17 December 2019

कोबी मन्चूरीअन ( Gobi Manchurian)

No comments :


कोबी मन्चूरीअन हा स्टार्टरचा चायनीज पदार्थ आहे तरूण वर्गाला तर खूप आवडतो. तसा मन्चूरीअन हा पदार्थ पौष्टिकच!बर्याच भाज्या यांत असतात. पण बाहेरचे खायचे म्हणजे ऩक्की त्यात भाज्या आहेत का मैद्याचे गोळे असतील.. ? भाज्या स्वच्छ धुतल्या असतील का? अशा बर्‍याच शंका मनात येतात.अन् खरच एके ठिकाणी भिजवलेले सोया चंक चक्क कोबी मन्चूरीअन म्हणून दिले होते. म्हणून आज विचार केला की आपल्या हाताने सर्व भाज्या स्वच्छ धुवून,भरपूर भाजी घालून आपणच घरी करावे.. व घरी केलेले असल्याने मनसोक्त खाता येते. तर चला कसे केले ती कृती व साहित्य पहा -

साहित्य :-
मन्चूरीअन बाँलसाठी
• बारीक चिरलेला कोबी २ कप
• कांदापात  १ कप
• बारीक चिरून सिमला मिरची अर्धा कप
• बारीक चिरून गाजर अर्धा कप
• आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
• हिरवी मिरची पेस्ट १टीस्पून
• लाल तिखट २ टीस्पून
• हळद
• मीठ चवीनुसार
• कोथंबीर
• मैदा पाव कप
• काँर्नफ्लोर पाव कप
• तांदूळ पीठी पाव कप
• तेल तळण्यासाठी

ग्रेव्हीसाठी साहित्य -
•  तेल २ टेस्पून
•  बारीक चिरलेला कांदा १
•  कांदापातीचा मागचा पांढरा कांदा चिरून
•  कांदापात बारीक चिरून अर्धी वाटी
•  चिरलेला कोबी, गाजर, सिमला प्रत्येकी एक मूठ
•  आलं- लसूण बारीक चिरून २ टीस्पून
•  सोया सॉस १ टेस्पून
•  टोमँटो सॉस १टीस्पून
•  व्हीनेगर १/२ टीस्पून
•  शेजवान सॉस/चटणी १ टीस्पून
•  काँर्नफ्लोर पेस्ट  २ टेस्पून
•  मीठ चवीनुसार
•  वरून सजावटीसाठी मुठभर चिरलेली कांदापात

कृती :-
प्रथम मन्चूरीअन व ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या भाज्या, कांदा सर्व बारीक चिरून घ्यावे.

आता मन्चूरीअन बाँलसाठी लागणार्‍या सर्व भाज्या एका बाऊलमधे घ्याव्यात व त्यामध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून हाताने एकजीव करावे. पाणी अजिबात घालू नये. मिश्रण सैल वाटले तर थोडी तांदूळ पीठी, कॉर्नफ्लोअर अाणखी घालावे. नंतर तयार मिश्रणाचे लहान लहान बॉल सैल हाताने करून भजी प्रमाणे तेलात सोडावेत व खमंग तळून घ्यावे. तळलेले मन्चूरीअन बॉल एका बाजूला ठेवून द्या.



आता ग्रेव्ही करायला घ्यावी. त्यासाठी पँनमध्ये तेल घालावे व गरम झाले की, त्यामध्ये कांदा, चिरलेले आलं- लसूण घालून परतावे. नंतर त्यात भाज्या घालाव्यात व थोड्या परताव्यात. फार मऊ करू नये. आता त्यामध्ये मीठ,सॉस,चटणी, व्हिनेगर घालावे. शेवटी कॉर्नफ्लोअर पेस्ट घालून थोडे पाणी घालून शिजवावे. जास्त पाणी, घालून पातळ करू नये. ग्रेव्ही दाटसरच ठेवावी.

शेवटी तयार ग्रेव्हीमधे आधी तयार केलेले मन्चूरीअन बॉल सोडावेत व व्यवस्थित मिसळून घ्यावेत .

आता तयार कोबी मन्चूरीअन  एका सर्व्हिंग डिशमध्ये घालून वरून थोडी चिरलेली कांदापात घालावी व सर्व्ह करावे.

टीप्स :-
* यामध्ये भाज्या आपल्या आवडीने घ्याव्यात.
• शेजवान चटणी आँप्शनल आहे. मी  झणझणीतपणासाठी व चटपटीत लागावे यासाठी वापरली आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

16 November 2019

राजमा मसाला (Rajama Masala)

No comments :
राजमा मसाला
-----------------

 राजमा चावल ही खास करून उत्तर भारतीयांची आवडती डिश आहे. तिथे प्रत्येक छोट्या धाब्यापासून ते फाईव्हस्टार हाँटेलच्या मेन्यू मधे तुम्हाला मिळणार. तर अशा या लाडक्या राजम्यामधे भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, आयर्न व मॅग्नेशियम असते. मसाल्याबरोबर मऊ शिजलेले राजमा पाढर्या मोकळ्या भातासोबत खूप रुचकर लागताे. करायलाही एकदम सहज सोपी पाककृती आहे. तर असा हा चविष्ट, रुचकर राजमा करण्यासाठी लागणारे साहित्य व कृति --

साहित्य :-
• भिजवून उकडलेला राजमा २ वाट्या
• बारीक चिरून कांदा मोठा १
•  टोमँटो प्यूूरी १ वाटी
•  आलं,लसुण,हिरवी मिरची पेस्ट  २ टीस्पून
•  खडा गरम मसाला ( एक तमालपत्र, दोन लवंगा, दोन दालचिनी काड्या, मसाला वेलची  एक)
•  पावडर गरम मसाला १ टीस्पून
•  कसूरी मेथी अर्धा टीस्पून
•  धना-जीरा पावडर २ टीस्पून
•  लाल मिरची पावडर १ टीस्पून
•  आमचूर पावडर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)
•  मीठ चवीनुसार
•  तेल व फोडणी साहित्य
•  वरून सजावटीसाठी क्रीम व कोथिंबीर (ऐच्छिक)

कृती :-
प्रथम राजमा आदले दिवशी रात्री स्वच्छ धुवून  भरपूर पाण्यात भिजत घालून ठेवावेत. दुसरे दिवशी मीठ घालून कुकरला मऊ  शिजवून घ्यावेत.

आता  प्रथम कढईत तेल घालून हिंग, जीरे, मोहरीची फोडणी करावी व फोडणीमधे हळद, खडा मसाला घालावा. थोडे परतून आता कांदा घालून परतावे. पाठोपाठ आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात मसाला,तिखट,मीठ, कसूरीमेथी वगैरे राहीलेले सर्व साहित्य घालावे गरजेनुसार पाणी घालून ,झाकून ठेवून एक उकळी काढावी.

तयार राजम्यामधे वरुन क्रिम व कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करावे .

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.



04 October 2019

उपवासाची कचोरी ( Upvas Kachori)

No comments :
उपवास असला की हमखास काहीतरी चटपटीत खावे वाटते ना? तर मस्त खमंग उपवासाची कचोरी करून खा. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• उकडलेले मोठे बटाटे -  ४ नग
• उपवासाची भाजाणी - २ टेस्पून
• ओले खोबरे किस - १ -१ १/२ वाटी
• काजू ७-८
• बेदाणे १० -१५
• हिरवी मिरची बारीक चिरून २
• लिंबू अर्धा
• भाजलेल्या जिर्याची पावडर १ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम वरच्या पारीसाठी उकडलेले बटाटे साल काढून मोठ्या किसणीने किसून घ्यावेत. त्यामधे उपवास भाजणी व चवीनुसार मीठ घालून मळून एकजीव करावे व गोळा तयार करावा.

आता आतील सारणासाठी ओले खोबरे एका बाऊलमधे घेऊन त्यामधे मीठ, जिरेपूड,मिरचीचे तुकडे, काजू, बेदाणे घालूून लिंबू पिळावे व चमच्याने सर्व एकत्र मिसळावे.

नंतर वरील पारीसाठी तयार केलेल्या पीठाची लिंबाइतकी गोळी घेऊन त्याची खोलगट वाटी तयार करावी व त्यामधे तयार सारण भरून तोंड बंद करून चेंडू सारखा गोळा करावा.

आता तयार कचोर्या गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

गरमा-गरम कचोरी ओलं खोबरं, मीठ, दही, मिरची घालून वाटलेल्या चटणी बरोबर खायला द्यावी.

