रोज तीच ती पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. पण मंडईत पण ज्या सिझनमधे उपलब्ध असतील त्याच भाज्या येणार. मग अशा वेळी भाजी करण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला तर जेवणाची लज्जत वाढते.कोबीची भाजी म्हणले की घरात सर्वजण नाक मुरडतील पण त्याच कोबीची कोफ्ता करी म्हणले की लगेच भूक प्रज्वलीत होते व आनंदाने खाल्ली जाते.म्हणून आज मी कोबीची कोफ्ता करीच कशी करायची सांगते. पहा
साहीत्य:-
कोफ्त्यासाठी
1) किसलेला कोबि 2 वाट्या
2) चना डाळीचे पिठ 3-4 टेस्पून
3) तिखट, मीठ, हिंग,हळद धना-जिरा पावडर चविनुसार
4) तेल तळणीसाठी
करीसाठी
1) कांदा 1मोठा
2) आल एक इंच-लसूण 4-5 पाकळ्या
3) लाल टोमॅटो 2
4) चना डाळ पिठ 1 टेस्पून
5) दही 2टेस्पून
6) गरम मसाला 1 चमचा
7) धना-जिरा पावडर 2 चमचा
8) लाल तिखट 2 टीस्पून
9) मीठ
10) फोडणीसाठी तेल 2 टेस्पून
11) फोडणीचे साहीत्य जिरे,मोहरी,हिंग व हळद
12) बारीक चिरलेली कोथंबिर
13) पाणी
कृती :-
प्रथम कोबि किसून घ्यावा व उकळत्या पाण्यात टाकावा . (कोबि साधारण मऊ करून घेतला की कोफ्ते करीमधे सुटत नाहीत) पाच मिनिटात गॅस बंद करावा.
थोडे थंड झाले की एका पातेल्यावर चाळणी ठेऊन पाणी काढावे.(निघालेले पाणी फेकू नका.करीसाठी उपयोगात आणा.पुर्ण पाणी निथळलले की हातानेच दाबून पिळून शिल्लक पाणी काढून टाकावे.
आता कोबिमधे डाळीचे पिठ ,तिखट,मीठ,हींग व धना-जिरा पावडर घालावी व नीट एकत्र करावे. लिंबाच्या आकाराचे लहान-लहान गोळे करावेत व गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
नंतर करीसाठी एका पॅनमधे तेल गरम करत ठेवावे. कांदा,टमाटा व आले-लसुण पेस्ट करून घ्यावी. तेलात मोहरी, जिरे, हींग व हळद टाकून फोडणी करा. त्यात एक चमचा डाळीचे पिठ घालून थोडे भाजा. त्यावरच तयार केलेली पेस्ट घाला व परतत रहा.परतानाच त्यावर गरम मसाला, धना-जिरा पावडर,मिरची पावडर व मीठ घाला. दहीपण आताच घालावे. तेल सुटेपर्यत चांगले खमंग परतावे.
परतल्यावर दोन वाट्या पाणी घालावे व झाकून पाच मिनिट उकळी आणावी. आवडी नुसार पाणी कमी-जास्त करावे. परंतू करी शक्यतो दाटसरच असावी.
आता तयार करीमधे वर तळून तयार असणारे कोफ्ते सोडा व एक उकळी येऊ द्या. वरून कोथंबिर घाला.
गरमा-गरम कोफ्ता करी फुलके अथवा पोळीसोबत सर्व्ह करा.
टीप:- कोफ्ते तयार करताना डाळीचे पीठ घातल्यावर पण जर पीठ जर सैल वाटले तर थोडेसे ब्रेडक्रमस् घालावेत .म्हणजे गोळे खुटखुटीत असे होतात. करीमधे घातल्यावर रद्दा होत नाही.
कोबी प्रमाणे दुधी,पनीर, बटाटा, इत्यादीचे पण अशाच पध्दतीने कोफ्ते करतात.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment