण पदार्थ एकच असतो.  हरभर्याची डाळ शिजवताना मधे मधे वरचे पाणी काढले जाते व त्या पाण्याची आमटी केली जाते ती कटाची आमटी होय.आजकाल डाळ कुकरमधे डाळ शिजवली जाते. म्हणून डाळीत जास्त, म्हणजे डाळीच्या चौपट पाणी घालतात व गाळून कट काढला जातो. तर अशा आमटीसाठी लागणारे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* डाळीचा काढलेला कट ५ वाट्या
* सुके खोबरे एक लहान वाटी, ५० ग्रँम
* लिंबाएवढ्या चिंचेचा काढलेला कोळ
* गूळ लिंबाएवढा
* गरम मसाला १ टीस्पून
* गोडा मसाला २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* फोडणीसाठी तेल एक पळीभर
* हींग, मोहरी, जीरे, कढीपत्ता
* कोथिंबीर

कृती :-
प्रथम सुक्या खोबर्याची वाटी डायरेक्ट गँसवर जाळामधे खरपूस भाजून घ्यावी.

आता भाजलेले खोबरे, जीरे, थोडा कढीपत्ता भाजून, कोथिंबीर सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे.

आता तेल गरम करून त्यामधे जीरे, मोहरी हींग तडतडवून घ्यावेत. त्यामधे कढीपत्ता, हळद, हींग घालावे व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतल्यावर त्यामधे लाल मिरचीपूड, गरम मसाला, गोडामसाला घालून परतावे.

सर्वात शेवटी डाळीचा कट, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून आमटी ५ मिनिट चांगली उकळू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.

अशी ही खमंग कटाची आमटी मोकळ्या भातासोबत खूप छान लागते. तसेच पुरणपोळी खाताना मधे-मधे भुरकायलाही मस्त लागते. बरेचजण आमटीत पोळी बुडवूनही खातात.  कशीही खा पण पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहीजेच.

टिप्स :
* बरेचवेळा आमटीला कट कमी निघतो अशा वेळी थोडी शिजलेली डाळ घोटून घालावी.
* या आमटीला मसाला वाटताना खोबर्यासोबत हिरवी मिरची,आले, लसूण, कोथिंबीर व जाळावर खोबर्याप्रमाणे आख्खा कांदा भाजून घातला तरी चालतो.छान वेगळी चव येते. परंतु मी देवाला नैवेद्य असल्याने कांदा लसूण नाही घातले.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

26 December 2018

मोरावळा (Amla Murabba)

No comments :

मोठा आवळा! यालाच डोंगरी आवळा असेही म्हणतात.औषधी व अतिशय गुणकारी असा हा आवळा,दिवाळी नंतर साधारण तुळशीच्या लग्नापासून बाजारात यायला लागतो. ते डिसेंबर पर्यंत असतो.डिसेंबर मधे एकदम परिपक्व म्हणजे वर्षाचे लोणचे,सुपारी,मोरावळा करण्यास योग्य असे आवळे असतात. आयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.आवळ्यामधे लोह व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.कोणत्याही रुपात आवळा खाल्ला तर तो आरोग्यदायी आहे.परंतु वर्षभर मिळत नसल्याने वेगवेगळ्या स्वरूपात साठविला जातो.आवळा खाल्याने दृष्टि तेज होते. पित्त, कफ कमी होते. त्वचेला चमक येते व त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच ह्रदयासाठी पण आवळा उत्तम आहे. रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. आवळ्यापासून बरेच पदार्थ करून वर्षभरासाठी साठविले जातात. जसे की, सुपारी,आवळा कँडी, लोणचे, सरबत, मुरांबा. केस काळेभोर रहाण्यासाठी केसांनाही लावण्यासाठी आवळा सुकवून पावडर करून ठेवली जाते. अशा बहूगुणी आवळ्याचा 'मुरंबा' म्हणजेच 'मोरावळा' कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* आवळे १/२ किलो
* साखर १/२ किलो
* वेलचीपूड ऐच्छीक
* सुंठ पावडर ऐच्छीक
* सैंधव मीठ चिमूटभर

कृती :-
मोरावळ्यासाठी आवळे घेताना साधारण तांबूस छटा असलेले, न डागाळलेले चांगले कडक व ताजे आवळे निवडून, वेचून घ्यावेत. असे आवळे चांगले रसाळ व आंबट -तुरट चवीचे असतात.

प्रथम बाजारातून आणलेले निवडक आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.

नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला *आतपर्यंत टोचून भोके पाडावीत.

