कारल ही भाजी सर्वांच्याच परिचयाची आहे. बर्याच घरी ती कडू असते या कारणास्तव सहसा केली जात नाही.मुलांना तर अजिबातच आवडत नाही. पण कारले औषधी आहे. शक्तीवर्धक, पित्तनाशक व सारक आहे. त्यात इन्शुलीन सारखा पदार्थ असल्याने ते मधू मेहावर उपयोगी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधूमेही रूग्णानी कारल्याचा रस, बियांची पूड, किवा कारली उकडून काढाही घ्यावा. तसेच कारल्याच्या सेवनाने रक्तदाब,मेंदूचे विकार, डोळ्याच्या तक्रारी,रक्तदोष इ. पण दूर होणेस मदत होते.अशा या गुणी कारल्याला,' तूपात तळा,साखरेत घोळवा कडू ते कडूच' असे म्हणले जाते.पण मी आज जे चिप्स सांगणार आहे ते अजिबात कडू न लागता खमंग लागतात. मुलेसुध्दा आनंदाने खातात.कसे करावेत पूढे कृती बघा.
साहीत्य:-
1) पांढरी कारली 3-4
2) लाल मिरचीपूड, मीठ,चाट मसाला,आमचूर पावडर व हळद
3) तळणीसाठी तेल
कृती :-
प्रथम कारली धुवून पुसून त्याच्या बिया काढून बोटाएवढ्या लांबीचे पातळ उभे काप करून घ्या.
नंतर हे काप मीठ व हळद घातलेल्या उकळत्या पाण्यात टाकावेत.तसेच पाच मिनिट खळखळ उकळू द्यावेत. पाच मिनीटानी गॅस बंद करून खाली उतरवा.
आता हे काप चाळणीवर काढावे व वरून थंड पाणी ओतावे.तसेच चाळणीवर निथळत राहू द्यावेत. पाणी पूर्ण निथळल्यावर कापडावर किवा पेपरवर पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्यावेत.
नंतर तेल तापत ठेवावे व गरम तेलात मंद आचेवर छान तांबूस गुलाबी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढावेत.
सगळे तळून झाले की त्यावर तिखट, मीठ, मसाला व आमचूर पावडर आपल्याचवीनुसार वरून भुरभूरावी आणि अलगद हातानी चिप्स मोडू न देता हलवावे. मस्त कुरकरीत चिप्स तयार. जेवणात साईड डीश म्हणून किवा नुसतेही चहासोबत तोंडात टाकता येते.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment