Showing posts with label Milk Shakes. Show all posts
Showing posts with label Milk Shakes. Show all posts

21 April 2018

मँगो फिरनी (Mango Firani)

No comments :

साधारण ख्रीरीसारखाच हा पदार्थ आहे. आजकालच्या पध्दतीनुसार डेजर्ट म्हणून थंड स्वरूपात खाल्ला जातो. मात्र आमच्याकडे गरम व खीर म्हणून जेवणात पोळीसोबत खायला आवडते. आपल्या आवडीनुसार कसेही खावे. आहे मात्र झकास पदार्थ. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बासमती तांदुळ १/४ कप
* दूध अर्धा लिटर
* मँगो पल्प २ आंब्याचा
* साखर अर्धा कप (आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ
* काजू, बदाम काप

कृती :-
प्रथम दूध एका पातेल्यात गरम करण्यास ठेवावे. दूध उकळू लागल्यावर मधे मधे ढवळत रहावे.

दूध उकळून थोडे घट्ट होईपर्यंत दोन आंब्याचा गर काढून ब्लेडरने घुसळून तयार करावा. तसेच तांदुळ धुवून, तूपावर थोडे परतून मिक्सरमधे  भरड वाटून घ्यावेत.

आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल त्यामधे वाटलेले भरड तांदुळ घालून पांच मिनिट उकळू द्यावे. शिजले की त्यामधे साखर, वेलचीपूङ घालून गँस बंद करावा.  पांच मिनिटानंतर तयार केलेला मँगो पल्प घालावा व एकत्र ढवळावे. शेवटी वरून काजू, बदाम चे काप घालावेत. मँगो फिरनी तयार!

आवडीनुसार थंड अथवा गरम खा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

मँगो फालुदा (Mango Falooda)

No comments :

उन्हाळ्याचे दिवसात थंडगार सरबत, लस्सी, निरनिराळे ज्यूस, फ्रूटशेक अशी पेयं प्यायला छान वाटतात. पण बाजारी पेये पिण्याऐवजी घरच्या घरी केली तर खूपच उत्तम. अन् थोडी पुर्वतयारी ठेवली तर घरी झटपट करणेही अवघड नसते. बर्याच निरनिराळ्या स्वादामधै फालुदा बनवला जातो. जसे केसर बदाम, कस्टर्ड फालुदा,  शाही फालुदा फ्रूट फालुदा इत्यादी..!तर आज मी मँगो फालुदा केला साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तापवून गार केलेले दूध अर्धा लिटर
* पिकलेले आंबे २+२
* भिजवलेले सब्जा बी २ टेस्पून
* फालुदा शेवया किंवा साध्या शेवया अर्धा कप
* रोज सिरप अर्धा कप
* साखर २ टेस्पून
* व्हँनिला किंवा मँगो आईस्क्रीम
* टुटीफ्रूटी सजावटीसाठी
* ड्रायफ्रूट्स ऐच्छिक
इतक्या साहित्यामधे फोटो मधील साईजचे ५ ग्लास फालुदा होतो.

कृती :-
प्रथम दोन आंब्याचा पल्प तयार करून घ्यावा.  व राहीलेले दोन आंबे साल काढून लहान चौकोनी तुकडे करावेत.  यातील थोडे सजावटीसाठी बाजूला ठेवून बाकीचे तुकडे व साखर गार दूधामधे घालून ब्लेडर ने घुसळावे व मिल्कशेक तयार करून घ्यावा.

आता शेवया साध्या असतील तर गरम पाण्यात टाकून मऊ करून ध्याव्यात.  नंतर वरून गार पाणी घालून गाळून घ्याव्यात.

आता सर्व साहित्याची जमवा जमव झाली असेल तर छानपैकी एक मोठा काचेचा ग्लास घ्यावा.  त्यामधे सर्वात आधी तळाला एक चमचा रोज सिरप नंतर अनुक्रमे एकेक चमचा सब्जा बी,  शेवया, मँगो पल्प घालावे. परत असाच अजून एक लेयर तयार करून मग ड्रायफ्रूट्स व मिल्कशेक घालावा.  शेवटी आईस्क्रीम घालून वर टुटीफ्रूटी व आंब्याचे क्यूब सजावटीसाठी घालावे.