आता टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच मिनीट उकळून द्यावे. आवळे पांढरट दिसू लागतात.*आता पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच साखर मिसळून घ्यावी.*एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी साखर विरघळून पाणी सुटलेले असेल तर आता मंद गँसवर पातेले ठेवावे.(वेगळे पाणी घालू नये) सतत ढवळत रहावे. साखरेचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील तर आताच वेलची पूड, मीठ घालावे व गँस बंद करावा. साधारणपणे अर्धा तास तरी लागतो. पाक मधासारखा असावा. अति घट्ट किंवा पातळ नको.

गार झाल्यावर मोरावळा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. तीन- चार दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य आंबट -गोड - तुरट चवीचा होतो. पाक आतपर्यंत मुरला जातो. हा मोरावळा फ्रिजशिवाय बर्षभर टिकतो.

असा मुरलेला एक आवळा रोज सकाळी अनशापोटी खाल्ला व वरून कोमट पाणी प्याले तर अतिशय आरोग्यदायी असते. ज्यांना पित्त किंवा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो त्यानी आवर्जून हा उपाय करावा.

टिप्स :
* जर वेळ नसेल तर साखर मिसळून एक रात्र न ठेवता, साखरेचा दोनतारी पाक करून त्यामधे उकडलेले आवळे घालावे. परंतु या पध्दतीत पाण्याचा वापर असल्याने मोरावळा जास्त कालावधीपर्यत टिकण्यात साशंकता निर्माण होते.
* आवळे आतपर्यंत नीट टोचून घ्यावेत.पाक चांगला मुरतो.
* आवळे उकडलेले पाणी टाकून न देता, त्यात मीठ, साखर घालून सरबत करून प्यावे. अथवा आमटी, भाजी, पराठे करताना वापरावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

24 July 2018

सांजोरी (Sanjori)

1 comment :

'सांजोरी' यालाच सारनोरी, साठोरी असेही म्हणतात.हा पारंपारिक व पौष्टीक पदार्थ आहे. गणेश चतुर्थी मधे गणपतीच्या,महालक्ष्मीच्या नैवेद्याला, दिवाळीच्या लक्ष्मीपुजना दिवशी नैवेद्याला केला जातो.तसेच मुलांना मधल्या वेळचे खाणे, शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात न्यायला सोयीचा प्रकार आहे.तीन-चार दिवस सहज टिकतो.घरात नेहमी उपलब्ध असणार्या साहित्यात होतो.साहित्य व कृती 👇

साहित्य :-
वरील पारीसाठी
* बारीक रवा १ कप
* मैदा २ टेस्पून
* तेल २ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* चिमुटभर साखर
* पाणी गरजेनुसार
आतील सारणासाठी
* बारीक रवा १/२ कप
* पीठीसाखर १/२ कप
* तूप २ टेस्पून
* मिल्क पावडर १/४ कप ( ऐच्छीक)
* खसखस १ टीस्पून
* वेलची पूड
*  पाणी गरजेनुसार
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम रवा,मैदा मीठ,साखर घालून एकत्र करून घ्यावे. नंतर तेल गरम करून त्यामधे घालून हाताने चोळून घ्यावे.आता गरजे इतकेच थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळावे.जास्त सैल नको व अती घट्टही नको.मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे.

आता सारण तयार करावे. पँनमधे घेतलेल्या एकूण तूपामधले १ टेस्पून तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.भाजून ताटलीत काढून त्यावर थोडे पाणी शिंपडावे व पांच मिनिट झाकावे. पांच मिनिटानंतर कोमट असतानाच पीठीसाखर,वेलची पूड घालून सारण हाताने एकजीव करावे. आत्ताच सारणात शिल्लक १ चमचा तूप व मिल्क पावडरही घालून मळावे.सारण फार कोरडे वाटले तर किंचित पाण्याचा हात घेऊन मळावे.मिश्रणाचे मुठीत दाबले तर लाडू व्हावेत इतपत ओलसर असावे. आता सारणाचेे हलक्या हाताने साधारण लाडू करून घ्यावे. दाबून फार घट्ट लाडू करू नये.

नंतर आधीच मुरून तयार असलेले पीठ परत एकदा मळून घ्यावे अथवा कुटून घ्यावे. मिक्सर मध्ये थोडे-थोडे घेऊन फिरवून काढावे. या पीठाच्या थोड्या लहान आकाराच्या म्हणजे सारणाचेे लाडू केलेत त्या आकाराचे समान गोळे करून घ्यावेत व एकेक गोळी घेऊन त्यामधे सारणाचा लाडू भरून व्यवस्थित बंद करावे. हलक्या हाताने फार पातळ नाही अशी किंचित जाडसर मोठी पुरी लाटावी व अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावी.तळताना सारखी उलटवू नये.अलगद तळावी,जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्यावी.

