Showing posts with label sweet puri. Show all posts
Showing posts with label sweet puri. Show all posts

24 July 2018

सांजोरी (Sanjori)

1 comment :

'सांजोरी' यालाच सारनोरी, साठोरी असेही म्हणतात.हा पारंपारिक व पौष्टीक पदार्थ आहे. गणेश चतुर्थी मधे गणपतीच्या,महालक्ष्मीच्या नैवेद्याला, दिवाळीच्या लक्ष्मीपुजना दिवशी नैवेद्याला केला जातो.तसेच मुलांना मधल्या वेळचे खाणे, शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात न्यायला सोयीचा प्रकार आहे.तीन-चार दिवस सहज टिकतो.घरात नेहमी उपलब्ध असणार्या साहित्यात होतो.साहित्य व कृती 👇

साहित्य :-
वरील पारीसाठी
* बारीक रवा १ कप
* मैदा २ टेस्पून
* तेल २ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* चिमुटभर साखर
* पाणी गरजेनुसार
आतील सारणासाठी
* बारीक रवा १/२ कप
* पीठीसाखर १/२ कप
* तूप २ टेस्पून
* मिल्क पावडर १/४ कप ( ऐच्छीक)
* खसखस १ टीस्पून
* वेलची पूड
*  पाणी गरजेनुसार
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम रवा,मैदा मीठ,साखर घालून एकत्र करून घ्यावे. नंतर तेल गरम करून त्यामधे घालून हाताने चोळून घ्यावे.आता गरजे इतकेच थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळावे.जास्त सैल नको व अती घट्टही नको.मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे.

आता सारण तयार करावे. पँनमधे घेतलेल्या एकूण तूपामधले १ टेस्पून तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.भाजून ताटलीत काढून त्यावर थोडे पाणी शिंपडावे व पांच मिनिट झाकावे. पांच मिनिटानंतर कोमट असतानाच पीठीसाखर,वेलची पूड घालून सारण हाताने एकजीव करावे. आत्ताच सारणात शिल्लक १ चमचा तूप व मिल्क पावडरही घालून मळावे.सारण फार कोरडे वाटले तर किंचित पाण्याचा हात घेऊन मळावे.मिश्रणाचे मुठीत दाबले तर लाडू व्हावेत इतपत ओलसर असावे. आता सारणाचेे हलक्या हाताने साधारण लाडू करून घ्यावे. दाबून फार घट्ट लाडू करू नये.

नंतर आधीच मुरून तयार असलेले पीठ परत एकदा मळून घ्यावे अथवा कुटून घ्यावे. मिक्सर मध्ये थोडे-थोडे घेऊन फिरवून काढावे. या पीठाच्या थोड्या लहान आकाराच्या म्हणजे सारणाचेे लाडू केलेत त्या आकाराचे समान गोळे करून घ्यावेत व एकेक गोळी घेऊन त्यामधे सारणाचा लाडू भरून व्यवस्थित बंद करावे. हलक्या हाताने फार पातळ नाही अशी किंचित जाडसर मोठी पुरी लाटावी व अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावी.तळताना सारखी उलटवू नये.अलगद तळावी,जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्यावी.

थंड झाल्यावर अतिशय खुसखूषीत खमंग अशी सांजोरी खायला उत्तम लागते. बाजारी पदार्थ आणण्यापेक्षा घरीच असा एखादा सहज सोपा पौष्टीक पदार्थ मुलांना खायला करून ठेवावा.

वर दिलेल्या साहित्या मधे फोटोतल्या आकाराच्या ८ साठोऱ्या होतात.

टिप्स :-
* सारण तयार करताना किंवा पारीसाठी कणिक मळताना पाण्याचाच वापर करावा,दूध नको. दूधामुळे नंतर वास येण्याची शक्यता असते.

* सारणामधे भाजलेला खवा अथवा शिल्लक पेढा घातला तरी चालते.