टिप्स :
• उपवासाची भाजणी पीठाऐवजी साबूदाणा पीठी किंवा शिंगाड्याचे पीठ किंवा आरारूट घेतले तरी चालते.
• आतील सारणामधे अर्धे खोबरे व अर्धे उकडलेले रताळे घालावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

25 July 2019

मेथी नमकीन (Methi Napkin)

2 comments :
संध्याकाळच्या वेळी चहासोबत कांहीतरी चटपटीत तोंडात टाकावे वाटते तसेच मुलांना तर येता -जाता कांहीतरी खायला हवेच असते. तर बाजारी फरसाण, चिप्स खाण्यापेक्षा घरीच कांही पौष्टीक व खमंग असे करून ठेवले तर जास्तच चांगले ना..  म्हणून मी आज हे खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' केले. कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• गव्हाचे पीठ १ कप
• बारीक रवा २ टेस्पून
• मैदा १ कप
• तेल ४ टेस्पून
• कसूरी मेथी ४ टीस्पून
• तिळ १ टीस्पून
• ओवा १ टीस्पून
• मिर्यांची भरड २ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तळण्यासाठी तेल

कृती :-

प्रथम एका बाऊलमधे गव्हाचे पीठ, मैदा, रवा एकत्र करून घ्यावे. नंतर त्यामधे मीठ,ओवा,कसूरी मेथी,तीळ,मिर्यांची भरड घालून सर्व एकत्र करावे.

आता या मिश्रणामधे मोठे चार चमचे तेल घालून हाताने चोळून चांगले मिक्स करावे. कोरडे पीठ मुठीत घेऊन दाबले तर मुटका होतो का पहावे. नाहीतर अजून एखादा चमचा तेल घालावे.

नंतर अंदाज घेत -घेत पाणी घालून घट्ट पीठ मळावे.   दिलेल्या पीठाच्या प्रमाणासाठी साधारण अर्धा कप पाणी लागते.  १० मिनीटे पीठ झाकून ठेवावे.

आता खूप जाड नाही का खूप पातळ नाही अशी पोळी लाटून लांबट पट्टया कापाव्यात. गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळावेत.

थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. पाहीजे तेव्हा गरमा-गरम चहासोबत खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' चा आस्वाद घ्या.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.




कटाची आमटी (Katachi Aamti)

1 comment :
इस कटाची आमटी हा आमटीचा पारंपारिक प्रकार आहे. पुरणपोळीचे जेवण म्हणजे सोबत कटाची आमटी पाहीजेच.या आमटीला निरनिराळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. कुठे येळवणीची आमटी..  तर कुठे सार! तसेच करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या असतात. पण पदार्थ एकच असतो.  हरभर्याची डाळ शिजवताना मधे मधे वरचे पाणी काढले जाते व त्या पाण्याची आमटी केली जाते ती कटाची आमटी होय.आजकाल डाळ कुकरमधे डाळ शिजवली जाते. म्हणून डाळीत जास्त, म्हणजे डाळीच्या चौपट पाणी घालतात व गाळून कट काढला जातो. तर अशा आमटीसाठी लागणारे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* डाळीचा काढलेला कट ५ वाट्या
* सुके खोबरे एक लहान वाटी, ५० ग्रँम
* लिंबाएवढ्या चिंचेचा काढलेला कोळ
* गूळ लिंबाएवढा
* गरम मसाला १ टीस्पून
* गोडा मसाला २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* फोडणीसाठी तेल एक पळीभर
* हींग, मोहरी, जीरे, कढीपत्ता
* कोथिंबीर

कृती :-
प्रथम सुक्या खोबर्याची वाटी डायरेक्ट गँसवर जाळामधे खरपूस भाजून घ्यावी.

आता भाजलेले खोबरे, जीरे, थोडा कढीपत्ता भाजून, कोथिंबीर सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे.

आता तेल गरम करून त्यामधे जीरे, मोहरी हींग तडतडवून घ्यावेत. त्यामधे कढीपत्ता, हळद, हींग घालावे व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतल्यावर त्यामधे लाल मिरचीपूड, गरम मसाला, गोडामसाला घालून परतावे.

सर्वात शेवटी डाळीचा कट, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून आमटी ५ मिनिट चांगली उकळू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.

