29 June 2015

मेथी-पोहा टिक्की ( Methi-Poha Tikki)

No comments :

संध्याकाळचे वेळी चहा सोबत आपल्याला काहीतरी चटपटीत पण हेल्दी असे खाण्याची इच्छा होते.तेव्हा ही टिक्की नक्की ट्राय करा एकदम सोपी, झटपट व पौष्टीकपण ! कशी करायची पहा..

साहीत्य :-
1) मेथी धुवून बारीक चिरून 2 वाट्या
2) पातळ पोहे 1 वाटी
3) उकडलेला बटाटा 2
4) कांदा 1 बारीक चिरून
5) कसूरी मेथी 2 टीस्पून
6) आल,लसूण हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
7) गरम मसाला 1/2 टीस्पून
8) आमचूर पावडर 1 टीस्पून
9) धना-जिरा पावडर 1 टीस्पून
10) मीठ चवीनुसार
11) हींग,हळद व जिरे-मोहरी फोडणीसाठी
12) तेल 1टेस्पून फोडणीसाठी
13) तळणीसाठी गरजे इतके
14) मैदा 1 टेस्पून

कृती :-

       प्रथम पॅनमधे फोडणीसाठी तेल घालून जिरे ,मोहरी व हींग, हळद घालून फोडणी करून घ्यावी. फोडणीत कांदा व आल-लसूण,मिरची घालून परतावे.मऊ झाला कांदा की नंतर त्यात चिरलेली मेथी , कसूरी मेथी व उकडलेला बटाटा घालून परता.

आता त्यात गरम मसाला, मीठ, आमचूर पावडर,धना-जिरा पावडर सर्व साहीत्य घालून नीट हलवा व एकजीव करा. गॅस बंद करा.नंतर
त्यात पोहे थोडे(पाव वाटी) शिल्लक राखून बाकीचे घाला व एकजीव करा.आता थंड होऊ दे.

थंड झाल्या नंतर आपल्या आवडीप्रमाणे साधारण मोठ्या लिंबा एवढे चपटे गोल गोळे करावेत. व मैदा घेऊन त्यात पाणी घालून पातळ पेस्ट बनवून घ्या.त्यात एक-एक गोळे बुडवून काढा व शिल्लक पोहे डिशमधे पसरा व त्यात घोळवा.

गरम तेलात मंद तांबूस रंगावर तळून काढावेत.
मस्त क्रिस्पि टिक्की तयार! चहा सोबत किवा हिरव्या चटणी सोबत,साॅससोबत कशासोबत पण आपल्या आवडीप्रमाणे खावे.

टीप :- तळण्याऐवजी शॅलोफ्राय केले तरी चालते. पण शॅलोफ्राय करायचे असेल तर पोह्यामधे घोळवण्याऐवजी ब्रेडक्रम्स किवा रव्यात घोळवावे व मग शॅलोफ्राय करावे.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

24 June 2015

पुदीना पराठा (Pudina Paratha)

No comments :

पुदीना ही कोथिंबिर वर्गातील वनस्पति आहे. पुदीन्याचा गंध व रंगच कसा मनाला तरतरी आणणारा आहे! हा गुणाने थंड आहे.तसेच सहजासहजी कुठेही,अगदी कुंडीतसुध्दा लावला तर विनासायास येऊ शकतो. पुदीना पाचक आहे.याच्या सेवनाने भुक लागते. अपचन,मळमळ, पोटदुखी कमी होते. आणखी बरेच औषधी गुणधर्म आहेत. पुदीना चटणी, रस्सा, पुलाव, सरबत, अशा खुप काही पदार्थात वापरतात.पण फारसा रोजच्या जेवणात वापरला जात नाही व भरपूर प्रमाणात पोटात जात नाही. म्हणून मी आज त्याचे पराठे बनवणार आहे.अतिशय रूचकर लागतात. हे दोन प्रकारानी बनवता येतात. एक म्हणजे कोरडी पुदीना पावडर वापरून.व दुसरा ताज्या हिरव्या पुदीन्याचे.मी ताज्या पुदीन्याचे केलेत.कसे ते पहा.

साहीत्य :-

1) कणिक 2 वाट्या
2) पुदीना धुवून ,बारीक चिरून 1 वाटी
3) हिरवी मिरची, आलं ,लसूण पेस्ट 1 टीस्पून
4) कोथंबिर उपलब्धततेनुसार
5) धना-जिरा पावडर 1 टीस्पून
6) हळद,हींग,लाल मिरची पुड, गरम मसाला
7) मीठ चवीनुसार
8) तेल आत घालण्यासाठी 1टेस्पून
9) बटर/तूप भाजण्यासाठी
10) पाणी पीठ मळण्यासाठी

कृती :-
       प्रथम अर्ध्या पुदीन्याची व कोथंबिरची पेस्ट करून घ्यावी.

आता कणिक घेऊन त्यात राहीलेला पुदीना, कोथंबिर व वरील सर्व मसाला घालावा.थोडे तेलही पीठ मळताना घालावे.मळून अर्धा तास झाकून ठेवावे.

अर्ध्या तासाने घडीच्या पोळीप्रमाणे मधे तेल लावून घडी करून थोडे जाडसरच पराठे लाटावेत. तव्यावर दोन्ही बाजूने बटर किवा तूप सोडून खरपूस भाजावेत.

असे गरमा-गरम खरपूस पराठे कोणत्याही कोरड्या अथवा ओल्या चटणी सोबत, लोणच्या सोबत किवा नुसतेही चहा बरोबर खायला चवदार लागतात. तसेच मुलांना डब्यात द्यायलापण सोईचे!

टीप :- पुदीना व कोथंबिर वाटून घेतल्याने पराठ्याना रंग व स्वाद खूप छान येतो.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

23 June 2015

कोबि कोफ्ता करी ( Cabbage Kofta curry)

No comments :

रोज तीच ती पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. पण मंडईत पण ज्या सिझनमधे उपलब्ध असतील त्याच भाज्या येणार. मग अशा वेळी भाजी करण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला तर जेवणाची लज्जत वाढते.कोबीची भाजी म्हणले की घरात सर्वजण नाक मुरडतील पण त्याच कोबीची कोफ्ता करी म्हणले की लगेच भूक प्रज्वलीत होते व आनंदाने खाल्ली जाते.म्हणून आज मी कोबीची कोफ्ता करीच कशी करायची सांगते. पहा

साहीत्य:-
कोफ्त्यासाठी
1) किसलेला कोबि 2 वाट्या
2) चना डाळीचे पिठ 3-4 टेस्पून
3) तिखट, मीठ, हिंग,हळद धना-जिरा पावडर चविनुसार
4) तेल तळणीसाठी

करीसाठी
1) कांदा 1मोठा
2) आल एक इंच-लसूण 4-5 पाकळ्या
3) लाल टोमॅटो 2
4) चना डाळ पिठ 1 टेस्पून
5) दही 2टेस्पून
6) गरम मसाला 1 चमचा
7) धना-जिरा पावडर 2 चमचा
8) लाल तिखट 2 टीस्पून
9) मीठ
10) फोडणीसाठी तेल 2 टेस्पून
11) फोडणीचे साहीत्य जिरे,मोहरी,हिंग व हळद
12) बारीक चिरलेली कोथंबिर
13) पाणी

कृती :-

      प्रथम कोबि किसून घ्यावा व उकळत्या पाण्यात टाकावा . (कोबि साधारण मऊ करून घेतला की कोफ्ते करीमधे सुटत नाहीत) पाच मिनिटात गॅस बंद करावा.

थोडे थंड झाले की एका पातेल्यावर चाळणी ठेऊन पाणी काढावे.(निघालेले पाणी फेकू नका.करीसाठी उपयोगात आणा.पुर्ण पाणी निथळलले की हातानेच दाबून पिळून शिल्लक पाणी काढून टाकावे.

आता कोबिमधे डाळीचे पिठ ,तिखट,मीठ,हींग व धना-जिरा पावडर घालावी व नीट एकत्र करावे. लिंबाच्या आकाराचे लहान-लहान गोळे करावेत व गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत.

नंतर करीसाठी एका पॅनमधे तेल गरम करत ठेवावे. कांदा,टमाटा व आले-लसुण पेस्ट करून घ्यावी. तेलात मोहरी, जिरे, हींग व हळद टाकून फोडणी करा. त्यात एक चमचा डाळीचे पिठ घालून थोडे भाजा. त्यावरच तयार केलेली पेस्ट घाला व  परतत रहा.परतानाच त्यावर गरम मसाला, धना-जिरा पावडर,मिरची पावडर व मीठ घाला. दहीपण आताच घालावे. तेल सुटेपर्यत चांगले खमंग परतावे.

परतल्यावर दोन वाट्या पाणी घालावे व झाकून पाच मिनिट उकळी आणावी. आवडी नुसार पाणी कमी-जास्त करावे.  परंतू करी शक्यतो दाटसरच असावी.

आता तयार करीमधे वर तळून तयार असणारे कोफ्ते सोडा व एक उकळी येऊ द्या. वरून कोथंबिर घाला.

गरमा-गरम कोफ्ता करी फुलके अथवा पोळीसोबत सर्व्ह करा.

टीप:- कोफ्ते तयार करताना डाळीचे पीठ घातल्यावर पण जर पीठ जर सैल वाटले तर थोडेसे ब्रेडक्रमस् घालावेत .म्हणजे गोळे खुटखुटीत असे होतात. करीमधे घातल्यावर रद्दा होत नाही.

कोबी प्रमाणे दुधी,पनीर, बटाटा, इत्यादीचे पण अशाच पध्दतीने कोफ्ते करतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 June 2015

क्रिस्पी कारले चिप्स ( Crispy Bitter gourd Chips)

No comments :

कारल ही भाजी सर्वांच्याच परिचयाची आहे. बर्याच घरी ती कडू असते या कारणास्तव सहसा केली जात नाही.मुलांना तर अजिबातच आवडत नाही. पण कारले औषधी आहे. शक्तीवर्धक, पित्तनाशक व सारक आहे. त्यात इन्शुलीन सारखा पदार्थ असल्याने ते मधू मेहावर उपयोगी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधूमेही रूग्णानी कारल्याचा रस, बियांची पूड, किवा कारली उकडून काढाही घ्यावा. तसेच कारल्याच्या सेवनाने रक्तदाब,मेंदूचे विकार, डोळ्याच्या तक्रारी,रक्तदोष इ. पण दूर होणेस मदत होते.अशा या गुणी कारल्याला,' तूपात तळा,साखरेत घोळवा कडू ते कडूच' असे म्हणले जाते.पण मी आज जे चिप्स सांगणार आहे ते अजिबात कडू न लागता खमंग लागतात. मुलेसुध्दा आनंदाने खातात.कसे करावेत पूढे कृती बघा.

साहीत्य:-

1) पांढरी कारली 3-4
2) लाल मिरचीपूड, मीठ,चाट मसाला,आमचूर पावडर व हळद
3) तळणीसाठी तेल

कृती :-

    प्रथम कारली धुवून पुसून त्याच्या बिया काढून बोटाएवढ्या लांबीचे पातळ उभे काप करून घ्या.

नंतर हे काप मीठ व हळद घातलेल्या उकळत्या पाण्यात टाकावेत.तसेच पाच मिनिट खळखळ उकळू द्यावेत. पाच मिनीटानी गॅस बंद करून खाली उतरवा.

आता हे काप चाळणीवर काढावे व वरून थंड पाणी ओतावे.तसेच चाळणीवर निथळत राहू द्यावेत. पाणी पूर्ण निथळल्यावर कापडावर किवा पेपरवर पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्यावेत.

नंतर तेल तापत ठेवावे व गरम तेलात मंद आचेवर छान तांबूस गुलाबी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढावेत.

सगळे तळून झाले की त्यावर तिखट, मीठ, मसाला व आमचूर पावडर आपल्याचवीनुसार वरून भुरभूरावी आणि अलगद हातानी चिप्स मोडू न देता हलवावे. मस्त कुरकरीत चिप्स तयार. जेवणात साईड डीश म्हणून किवा नुसतेही चहासोबत तोंडात टाकता येते. 

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 June 2015

साखर आंबा (Mango Sweet)

1 comment :


सामान्यपणे उन्हाळा संपत आला की,त्याआधी 
निरनिराळी लोणची,मुरांबे,साखरआंबा, सांडगे, पापड,कुरडया या वस्तू पूढे येणारा पावसाळा सुखकर जावा या हेतूने केल्या जातात. साखरआंबा साधारणपणे तोतापुरी आंब्याचा करण्याची पध्दत आहे.कारण तो आंबट नसतो त्यामुळे त्याला साखर कमी लागते. पण मी आंबा संपत आला की शेवटी शेवटी हापूस आंब्यातिलच थोडे हिरवट व घट्ट आंबे घेऊन साखरआंबा करते. कारण हापूसचा जो एक विशिष्ट स्वाद, रंग असतो तो इतर कुठल्याही आंब्याला नसतो. कसा केला पहा.
साहीत्य:-
* मोठे आंबे २ नग
* साखर ४ वाट्या
* पाणी २ वाट्या
* लिंबूरस २ टीस्पून
* वेलचीपूड
कृती:- 
प्रथम आंबा साल काढून त्याच्या साधारण चपट्या व रूपयाच्या नाण्याएवढ्या आकाराच्या फोडी करून घ्याव्यात.

साखरेत पाणी घालून मंद गॅसवर पाक करण्यास ठेवावे. सतत ढवळत रहावे व पक्का गोळीबंद पाक करावा.तयार पाक खाली उतरवून त्यात लिंबूरस व वेलचीपूड घालावी. आता त्यात चिरलेल्या आंब्याच्या फोडी घालाव्यात. व एक तास झाकून ठेवून द्यावे.

एक तासाने पाक सैल झालेला दिसेल व फोडी मऊ झालेल्या असतील. आता परत पातेले गॅसवर ठेवून त्याला एक उकळी आणा. आंब्याच्या फोडी पारदर्शक दिसू लागतील .गॅस बंद करा. थंड होऊ दे.

आता थंड झाल्यावर दाटसर दिसू लागेल. आता घट्ट झाकणाच्या व काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवा. गरम पोळी , फुलके किंवा ब्रेड सोबत केव्हाही खाता येते.तसेच ब्रेडला लावून डब्यात देण्यास पण सोईचे होते.

टीप :- आंबे एकदम पिकलेले मऊ नसावेत. पिकलेले पण कडक असावेत. तोतापुरी आंबे व पिकत आलेले हापूस आंबे असे दोन्ही निम्मे निम्मे घ्यावेत. जास्त चांगला साखरआंबा होतो. 

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 June 2015

दोडक्याच्या शिरांची चटणी (Chutney )

No comments :

जेवताना डाव्या बाजूला चटणी, लोणचे असे कांही चवीला असले की जरा जेवणाची लज्जत वाढते. आपण दोडका,दुधी,लाल भोपळा अशा अनेक भाज्या रोजच्या जेवणात वापरतो.पण आपण त्यांच्या साली टाकून देतो. पण त्यातपण पौष्टीकपणा खूप  असतो. त्यांच्या चटण्या कराव्यात.खूप छान होतात.आज दोडक्याच्या सालींची चटणी दाखवते. कशी पहा!

साहीत्य :-

1) अर्धा किलो दोडके स्वच्छ धुवून मग त्याच्या काढलेल्या साली
2) भाजलेले शेंगदाण्याचे कूट 2 टेस्पून
3) तिखट,मीठ
4) फोडणीसाठी जिरे,मोहरी,हिंग व तिळ
5) तेल 2 टेस्पून

कृती:-

         दोडक्याच्या काढलेल्या साली दगडी खलबत्त्यामधे प्रथम थोड्या हलकेच ठेचा व हाताने दाबून त्यातील रस पिळून काढा.

आता एका कढईत तेल घाला व तापले की त्यात फोडणीचे साहीत्य घालून फोडणी करा.नंतर त्यावर ठेचलेल्या शिरा घाला व मंद आचेवर परतत रहा. खरपूस भाजून झाल्या की त्यात दाण्याचे कूट व तिखट,मीठ घाला आणि एक-दोन परतण्या द्या.मस्त कुकूरीत चटणी तयार !

हवाबंद बाटलीत भरून ठेवा.एक-दोन दिवसांत संपवून टाका.कारण चुरचूरीत असेपरेंतच छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

झटपट गोड चिरोटे ( Chirote)

No comments :

आमच्याकडे गोड सर्वानाच फार आवडते. अक्षयतृतीयेपासून जे आंबा व आंब्याचे विविध प्रकार चालू होतात ते एक पाऊस पडला कीच बंद ! पण आता सतत गोड काय ?हा प्रश्न सतावतो.मग पट्कन होणारे चिरोटे केले.हे अगदी दहा मिनिटात होतात.तसेच शाळेच्या मुलांना लहान सुट्टीच्या डब्यात द्यायला पण सोईचे आहे.अगदी कमी साहीत्य व झटपट ! कसे ते पहा...

साहीत्य :-
1) खारी पापुद्र्याची बिस्कीट्स  10-12
2) साखर 1 वाटी
3) पाणी 1/2 वाटी
4) वेलचीपूड
5) ड्रायफ्रूट्स पातळ काप आवडीनुसार

कृती :-
        प्रथम साखरेत पाणी घालून मंद आचेवर पाक करून घ्यावा.पाक कच्चा किंवा फार घट्ट असू नये. एकतारी करावा. खाली उतरवून त्यात वेलची पूड घालावी.

आता एक-एक बिस्कीट पाकात बुडवून पापडाच्या चिमट्याने काढावे व एका डिशमधे ठेवावेत. थंड व्हायच्या आधी पट्कन बदाम पिस्ता काप वर लावावेत म्हणजे चिकटतात. व थंड होऊ द्या.

थंड झाले की खायला तयार. असे झटपट चिरोटे आपल्या पारंपारीक चिरोट्या पेक्षाही अतिशय खुसखूषीत लागतात व चव पण हुबेहूब किवा काकंणभर सरसच लागते.
बघा तुम्हीपण करून. पण याला अट एकच की बिस्कीटे ताजी  व खुसखूषीत असावीत.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

08 June 2015

मसाला पराठा( Masala Paratha)

No comments :

 टिफीनला पोळी भाजी नेणे मुलांना सहसा नको असते.आवडत नाही ! त्यापेक्षा तीच भाजी भरून केलेला किवा मसाला पराठा आनंदाने खातात.मुळात पराठा हा प्रकार खाण्यास,नेण्यास सुटसूटीतच असतो. तसेच करणेही सोईचे असते. पट्कन होतो व दही, लोणचं किवा चटणी साॅस कशा सोबतही खायला छान लागतो.तर आज मसाला पराठा करू .काय काय साहीत्य लागते व कसा ते पहा.

साहीत्य:-
1) कणिक 4 चमचे
2) कसुरी मेथी 2 टेस्पून
3) धना-जिरा पाडर 2 टीस्पून
4) लाल मिरची पावडर आवडीनुसार
5) हळद,हिंग,मीठ चविनूसार
6) ओवा चिमूटभर
7) तेल
8) पाणी

कृती :-
  प्रथम कणिक एका पसरट भांड्यात घ्या. त्यात वरील सर्व मसाला घाला व नीट एकत्र करा. दोन टीस्पून तेल घाला व गरजेनुसार पाणी घालून कणिक मळा.फार घट्ट अथवा सैल नको.पंधरा मि.झाकून ठेवा.

आता घडीच्या पोळीप्रमाणे तेल घालून घडी करा व थोडं जाडसरच लाटा व तव्यावर तेल सोडून खरपूस भाजा.

गरमा-गरम खमंग पराठे तयार ! लोणच चटणी लावून डब्यात द्या किवा दह्यासोबत घरात खा ! एकदम पोटभरीचे होते. झटपट होते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.