थंडगार सर्व्ह करावे.

टिप :-
* सर्व साहित्य आधीच तयार करून फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावे ऐनवेळी ग्लास मधे सर्व साहित्य एकत्र करून द्यावे.
* साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 April 2018

खरबूज मिल्कशेक ( Musk Melon Milkshake)

No comments :

खरबूज हे फळ खास करून उन्हाळ्यात येते. रसाळ, गोड चवीचे व गुणधर्माने थंड असते. याचा मिल्कशेक अतिशय उत्तम चवीचा लागतो.  कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* खरबूज लहान आकाराचे १ नग ( साधारण ५०० ग्रॅम)
* थंड दूध अर्धा लिटर
* साखर ४ टेस्पून
* वेलचीपूड १/४ टीस्पून
* बदामाचे काप सजावटीसाठी

कृती :-
प्रथम खरबूज मधून कापून दोन भाग करावेत व आतील बीया काढून स्वच्छ करावे. नंतर साल काढून लहान चौकोनी तुकडे करावेत.

आता मिक्सर जारमधे खरबूजाचे तुकडे, साखर, वेलचीपूङ घालून मऊ पेस्ट करावी. नंतर सर्व पेस्ट झालीय का, कुठे तुकडे राहीले नाहीत ना याची खात्री करून नंतर दूध घालावे व परत एकदा सर्व एकजीव करावे.

आता तयार खरबूज शेक ग्लास मधे घालून वरून बदामाचे काप घालून सर्व्ह करावा. थंड हवे असेल तर आधीच करून फ्रिजमधे ठेवावा.  बर्फ अजिबात वापरू नये. 

टिप :- वेलचीपूङ आवर्जून घालावी.  स्वाद खूप छान येतो व वेलची प्रकृतीला थंड असते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 May 2017

मँगो लस्सी (Mango Lassi)

No comments :

उन्हाळा म्हटले की थंडगार काही प्यायला मिळाले तर सर्वानाच आवडते. त्यातही आंब्याचा सिझन चालू असतो. मग काय आंब्यापासूून बनणारी विविध थंड पेय, आईस्क्रिम, कुल्फी... मजा असते. आमच्याकडे उन्हाळा आंबामय असतो. आंब्याचेच विविध पदार्थ चालू असतात. त्यापैकीच एक "मँगो लस्सी " साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ताजे गोड दही २ वाट्या
* पिकलेला हापूस आंबा मोठा १
* साखर आवडीनुसार
* मीठ चिमूटभर
* फ्रेश क्रिम २ टेस्पून (ऐच्छीक)

कृती :-
प्रथम आंबा साल काढून चौकोनी फोडी करून घ्यावा.

आता मिक्सरमधे दही, आंब्याच्या फोडी, साखर २ चमचे व चिमुूटभर मीठ घालून घुसळावे. फारच घट्ट वाटले तर बर्फाचे खडे किवा गार पाणी घालून घुसळावे.

फ्रेश क्रिम वापरणार असाल तर मिश्रण घुसळून झाल्यावर घालावे व परत एकदा हलकेच घुसळावे. क्रिममुळे लस्सी मलईदार लागते व ग्लासमधे ओतल्यावर वर फेस (फोम) येतो. दिसायला आकर्षक दिसते.

आता तयार थंडगार लस्सी काचेच्या मोठ्या ग्लासमधे घालून प्यायला द्यावी.