अशी ही खमंग कटाची आमटी मोकळ्या भातासोबत खूप छान लागते. तसेच पुरणपोळी खाताना मधे-मधे भुरकायलाही मस्त लागते. बरेचजण आमटीत पोळी बुडवूनही खातात.  कशीही खा पण पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहीजेच.

टिप्स :
* बरेचवेळा आमटीला कट कमी निघतो अशा वेळी थोडी शिजलेली डाळ घोटून घालावी.
* या आमटीला मसाला वाटताना खोबर्यासोबत हिरवी मिरची,आले, लसूण, कोथिंबीर व जाळावर खोबर्याप्रमाणे आख्खा कांदा भाजून घातला तरी चालतो.छान वेगळी चव येते. परंतु मी देवाला नैवेद्य असल्याने कांदा लसूण नाही घातले.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

10 July 2019

दुधीचे मुठीया (Dudhi Muthiya)

No comments :
दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे.एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दुधच आहे. दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते.परंतु दुधीभोपळ्याची भाजी जेवणात आहे म्हटले की नाकं मुरडली जातात. सामान्यपणे लोकांना आवडत नाही. म्हणून मी त्याचे मुठीया केले. जेवणात खा,नाष्टा म्हणून खा किंवा चहासोबत स्नँक्स म्हणून खा उत्तम लागतात व पौष्टीक आहेत. जेणेकरून दुधी पोटात गेला पाहीजे. तर हे मुठीया कसे करायचे पाहुयात.

साहित्य :-
* खिसलेला कोवळा दुधी २ वाट्या
* गव्हाचे पीठ १ वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* चणाडाळीचे पीठ अर्धी वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* तांदुळाचे पीठ पाव वाटी
* बारीक रवा २ टेस्पून
*मीठ
*हळद
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
*धना-जिरा पावडर
* लिंबू रस चमचाभर
* कोथिंबीर
* फोडणी साहित्य तेल,हिंग, मोहरी,तिळ, कढीपत्ता

कृती :-
प्रथम  कोवळा दुधी भोपळा सालं काढून किसून घ्यायचा. थोडं हलक्या हाताने किस पिळून घ्यायचा व निघालेले पाणी पिऊन टाकायचे.  खूप नाही पाणी काढायचे. पण अगदीच न पिळता किस घेतला की पीठ खूप घालावे लागते व चवीला पीठ पीठ खूप लागते.

तर आता दुधीच्या किसात मावेल इतके गव्हाचे, तांदूळाचे व डाळीचे पीठ, रवा थोडासा घालायचे. तसेच मीठ,  हळद, धना-जिरा पावडर, आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट, लिंबू रस, कोथिंबीर चिरून सर्व घालून सैलसर पीठ भिजवावे,

आता त्याचे मुटके करून उकडायचे व गार झाल्यावर कापून हिंग,जीरे,मोहरी,तिळ, कढीपत्ता घालून फोडणी करावी व त्यामधे उकडलेले  मुठीया घालून चांगले तांबूस रंगावर परतायचे व खायचे.

टीप - यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या म्हणजे गाजर, पालक, मेथी मिसळले तरी छान लागते. तसेच पीठही बाजरी, मका, नाचणी मिसळून अधिक पौष्टिक करता येते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

22 February 2019

हरा-भरा कबाब (Hara-bhara Kabab)

No comments :


हरा-भरा कबाब पौष्टीक व सर्वाना आवडणारा स्नँक्सचा प्रकार आहे. तसेच करायलाही एकदम सोपा आहे. कसा करायचा साहित्य व कृती-
साहित्य :-
* हिरवे मटार २ वाट्या
* पालक एक जुडी
* शिमला मिरची २ नग
* बीन्स १ वाटी
* कांदापात चिरून १ वाटी
* कोथिंबीर १ वाटी
* हिरवी मिरची व आलं पेस्ट १ टीस्पून
* उकडलेले बटाटे २ नग
* ब्रेडक्रम्स २+२ टेस्पून
* काँर्नफ्लोअर २ टेस्पून
* मीठ चवीनुसार
* चाट मसाला १ टीस्पून
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* आमचूर पावडर १/२ टीस्पून
* हळद १ टीस्पून
* जीरे १/२ टीस्पून
* तेल १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी / शॅलोफ्राय साठी गरजेनुसार
कृती :-
प्रथम पालक निवडून स्वच्छ धुवून मोठा मोठा चिरावा व उकळत्या पाण्यात घालून दोन मिनिट ठेवावा. नंतर गरम पाण्यातून काढावा व चाळणीवर ठेवून वरून गार पाणी ओतून निथळत ठेवावे.

