Showing posts with label Misc. Fasting. Show all posts
Showing posts with label Misc. Fasting. Show all posts

04 October 2019

उपवासाची कचोरी ( Upvas Kachori)

No comments :
उपवास असला की हमखास काहीतरी चटपटीत खावे वाटते ना? तर मस्त खमंग उपवासाची कचोरी करून खा. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• उकडलेले मोठे बटाटे -  ४ नग
• उपवासाची भाजाणी - २ टेस्पून
• ओले खोबरे किस - १ -१ १/२ वाटी
• काजू ७-८
• बेदाणे १० -१५
• हिरवी मिरची बारीक चिरून २
• लिंबू अर्धा
• भाजलेल्या जिर्याची पावडर १ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम वरच्या पारीसाठी उकडलेले बटाटे साल काढून मोठ्या किसणीने किसून घ्यावेत. त्यामधे उपवास भाजणी व चवीनुसार मीठ घालून मळून एकजीव करावे व गोळा तयार करावा.

आता आतील सारणासाठी ओले खोबरे एका बाऊलमधे घेऊन त्यामधे मीठ, जिरेपूड,मिरचीचे तुकडे, काजू, बेदाणे घालूून लिंबू पिळावे व चमच्याने सर्व एकत्र मिसळावे.

नंतर वरील पारीसाठी तयार केलेल्या पीठाची लिंबाइतकी गोळी घेऊन त्याची खोलगट वाटी तयार करावी व त्यामधे तयार सारण भरून तोंड बंद करून चेंडू सारखा गोळा करावा.

आता तयार कचोर्या गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

गरमा-गरम कचोरी ओलं खोबरं, मीठ, दही, मिरची घालून वाटलेल्या चटणी बरोबर खायला द्यावी.

टिप्स :
• उपवासाची भाजणी पीठाऐवजी साबूदाणा पीठी किंवा शिंगाड्याचे पीठ किंवा आरारूट घेतले तरी चालते.
• आतील सारणामधे अर्धे खोबरे व अर्धे उकडलेले रताळे घालावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

02 October 2016

उपवासाचे भाजणीे पीठ ( Fasting Bhajani)

No comments :

उपवास म्हटले की नेहमी तीच ती शाबूदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. तर भाजणी पीठ तयार असेल तर, थालीपीठ, पुर्या किंवा कधी भाकरी व भोपळा बटाट्याची उपवासाची भाजी करता येते. याच पीठात उकडलेला बटाटा, रताळी,कच्ची केळी मिसळून कटलेट, वडे असे पदार्थ करता येतात. एकंदरीत उपवासाची भाजणी घरात ठेवणे सोयीचे असते. ऐनवेळी उपयोगी पडते.तर कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-

* वरी तांदुळ ५०० ग्रँम
* शाबूदाणा २५० ग्रँम
* राजगिरा २५० ग्रँम
* तेल किवा तूप १/२ टीस्पून 

कृती :-

प्रथम राजगिरा व वरी तांदुळ व्यवस्थित निवडून स्वच्छ करावे. शाबूदाणाही मोठ्या चाळणीतून चाळून घ्यावा म्हणजे त्यातील पीठ भाजताना कढईला चिकटत नाही.

आता सर्वात आधि राजगिरा भाजावा. याला कढई कमी तापलेली लागते. नाहीतर एकदम लाल होतो. नंतर वरी तांदुळ भाजावे. शेवटी शाबूदाणा कढईत किंचित तेल घालून भाजावा.  तेलामुळे शाबूदाणा भाजताना कढईला चिकटत नाही. अथवा तेल आधीच शाबूदाण्याला चोळून ठेवावे.

भाजलेले पदार्थ थंड होऊ द्यावेत. नंतर मिक्सरमधे, घरगुती अाटा चक्कीवर अथवा गिरणीतून दळून आणावे.

तयार पीठामधे थालीपीठ  करण्याच्या वेळी मीठ, मिरची, जीरे, दाण्याचे कूट घालून थालीपीठ करावे. थालीपीठ दही, उपवासाचे गोड लिंबू लोणचे घेऊन खावे.