टिप्स :-
* आंबा शक्यतो हापूसच घ्यावा. केशर नसतो. इतर कोणता वापरायचा असेल तर आधी मँगो पल्प तयार करून गाळून घ्यावा.
.* दही ताजे व गोड असावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

11 January 2017

ओल्या हळदीचे दूध ( Turmeric Golden Milk)

No comments :

"हळद" ही अत्यंत औषधी व गुणकारी आहे.सर्दी, कफ झाले असेल तर "हळदीचे दूध" त्यावर रामबाण उपाय आहे. घशातील खवखव थांबते. तसेच आयुर्वेदात हळदीला खूप महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.अजूनही हळदीचे खूप फायदे आहेत. रक्तशुध्दी होते, निद्रानाशापासून आराम मिळतो.,श्वसन विकारांवर उपयोगी आहे.त्वचेवर चमक येते. रंग उजळतो. तसेच दूधात कँल्शियम भरपूर असते. त्यामुळे हळद घालून दूध प्यायल्याने  दुहेरी फायदा होतो. थंडीच्या दिवसात हळदीचे दूध अवश्य प्यावे. अनेक फाबयदे होतात. कसे तयार करायचे, साहित्य व कृती 👇 👇

साहित्य :-
* दूध अर्धा लिटर
* ओली हळद २ इंच
* वेलची पावङर १/२ टीस्पून
* लवंगा २
* दालचिनी पावडर १/२ टीस्पून
* मध २ टेस्पून
* खडीसाखर १ टेस्पून (ऐच्छीक)

कृती :-
प्रथम दूध गरम होण्यास ठेवावे. दूध गरम झाले की, त्यामधे हळदीचे खोड चेचून अथवा किसून घालावे. पाठोपाठ लवंगा टाकाव्यात. तसेच वेलची पावडर, थोडी दालचिनी पावडर घालावी व दूध पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. गोड हवे असेल तर आताच खडीसाखर घालावी.

आता चांगले उकळलेले दूध ग्लासमघे गाळणीने गाळून ओतावे. वरून मध घालावा व थोडी दालचिनी पावडर भुरभुरावी. गरम-गरम दूध प्यावे.

औषधी व गुणकारी असे "हळदी दूध" थंडीमघे आवर्जून प्यावे. तुम्हीही जरूर करून बघा. नक्की आवडेल.

टिप:- ओली हळद नसेल तर १/२ टीस्पून हळद पावडर वापरावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

08 January 2017

कन्डेंस्ड मिल्क (Condensed Milk)

No comments :

"कन्डेंस्ड मिल्क" हे केक,निरनिराळ्या खीरी, हलवा, मिठाई बर्फी तसेच फ्रूट सँलड करताना उपयोगात आणले जाते. "कन्डेंस्ड मिल्क" पदार्थात वापरले तर वेगळी साखर किंवा खवा वापरण्याची गरज उरत नाही व पदार्थ झटपट बनतो. बाजारात "नेसले मिल्कमेड " "अमूल मिठाईमेड" हे  कन्डेंस्ड मिल्क सहज उपलब्ध आहेत. पण एखाद्या ऐन गरजेवेळी नाही मिळाले किवा दुकानात जाणे शक्य नसते अशावेळी आपण घरच्या-घरीच बनविले तर? अगदी साधी,सोपी व कमी साहित्यातील कृती आहे. तर हे "होममेड कन्डेंस्ड मिल्क" कसे करायचे साहित्य व कृती 👇

साहित्य :-
° गाईचे दूध १/२ लिटर
° साखर १/२ कप
° चिमुटभर खाण्याचा सोडा

कृती :-

प्रथम एका जाङ बुङाच्या पातेल्यात दूध तापविण्यास ठेवावे.

तापून वर आले की, त्यामधे साखर घालावी. पळीने हलवत रहा. साखर विरघळून दूध उकळू लागले की चिमूटभर सोङा घालावा व दूध सतत ढवळत रहावे. दूध उकळून साधारणपणे एकूण दूधाच्या १/३ दूध झाले पाहीजे.

दूध आटत आले की,मधे-मधे बशीत थेंब टाकून पहावा. साधारण चिकट व साखरेच्या एकतारी पाकाप्रमाणे बोटाला लागला तर आपले कन्डेंस्ड मिल्क" तयार झाले. थंड करून काचेच्या हवाबंद बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावे. गरज पडेल तेव्हा वापरा.

रोजची घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे घेऊन त्याचे मोठे चौकोनी तुकडे करा व वरून हे होममेड तयार मिल्कमेड चमचाभर घालून मुलांना डिशमधे घालून काटा चमच्याने खायला द्या.खूप सुंदर लागते व मुलं फळे आवडीने खातात.

टिप :- दूध उकळत असताना पळीने तळापासून सतत हलवत रहावे. दूध खाली लागले तर  करपट वास येतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

15 May 2016

ओरीओ मिल्कशेक (Oreo Milkshake)

No comments :

सर्वसामान्यपणे मुलांना कोणत्याही पदार्थाचा चाँकलेट फ्लेवर प्रचंड आवडतो. बिस्कीट असो किंवा मिल्कशेक, आईस्क्रिम असो मुले चाँकलेट स्वादाला प्राधान्य देतात. तर मुलांच्या आवडीचा चाँकलेट फ्लेवरचा मिल्कशेक कसा केला पहा. साहीत्य व कृती -

साहीत्य :-
* थंड दूध अर्धा लिटर
* चाँकलेट क्रिम ओरीओ बिस्कीट्स 5 नग
* कोको पावडर 1टेस्पून
* चाँकलेट इसेंन्स 4-5 थेंब
* पिठीसाखर 2 टीस्पून
* व्हँनिला आईसक्रीम 2 स्कूप
* चाँकलेट चिप्स किंवा शेव गार्निशिंग साठी

कृती :-

प्रथम मिक्सरमधे बिस्कीट्स तूकडे करून टाका. पावडर करून घ्या. नंतर  कोको पावडर, साखर, इसेंन्स व दूध घालून परत एकदा हलकेच फिरवा.

आता दोन मोठे ग्लास घ्या. त्यामधे आधि तयार केलेले दूध घाला. नंतर आईसक्रीम घाला. शेवटी वरून चोको चिप्स किंवा शेव भुरभूरा.

थंडगार प्यायला द्या. मुलांना खूप आवडतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 April 2016

मँगो मस्तानी (Mango Mastani)

No comments :

एप्रिल,मे उन्हाळा म्हटले की, जोडीला आंबे आलेच. आणि आंबे कोणाला आवडत नाहीत?  तो तर फळांचा राजा, सर्वानाच आवडतात. मग ओघानेे आंब्याचे विविध प्रकार करणे आलेच. त्यातसुध्दा खास उन्हाळ्यासाठी  थंडगार व पौष्टीक कांही घरच्या-घरी मिळाले तर? मग काय मजाच!

तर आज खास पुण्याची प्रसिध्द अशी 'मँगो मस्तानी' करू. या पेयाचा शोध लावण्याचे सर्व श्रेय पुणेकरांचेच बरं का! पुण्यात सुध्दा खास करून 'सुजाताची मँगो मस्तानी' प्रसिध्द आहे. मी अलिकडे नाही पण बर्याच बर्षापूर्वी ही चव चाखली होती. आवडली मला. ताजे आंबे, दूध व आईसक्रीम वापरून करतात. बाकी बर्याच ठिकाणी कस्टर्ड पावडर, रंग इसेंन्स वापरतात. तसेच यात अजून इतरही स्वाद आहेत, जसे की, चाँकलेट, आँरेंज,केशर-पिस्ता, बदाम इत्यादी. तर आपण बघू, मँगो मस्तानीचे साहीत्य व कृती :-

* हापूस आंबे 3-4 (साईजवर कमी-जास्त)
* थंडगार फुल क्रीम दूध अर्धा लिटर
* साखर 2-3 टेस्पून ( आंब्याच्या गोडीवर कमी-जास्त)
* इसेंन्स 5-6 थेंब ( ऐच्छीक)
* ड्रायफ्रूट्स काप 2टेस्पून
* चेरी सजावटीला
* वँनिला आईसक्रीम 4 स्कूप

कृती :-

सर्वात आधि आंबे साल काढून लहान फोडी करून घ्या.