थंड झाल्यावर अतिशय खुसखूषीत खमंग अशी सांजोरी खायला उत्तम लागते. बाजारी पदार्थ आणण्यापेक्षा घरीच असा एखादा सहज सोपा पौष्टीक पदार्थ मुलांना खायला करून ठेवावा.

वर दिलेल्या साहित्या मधे फोटोतल्या आकाराच्या ८ साठोऱ्या होतात.

टिप्स :-
* सारण तयार करताना किंवा पारीसाठी कणिक मळताना पाण्याचाच वापर करावा,दूध नको. दूधामुळे नंतर वास येण्याची शक्यता असते.

* सारणामधे भाजलेला खवा अथवा शिल्लक पेढा घातला तरी चालते.

* सांजोरी तूपावर शॅलोफ्राय केली तरी चालते.  तसेच आधी तव्यावर थोडी भाजून नंतर तेलात तळल्यास तेल कमी लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

21 April 2018

ढोकळा प्रीमिक्स (Dhokla Premix)

No comments :

सकाळच्या घाईमधे रोज नाष्टा काय करावा हा प्रश्न नेहमीच पडतो.  बरं, नाष्टा पौष्टीक हवे,  झटपट होणारा हवे व सर्वाना आवडणारा पाहीजे. तर या सर्व मापात बसणारा ढोकळा हा उत्तम पदार्थ आहे. याचे प्रीमिक्स तयार करून ठेवले तर सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत आपण पट्कन ढोकळा बनवू शकतो.तसैच मुलांना डब्यात ही देता येतो. तर प्रीमिक्स कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तांदुळ १ कप
* चणा डाळ १/२ कप
* उडीद डाळ १/४ कप
* साखर १/ ४ कप
* मीठ १ टेस्पून
* सोडा १ टेस्पून
* सायट्रीक अँसिड १ टेस्पून

ढोकळ्यासाठी साहित्य
* प्रीमिक्स १ कप
* पाणी १ कप
* चिमुटभर हळद
* हिरवी मिरची,आलं पेस्ट १ टीस्पून
* फोडणीसाठी तेल,हिंग,मोहरी,तिळ, कङीपत्ता
* सजावटीसाठी कोथिंबीर

कृती :-
प्रथम तांदुळ व दोन्ही डाळी एकत्र करून मिक्सरमधे पावडर करून घ्यावे.

नंतर मीठ, साखर, सोडा व सायट्रीक अँसिड एकत्र करून मिक्सरमधे पावडर करा.

आता वरील दोन्ही पावडरी एकत्र करून हलकेच एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

तयार झालेले प्रीमिक्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे.  एक महीन्यापर्यंत टिकते.  गरजेनुसार प्रीमिक्स घेऊन ढोकळा बनवावा.

प्रीमिक्स ढोकळा कृती :-
प्रथम ढोकळा कुकरमधे तळाशी गरजेइतके पाणी घालून गरम करण्यास ठेवावे.  ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.

आता प्रीमिक्स एका बाऊलमधे घेऊन त्यामधे हळद व मिरची, आलं पेस्ट घालावी व गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेत पाणी घालून ढवळावे.  तयार मिश्रण झटपट ढोकळा पात्रात ओतून, ढोकळा स्टँड कुकरमधे ठेवावे. पंधरा मिनिट वाफवावे.

आता ढोकळा वाफेपर्यंत फोडणी तयार करून ठेवावी.  ढोकळा वाफून तयार झाला की, थोडा थंड झाल्यावर एका थाळीत काढावा, त्यावर फोडणी चमच्याने पसररावी व वरून कोथिंबीर घालून कापून ढोकळा चटणीसोबत खायला द्या.

टिप्स :
* प्रेशर कुकर मधे करणार असाल तर रींग व शिट्टी काढावी.
* डाळी व सोडा, साखर वगेरे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळेच बारीक करावे, अन्यथा पीठात गुठळ्या होऊ शकतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

17 March 2018

साखर माळ/गाठी (Sakhar Maal/ Gathi)

No comments :

गुढीपाढवा एक पारंपरिक मराठी सण व साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त. मोठ्या थाटा-माटाने साजरा केला जातो. गोडाचा नैवेद्य, गुढी सजविण्यासाठी साठी रेशमी वस्त्र, कलश, चाफ्याच्या फुलाची माळ व जोडीला साखर माळ लागते.  तर ही सहज सोपी पटकन् होणारी साखरमाळ कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* साखर अर्धी वाटी
* पाणी साखर बुडेल इतकेच,पाव वाटी
* बेकिंग पावडर पाव टीस्पून
* तूप १ टीस्पून
* आवडीचा खाद्यरंग २ थेंब

कृती :-
प्रथम फोटत दाखवल्याप्रमाणे कप केकचे मोल्ड एका ताटात ठेवून त्यात दौरा ठेवावा.

नंतर गँसवर साखर व पाणी एकत्र करून पाक करण्यास ठेवावा. सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की त्यात रंग व तूप घालावे. कडक गोळीबंद पाक करावा. शेवटी बेकींग पावडर घालावी.

नंतर झटपट गरम पाक मोल्डमधे चमच्याने घालावा.  पंधरा मिनिटानंतर कडक झाले की मोल्ड मधून सहजच साखर माळ निघते.

घरच्या घरी आपली साखर माळ तयार. आदले दिवशीच करून, अलगद डब्यात घालून ठेवावी. दुसरे दिवशी गुढीला घालावी.

टिप:
* कपकेक मोल्ड नसतील तर ताटाला तूपाचा हात चोळून त्यावर दोरा ठेवून ठराविक अंतराने पाक टाकावा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

03 March 2018

चिंचेचे पंचामृत ( Chincheche Panchamrut)

No comments :


चिंचेचे पंचामृत हा एक पारंपरिक पदार्थ आहे. सणावाराचे दिवशी हमखास नैवेद्याच्या पानात डाव्या बाजूचा पदार्थ म्हणून केला जातो.  चविला आंबट-गोड असा अप्रतिम लागतो. कसा करायचा पहा साहित्य व कृती-👇

साहित्य : -
* चिंचेचा कोळ १ वाटी
* गूळ १ वाटी
* दाण्याचा कूट २ टेस्पून
* तिळाचे कूट २ टेस्पून
* भाजलेले दाणे मूठभर
* सुक्या खोबर्याचे पातळ काप २ टेस्पून
* कढीपत्ता
* सुक्या लाल मिरच्या २
* मीठ १ टीस्पून
* लाल तिखट १ टीस्पून
* हळद अर्धा टीस्पून
* गोडा /काळा मसाला १ टीस्पून
* मोहरी १/२ टीस्पून

* मेथी दाणे पाव १/४ टीस्पून 

* जीरे १/२ टीस्पून
* हींग पाव टीस्पून
* तेल १ टेस्पून

कृती :
सर्वप्रथम  चिंच पाण्यात भिजवून चाळणीमधून गाळून त्याचा गर काढून घ्यावा. शेंगदाणे व तिळ भाजून कूट करावे. मूठभर दाणे भरड ठेवावे. अखंड दाताखाली आले की छान लागते.

नंतर कढईमधे तेल गरम करून मोहरी, जीरे मेथीदाणे तडतडवून त्यात लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हींग , खोबऱ्याचे काप,भरड शेंगदाणे घालून थोडे परतून घ्यावे .

नंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ, हळद, तिखट,काळा मसाला घालून ५ मिनिट उकळवावे. मिश्रण चमकदार झाले की चवीनुसार मीठ, तिळाचे कूट व दाण्याचे कूट घालावे .सर्व एकत्र ढवळून पाच मिनिट शिजले की झाले तयार पंचामृत.

आंबट-गोड चविचे पंचामृत जेवणाची लज्जत वाढवते. एखादी भाजी कमी असेल तरी चालून जाते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

22 February 2018

चिंचेचा भात (Tamarind Rice)

No comments :

दक्षिणेकडे भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे भाताचेच विविध प्रकार केले जातात. हा चिंच राईस तेलगू मधे "पुलिओरा" (pulihora Rice) म्हणून ओळखला जातो. एक-दोन वेळा बालाजी मंदिर मधे प्रसाद म्हणून दिलेला हा भात खाल्ला. मला खूप आवडला. म्हणून चवीवरून व गुगलवरून त्याची रेसिपी शोधून मी    सेम टेस्टचा "चिंचेचा भात " केला. सर्वाना हा भाताचा प्रकार आवडला, तेव्हापासून आमच्या घरी वरचेवर, रात्रीच्या जेवणात फारशी भूक नसेल तर वन डिश मिल म्हणून हा भात बनतो. कसा केला साहित्य व कृती-👇

साहित्य -
* शिजवलेला भात २ वाट्या
* चिंचेचा कोळ पाव वाटी
* सुक्या लाल मिरच्या २
* कढीपत्ता
* उडीद डाळ १ टीस्पून
* चणा डाळ १ टीस्पून
* शेंगदाणे मुठभर
* मीठ चवीनुसार
* गुळ सुपारीइतका
* हळद  ( ऐच्छीक)
* फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम कढईत तेल गरम करून त्यामधे हिग, मोहरी, जीरे तडतडवून घ्यावेत.

नंतर त्यामधे लाल मिरची, कढीपत्ता, डाळी व शेंगदाणे घालून तांबूस परतावे.

