30 October 2014

भरली भेंडी ( Stuffed Bhendi)

No comments :
साहीत्य:-
* भेंडी अर्धा किलो
* चना डाळ पीठ १ वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/२ वाटी
* हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट एक चमचा
* मीठ चवीनुसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* कोथिंबीर
* मोहरी, हींग, हळद, तेल फोडणीसाठी

कृती:-
प्रथम भेंडी धुवून ,पुसून चांगली कोरडी करून घ्यावी.नंतर देठ व शेंडा कापून मधून पोट फाडून उभी चिरावी. कडेला ठेवून द्यावी.

आता मधल्या सारणासाठी डाळीचे पीठ थोड्या तेलावर भाजून घ्यावे.त्याला तेलाचा वास येणार नाही याची काळजी घ्यावी.म्हणजे वास येणार नाही इतपतच भाजावे.

नंतर हे भाजलेले पीठ,दाण्याचे कूट,आले,लसूण मिरची पेस्ट मीठ आमचूर पावडर सर्व घालून नीट एकसारखे करावे.

नंतर वरील मिश्रण प्रत्येक भेंडीमधे भरावे आणि तेलाची फोडणी करून त्यात अलगद टाकाव्यात.हलक्या हाताने व्यवस्थित हलवाव्यात व पाच मिनिट वाफ येण्यास झाकून ठेवावे.
आता झाकणी काढून परत एकदा नीट हलवावे व गॅस बंद करावा.

तयार भाजी बाऊल मधे काढावी व वरून कोथिंबीर पेरावी.

टीप :- भेंडी घेताना शक्यतो लहान व कोवळी घ्यावी.म्हणजे एका वाफेत शिजते व लहान असल्याने एक-एक उचलून खाणे सोयीचे होते.

तसेच ही भाजी शक्य असेल तर ओव्हन मधेच करावी.झटपट तर होतेच व खालून लागण्याची भिती रहात नाही.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
     

27 October 2014

पालकाची पातळ भाजी (Spinach Saag)

No comments :
पालक ही एक गडद हिरव्या रंगाची,रूंद पानाची थंड व पौष्टीक भाजी आहे.पालकामधे अॅमिनो अॅसिड,फाॅलीक अॅसिड,लोह व विटामिन ' ए ' असते.या भाजीतून आपल्याला,मांस,अंडी मासे ,कोंबडी या पासून जेवढी प्रथिने मिळतात तेवढीच प्रथिने मिळतात. पालक बर्याच प्रकारानी आपल्या आहारात वापरता येतो.उदा . भाजी , सूप ,कोशिंबिर, पराठा,पुरी इ.यातील भाजीचा एक प्रकार पूढीलप्रमाणे करता येतो.

साहित्य:-
* पालक एक जुडी
* भिजवलेले शेंगदाणे व चना डाळ अर्धी वाटी
* चना डाळ पीठ १ टेस्पून
* शेंगदाणा कूट १ टेस्पून
* आंबट ताक अर्धी वाटी किंवा चिंचेचा कोळ
* मीठ चवीसाठी
* गूळ लहान सुपारीएवढा ( आंबट घातले की थोडे गोड )
* फोडणीसाठी तेल,हींग, मोहरी,हळद हीरव्या मिरचीचे तूकडे आवडत असल्यास लसूण
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम पालक निवडून स्वच्छ धुवून,बारिक चिरून घ्यावा व एका पातेलीत वाफविणयास गॅसवर ठेवावे.

आता पातेले खाली घेऊन वाफवलेले पालक पळीने घोटावे त्यात डाळीचे पीठ,दाण्याचे कूट,गूळ,मीठ घालावे. तसेच ताक व थोडे पाणी घालून सर्व नीट सारखे करून घ्यावे.पाणी फार जास्त घालू नये.थोडी घट्टसरच ठेवावी.

आता पळीमधे तेल गरम करून हींग मोहरी मिरची, हळद सर्व घालून चांगली फोडणी करावी व वरील तयार भाजीवर घालावी व एक उकळी काढावी.

अशी गरमा-गरम तयार भाजी पोळी अथवा भाताबरोबर वाढावी.खूप छान लागते.

टीप :- विटामिन ' C ' मूळे लोह शोषणाची क्रीया होते.म्हणून पालकाच्या भाजीमधे आंबट ताक किंवा चिंच अवश्य घालावे.त्यामूळे त्यातील पूर्ण  लोह शोषले जावून शरीराला मिळते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

बिटरूट हलवा (Beet root halawa )

No comments :
बिट हे एक रसाळ कंद आहे.यात नैसर्गिक साखर विपूल प्रमाणात असूनही कॅलरीज कमी असतात.बिटाच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.तसेच अँनिमिया,मुळव्याध,बध्दकोष्टता या विकारात अत्यंत गुणकारी आहे.अशा या बिटाचा उपयोग विविध प्रकारानी आपल्या आहारात करावा.म्हणून सर्वाना आवडेल अश्या बिटरूट हलव्याची कृती पुढे दिली आहे.

साहीत्य:-
* मध्यम आकाराचे  बिट २
* साखर १ वाटी
* सायीसह दूध १ कप
* वेलची पावडर
* ड्राय फ्रूट्स आवडीप्रमाणे
* तूप १ टेस्पून

कृती:-
प्रथम बिट साल काढून किसून घ्यावे.किस हाताने दाबून त्यातीरस पिळून काढावा.
आता गॅसवर पॅन ठेवून त्यात आधि तूप घालावे व त्यावर किस टाकून परतावा.
परतून साधारण मऊ झाल्यावर त्यामधे दूध घालावे व आटेपर्यंत शिजवावे.
शेवटी साखर घालून विरघळेपर्यंत हलवावे.
आता तयार हलव्यामधे वेलचीपूड ड्रायफ्रूट्स घालून खायला द्यावे.
टीप :- पिळून काढलेला रस टाकून न देता मिठ मिरपूड घालून पिणास द्यावा अथवा सूपसाठी वापरावा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

20 October 2014

रसगुल्ला (Rasgulla)

No comments :
साहित्य:-
* गाईचे दूध अर्धा लिटर
* अर्धा लिंबू
* साखर अर्धी वाटी
* पाणी साखरेच्या तिप्पट
* चिमुटभर सोडा

कृती :-
प्रथम दूध गॅसवर गरम करण्यास ठेवावे.दूध तापले की गॅस बंद करावा .
एका वाटीत अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावा व लिंबूचे पाणी तयार करून घ्यावे.
आता हे पाणी गरम दूधामधे ,दूध हलवत-हलवत घालावे.दूध फाटले की थांबावे.
नंतर हे फाटलेले दूध गाळणीवर सुती स्वच्छ कपडा घालावे व त्यावर ओतावे व वरून एक ग्लास थंड पाणी घालावे.म्हणजे जो आपण लिंबू पिळला आहे त्याचा आंबटपणा निघून जातो व पनीर गार पण होते.