आता सजावटीला साठी थोड्या आंब्याच्या फोडी व ड्रायफ्रूट्स काप बाजूला शिल्लक ठेवा  व बाकीचे साहीत्य, चिल्ड दूध,आंब्याच्या फोडी व साखर, इसेंन्स एकत्र करून मिक्सरमधे किवा ब्लेडरने घुसळा. शेवटी ड्रायफ्रूट्स मिसळा व हलकेच फिरवा. पावडर नको व्हायला.

आता ग्लासमधे आधि तयार आंब्याचे मिश्रण पाउण ग्लास भरेपर्यंत ओता, नंतर वर एक आईसक्रीम चा गोळा घाला. शेवटी वरून चेरी व आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्स काप लावून सजवा.

थंडगार, एकदम चिल्ड सर्व्ह करा. मस्त लागते.
एकदम सोपी कृती आहे. तूम्हीही करून बघा. नक्की आवडेल. मात्र कशी झाली सांगायला विसरू नका.

टिप :- तयार करून फ्रिज मधे ठेवू नका चव बिघडते. वेळेवर ताजेच तयार करा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 April 2016

मैंगो कुल्फी (Mango kulfi)

No comments :

उन्हाळा म्हटले की, बाहेर उन्हें रणरणत असतात सहाजिकच काहीतरी थंडगार खावे वाटते. तर सकाळीच कुल्फी लावून फ्रिज मधे ठेवली तर, जेवण झाले की, मस्त मलाईदार कुल्फी चा आस्वाद घेता येईल. या दिवसात आंबे ही येतात.  तर चला आपण घरच्या-घरी पौष्टीक, शुध्द सात्विक अंब्याच्या स्वादाची कुल्फी तयार करू.

साहीत्य ;-

* होलमिल्क 1/2 लिटर
* खवा 50 ग्राम / मिल्क पावडर 4 टेस्पून
* साखर 1/2 वाटी
* मँगो पल्प 2 वाट्या
* काॅर्नफ्लोअर /तांदुळ पीठी 2 टेस्पून
* वेलचीपूड
* ड्रायफ्रूट्स

कृती :-

प्रथम दूध उकळवायला ठेवावे. थोडे उकळले की,खवा किवा मिल्क पावडर थोड्या दूधामधे मिक्स करून मग उकळत्या दूघात घाला. नंतर काॅर्नफ्लोअर पण थोड्या दूधामधे मिक्स करून दूघ हलवत-हलवत त्यात घाला. गुठळी होऊ देऊ नका. मिश्रण सतत ढवळत रहा. दूध दहा मिनिटानी घट्ट होण्यास सुरवात होईल. पूरेसे घट्ट झाले की,गँस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या.

आता आंबे सोलून, चिरून त्याच्या फोडी करून घ्या व साखर मिसळून मिक्सरमधे फिरवा.

आता थंड झालेल्या दूधामधे आब्यांचा रस, वेलची पूड,ड्रायफ्रूट्स सर्व घाला. परत एकदा सर्व एकत्र करून मिक्सरमधे फिरवा.

नंतर तयार दूधाचे मिश्रण कुल्फी मोल्डमधे किवा कोणत्याही प्लास्टिक बाऊलमधे ओता व फ्रिजर मधे 2-3 तास ठेउन द्या.

खायला देताना वरून ड्रायफ्रूट्स चा चूरा भुरभूरा व थंडगार 'मँगो कुल्फी' सर्व्ह करा. तूम्हीही करून बघा व कशी झाली ते सांगायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 April 2016

फालुदा आईसक्रीम (Faluda Ice-cream)

No comments :

'फालुदा आईसक्रीम' एक मस्त इंडियन डेजर्ट चा प्रकार आहे. गरमीच्या दिवसात असे मस्त गारेगार घरच्या घरी दुपारचे वेळी खायला मिळाले तर किती छान न?  तर चला बघू कसे करायचे पाहू,

साहीत्य :-
* फुल क्रीम मिल्क 1 लिटर
* फालुदा शेवया 1बाउल
* रोज सिरप अर्धा कप
* सब्जा बी 1 टेस्पून
* जेली क्यूब्स
* व्हँनिला आईसक्रीम
* ड्रायफ्रूट्स ऐच्छीक
* चेरी, टूटी-फूटी सजावटीला

कृती :-

प्रथम दूध उकळवायला ठेवावे.  चांगले उकळून दाट होईपर्यंत उकळा व गार करून फ्रिज मधे चांगले थंड होण्यासाठी ठेवून द्या.

सब्जा बी वाटीत पाणी घेऊन फुलण्यासाठी भिजत घाला. ( हे प्रकृतीला अतिशय थंड व पाचक असते.)

शेवया गरम पाण्यात हलकेच उकडा व थंड होण्यासाठी फ्रिज मधे ठेवून द्या.

आता खायला देण्तासाठी एक उभा ग्लास घ्या. त्यामधे तळाला आधी रोज सिरप घाला. नंतर अनुक्रमे शेवया, सब्जा बी, ड्रायफ्रूट्स, जेली घाला. नंतर गार दूध घाला. शेवटी वर आईसक्रीम एक स्कूप घाला व टूटी-फूटी, चेरीने सजवा.

गारेगार सर्व्ह करा.

थंड व पौष्टीक आहे तूम्हीही करून बघा

टीप :- फालुदा शेवया नसतील तर नेहमीच्या नायलाँन शेवया वापरा. किवा तयार करा.
कृती :-1 वाटी काॅर्नफ्लोअर, 2 वाटी पाणी घेऊन एकत्र करा.  गुठ्यळ्या होउ देउ नयेत.  गँसवर हलवत -हलवत घट्ट होईपर्यंत शिजवा व गरम असतानाच शेव यंत्रातून बर्फाच्या गार पाण्यात बाउल मधे पाडा. बाउल तसाच फ्रीज मधे ठेवा. ऐनवेळी पाण्यातून चमच्याने काढा व ग्लासमघे घाला.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 December 2015

खजूर-अंजिर मिल्कशेक( Dates-fig Milkshake)

No comments :

खजूर,अंजिर दोन्हीही खूप पौष्टीक. मग दोघांचा मिलाफ म्हणजे डबल पौष्टीक. लहान मुलांना वजन वाढीसाठी, शक्ति येण्यासाठी दूधात अंजिर भिजवून ते दूध देत असत. खजूर लोह वाढवतो. आणि दूधाची उपयुक्ततता तर आपल्याला माहीतच आहे. तर चला पट्कन आपण सोपा व पौष्टीक शेक तयार करू. साहित्य व कृती :

साहीत्य :-

* सीडलेस काळा खजूर ७-८ बिया
* सुकं अंजिर ४-५
* दूध २००मिली.
* साखर २ टेस्पून आवडीनुसार कमी-अधिक

कृती :-

प्रथम खजूर व अंजिर ४ तास थोड्या दूधामधे भिजत घाला.

नंतर मिक्सरमधे भिजलेले खजूर,अंजिर व साखर घाला व पेस्ट करा.

आता  दूध घाला व हलकेच एकदा फिरवा. खजूर -अंजिर मिल्कशेक तयार.

कोमट किंवा आवडत असेल तर गार सर्व्ह करा.
अगदी लहान मुलांना द्यायचे असेल तर कोमटच द्या.

07 February 2015

स्ट्राॅबेरी शेक (Strawberry shake )

No comments :

बर्याच वेळा मुले दूध प्यायचा कंटाळा करतात. त्याना रोज-रोज एकाच चवीचे दूध नको असते.तर त्याना अशा वेळी निरनिराळे फळांचे शेक करून द्यावेत.जसे की अॅपल शेक,मॅगो शेक,चिकू शेक तसेच आज मी करणार आहे स्ट्राबेरी मिल्क शेक !म्हणजे दूध ही पोटात जाते व फळे पण ! कसा करायचा पहा...