आता त्यात चिंचेचा कोळ, मीठ, गूळ घालून मिश्रण घट्ट होऊन तेल सुटेपर्यंत परतावे व शेवटी शिजलेला भात घालून परतावे. भात तयार!

तयार चिंचेचा भात गरमा-गरम सर्व्ह करावा. सोबत लोणचे, पापड द्या. अतिशय रूचकर लागतो. पोट भरते.

टिप 

* भात मोकळा शिजलेला असावा. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

07 February 2018

झटपट लिंबू लोणचे (Instant Lemon Pickle)

1 comment :

लिंबाचे लोणचे अनेक वेगवेगळ्या पध्दतिने बनविले जाते. मुळात लोणचे म्हटले की च, तोंडाला पाणी सुटते. त्यात लिंबूचे लोणचे आवडत असेल तर याला मुरायला बरेच दिवस लागतात. तर असे झटपट होणारे लोणचे केले तर कोणाला नाही आवडणार? हे लोणचे मुरायची वाट बघायची अजिबात गरज नाही. लिंबू बाराही महीने उपलब्ध असतात. गरजेनुसार थोडेच लिंबू आणून ताजेच केले तरी चालते. हे लोणचे लहान मुलांना किंवा वृध्द लोकांना अधिक आवडते गोडसर चविचे व चावावे लागत नाही. तर याचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* लिंबू मध्यम आकाराचे १२ -१५ नग
* साखर १ /२ किलो ( अडीच कप)
* मीठ लहान अर्धी वाटी
* तयार लिंबू लोणचे मसाला ५० ग्रँम

कृती :-
प्रथम लिंबू स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करून घ्यावेत. नंतर चिरून एका लिंबाच्या आठ फोडी करून त्यातील सर्व बिया काळजीपूर्वक काढाव्यात.

आता बी काढलेल्या फोडी मिक्सरमधे वाटायच्या व गर बाऊलमधे काढून घ्यायचा. वाटताना एकदम गुळगुूळीत पेस्ट करायची नाही बरकां..थोडं मोटसरच ठेवायचे, खाताना क्रंची क्रंची छान लागते. नंतर यात साखर, मीठ व मसाला मिसळायचा. मस्तपैकी सर्व साहित्य एकत्र ढवळायचे व साखर विरघळून घ्यायची . झाले लोणचे तयार!

हे चटकदार लोणचे पराठा, मसाला पुरी, चपातीला लावून खाता येते. मुलांच्या डब्यात ब्रेडला लावून देता येते. अगदी रोजच्या जेवणात चटक -मटक करून मधे मधे चाटून खायला मस्त लागते, तोंडाला चव येते.

तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल कारण झटपट तर होतेच शिवाय अतिशय कमी साहीत्यात होते. शिवाय केल्यावर मुरेपर्येत बरणीकडे बघत बसायला नको. लगेच खाता येते हे जास्त चांगले. लिंबू व मसाला तयार असेल तर अगदी १५ मिनीटांत तयार होते.

टिप्स :
* लिंबू ताजे व रसरशीत पिवळ्या रंगाचे असावेत.
* लिंबाच्या आकारमानानुसार व आवडीनुसार साखर, मीठ कमी-जास्त करावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

11 January 2018

तिळाची कुरकुरीत वडी (Crispy Til Burfi)

No comments :
संक्रांत, भोगी म्हटले की, गुळपोळी, तिळ-गुळाच्या वड्या, तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी असे पदार्थ केले जातात. हे उष्ण पदार्थ असतात. तिळामधे शरीराला आवश्यक स्निग्धांश असतात. यांच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते. म्हणून थंडी मधेे असे पदार्थ केले जातात. तिळाच्या पारंपारिक मऊ वड्या, लाडू आपण करतोच. आज मी तिळाच्या कुरकुरीत वड्या केल्या. अगदी कमीत-कमी व मोजके साहित्य लागते व पट्कन होतात. कशा केल्या साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तिळ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ ऐच्छिक
* काजू, बदाम काप ऐच्छिक
कृती :-
प्रथम तिळ स्वच्छ निवडून चाळून ध्यावेत. पोळपाट- लाटण्याला तूपाचा हात चोळून घ्यावा.
प्रार्थमिक तयारी केल्यावर आता गँसवर कढई ठेवून मंद आचेवर तिळ भाजून घ्यावेत. जास्त भाजू नयेत.,कडू लागतात.
आता तिळ ताटात काढून त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप पातळ झाले साखर घालावी.  मंद आचेवरच साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,गँस बंद करून लगेच भाजलेले तिळ, ड्रायफ्रूट्सचे पातळ काप घालावेत व सर्व साहित्य झटपट एकत्र करावे.
आता मिश्रणाचा तयार गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर काढावा व गरम असतानाच हवे त्या जाडीची (शक्यतो पातळच) पोळी लाटावी. चाकूने रेषा पाडाव्यात. ही वडी लगेचच सुकते. म्हणून सर्व कृती झटपट करावी.
आता मस्त कुरकुरीत वड्या काढाव्यात व हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. महीनाभर सुध्दा छान कुरकुरीत रहातात.
तुम्हीही अशा पध्दतीने वड्या करून बघा. नक्की आवडतील.
टिप :
* तिळ तांबूस रंगाचे वापरावेत. पांढरे पाँलीशचे नको. तांबूस तिळ चविला अधिक खमंग असतात. मी तेच वापरलेत.
* साखरे ऐवजी गुळ वापरला तरी चालतो. परंतु गुळ नुसता विरघळून न घेता त्याचा गोळीबंद पाक करावा. 
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.



15 December 2017

चिंच गुळाची आमटी ( Chinch Gulachi Aamti)

1 comment :

तूर डाळीची चिंच गुळाची आमटी खास करून महाराष्ट्रीयन ब्राम्हण समाजात केली जाते . रोजच्या जेवणात भातासोबत वरण,आमटी, कढी,सार, किंवा पालक, मेथीची पातळ भाजी असे कांही ना कांही पातळ पदार्थ असतोच. यापैकीच हा एक प्रकार. पावसाळ्यात किंवा थंडीमधे गरमा-गरम मोकळा भात, आमटी, वर तुपाची धार  व सोबत पापड आणि लोणच्याची फोड अहाहा.. अप्रतिम लागते. या आमटीचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तूर डाळ १ वाटी
* मेथी दाणे ७-८
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची पावडर एक टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* गूळ सुपारी एवढा खडा
* मीठ चवीनुसार
* कढीपत्ता, कोथंबिर, ओले खोबरे
* फोडणीसाठी मोहरी, हींग, हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.नंतर डाळीत चिमूटभर हळद, हिंग, मेथी दाणे व शिजण्यापुरते पाणी घालावे आणि कुकरला मऊ शिजवावी.

आता एका पातेल्यात तेल घालून हींग, मोहरी, हळद व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यात एक वाटीभर पाणी घालावे. म्हणजे फोडणी जळत नाही. आता त्यात एक एक साहित्य म्हणजे मसाला, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचाकोळ घालावे. शेवटी शिजलेली डाळ थोडे पाणी घालून, पळीने घोटून एकजीव करावी व फोडणी मधे घालावी. आपल्या आवडीनुसार घट्ट, पातळ करण्यास पाणी घालावे. चांगली उकळावी. म्हणजे सर्व मसाल्यांचे स्वाद उमटतात.

उकळताना थोडे खोबरं, कोथंबिर घालावे व राहीलेले शेवटी वरून सजावटीसाठी घालावे. जेवणात गरमा-गरम भातासोबत वाढावी.

टीप्स :
* आमटीची डाळ चांगली मऊ मेणासारखी शिजवावी. आमटी एकसंध होते.
* डाळीमधे मेथी दाणे शिजवतानाच घालावे. आमटीला जास्त खमंग चव लागते.
* चिंचेऐवजी ४ आमसुले घातली तरी चालते.
* महत्वाचे म्हणजे आमटी नेहमी गरमच वाढावी.
* या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात.

13 December 2017

ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake)

No comments :

07 October 2017

बालूशाही (Balushahi)

No comments :

बालूशाही हा पक्वान्नाचा  किंवा हवे तर मिठाई चा पदार्थ म्हणावे. कारण ८ -१० दिवस टिकतोही. करायला एकदम सोपा. खायलाही मस्तच. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
(अंदाजे १५-१६ नग)
* मैदा ३ कप
* तूप अर्धा कप
* दही पाव कप
* मीठ चिमूटभर
* सोडा अर्धा टीस्पून
* साखर २ कप
* पाणी १ कप
* वेलचीपूङ
* रोज इसेन्स
* बदाम पिस्ता काप सजावटीला
* तूप किंवा रिफाइंड तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम मैदा चाळून एका बाऊलमधे घ्यावा.त्यामधे  तूप, सोडा व मीठ घालून आधी कोरडेच हाताने चोळून घ्यावे. मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.

आता दही व गरजेनुसार पाणी घालून पीठ फक्त एकत्र करावे. खूप मळून तुकतूकीत गोळा करण्याची आवश्यकता नाही.ओबड-धोबडच राहू द्या. अशाने बालूशाही वर छान लेयर येतात व खुसखूषीत होते. १५ मिनिट झाकून ठेवावे.

आता पीठाचे लहान -लहान पेढ्यासारखे चपटे गोळे बनवून अंगठ्याने मधे दाब देऊन खळगा करावा. व गरम तूपामधे अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावेत. तळून थंड होऊ द्यावे.