आता बाकीच्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.  नंतर गँसवर पँनमधे तेल गरम करून त्यामधे जीरे तडतडवून घ्यावेत. आले -मिरची पेस्ट घालावी व चिरलेल्या भाज्या मटार टाकून साधारण मऊ होईपर्यंत परतावे.  भाज्या मऊ झाल्यावर पालक हाताने हलकेच दाबून पाणी काढून त्यामधे घालावे व कोरडे होईपर्यंत परतावे. नंतर गँस बंद करून सर्व मिश्रण थंड होऊ द्यावे. 

आता थंड झालेले मिश्रण पाणी न घालता मिक्सरमधे भरड वाटावे खूप मऊ पेस्ट करू नये.  वाटलेले मिश्रण बाऊलमधे काढून त्यामधे उकडलेला बटाटा किसून, काँर्नफ्लोअर, थोडे ब्रेडक्रम्स, कोथिंबीर,मीठ  व वर दिलेले सर्व मसाले घालून घट्टसर गोळा तयार करावा. 

आता थोड-थोडेे मिश्रण घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराचा थोडा चपटा गोळा तयार करावा व ब्रेडक्रम्स मधे घोळवून गरम तेलात तळावा किंवा शॅलोफ्राय करावा.मी शॅलोफ्राय केलेत. 

गरमा-गरम क्रिस्पी कबाब टोमँटो साँस सोबत खायला द्यावे. 

टिप्स: 
* भाज्या परतताना त्यांचा हिरवा रंग टीकून राहीत इतपतच परताव्यात थोड्या क्रंची राहू द्या. 
* मिश्रण सर्व कोरडे झाले पाहीजे.  
* ब्रेडक्रम्स,बटाटे यांचा कमीत-कमी कमी वापर करावा. तरच कबाबला हिरवा रंग येतो. बाहेरच्यासारखे शरीराला हानिकारक कृत्रिम रंग वापरायला नको. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.




11 January 2019

फ्रेश स्ट्राँबेरी -कोकोनट बर्फी ( Fresh Strawberry -Coconut Burfi)

2 comments :

हिवाळ्यात सर्व भाज्या,फळे भरपूर प्रमाणात येतात.अन् खाल्लेही जातात. तर याच दिवसात लाल चुटूक रंगाच्या व हिरवे देठ असणार्या स्ट्राँबेरी बाजारात येतात.आंबट - गोड चवीच्या पिकलेल्या खूप छान लागतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी पण उत्तम फळ आहे. यामधे विटामिन बी व सी भरपूर असते. शिवाय प्रोटीन, फाइबर, पोट्याशियम, मैग्नीशियम, फास्फोरस,आयोडीन अशीही तत्वे आहेत. स्ट्राँबेरी अनेक रोगाशी लढण्याची ताकद देते. जसे उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, कँंन्सर, डायबिटीज.शिवाय स्ट्राँबेरी सेवनाने पोट साफ रहाण्यास मदत होते. स्मरणशक्ति चांगली रहाते. डिप्रेशन कमी होते. महत्वाचे म्हणजे वजन घटण्यास मदत होते. म्हणून स्ट्राँबेरी ला सुपर फुड असेही म्हटले जाते. हे सर्व फायदे पाहून मी बाजारातून नेहमीच स्ट्राँबेरी आणते.पण नुसती खाऊन कंटाळा आला.म्हणून क्रश,बर्फी असे पदार्थ केले. या आधी च्या रेसिपीमधे क्रश केलाय. तेच वापरून ही बर्फी केली. कशी केली साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• खोवलेले ओले खोबरे २ कप
•  साखर २ कप
•  स्ट्राँबेरी क्रश १/२ कप
•  मिल्क पावडर १/२ कप
•  फ्रेश क्रिम १ कप
•  तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी

कृती :-
प्रथम खोवलेले खोबरे +साखर मिक्सरमधून वाटून घ्यावी.