साहीत्य :-

1) स्ट्राॅबेरी 15-20
2) स्ट्राॅबेरी क्रश दोन टे.स्पून
3) स्ट्राबेरी इसेंन्स पाव टीस्पून
4) गायीचे अथवा टोन्ड मिल्क अर्धा लिटर
5) साखर 2 टेस्पून (गरज वाटली तर वापरावी)

कृती:-

       प्रथम स्ट्राॅबेरी स्वच्छ धुवून काप करून घ्याव्यात.

नंतर हे काप,साखर, क्रश सर्व एकत्र करून अर्धा कप दूध घालून ब्लेंड करावे. चांगले एकजीव झाले की राहीलेले दूध व इसेंन्स घालून परत थोडे ब्लेडरने घुसळावे.मस्त गुलाबी लालसर शेक तयार !

थंडगार सर्व्ह करा.

टीप :- स्ट्राॅबेरी छान पिकलेल्या व गोड असतील तर साखर वापरण्याची गरज नाही.

दूध कच्चे व थंड वापरावे.

11 October 2014

मसाला दूध(Masala Dudh)

No comments :

अश्विन महिन्यातील पौर्णिमा कोजागरी किंव्हा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर येथे कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते.  असे मानले जाते की रात्री देवी लक्ष्मी घरोघरी येते आणि  'को जागर्ती' म्हणजे 'कोण जागे आहे?' असे विचारून जे जागे आहेत त्यांना ती आशिर्वाद देते. म्हणूनच रात्री जागरण केले जाते. रात्री १२ वाजता मसाले दुधाचा देवाला नैवेद्य दाखून दुधाचे पातेले गच्चीवर नेतात। त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसेल असे ठेऊन चंद्राची पूजा केली जाते. नंतर सगळ्यांना हे मसाला दुध प्यायला दिले जाते. कोजागरी पौर्णिमेलाच मसाला दुध करतात असे नाही. सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू अशा प्रसंगी देखील  मसाला दुध केले जाते. कसे करायचे पहा 👇 

साहीत्य:
* दूध एक लिटर (फुल क्रिमचे म्हशीचे घ्यावे)
* साखर अर्धी वाटी(आवडीनुसार कमी-जास्त करावी)
* वेलचीपूड १  टीस्पून
* जायफळ १/२  टीस्पून
* बदाम,काजू,पिस्ता ची भरड पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत)
* चारोळी १ टीस्पून
* केशर चिमुटभर 

कृती:
 प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यामधे दुध तापण्यासाठी गॅसवर ठेवावे. तापून फुगा आला की,गॅस बारीक करावा व त्याच्यामधे डाव टाकावा अथवा एक काचेची चहाची बशी पालथी टाकावी म्हणजे दुध तळाला लागत नाही.आणि पाच मिनीटे उकळू द्यावे.

उकळून थोडे आटले की त्यामधे वेलची,,सुक्या मेव्याचे कुट व साखर आणि केशर घालावे.एक उकळी आणावी व गॅस बंद करावा.

सजावटीसाठी शिल्लक ठेवलेले सुकामेव्याचे काप व चारोळ्या वरून घालावेत व आवडीप्रमाणे ,फ्रिजमधे थंड करून किंवा गरम पिण्यास द्यावे.शक्यतो कोमटसर दुधच प्यावे.चविला छान पण लागते व थंड दुधाने पोटात गॅस होतात,ते होण्याची भिती पण रहात नाही.

टीप :- 
* सुक्यामेव्याची  बारीक पावडर न करता थोडे भरड कूटच ठेवावे दुध पिताना मधे-मधे दाताखाली आलेले छान लागतात.

* जायफळ पूड अगदी ऐनवेळी दूध देताना घालावी. उकळताना घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते. 

* दिलेल्यापैकी फक्त कोरडे साहित्य पावडर करून बाटलीत भरून ठेवले तर एरव्ही पण हा दूध मसाला गरम दूधामधे घालून पिता येतो.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.