* सांजोरी तूपावर शॅलोफ्राय केली तरी चालते.  तसेच आधी तव्यावर थोडी भाजून नंतर तेलात तळल्यास तेल कमी लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

21 February 2017

मालपुआ (Malpua)

No comments :

"मालपुआ" हा प्रसिध्द गाेडाचा पदार्थ उत्तर भारत या प्रांतातील पारंपारिक पाककृती आहे. होळी सणाचे दिवशी केला जातो . तसेच घरात काही पवित्र कार्य, पुजा होम-हवन असेल तर "खीर मालपुआ" नैवेद्याला केले जाते. मालपुआ निरनिराळ्या प्रांतामधे विविध पध्दतिने केला जातो. रबडी मालपुआ, पाकातला मालपुआ, पिकलेले केळ, आंबा, अननस वापरूनही त्या-त्या स्वादाचे मालपुआ केले जातात. राजस्थान मधे "खवा मालपुआ" बनवितात. तर आता पाकातील मालपुआ कसा केला जातो पहा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मैदा १ कप
* बारीक रवा १/२ कप
* साखर १/२ कप
* वेलची पूङ १/२ टीस्पून
* बडशेप पूड १/४ टीस्पून
* दूध १/२ कप
* पाणी गरजेनुसार (अंदाजे १/२ कप)
* तळणीसाठी तूप किंवा रिफाइंड तेल
पाकासाठी
* साखर १ कप
* पाणी १/२ कप
* वेलची पूङ १/२ टीस्पून
* केशर काड्या चिमूटभर
* सजावटीसाठी पिस्ता,बदामाचे पातळ काप

कृती :-
प्रथम एका बाऊलमधे मैदा, रवा, साखर बडीशेप  व वेलचीपूड एकत्र करावी. त्यामधे दूध मिसळावे. चमच्याने ढवळत ढवळत गरजेनुसार पाणी घालावे. जिलेबीच्या पिठासारखे सैलसर भिजवावे. जेणेकरून तूपामधे चमच्याने सहज घालता यावे. पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.

आता साखरेत पाणी घालून उकळत ठेवावे. साखर विरघळून एकतारी पाक करून घ्यावा.उकळत असताना केशर व वेलचीपूड घालावी. पाक तयार झाला की गँस बंद करावा व पाक झाकून बाजूला ठेवून द्यावा.

आता गँसवर पसरट पँन ठेवून त्यामधे तूप/तेल घालावे व गरम होऊ द्यावे. नंतर गरम तूपात वरून, डावाने एक डाव पीठ सोडावे ते आपोआप पुरीसारखे गोल पसरते. गोल पुरीच्या आकाराचा मालपुआ फुगतो. झार्‍याने त्यावर तूप ढकलत, मंद आचेवर दोन्ही बाजूनी गुलाबी तळून घ्यावा. तळलेला मालपुआ आधि टिश्यू पेपरवर काढावा व नंतर आधीच तयार असलेल्या पाकात सोडावा. दुसरा तयार होईपर्यंत पाकात राहू द्यावा. दुसरा तयार झाला की आधिचा पाकातून काढून डिश मधे काढावा.

असे सर्व मालपुवे तयार झाले की, वरून ड्रायफ्रूट्स चे काप घालून सजवावे व खायला द्यावे.

टिप्स :-
* दूधा ऐवजी पाण्यात भिजवले तरी चालते.
* दूधासोबत खवा सुध्दा घालता येतो.
* साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.
* शक्य असेल तर तुपामध्येच तळावेत. अधिक रूचकर लागतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 August 2016

अनारसे (Anarase)

No comments :
अनारसे हा पदार्थ थोडी दीर्घ कृती असल्याने व गोड असल्याने दिवाळी व्यतिरीक्त एरव्ही सहसा केला जात नाही. तसेच अनारसे जाळीदार असल्याने अधिक मासामधे जावयाला वाण म्हणून द्यायची पण पध्दत आहे.तेव्हाही केले जातात. पण कितीही वेळखाऊ पदार्थ असला तरी दिवाळीला फराळाच्या ताटाला अनारसे असल्याशिवाय शोभा नाही. तर असे हे नाजुक अनारसे कसे करायचे साहित्य व कृती,

साहित्य :-
* पटणीचा जाड, जुना तांदुळ  १/२ किलो
* स्वच्छ, पिवळा गुळ १/२ किलो
* साजुक तूप १-२ टेस्पून
* वेलची, जायफळ पावडर आवडीनुसार
* खसखस १०० ग्रँम
* पिकलेले केळ १ (ऐच्छीक)
* तूप तळणीसाठी

कृती:-
प्रथम तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत.पाणी रोज बदलावे.अन्यथा तांदळाला कुजकट वास येऊ शकतो.

तिसर्या दिवशी पाणी निथळून, सुती कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पीठ चाळावे व बारीक पीठी करावी.

नंतर गुळ किसणीने किसून किंवा बारीक कुटून  घ्यावा व चाळलेल्या पिठाीमधे मिसळावा. साजुक तूपाचे मोहन व वेलदोडे, जायफळची पूड घालून हलक्या हाताने मळून गोळा तयार करावा .

आता हा तयार पीठाचा गोळा प्लास्टिक किंवा  अल्युमिनिअम च्या डब्यात घालून ७ ते ८ दिवस मुरण्यासाठी ठेवावे. पीठ चांगले मुरले तर अनारशाला जाळी पडते व अनारसे जाळीदार,  कुरकूरीत होतात.

नंतर जेव्हा अनारसे करायचे असतील तेव्हा गरजेइतकेच पीठ घेऊन पिकलेल्या केळाचा हात लावून मळावे व त्याचे साधारणपणे  पेढ्याएवढे चपटे गोळे करावेत व पोळपाटावर खसखस थोडी -थोडी पसरून पिठाची एकेक गोळी घेऊन बोटाने हलकेच दाब देऊन अनारसा खसखशीवर फिरवत गोल थापावा

आता कढईमधे तूप गरम करावे. खसखशीची बाजू वर येइल अशा पध्दतीने अनारसा कढईमधे अलगद सोडावा.झार्‍याने त्यावर तूप घालत अनारसा मंद आचेवर तळावा. अनारसा उलटवू नये. सोनेरी रंगावर तळावा.

असा हा खमंग तळलेला कुरकुरीत अनारसा खायला खूप चविष्ट लागतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.

टिप्स :-
* तयार पीठ स्टीलच्या डब्यात ठेऊ नये. काळे पडते.
* तयार पिठ बरेच दिवस म्हणजे अगदी महिनाभर सुध्दा टिकते. खराब होत नाही.
* तांदुळ शक्यतो जूना व जाडाच वापरावा.पीठ फुलून जाळी चांगली पडते.
* एकाच बाजूने तूप झार्याने उडवून तळावा. अन्यथा खसखस तूपामधे सुटते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


15 April 2015

केळाच्या पुर्‍या (Banana Puri)

No comments :
काही  वेळा गणपती ,नवरात्र असे काही सण उत्सवअसेल तर प्रसाद म्हणून आलेली ,किवा उपवास म्हणून आणलेली बरीच केळी जमा होतात.आणि ती काही लगेच संपत पण नाहीत. मऊ व काळी होतात.तर कोणीच  खायलापण तयार नसते.ती तशीच पङून वाया जाते. मग त्यांचे काय करावे ? असा प्रश्न पडतो. फेकून देणेही होत नाही व खाल्लेहीजात नाही . अशावेळी मग त्याच्या खाली सांगितल्याप्रमाणे पुर्या कराव्यात.खूप सुंदर लागतात. विश्वास बसत नसेल तर खाली संगीत्यल्याप्रमाणे करून बघा . एकदम सोप्या व झटपट होतात . 