आता कपडा पिळून शक्य तितके  पाणी काढून टाकावे.पनीर एका डिश मधे काढून घ्यावे व चिमूटभर सोडा टाकून चांगले मळून मऊ करून घ्यावे.गुठळ्या राहू देऊ नयेत.
आता पनीरचे लहान-लहान गोळे करावेत व बाजूला ठेवावेत.

साखर व पाणी एकत्र करून गॅसवर ठेवावे. साखर विरघळून पाणी उकळू लागले की तयार पनीरचे गोळे त्यात सोडावेत व दहा ते पंधरा मिनीट शिजू द्यावेत.चांगले शिजले की रसगुल्ले फुलून मोठे होतात मग गॅस बंद करावा. थोडावेळ रसगुल्ले पाकात राहू द्यावेत.

थंड झाले की मस्त स्पाॅजी रसगुल्ले सर्व्ह करावेत.
टीप :- पाक ऊकळत असतानाच रसगुल्ले सोडावेत.सतत ऊकळतच असावा पंधरा मि पर्यंत.नाहीतर रसगुल्ले पाकात विरघळतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

18 October 2014

क्रिस्पी मसाला हार्टस् (Crispy masala hearts )

No comments :
दिवाळीच्या फराळात आपण नेहमीचे पारंपारिक पदार्थ बनवतोच,पण त्यात थोडाफार बदल केला तर फराळ करताना थोडी मजा येते.तर यासाठी पुढे दिल्याप्रमाणे क्रिस्पी मसाला हार्टस्  ट्राय करा.

साहीत्य :-
* मैदा १ वाटी
* गव्हाचे पिठ १/२ वाटी
* मक्याचे पिठ २ टेस्पून
* मिरची पेस्ट आवडीनुसार
* मीठ
* तिळ १ टीस्पून
* ओवा अर्धा टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून 
* कसूरी मेथी चिमूटभर
* कोथिंबीर
* गरम तेल २ टेेस्पून (मोहन)
* तळणीसाठी तेल
* चिमूटभर सोडा

कृती:-
प्रथम मैदा,कणिक मका पिठ एका पसरट भांड्यात एकत्र घ्यावे.नंतर त्यामधे वर सांगितलेला सर्व मसाला घालावा.दोन चमचे तेल गरम करून घालावे.आधि सर्व कोरडे मिश्रण हाताने सारखे करावे.नंतर पाणी घेऊन नेहमीच्या कणिकेप्रमाणे कणिक मळावी. व दहा मिनिटे झाकून ठेवावे.

दहा मिनिटानी कणकेचा लहान गोळा घेऊन,थोडी जाडसर पोळी लाटावी व हार्ट शेपच्या कटलेट मोल्डने छोटे-छोटे हार्ट कापून गरम तेलात तळावेत.

थंड झाल्यावर खुसखूषीत होतात .नंतर चहाबरोबर सर्व्ह करावेत.

टीप :- मिरची पेस्ट ऐवजी मिरची पावडर वापरली तरी चालते. किंवा आवडत असेल तर आले लसूण पेस्ट घालावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

लाल भोपळ्याच्या घार्या (Lal bhoplyachya gharya)

No comments :
मुलांना मधल्या वेळी खाण्यास किंवा डब्यात देण्यासाठी घार्या किंवा घारगे हा पौष्टीक पदार्थ आहे.तसेच प्रवासात नेण्यासाठी पण सोयीचा आहे.आठ दिवस सहज टिकतो. कशा करायच्या साहित्य व कृती-👇 

साहीत्य:-
* लाल भोपळ्याचा खिस ३ वाट्या
* गूळ ३ वाट्या
* कणिक  वाट्या अथवा मावेल तेवढी
* चनाङाळ पीठ अर्धी वाटी
* दूध २ वाट्या
* तेल
* मीठ चिमूटभर 

कृती:- 
प्रथम भोपळा किसून घ्यावा.किस जाड बुडाच्या भांङ्यामधे घेऊन त्यामधे दूध घालावे व शिजत ठेवावे.किस शिजून मऊ झाला की, त्यात गूळ घालावा.गूळ विरघळला की गॅस बंद करावा.मिश्रण थंड होऊ द्यावे.

आता थंड झालेल्या मिश्रणामधे कणिक व डाळीचे पीठ, मीठ घालून तेल घेऊन गोळा मळावा. कणिक गरजेनुसार कमी-जास्त करावी.परंतू जास्त घट्ट मळू नये,घार्या चिवट होतात.अर्धा तास पीठ झाकुन ठेवावे.
अर्ध्या तासाने थोङ्या जाडसरच लहान-लहान पुर्या लाटून तळाव्यात.साजूक तूपाबरोबर सर्व्ह करा.

टीप:- 
* खिस नूसता वाफवण्याऐवजी दूधामधे शिजवल्यामूळे घार्या छान मऊसर होतात.

तूर डाळीची भजी (Tuwar dal bhaji )

No comments :
साहित्य :-
* तूर डाळ २ कप
* खवलेला नारळ १ कप
* मध्यम आकाराचा कांदा १नग
* हिरवी मिरची,आलं,कोथंबिर   
      आवडीनुसार

कृती :-
प्रथम डाळ स्वच्छ धुवून १-२ तास  भिजत घालावी.

नंतर,डाळीमधील सर्व पाणी निथळून काढून टाकावे व डाळ ,मिरची,कोथंबीर सर्व एकत्र करून ,पाणी न घालता थोडे भरडच मिक्सरवर वाटून घ्यावे.

त्यामधे बारिक चिरलेला कांदा,खवलेला नारळ व चवीनुसार मीठ घालावे.हाताने एकसारखे करून घ्यावे व हातानेच छोटी-छोटी भजी  तेलामध्ये सोडून मध्यम आचेवर तळावी.

मस्त गरमा-गरम खुसखूशीत भजी तयार. हिरवी चटणी अथवा साॅस बरोबर सर्व्ह करावीत.

टिप:-
सारणामध्ये गरम तेल अथवा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

बेसन लाडू (Besan ladu)

No comments :
दिवाळीच्या फराळतला शेलका व बहुतेक सर्वाना आवडणारा लाडू म्हणजे बेसन लाडू.आमच्याकडे फराळ बनवायला सुरवात बेसन लाडू पासून असायची. याचे पीठ भाजायला घातले की घरभर, अगदी शेजारी सुध्दा  वास जातो. वासावरूनच आज कोणाच्यातरी घरी बेसन लाडू करताहेत ओळखते. लहानपणी आई आम्हाला स्वयंपाक घरातून बेसन भाजत आले की विचारायची, "बाहेर वास येतोय का?  ही बेसन भाजल्याची खूण असायची. कधी एकदा लाडू तयार होतील व आपण खातोय असे व्हायचे. चला तर आता साहित्य व कृती पाहू!

साहीत्य:-
* बेसन पीठ (चना ङाळ पीठ) ४ वाट्या
* पीठी साखर ३ वाट्या
* तूप दिङ ते दोन वाट्या
* वेलची पूङ,बेदाणे,काजू
* दुध २ चमचे
* लवंगा ४ -५
* हळदपूड चिमूटभर

कृती:-
 प्रथम जाङ बुङाच्या कढई मधे तूप घालावे. ते वितळले की,त्यामधे लवंगा टाकाव्यात त्या तळल्या की बेसनपिठ घालावे व मंद आचेवर चांगले तांबूस गुलाबी रंग येइपर्यंत भाजावे.

भाजून झाल्यावर दूध शिंपङावे व चिमुटभर हळद घालावी (रंग छान येतो.) आणि थंङ होण्यासाठी परातीमधे ओतून ठेवावे.

थंङ झाल्यावर मिश्रण घट्ट होते. हाताने मळून एकसारखे करावे व त्यामधे पीठीसाखर वेलचीपूङ घालून पाहीजे त्या साइजचे बेदाणे लावून लाङू वळावेत.

टीप:-
 * बेसन पीठ फार मऊ दळून आणू नये,थोङे मोटसर रवाळ असावे. म्हणजे खाताना लाङू टाळ्याला चिकटत नाही.
 * शुध्द तूप असेल तर,थोङे कमी घेतले तरी चालते .किवा वनस्पती तूप निम्मे व  शुध्द तूप निम्मे घ्यावे .लाङूचे मिश्रण लवकर आळते.व लाङू मऊसर पण होतात.
* पीठ मळल्यमुळे लाडू खाताना टाळ्याला चिकटत नाही. नाहीतर बरेचवेळा पीठ कोमट असतानाच साखर मिसळली जाते. तसे करू नये. 

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या

15 October 2014

पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohyacha Chiwada)

5 comments :
ज्यांना कमी तेलकट चिवडा आवडतो त्यांच्यासाठी पातळ पोह्यांचा चिवडा हा उत्तम प्रकार आहे.तो पुढील प्रकारे करावा.

साहीत्य:-
* पातळ पोहे अर्धा किलो
* शेंगदाणे १ वाटी
* फुटाण्याची डाळ १/२ (अर्धी) वाटी
* सुक्या खोबर्याचे पातळ काप १/ ४ वाटी
* कढीपत्ता एक वाटी
* हिरवी मिरची तुकडे करून ८-१० 
*,मिठ चवीनूसार
* पिठीसाखर ऐच्छीक
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* तेल एक वाटी फोडणीसाठी
* जिरे,मोहरी,हींग,तिळ फोडणीसाठी

कृती:-
प्रथम पोहे नीट चाळून ,स्वच्छ करून कडकडीत उन्हात वाळवावेत.मिरचीचे पोट चिरून तुकडे करावेत.कढीपत्ता पाने धुवून पुसून कोरडी करून घ्यावीत .फुटाण्याची डाळ निवडून घ्यावी. खोबर्याचे पातळ काप करावेत.

आता संपूर्ण पूर्वतयारी झाली की ,गॅसवर कढई अथवा जाड बुङाचे पातेले तापत घालून तेल घालावे. तेल तापल्यावर तेलात मोहरी,जिरे तिळ व हींग हळद घालून फोडणी तडतडवून घ्यावी.फोडणीमध्ये सग्ळ्यात आधी शेंगदाणे टाकावेत. ते थोडे तांबूस झाले की, अनुक्रमे   फुटाणा डाळ,मिरची व कडीपत्ता  असे सर्व टाकावे. गॅस बंदच करावा व मीठ,साखर धना-जिरा पावडर घालावी.सर्व व्यवस्थित हलवावे. शेवटी पोहे घालावेत.नीट हलवावे. जेणेकरून सर्व मिठ मसाला पोह्याना लागावा.

आता  कढई परत गॅसवर ठेवावी.गॅस एकदम बारीक ठेवावा किंवा कढईखाली तवा ठेवावा म्हणजे खालून करपण्याची शक्यता रहात नाही व मंद आचेवर मधून-मधून चिवडा परतत रहावा.पंधरा-वीस मिनीटानी गॅस बंद करून टाकावा.
आता तयार चिवडा व्यवस्थित गार होऊ द्यावा म्हणजे छान कुरकरीत होतो.मग हवाबंद डब्यात भरावा.

टीप्स :- 
*पोहे ऊन्हात वाळविणे सोयिचे नसेल तर पातेले गरम करून घ्यावे(गॅस बंद करावा) व त्यात आधि चिमूटभर मिठ टाकावे व नंतर पोहे टाकावेत व हलवून पंधरा मिनीट त्यातच ठेवावेत म्हणजे चिवडा कुरकूरीत होतो.मिठामूळे  पोहे आकसण्याचा धोका रहात नाही.
* तेलात सर्व मसाला मिठ घातल्याने नीट विरघळते व सगळीकडे व्यवस्थित लागते
*खोबर्याचे काप पातळ व सहज करता यावेत म्हणून खोबर्याच्या वाट्या पंधरा मिनिट कोमट पाण्यात टाकाव्यात.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

शंकरपाळे (Shankarpale)

No comments :
शंकरपाळे फार गोड किंवा खारेही नसतात. त्यामुळे चहासोबत खायला छान लागतात. त्यातही मला पुरीसारखे फुगलेले पातळ शंकरपाळे नाही आवडत. कारण हाताळताना वरच्या फुग्याचा पार चुरा होतो व दिसायला चांगले नाही दिसत. मला हाँटेलमधे जाड, ठुसठूशीत, खुसखूषीत असतात असे आवडतात. त्यामुळे मी नेहमी तसेच बनवते. कसे करायचे साहित्य व कृती 

साहित्य:-
* मैदा ३ वाट्या
* साखर १/२ वाटी
* पाणी १/२ वाटी
* तेल १/२ वाटी
* मीठ
चिमूटभर
* तळणीसाठी पुरेसे तेल

कृती:-
प्रथम मैदा स्वच्छ चाळून एका पसरट भांड्यामधे घ्यावा व त्यामधे मीठ  घालून सारखे करून घ्यावे. 