आता साखर पाणी एकत्र करून पाक करावा. साखर विरघळून उकळू लागले की साधारण दाट होईपर्यंत, एकतारीच्या किंचित अलिकडे म्हणजे एकतारीला सुरवात झाली की पाक झाला. आता वेलचीपूड व इसेंन्स घालावे.

आता पाकामधे, तळलेली बालूशाही सोडावी किंवा बालूशाही पसरट भांङ्यामधे घेऊन वरून पाक ओतावा. ५-१० मिनिट ठेऊन अलगदपणे चिमट्याने एकेक बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवावे व वर बदाम, पिस्ता काप लावावेत.

गार झाल्यावर एकदम खुसखूषीत लागते. अतिशय छान आतून पदर सुटलेले असतात वरून पांढरट साखरेचा थर दिसतो. एकूणच मस्त! 

टिप्स:
* मंद आचेवरच तळावे. वेळ लागतो पण आतून छान तळली जाते.
* दही ताजे वापरावे. खूप आंबट व वास येणारे नसावे.
* पाकात थोडा केशर टाकला तर मार्केटप्रमाणे केशरी रंग येतो.
* पाक कच्या ठेवला तर बालूशाही नरम पडते व पक्का केला तर आत पर्यंत मुरत नाही.
* पीठ फार मळू नये.
* तळताना काळजी घ्यावी. खूप खुसखूषीत असल्याने फूटू शकतात. अलगदपणे उलट-सुलट करावे.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 October 2017

सात कप वडी (Seven Cup Burfi)

No comments :

'सात कप वडी ' हा एक पारंपरिक मिठाईचा पदार्थ आहे. पौष्टीक व झटपट होणारा आहे. पारंपारिक प्रकारामध्ये फक्त एकूण साहित्य सात कप असते. म्हणून सात कप वडी नांव पडले. परंतु मी थोडा बदल करून मिल्क पावडर व सुकामेव्याची पावडर घेऊन टोटल सात पदार्थ घेऊन सात कप मिश्रण केले व थोडी अधिक पौष्टीक करण्याचा प्रयत्न केला व छान यशस्वी झाला. कशी केली साहित्य व कृती -

साहित्य :-
* बेसन पीठ १ कप
* ओलं खोबरं १ कप
* तूप १ कप
* दूध १ कप
* मिल्क पावडर १/२ कप
* ड्रायफ्रूट भरड १/२ कप
* साखर २ कप

कृती :-
प्रथम सर्व साहित्य मापाने मोजून काढून घ्यावे. नंतर नाँनस्टीक पँनमधे डाळीचे पीठ साधारण म्हणजे कच्चेपणा जाण्याइतपत भाजून घ्यावे.

नंतर तूप, दूध, ओलं खोबरं, साखर घालून ढवळत रहावे. साखर विरघळली की ड्रायफ्रूट पावडर व मिल्क पावडर घालावी.

सर्व साहित्य गोळा होईपर्यंत ढवळत रहावे. कडेने तूप सुटून एकत्र गोळा तयार झाला की तूप लावलेल्या ताटात काढावे  व हाताने किंवा वाटीने थापावे. आवडत असल्यास वरून बदाम पिस्ता काप लावावेत. मिश्रण थंड झाले की वड्या कापाव्यात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 October 2017

तूपाची बेरी

2 comments :

आजकाल लोकांना 'तूप' म्हटले की च वजन वाढल्याचा भास होतो. तूप खाणे शक्यतो टाळले जाते त्यामुळे घरात तयार करून खाणे तर दूरच. तसेही तूप बनविण्याची प्रक्रिया खूप मोठी व वेळखाऊही आहे. परंतु घरी करायचे तितकेही अवघड नाही.. फक्त रोज नियमितपणेे दूधाची साय काढणे, विरजणे, घुसळणे, लोणी ठराविक दिवसानी कढविणे असे सर्व चिकाटीने करावे लागते. तूप अतिशय गुणकारी आहे. रोज सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा शुध्द तूप आहारात असावेच. आरोग्याला चांगले असते. घरी केलेल्या लोणकढ्या तूपाची चव व खमंग वास खूपच छान लागते. तसेच घरी केलेले असल्याने भेसळ नाही व असे घरचे शुध्द तूप अजिबात बाधत नाही. तसेच तूप कढविल्यावर खाली लागते त्या खरवडीला तूपाची बेरी म्हणतात. ही सुध्दा खूप पौष्टीक असते बरं..