आता जाड बुडाच्या कढईत वाटलेले मिश्रण  घालून मध्यम आचेवर शिजत ठेवावे.सतत ढवळत रहावे. अन्यथा मिश्रण तळाला करपू शकते.

आता मिश्रण अर्धे शिजले की फ्रेश क्रिम घालावे व सतत ढवळत रहावे.

आता कढईच्या कडेने मिश्रण कोरडे होण्यास सुरवात झाली की मिल्क पावङर घालावी. गँसची आच मंद करावी व सतत ढवळत रहावे. पांच ते दहा मिनिटानी मिश्रणाचा गोळा होतो व कढईपासून सुटू लागतो. आता गँस बंद करावा. मिश्रणाचे दोन भाग करावेत व एक भाग तूप लावलेल्या ताटात पसरवून वाटीने दाबावा. दुसरा कढईत तसाच राहू द्यावा. ही सर्व क्रिया झटपट करावी. अन्यथा मिश्रण खळखळीत कोरडे होते व वडी थापली जात नाही.

आता कढईमधे मिश्रणाचा जो अर्धा भाग आहे, त्यामधे स्ट्राँबेरी क्रश घालावे व पुन्हा पाच मिनिट गँस चालू करून शिजवावे.

नंतर आधीच जे पांढरे मिश्रण ताटात पसरलेय त्यावर हे स्ट्राँबेरी चे मिश्रण पसरावे. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित थापून घ्यावे. थोडे सेट झाले की चाकूने आडव्या उभ्या रेषा पाडाव्यात.

आता पुर्ण गार झाल्यावर ही आकर्षक व सुंदर चवीची बर्फी डब्यात भरून ठेवावी.

टीप्स :
*,फ्रेश क्रिम च्या ऐवजी घरच्या एक लिटर दूधावरची जाड साय व एक कप दूध घेतले तरी चालते.
• साखरेचे प्रमाण थोडे कमी-जास्त केले तरी चालते.

° खोबरे कायम खवणीने खोवून नंतरच मिक्सरमधे वाटावे.अन्यथा बर्फीला अपेक्षित आकर्षक रंग येत नाही.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

09 January 2019

स्ट्राँबेरी क्रश ( Strawberry Crush)

No comments :

सध्या बाजारात छान आंबट-गोड चवीच्या लालबुंद स्ट्राँबेरी येताहेत. सहाजिकच बघितले की घ्यावे वाटतात. घेतोही आपण पण घरी आणले की त्याचे काय करावे? प्रश्न पडतो. थोड्या नुसत्या खाल्या, कांही मिल्कशेक मधे गेल्या तर काही फ्रूट सलाडला गेल्या.राहीलेल्या वाया नको जायला म्हणून त्याचे क्रश करून ठेवले.कधीही मिल्कशेक, केक, हलवा, बर्फी बनविता येते. तर स्ट्राँबेरी क्रश कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• स्ट्राँबेरी ५०० ग्रॅम
• साखर २५० ग्रँम
• व्हिनेगर १ टीस्पून

कृती :-
प्रथम स्ट्राँबेरी देठ काढून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी.

नंतर स्ट्राँबेरीचेे चाकूने मोठे -मोठे तुकडे करावेत.

आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व स्ट्राँबेरी एकत्र घालून मंद आचेवर ठेवावे व सतत साखर विरघळेपर्यंत ढवळत रहावे.

साखर विरघळली की, व्हिनेगर घालून दोन मिनिट मिश्रण उकळू द्यावे. एकतारी पाक होतो. गँस बंद करावा.

आता थंड झाल्यावर ब्लेडरने घुसळावे. तयार क्रश काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे.

हे क्रश फ्रिजमधे ठेवले तर दोन महीन्यापर्यंत टिकते.  हवे तेव्हा काढून वापरता येते.अगदी रेडीमेड ज्यूस पिण्यापेक्षा एक भाग क्रश व तीन भाग थंड पाणी घालून झटपट ज्यूस करता येतो,  मुले आवडीने पोळीबरोबर सुध्दा खातात.

टीप: स्टाँबेरी एकदम गोड नसतील तर साखरेचे प्रमाण वाढवावे. ५०० ग्रॅम स्ट्राँबेरी असेल ४०० ग्रँम साखर घ्यावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.