दुसर्या एका भांड्यामधे पाणी, तेल व साखर एकत्र करून गॅसवर ठेवावे.ढवळत रहावे. साखर विरघळून पाणी उकळू लागले की, मैद्यामधे घालावे.नंतर हाताने मैदा मळून घट्ट गोळा तयार करावा. दहा मिनीटे झाकून ठेवावा.

आता तयार  कणिकेचा एक-एक मोठा गोळा घेऊन पराठ्याप्रमाणे जाडसर पोळी लाटावी व सुरीने किंवा कातरण्याने त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्यावेत.
एका तळपाइतके झाले की गरम तेलात टाकावेत व ते तळत-तळत दुसरी पोळी लाटावी.

अशा रीतीने सर्व शंकरपाळे मंद आचेवर सोनेरी रंगावर तळावेत.थंड होऊ द्यावेत. म्हणजे खुसखूषीत होतात.नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.चहा बरोबर खायला छान लागतात.

टीप्स :-
पाण्याऐवजी दूध वापरले तर फारच खुसखूषीत होतात.निम्मे दूध व निम्मे पाणी वापरले तरी चालते.
शंकरपाळ्यासाठी मैदा फार जूना वापरू नये.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.




14 October 2014

चकली (Chakali)

No comments :

दसरा झाला की,दिवाळीचे वेध लागतात.आता
दिवाळी म्हणले की फराळ आलाच.आणि फराळात लाडू पाठोपाठ चकली जास्त आवडीची .आता अशा या चकलीचे नाव निघाले की,मात्र चकलीच्या आधि करणारीच्या अंगावर काटा उभा रहतो.तिच्या प्राप्ती साठी  भाजणे-दळणे-मळणे-तळणे असा चक्कर येणारा वळणांचा प्रवास असतो. एखाद्या वळणावर थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर ती रूसलीच म्हणून समजा .कधी खाणार्याच्या दातांची सत्व परिक्षा नाहीतर ,कधी कपडे वाळत घालायच्या दोरीचे रूप घेते.मग तिला  लाईनवर आणण्यासाठी घाल, पाणी घाल,भाजाणी असे करत-करत परातभर चकल्यांचे विविध नमुने तयार होतात.अशी फजीति टाळायची असेल तर,भाजाणीपासून सर्व क्रिया लक्षपूर्वक कराव्यात.चकल्या बर्याच प्रकारे करता येतात.त्यापैकी भाजाणीच्या चकलीचा प्रकार खाली दिला आहे.भाजाणीची कृती या आधिच्या "चकलीची भाजाणी" या रेसिपी मधे आहेच.

साहीत्य:-
* चकलीची भाजाणी २ वाट्या 
* तेलाचे मोहन ४ टीस्पून
* पाणी १ वाटी
* मिरची पूड १ टीस्पून
* मिठ १ टीस्पून
* तिळ १ टीस्पून           
* ओवा १ टीस्पून
* हींग १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* तळणीसाठी तेल

कृती:-
 प्रथम एका पसरट भांड्यामधे भाजणीचे पीठ घ्यावे.त्यामध्ये वरील सर्व कोरडा मसाला घालावा व नीट मिक्स करावे.

नंतर तेल गरम करून (मोहन) घालावे.परत नीट मिक्स करावे.सगळीकडे पीठाला नीट चोळावे.
शेवटी पाण्यात मीठ टाकून ते विरघळून उकळलेले गरम पाणी घालून सर्व पीठ हलवून दडपून दहा ते पंधरा मिनीटे झाकून ठेवावे.

आता पंधरा मिनिटानी थोडे-थोडे पीठ घेऊन थंड पाण्याने मळावे व चकलीच्या साच्यातून चकल्या पाडाव्यात व गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात.
तळून झाल्यावर चाळणीवर काढाव्यात.पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

टीप्स :-
* पीठ हाताने चांगले मळावे.नाहीतर चकल्या तुटतात.
* चकल्या तेलात सोडताना तेल चांगले गरम असावे,मात्र चकली तेलात सोडल्यावर गॅस थोडा कमी करावा.म्हणजे चकली न जळता पोटातून छान तळते व कुरकूरीत होते.
फार गरम तेलात चकल्या वरून करपतात व पोटात मऊ रहातात  व फार गार कमी तापलेल्या तेलात टाकताच विरघळतात.म्हणून योग्य तापमान ठेवावे.
* चकलीमधे हळद घालू नये.चकलीचा रंग काळा येतो.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

13 October 2014

चकलीची भाजाणी (Chakali bhajani )

No comments :
दिवाळी फराळातील खुसखूषीत खमंग चकली हा मोठा कौतुकाचा पदार्थ असतो. कारण सर्वानाच आवडतोही. परंतु खुसखूषीत खमंग चकली जमणे म्हणजे एक कलाच आहे. चकलीचे घटक पदार्थ घेणे ते चकली तळणे पर्यंत प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो व तो यशस्वी पणे पार पडला तरच चकली चांगली होते. तर यातील भाजणी तयार करणे हाही एक अत्यंत महत्वाचा भाग. यावर चकलीचा रंग, चव व कुरकूरीत पणा अवलंबून असतो. तर साहित्य किती घ्यावे कृती कशी? काय काळजी घ्यावी पहा,

साहित्य:-
* मोठा तांदुळ (पटणीचा)  १ किलो
* चणा (हरभरा) डाळ १/२ किलो
* उडीद डाळ १/४ किलो
* धणे ६ टीस्पून
* जिरे ३ टीस्पून
* मेथी दाणे २ चमचे (ऐच्छीक)

कृती:-
प्रथम तांदुळ व डाळी स्वच्छ निवडून घ्याव्यात.नंतर वेगवेगळे धुवून चाळणीमधे पाणी निथळण्यास ठेवावे.अथवा थोडावेळ सुती कपड्यावर पसरावे. मात्र उन्हात वाळवू नये. घरातच फॅन खाली सुकवावे.