टिप:
* भाजणी बेतशीरच भाजावी. अन्यथा थालीपीठ काळपट रंगाची,कडवट चवीची होतात व पीठाचा चिकटपणाही थोडा कमी होतो.

* भाजणी  हवाबंद डब्यात व कोरड्या जागी ठेवल्यास महिनाभर सहज टीकते.

* जीरे, भाजणी दळताना घातले तर त्याचा वास कमी होतो. म्हणून पदार्थ करण्यावेळी कच्चेच अाख्खे किंवा भरड घालावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 August 2016

उपवासाचा ढोकळा (Fasting Dhokala)

No comments :
उपवास म्हटले की, हमखास काहीतरी खायची इच्छा होते. पण नेहमीचीच शाबूदाणा खिचडी, वेफर्स नको असते. तर पुढील प्रकारे उपवासाचा ढोकळा करा. साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* वरी तांदुळ १ वाटी
* शेंगदाणे कूट १/२ वाटी
* आंबट ताक
* मीठ, चविनुसार
* हिरवी मिरची, आले पेस्ट
* फ्रूटसाँल्ट इनो एक टीस्पून

कृती :-
प्रथम वरी ताकामधे किमान एक तास भिजत घालावी. नंतर मिक्सरमधे वाटून घ्या. साधारण भजीच्या पीठाइतपत पातळ असावे. पाणी शक्यतो नकोच. जे भिजवलेले ताक आहे त्यातच वाटावे.

नंतर त्यामधे मीठ, मिरची व आले पेस्ट व दाण्याचे कूट घालावे. एकजीव हलवावे. शेवटी ऐनवेळी इनो पावडर घालून हलवावे.

आता लगेच तेल लावलेल्या ढोकळा पात्रात घालून १५ मिनट शिट्टी न लावता वाफवा.

शेवटी तेलामधे जीरे व हिरवी मिरची तुकडे घालून फोडणी करा व तयार ढोकळ्यावर पसरवा.

उपवासा दिवशी हा ढोकळा एकदम पोटभरीचा होतो. वरी असल्याने भूक लागत नाही. व चविला ही छान लागतो. तुम्हीही नक्की करून घा.

टीप :-  वरील तांदुळ रात्रीच भिजत घातले तर ढोकळा जास्त हलका होतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

01 August 2016

उपवासाची भजी (Pakoda)

No comments :

उपवास असला की हमखास चटपटीत काहीतरी खावे वाटते. अशावेळी ही एकदम सोपी व पट्कन होणारी भजी करा. साहीत्य व कृती,

साहित्य :-
* बटाटे २
* राजगिर्याचे पीठ अर्धा वाटी
* आरारूट पावडर १ टेस्पून
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड /हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* जीरे पूड
* तेल तंळणीसाठी

कृती :-

प्रथम बटाटे साल काढून पातळ गोल चकत्या करा व नंतर त्या चकतीच्या उभ्या बारीक स्ट्रिप कापा. (उभ्या चिरलेल्या कांद्याप्रमाणे दिसतील)

नंतर त्यावर मिरचीपूड, मीठ व जीरपूड घालून चोळा व दहा मिनिट झाकून ठेवा.

दहा मिनिटानी बटाट्याला पाणी सुटलेले असेल, आता त्यात राजगिरा पीठ व आरारूट घाला व एकत्र करा.  गरजेनुसार राजगिरा पीठ कमी -अधिक करा. मिश्रण सुटसूटीत झाले पाहीजे.  साधारण कांद्याची खेकडा भजी करतो त्याप्रमाणे असावे.

आता गरम तेलात हाताने लहान लहान भजी सोडा व कुरकुरीत तळा.

मस्त कुरकुरीत भजी नुसतीच अथवा चटणी सोबत खा.

टीप :- आरारूट पावडर नसेल तर बाईंडींग साठी शिंगाडा पीठ वापरले तरी चालते.

चकत्या जितक्या पातळ कापला येतील तितक्या पातळ कापा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.