लहानपणी आम्ही भावंडे ही खरवड व तूपात घातलेले विड्याचे पान खाण्यासाठी भांडत असू. यावरून लहानपणीचे एक गाणे आठवले. आई विचारायची तूप कसे तयार होते माहीत आहे का? मग आम्ही सुरू,
दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी , लोण्याचं तूप, तुपाची बेरी... 

बर्याच घरातील ही आजची पिढी या तूपाची बेरी खाण्याच्या आनंदाला... घरात तूप कढत असताना येणार्या दरवळाला मुकली आहे. आता या बेरीच्या वड्या, लाडू, केक सुध्दा बनविले जातात. आम्ही लहानपणी पातेले चमच्याने खरवडून खरवडून बेरी काढून त्यात साखर मिसळून खात असू. आजच तूप कढवले त्यावरून हे सर्व आठवले. आता मी तूप कढवले की बेरी काढून साखर मिसळून टेबलवर ठेवते व येता -जाता चमच्याने तोंडात टाकते. भांडायला भावंड नाहीत आता... प्रत्येकजण आपापल्या घरी! व आजच्या मुलांना है असले पदार्थ खायला आवडत नाहीत.

घरगुती शुध्द तूप कसे तयार केले जाते? खाली दिलेल्या लिंकवर वाचा.

http://swadanna.blogspot.in/2016/12/clarified-butter-ghee.html?m=1

27 September 2017

वाटली डाळ ( Vatali Daal)

No comments :

'वाटली डाळ ' यालाच कोणी 'मोकळी डाळ', 'खमंग डाळ' असेही म्हणतात. हा पारंपारिक पदार्थ आहे. मी फक्त कृतीमधे थोडा बदल केला आहे. जेणेकरून पट्कन व अधिक चविष्ट होईल यावर भर दिला. यामधे चण्याची डाळ असल्याने मुलांना खाण्यास पौष्टीक आहे. हा पदार्थ आपण जेवणात भाजीसारखा, दही घालून नाष्ट्याला, संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर,चहासोबत किंवा अगदी सहज स्नँक्स म्हणून येता -जाता वाटी चमच्यातून तोंडात टाकू शकतो. तसेच गणपती विसर्जनादिवशी प्रसादाला, नवरात्रि मधे देवीच्या प्रसादाला ही केला जातो. पारंपारिक पध्दतिने डाळ केल्यास थोडी जास्त वेळखाऊ प्रक्रिया होते म्हणून मी थोडी वेगळ्या पध्दतिने केली कशी ते पहा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* चणाडाळ २ वाट्या
* तेल १/४ (अर्धा) वाटी
* फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, हळद व कढीपत्ता
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हिरव्या मिरच्या ३ -४
* लसूण, आलं (ऐच्छीक)
* ओलं खोबरं, कोथिंबीर
* लिंबू

कृती :-
प्रथम डाळ स्वच्छ धुवून ३ -४ तास पाण्यात भिजत घालावी.

नंतर पाण्यातून उपसून काढावी व परत एक-दोनदा स्वच्छ धुवावी. १० मिनीटे एका चाळणीवर निथळत ठेवावी.

आता निथळलेली डाळ, जीरे, मीठ, साखर, आले-लसूण, मिरची सर्व एकत्र भरडसर वाटून घ्यावे.

नंतर हे सर्व तयार वाटण कुकरच्या डब्यामधे घालून वरून पाण्याचा शिपका मारून शिजायला लावावे. साधारण दोन शिट्ट्या काढाव्यात. (भाताप्रमाणे बाहेरच्या डब्यात पाणी घालून शिजवावे)

आता कुकरची वाफ जिरल्यावर शिजलेली डाळ ताटात काढावी व थोडी गार झाल्यावर हाताने मोकळी करावी किंवा गहू चाळण्याच्या चाळणी वर घासून घ्यावी.

आता मोकळी केलेली डाळ कढईत तेल गरम करून फोडणी करावी व त्यामधे घालावी. दोन-चार वेळा परतून एक वाफ काढा. झाली डाळ तयार.

आता तयार डाळीवर ओलं खोबरं कोथिंबीर व लिंबू घालून खायला द्यावी.

टिप्स :
* अशा पध्दतीने डाळ केल्याने डाळ फोडणी टाकल्यावर शिजेपर्यंत तळाला करपणयाची शक्यता रहात नाही. व्यवस्थित मऊ शिजून मोकळी रहाते. पारंपारिक पध्दतिने केली जाते त्यात मधे -मधे डाळीचे डिकळे रहातात व कच्ची रहाण्याची शक्यता असते व खाली लागू नये म्हणून तेलही जास्त लागते.

* वाटली डाळ प्रसादाला, नैवेद्याला करायची असल्यास लसूण आलं घालू नये. मात्र एरव्ही खायला करायची असल्यास जरूर घालावे, जास्त खमंग व चविष्ट लागते.