आता सुकलेले तांदुळ व डाळी कढईमधे वेगवेगळे  भाजून घ्यावेत.धणे,जिरे व मेथीदाणे थोडे गरम करावेत.आता भाजलेले तांदुळ व डाळी पुर्णपणे थंड होऊ दे.

नंतर सर्व गार झालेले साहित्य एकत्र करावे व गिरणीतून दळून आणावे.आणल्यावर नीट चाळून हवाबंद डब्यामधे ठेवावी.महीना- सहा महीने पर्यंत सुध्दा छान रहाते.

चकल्या करण्याच्यावेळी डब्यातून भाजाणीचे पीठ काढून घ्यावे व त्यात मोहन तिखट,मीठ इ. सर्व घालून चकल्या तळाव्यात.

टिप :-
*भाजाणी बेतशीरच भाजावी.कारण चकली पुन्हा तेलात तळायची असतेच.नाहीतर करपट चव येते.
*भाजणी शक्यतो तांदुळावर दळावी.चकलीचा रंग चांगला येतो.डाळीवर दळल्यास काळपट येतो.
* भाजाणी थोडी मोटसर खसखशीत दळावी.फार बारीक ,गुळगूळीत दळू नये.म्हणजे चकली छान कुरकूरीत बनते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


बिटाचे सूप(Beetroot Soup)

No comments :

साहीत्य:-
* साल काढून केलेले एका बिटाचे तूकडे
* दोन टोमॅटो
* लसूण पाकळ्या ३-४
* आले एक इंच (साल काढून तूकडे करून)
* काळे मिरे ५-६
* दालचिनी एक ते दोन इंच
* मिठ,साखर चवीसाठी
* काॅर्नफ्लोअर दोन टेस्पून
* फ्रेशक्रीम ऐच्छीक
* पाणी

कृती:-
प्रथम एका भांड्यामधे पाणी घेऊन गरम करण्यास ठेवावे व त्यामधे मीठ,साखर आणि काॅर्नफ्लोअर सोडून वरील सर्व साहीत्य टाकावे व मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. कुकरमधे शिजवले तरी चालते.शिजल्यावर थंड होऊ द्यावे.

थंड झाल्यावर टोमॅटोचे साल काढावे .पाणी गाळून बिटाचे तूकडे, टोमॅटो सर्व साहीत्य मिक्सरमधे वाटावे अथवा ब्लेंडरला वाटावे.वाटताना गरज वाटली तर गाळून ठेवलेलेच पाणी वापरावे.त्यात जीवनसत्वे असतात.वाटून झाल्यावर एका मोठ्या गाळणी मधून गाळावे.

आता गाळलेल्या पातळ पेस्टला ,पाण्यात कालवून काॅर्नफ्लोअर लावावे व चवीला मीठ,साखर घालून उकळण्यास ठेवावे. सतत हलवावे म्हणजे काॅर्नफ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत. आधि गाळलेले पाणी शिल्लक असेल तर आता घालून टाकावे.कितपत दाट आहे त्यानुसार आवडीप्रमाणे कमी-जास्त साधे पाणी घालावे व चांगले गरम होऊ द्यावे.

तयार गरमा-गरम सूप वरून क्रीम घालून सर्व्ह करावे.

टीप :-टोमॅटो नाही घेतला तरी चालते. पण थोडी आंबट गोड चव छान लागते म्हणून मी घालते.
रक्तातील हीमोग्लोबीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर , बिटाचे सूप हा एक अतिशय उत्तम असा प्रकार आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

11 October 2014

मसाला दूध(Masala Dudh)

No comments :

अश्विन महिन्यातील पौर्णिमा कोजागरी किंव्हा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर येथे कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते.  असे मानले जाते की रात्री देवी लक्ष्मी घरोघरी येते आणि  'को जागर्ती' म्हणजे 'कोण जागे आहे?' असे विचारून जे जागे आहेत त्यांना ती आशिर्वाद देते. म्हणूनच रात्री जागरण केले जाते. रात्री १२ वाजता मसाले दुधाचा देवाला नैवेद्य दाखून दुधाचे पातेले गच्चीवर नेतात। त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसेल असे ठेऊन चंद्राची पूजा केली जाते. नंतर सगळ्यांना हे मसाला दुध प्यायला दिले जाते. कोजागरी पौर्णिमेलाच मसाला दुध करतात असे नाही. सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू अशा प्रसंगी देखील  मसाला दुध केले जाते. कसे करायचे पहा 👇 

साहीत्य:
* दूध एक लिटर (फुल क्रिमचे म्हशीचे घ्यावे)
* साखर अर्धी वाटी(आवडीनुसार कमी-जास्त करावी)
* वेलचीपूड १  टीस्पून
* जायफळ १/२  टीस्पून
* बदाम,काजू,पिस्ता ची भरड पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत)
* चारोळी १ टीस्पून
* केशर चिमुटभर 

कृती:
 प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यामधे दुध तापण्यासाठी गॅसवर ठेवावे. तापून फुगा आला की,गॅस बारीक करावा व त्याच्यामधे डाव टाकावा अथवा एक काचेची चहाची बशी पालथी टाकावी म्हणजे दुध तळाला लागत नाही.आणि पाच मिनीटे उकळू द्यावे.

उकळून थोडे आटले की त्यामधे वेलची,,सुक्या मेव्याचे कुट व साखर आणि केशर घालावे.एक उकळी आणावी व गॅस बंद करावा.

सजावटीसाठी शिल्लक ठेवलेले सुकामेव्याचे काप व चारोळ्या वरून घालावेत व आवडीप्रमाणे ,फ्रिजमधे थंड करून किंवा गरम पिण्यास द्यावे.शक्यतो कोमटसर दुधच प्यावे.चविला छान पण लागते व थंड दुधाने पोटात गॅस होतात,ते होण्याची भिती पण रहात नाही.

टीप :- 
* सुक्यामेव्याची  बारीक पावडर न करता थोडे भरड कूटच ठेवावे दुध पिताना मधे-मधे दाताखाली आलेले छान लागतात.

* जायफळ पूड अगदी ऐनवेळी दूध देताना घालावी. उकळताना घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते. 

* दिलेल्यापैकी फक्त कोरडे साहित्य पावडर करून बाटलीत भरून ठेवले तर एरव्ही पण हा दूध मसाला गरम दूधामधे घालून पिता येतो.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


10 October 2014

डिंकाचे पौष्टिक लाडू (Dink Ladu)

1 comment :
सुटा सुकामेवा मुले आवडीने खात नाहीत. परंतु हाच सुकामेवा, खोबरे, डिंक घालून लाडू केले तर लगेच फस्त करतात. तसेच पौष्टीक पण झाले. मी दिवाळीच्या फराळामधेही आवर्जून करते. कसे करायचे साहित्य व कृती पहा,

साहित्य :-
१) किसलेले सुके खोबरे १ १/२  वाट्या
२) खारीक पावडर  १ वाटी
३) खाण्याचा डिंक  १/२ वाटी
४) खसखस २ टीस्पून
४) वेलची पूड २ टीस्पून
५) जायफळ पावडर  १ टीस्पून
६) सुका मेवा काप १/२ वाटी (बदाम,काजू,पिस्ते,मनुका,बेदाणे सर्व मिक्स)
७) गूळ  २ वाट्या
८) शुद्ध तूप १ वाटी
९ ) डेसिकेटेड कोकोनट २ चमचे

कृती :-
प्रथम कोरड्या कढई मध्ये खसखस भाजून घ्यावी.नंतर खोबर्‍याचा कीस भाजावा.दोन्ही कोरड्या वस्तु भाजूनटख झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून ठेवाव्यात.

नंतर त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप गरम झाले की,थोडा-थोडा डिंक टाकून तळून त्याची लाही फुलवून घ्यावी व कडेला काढून ठेवावी. बदाम,काजू,पिस्ते तळून घ्यावेत.शेवटी राहिलेल्या तुपामध्ये खारीक पावडर भाजून घ्यावी.

वरील भाजलेली खसखस थोडी कूट करून घ्यावी.( नाही केले तरी चालते पण कुटली तर खमंग वास येतो). खोबरे व डिंक हातानेच थोडे चुरावे.

आता सर्व भाजलेले साहित्य ,सुकामेवा व जायफळ वेलचीची पूड  मिसळावे, व नीट एकत्र करावे व मिश्रण तयार करावे.

दुसर्‍या एका भांड्यामडे गूळ घ्यावा व दोनच चमचे पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळत रहावे. गूळ वितळून वर आला की गॅस बंद करावा.(पाक करू नये) झटपट सर्व तयार केलेले कोरडे मिश्रण त्यामध्ये घालावे व नीट हलवावे. मिश्रण गरम -गरम असेपर्यंतच झटपट हव्या त्या साईजचे लाडू वळावेत व प्रत्येक लाडू वळल्यावर डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावा व कडेला ठेवावा.

हे लाडू खूप पौष्टिक असतात.बाळंतीण बाईसाठी खास बनविले जातात.त्यामुळं दूध जास्त येते.

टीप : गुळाऐवजी साखर पण वापरतात.साखरेचा एकतारी पाक बनवावा व नंतर सर्व साहित्य घालावे.पण पौष्टिकतेचा विचार करता ,उपलब्ध असेल तर गुळच वापरावा.  

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते

बिटाच्या खमंग पुर्या(Beetroot Puri)

No comments :
बिट हे एक अत्यंत उपयुक्त असे कंद आहे.याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.परंतू ते सहसा जास्त खाण्यात येत नाही.मुलांना जास्त आवडत नाही,तेव्हा त्याच्या पूढे दिल्याप्रमाणे पुर्या कराव्यात. पटापट् खाल्या जातात व बीट पोटात जाते.
साहित्य:
* एका बिटाचे साल काढून केलेले तुकडे
* आले,लसूण,मिरची आवडीप्रमाणे
* मीठ चवीनुसार
* गव्हाचे पीठ आवशक्यतेनुसार (एका बिटाला साधारण चार वाट्या पीठ लागते )
* तेल तळणीसाठी
* तिळ एक चमचा

कृती:-
प्रथम बिटाचे तूकडे व आले,लसूण,मिरची मिक्सरमधे वाटून पेस्ट करून घ्यावे. वाटताना गरज वाटली तर थोडे पाणी वापरावे.जास्त नको.
आता एका बाऊलमधे पेस्ट काढून घ्यावी व त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालावे.चवीला मीठ व शोभेसाठी तिळ घालून पाणी घेउन नेहमीच्या पुरीच्या कणिकेप्रमाणे थोडी घट्ट कणिक मळावी.तेल लावून दहा मिनीटे झाकून ठेवावी.

नंतर गँसवर कढई तापत ठेवावी व त्यात तेल गरम करावे.आता भिजलेल्या कणिकेच्या लहान-लहान पुर्या लाटून तळाव्यात.

साॅसबरोबर अथवा नुसत्यापण खाण्यास छान लागतात.त्यांचा लालसर गुलाबी रंग खूप आकर्षक  दिसतो.त्यामूळे मुलेसुध्दा पट्कन खातात. मुलांना डब्यात द्यायला खूप सोइचे होते. 

टीप :  वाटताना जास्त पाणी घालू नये.नाहीतर पेस्ट पातळ होईल व जास्त पीठ घालावे लागेल.आणि पुर्याना अपेक्षित लाल रंग येणार नाही. फिक्क्या पांढरट दिसतील.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

09 October 2014

पंचधान्याचे दुधीचे थालिपिठ(Panchdhanyache Thalipith)

No comments :

दुधी ही एक अत्यंत पौष्टीक अशी फळभाजी आहे. या भाजीचा कोणताही भाग वाया जात नाही.चिरून भाजी तर होतेच, पण सालीची चटणी होऊ शकते.दुधीचा रस तर ह्रदय रूग्णांसाठी अत्यंत लाभदायक आहे.पण अशा पौष्टीक दुधीची भाजी सर्वांना आवडतेच असे नाही म्हणून पुढे दिल्याप्रमाणे थालिपीठे बनवावित व दुधी खावा.सर्व धान्येही पोटात जातात.
साहीत्य:
* ज्वारीचे पीठ १वाटी
* हरभरा डाळीचे पीठ १/२ वाटी
* तांदुळ पीठ १/४ वाटी
* बाजरी पीठ १/४ वाटी
* गहू पीठ एक चमचा
* दुधीचा किस पीठात मावेल एवढा (अंदाजे २ वाट्या लागतो)
* आले,लसूण,हिरवी मिरचीपेस्ट आवडीनुसार
* धना जिरा पावडर  टीस्पून
* हळद,हींग,मीठ चवीप्रमाणे
* कोथिंबीर
* तेल

कृती:-
प्रथम वरील सर्व पिठे एका बाऊलमधे एकत्र करावित.त्यामधे वर दिलेला ओला व कोरडा मसाला घालावा व नीट हलवावे.शेवटी त्यात मावेल एवढा एवढा दुधीचा किस घालावा व पिठाचा गोळा बनवावा.