साहित्य:-
1) पिकलेली दोन केळी
2) कणिक आवशक्यतेप्रमाणे अंदाजे २-३ वाट्या लागते
3) वेलचीपूङ
4) तेल तळणीसाठी
5) पिठीसाखर दोन टे.स्पून
कृति:-
     केळ एका बाऊलमधे घेऊन कुस्करावे .त्यामधे मावेल एवढीच कणिक घाला. साखर व वेलचीपूङ घाला .सर्व साहीत्य नीट एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा.पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवा.

नंतर तयार पिठाच्या लहान लहान पुर्या लाटून तेलात मंद आचेवर गुलाबी  तळाव्यात.  

 तयार  पुर्‍या साजूक तुपासोबत खाल्यास खूपच छान लागतात . तसेच या पुर्याना केळाचा छान स्वादपण येतो , त्यामूळे लहान मुलांना आवङतात. ङब्यामधे पण देण्यास सोयीच्या पङतात. आठ दिवसा पर्यंत टिकतात.त्यामुळे प्रवासात पण नेण्यास सोयीच्या !!

18 October 2014

लाल भोपळ्याच्या घार्या (Lal bhoplyachya gharya)

No comments :
मुलांना मधल्या वेळी खाण्यास किंवा डब्यात देण्यासाठी घार्या किंवा घारगे हा पौष्टीक पदार्थ आहे.तसेच प्रवासात नेण्यासाठी पण सोयीचा आहे.आठ दिवस सहज टिकतो. कशा करायच्या साहित्य व कृती-👇 

साहीत्य:-
* लाल भोपळ्याचा खिस ३ वाट्या
* गूळ ३ वाट्या
* कणिक  वाट्या अथवा मावेल तेवढी
* चनाङाळ पीठ अर्धी वाटी
* दूध २ वाट्या
* तेल
* मीठ चिमूटभर 

कृती:- 
प्रथम भोपळा किसून घ्यावा.किस जाड बुडाच्या भांङ्यामधे घेऊन त्यामधे दूध घालावे व शिजत ठेवावे.किस शिजून मऊ झाला की, त्यात गूळ घालावा.गूळ विरघळला की गॅस बंद करावा.मिश्रण थंड होऊ द्यावे.

आता थंड झालेल्या मिश्रणामधे कणिक व डाळीचे पीठ, मीठ घालून तेल घेऊन गोळा मळावा. कणिक गरजेनुसार कमी-जास्त करावी.परंतू जास्त घट्ट मळू नये,घार्या चिवट होतात.अर्धा तास पीठ झाकुन ठेवावे.
अर्ध्या तासाने थोङ्या जाडसरच लहान-लहान पुर्या लाटून तळाव्यात.साजूक तूपाबरोबर सर्व्ह करा.

टीप:- 
* खिस नूसता वाफवण्याऐवजी दूधामधे शिजवल्यामूळे घार्या छान मऊसर होतात.

31 August 2014

पाकातील मलई पूरी(Pakatali Malai Puri )

No comments :
  
साहीत्य :-
* मैदा २ वाट्या
* मलई आवश्यकते प्रमाणे
* साखर पाक बनविण्यासाठी
* तेल तळणीसाठी
* वेलचीपूङ
कृती :-
 प्रथम एका बाऊलमधे मैदा घेऊन त्यामधे दोन चमचे गरम तेलाचे मोहन व चिमूटभर मीठ घालावे. नंतर गरजेनुसार मलई घालून घट्टसर भिजवावे व लगेचच पुर्या लाटाव्यात. लाटून झाल्यावर त्यावर चाकूने अथवा काटा चमच्याने कच पाङावेत व मंद आचेवर तळून घ्यावे.

नंतरदुसर्या एका भांङ्यामधे साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा व तळलेल्या पुर्यावर घालावा . नैवेद्यासाठी पुर्या तयार.

टीप :- पाक कच्चा करू नये.पुर्या नरम पङतात

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.