नंतर तयार पीठाचा लहान गोळा घ्यावा व थंड तेल लावलेल्या तव्याला हाताने थापून पसरवावा. मधे-मधे बोटानी चार पाच छिद्रे पाडावीत व त्यामधे तेल सोडावे.एक बाजू भाजली की, उलटून दूसरी बाजू भाजून घ्यावी.
असे खरपूस भाजलेले थालिपीठ दह्याबरोबर खाण्यास द्यावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

सोलकढी(Solkadhi)

No comments :
साहित्य:
* आमसोल ७-८ नग
* ओले खवलेले खोबरे २ वाट्या
* मीठ,साखर चवीप्रमाणे
* आले लसूण पेस्ट लहान अर्धा चमचा
* कोथिंबिर सजावटीसाठी

कृती:
प्रथम सोलं कोमट पाण्यामधे पंधरा मिनीट भिजत घालावित.ती भिजेपर्यंत खोबरे मिक्सरमधे वाटून नारळाचे दूध काढून गाळून घ्यावे.

आता आमसोले पाणी घालून हाताने चुरडावीत व गाळून पाणी (आगळ) घ्यावे.

शेवटी वर काढलेले नारळाचे दूध व सोलाचे आगळ मिक्स करावे.त्यात चवीला मीठ,साखर व आले,लसूण पेस्ट घालावी. वरून कोथिंबिर घालून सजवावे व थंडच सर्व्ह करावे.

अशी ही सोलकढी अतिशय थंड व पित्तनाशक आहे.

टीप : खोबरे वाटताना  कोमट पाणी वापरावे दूध जास्त निघते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

05 October 2014

मसाला शेंगदाणे(Masala Shengdane)

No comments :

साहित्य ::

* कच्चे शेंगदाणे १ वाटी
* चणा डाळीचे पीठ १/४ वाटी
* तांदुळाचे पीठ १ टीस्पून
* गरम मसाला लहान १/२ टीस्पून
* धना-जिरा पावडर १/२ टीस्पून
* आमचूर पावडर १/४ टीस्पून
* चाट मसाला १ टीस्पून
* लाल मिरची पूड,मीठ ,चवीनुसार
* हळद,हिंग आवडिनुसार
* तेल १-२ टेस्पून (ऐच्छीक)
* पाणी गरजेनुसार
* सोडा चिमुट भर

कृती::

प्रथम एका बाउल मध्ये चणा डाळीचे पीठ व तांदुळाचे पीठ घ्यावे. त्यामध्ये वरील सर्व मसाला, सोडा व शेवटी तेल मिसळावे.सर्व मिश्रण कोरडेच ठेवावे.

नंतर शेंगदाणे बुडतील एवढे पाणी घालावे व लगेच पाणी चाळणीत शेंगदाणे ओतून काढून टाकावे.शेंगदाणे ओले करणे एवढाच हेतु आहे.

आता ओले झालेले शेंगदाणे वरील कोरड्या मिश्रणा मध्ये घालावेत .म्हणजे कोरडे पीठ शेंगदाण्याला चिकटेल.सर्व नीट कालवावे. तळाला पीठ कोरडे राहिले तर ,हाताने दोन चमचे पाणी शिपडावे .म्हणजे पूर्ण पीठ शेंगदाण्याला लपेटले जाईल.

आता पीठात घोळवलेले शेंगदाणे मायक्रोवेव ट्रे मधे पसरून ठेवावेत व हाय पाँवरला ४ मिनिट ठेवावेत. मधेच एकदा हलवावेत नाहीतर एकाच बाजूने भाजले जातात. थंड होऊ द्यावेत म्हणजे कुरकुरीत होतात. कुरकूरीत शेंगदाणे हवाबंद डब्यात भरून ठेवा.

असे खमंग व कुरकुरीत शेंगदाणे चहा बरोबर किंवा एरवी सुध्दा मधेच तोंडामध्ये टाकायला छान लागतात.

टिप्स :-
* पीठामधे तेल नाही घातले तरी चालते. तेल घातले तर रंग थोडा उठावदार दिसतो इतकेच.

* पीठामधे घोळवलेले शेंगदाणे गरम तेलामध्ये मंद आचेवर तळले तरी चालतात .तळून टिश्यू पेपर वर काढवेत.थंड होऊ द्यावेत म्हणजे कुरकुरीत होतात.
मी ओवन मधे केले.

* आवडीनुसार मसाल्यामधे आलं-लसूण पेस्ट पण वापरली तरी चालते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.




04 October 2014

मेथी पराठे(Methi Parathe)

No comments :
प्रकार -१
साहित्य:- 
* स्वच्छ धुवून बारिक चिरलेली मेथी २ वाट्या
* गव्हाचे पीठ गरजेएवढे
* डाळीचे पीठ एक टे.स्पून
* मोठा एक कांदा किसून
* हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट
* तिळ,ओवा लहान एक चमचा
* धनाजीरा पावडर ,हळद,हींग,
* मीठ चवीपूरते
* तेल

कृती:-
प्रथम एका कढईमधे थोडेच तेल गरम करून त्यात मिरची लसूण आले पेस्ट टाकावी .कांदा टाकावा व थोडा मऊ झाल्यावर त्यामधे मेथी घालून परतावे. मेथी मऊ झाली की ,वरील सर्व मसाला घालून गॅस बंद करावा.मिश्रण थंड होऊ द्यावे.

नंतर थंड झालेल्या मिश्रणात एक चमचा डाळीचे पीठ व मावेल इतकेच गहूपिठ घालून कणिक मळावी.गरज  वाटल्यास थोडे पाणी घ्यावे.
मळलेल्या कणिकेचे लहान-लहान गोळे घेऊन पराठे लाटावेत व तेल सोडून खरपूस भाजावेत.
दही व लोणच्याबरोबर खाण्यास द्यावेत.
प्रवासात नेण्यासाठी सोयीचे व टिकाऊ आहेत.

प्रकार-२
साहित्य:
सर्व साहीत्य प्रकार -१ प्रमाणेच घ्यावे.फक्त कांदा घेऊ नये.
कृती: 
प्रथम चिरलेली मेथी एका पातेलीमधे घालून थोडी वाफवून घ्यावी.

नंतर वाफवलेली मेथी थंड झाल्यावर ,मेथी,हीरवी मिरची व आले लसूण यांची मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.

एका पसरट भांड्यामधे गव्हाचे व डाळीचे पीठ घेऊन त्यामधे वरील सर्व मसाला तिळ,धना जीरा पावडर,मीठ,हळद व वर तयार केलेली पेस्ट घालावी व कणिक मळावी.गरज वाटल्यास थोडे पाणी घ्यावे.

तयार कणकेचे पराठे लाटावेत.व तेल सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावेत. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
    

मेथीची चटणी(Methi Chutney)

No comments :

साहित्य:-
* मेथीदाणे लहान एक चमचा
* मेथीपाने एक वाटी
* लसूण १०-१२ पाकळ्या
* लाल मिरची आवडीनूसार
* मीठ,साखर चवीनूसार
* लिंबू
* तेल एक टेबलस्पून

कृती:
प्रथम एका पॅनमधे तेल गरम करून त्यामधे मेथीदाणे टाकावेत.नंतर लसूण,मिरची टाकावी व शेवटी मेथीची पाने टाकावीत आणि मंद आचेवर सर्व कोरडे होईपर्यंत परतावे.

नंतर सर्व साहीत्य थंड झाल्यावर चवीसाठी मीठ व साखर घालून मिक्सरमधे भरडच वाटावे.
वाटलेले मिश्रण एका बाऊलमधे काढावे व वरून लिंबू पिळावे व नीट हलवून वाढावी.

ही चटणी चवीला अतिशय रूचकर व खमंग लागते.तसेच मधुमेहासारख्या आजारात लाभदायक आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

होममेड श्रीखंड(Home made Shrikhand)

No comments :

श्रीखंड हा पदार्थ गुजरात मधून आला. आता मात्र जगभरात स्वीटडीश म्हणून खाल्ला जातो. श्रीखंड श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ असल्याने त्याच्या नैवेद्यासाठी सुध्दा वापरतात. थंडगार, मलईदार गोड श्रीखंड जेवणात पक्वान्न म्हणून पण केले जाते. तसे तर एरव्ही विकतचे निरनिराळ्या कंपन्यांचे तयार श्रीखंड आणून खाल्ले जातेच. परंतु खास मराठी नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे गुढीपाडव्याला आमच्याकडे हमखास धरी चक्का बांधून केले जाते. अगदी चक्यासाठीचे दहीपण घरीच केले जाते. तर असे मलईदार, मधुर चविचे श्रीखंड कसे करायचे साहित्य व कृती-👇 

साहित्य :
म्हशीचे दूध २ लिटर (फुल क्रीमचे)
* साखर ५-६ वाट्या (आवडीनुसार साखर कमी-जास्त घ्यावी)
* वेलची पूड,जायफळ पूड आवडीनुसार
* सूकामेवा टूटी-फ्रूटी आवडीनूसार
* केशरकाड्या चिमूटभर
* मीठ पाव टीस्पून
* दही/ताक दोन मोठे चमचे विरजणासाठी

कृती:
प्रथम दूध आदलेदिवशी सकाळी घेऊन कोमट करून (तापवू नये,साय काढू नये) दही/ताक घालून विरजावे.रात्रीपर्यंत दही तयार होते.

नंतर तयार दही रात्री एका पातळ कपड्यामधे बांधून आपल्या सोयीने लटकवून ठेवावे व त्याखाली पाणी धरण्यासाठी भांडे ठेवून द्यावे.

दुसर्या दिवशी सकाळी तयार चक्का चाळणीवर घासून अथवा पुरण यंत्रातून फिरवून गुठळ्या मोडून गुळगुळीत करून घ्यावा.

आता तयार फेटलेल्या चक्कयामधे साखर/पिठीसाखर ,(मोठी साखर मिक्सरवर बारीक करून घ्यावी. लवकर विरघळते) वेलचीपूड,जायफळपूड व केशर, थोडा सूकामेवा घालून चांगले एकत्र घोटावे वरून सजावटीसाठी राहीलेला सुकामेवा ,टुटीफ्रूटी घालावे व फ्रीजमधे थंड होण्यास ठेवावे.

जेवणाचे वेळी मलईदार ,घट्ट असे थंडगार श्रीखंड तयार ! व घरीच बनविल्याने त्याची बाहेरच्या तयार बाऊल मधील श्रीखंडापेक्षा लज्जत न्यारीच असते.आणि मनसोक्त खाता येते.

टीप: आंब्याच्या मोसमात आपण  तयार चक्कयामधे आंब्याचा रस मिसळून आम्रखंडपण बनवू शकतो.एरव्ही बनविण्यासाठी बाजारात मिळणारा तयार मॅगोपल्प आणावा .

दही बांधून ठेवल्यावर खालच्या भांड्यामधे जे पाणी जमा होते ते,टाकून देऊ नये त्या पाण्यामधे पराठ्याची कणिक भिजवावी अथवा ताकामधे मिसळून पिऊन टाकावे.खूप पौष्टीक असते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

कढीपत्ता चटणी(Curry leaves Chuteney)

No comments :
कढीपत्यामधे खूप सारे औषधि गुणधर्म आहेत. रोजच्या आहारात जरूर वापर करावा. असे असले तरी बर्याच जणाना कढीपत्ता आवडत नाही. पुढील प्रकारे चटणी करून बघा नक्की आवडेल. साहित्य व कृती, 

साहित्य:-
* जून कढीपत्ता पाने एक वाटी
* सुकं खोबरं पाव वाटी 
* चणाडाळ पाव वाटी 
* उडीद डाळ पाव वाटी
* लाल सुकी मिरची ८-१०
* गूळ सुपारी एवढा खडा 
* चिंच सुपारी एवढी 
* मीठ चविनूसार
* तेल १ टीस्पून 

कृती:-
प्रथम दोन्ही डाळी कोरड्याच भाजून घ्याव्यात. नंतर खोबरं भाजून घ्या. शेवटी तेलावर कढीपत्ता पाने व मिरची तेलावर परतून घ्या. चिंचही थोडी परतावी. सर्व थंड होऊ द्या. 

नंतर थंड झालेले सर्व साहित्य, चविला मीठ घालून मिक्सरमध्ये भरडसर वाटावे.

तयार कोरडी चटणी हवाबंद बाटलीमधे भरून ठेवावी.बरेच दिवस छान टिकते. पोळी सोबत किंवा डोस्यावर पसरून खायला चवदार लागते. 

टीप:
चटणीत थोडे भाजलेले तीळ, जिरे घातले तरी चालते छान चव येते.
* चटणी भरडच ठेवावी. दाताखाली कण आलेले चांगले लागतात. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.