Showing posts with label Soup. Show all posts
Showing posts with label Soup. Show all posts

18 November 2016

वेज मनचाँव सूप (Manchow Soup)

No comments :

आजकाल चायनीज पदार्थांची क्रेझ वाढलीय. त्यापैकीच हे एक सूप आहे. यामधे बर्याच भाज्या असल्याने पौष्टीक व पोटभरीचे होते. संध्याकाळच्या जेवणात फारशी भूक नसेल व एक बाउल वेज मनचाँव सूप प्याले तर जेवणाची अजिबात भुक रहात नाही. असे हे स्पाईसी पण पौष्टीक सूप कसे केले पहा साहीत्य व कृती,

साहित्य :-

* चिरलेला कोबी १ वाटी
* शिमला मिरची १ वाटी
* गाजर किसून २ नग
* बीन्स १/२ वाटी
* कांदापात (पांढरा भाग)चिरून १/२ वाटी
* आलं-लसूण बारीक चिरून
* मिरची उभी चिरून बी काढलेली
* काँर्नफ्लोअर १ टेस्पून
* सोया साँस १ चमचा
* व्हिनेगार १ टीस्पून
* शेजवान साँस १ टीस्पून
* काळी मिरी पावडर १/२ टीस्पून
* मीठ चविनूसार
* वेजीटेबल स्टाँक किंवा पाणी ४ वाट्या
* तेल १ टेस्पून
* तळलेल्या चायनीज नूडल्स १/२ वाटी

कृती :-

प्रथम पँन गरम करून तेल घालावे. नंतर त्यामधे आलं-लसूण व मिरची घालून परतावे. नंतर कांदा व सर्व भाज्या एकेक करून घालून परताव्यात. फार मऊ होईपरेंत नको. साधारण कचवटच ठेवाव्यात.

आता मीठ,मिरपूड व व्हिनेगार, शेजवान साँस, सोया साँस घालावे. त्यावर व्हेजिटेबल स्टाँक घालावा. उकळत असतानाच काँर्नफ्लोअर अर्धा कप पाण्यात पेस्ट करून त्यामधे घालावे व सर्व चांगले ५ मिनिट उकळू द्यावे.

शेवटी तयार सूप बाऊलमधे काढून सर्व्ह करताना वरून तळलेल्या नूडल्स घालाव्यात व गरमा-गरम प्यायला द्यावे.

टिप्स :-
*भाज्या एकदम बारीक व लांबट चिराव्यात.

*व्हेजिटेबल स्टाँक असेल तर जास्त चांगले. सूप अधिक पौष्टीक बनते.

* नूडल्स ऐच्छीक आहेत. तयार मिळतात. किंवा चायनीज नूडल्स गरम पाण्यात शिजवून पाणी काढावे व गार नूडल्स तेलात कुरकुरीत तळून घ्याव्यात.

*आवडीनुसार भाज्या व प्रमाण घेऊ शकता.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

24 February 2016

टोमँटो मिक्स व्हैज सूप ( Mix Veg.Soup)

No comments :
सूप! नुसते टमाटा सूप नेहमीच केले जाते. आज मी मिक्स व्हैज सूप केले आहे. हे सूप जर रात्रिच्या जेवणा ऐवजी घेतले तरी पोटभरीचे असल्याने भूक लागत नाही. एकदम सोपे व पट्कन होणारे आहे.

साहीत्य :-
* लाल टोमँटो 4 नग
* लाल भोपळा एक वाटी फोडी
* गाजर 2 नग
* लवंगा 4.
* दालचीनी 1इंच
* मिरपूड
* आलं अर्धा इंच
* लसूण 4 पाकळ्या
* गव्हाचे पीठ 1 टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर 1 टीस्पून
* पाणी /भाजीचा स्टाँक असेल तर जास्तच चांगले .

कृती :-

प्रथम गाजर व भोपळा साल काढून मोठे तूकडे करून घ्या.

आता कूकरच्या डब्यात टोमँटो, गाजर व भोपळ्याच्या फोडी घाला. त्यासोबतच, गव्हाचे पीठ व मीठ, साखर  सोडून बाकी सर्व घाला व शिजायला ठेवा. एक शिट्टी काढा.

थंड झाले की,लसूण,आलं दालचीनी लवंगा चमच्याने काढून टाका, टोमँटो ची साल काढा व मिक्सरमधे किवा ब्लेडरने घुसळून मीठ व साखर घाला.गरजे इतक पाणी घाला.

आता एका वाटीत गव्हाचे पीठ घेऊन थोडे पाणी घालून पेस्ट बनवा व वरील मिश्रणात मिसळा. सर्व नीट ढवळून गँसवर गरम करायला ठेवावे. चांगले गरम होउन उकळले की गँस बंद करा व गरमा-गरम सूप बाउलमधे काढा. वरून मिरपूड घाला व प्यायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 August 2015

दुधी भोपळ्याचे सूप( Bottlle Gourd Soup)

No comments :

दुधी भोपळा ही एक सर्वत्र मिळणारी वेलवर्गीय भाजी आहे. पण सहसा कोणाला आवडत नाही.पथ्यकर भाजी म्हणून संबोधतात. परंतू आजारपणातून उठलेल्या व्यक्तीला रोज द्यावी. अशक्तपणा लवकर भरून येतो. तसेच ह्रदय रोग्याना सुध्दा खूपच उपयुक्त आहे. याचा रस रक्त पातळ ठेवते. दुधीमधे 96 टक्के पाणी असते. वजन घटवण्यासाठी पण उपयुक्त आहे. कमी तेलात होते. याचे विविध प्रकार करून आहारात वापरू शकतो. जसे की, भाजी, पराठे, कोफ्ते, हलवा, सालीची चटणी, नुसते फोडी वाफवून सलाड इत्यादी. काहीही करून जास्तीत-जास्त आहारात वापरावा. तर अशा या गुणी दुधीचे मी सूप केले. पौष्टीक व चवदार असे सूप कसे केले पहा !

साहीत्य :-
1) दुधीच्या फोडी 2 वाट्या
2) लसूण चार पाकळ्या
3) आले अर्धा इंच
4) लवंगा दोन
5) काळे मिरे चार
6) मीठ चवीला
7) फ्रेश क्रीम ऐच्छिक

कृती :-

       प्रथम  दुधीच्या फोडी व मीठ,क्रिम सोडून बाकीचे सर्व साहीत्य कुकरमधे वाफवून घ्यावे.

थंड झाल्यावर त्यातील लवंग मिरे काढून व ब्लेंडरने वाटावे. गाळून घ्यावे. चवीला मीठ व दोन वाट्या पाणी घालावे. एक उकळी आणावी.

गरम असतानाच बाऊलमधे घेऊन , वरून क्रीम घालावे व सर्व्ह करावे.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 May 2015

व्हेजिटेबल स्टाॅक (Vegetable Stock)

No comments :

बरेच वेळा असे होते आपल्याला भाजीचे सूप करायचे असते. पण सर्वच भाज्या घरात ऐनवेळी उपलब्ध असतील असे नाही. मग भाज्या आणून सूप करणे म्हणजे कटकटीचे व किचकट काम वाटते.म्हणून हा स्टाॅक तयार असेल तर आपण कोणतीही उपलब्ध भाजी घालून सूप पट्कन तयार करू शकतो.. तर स्टाॅक म्हणजे सर्व भाज्या शिजवून त्यांचा काढलेला अर्क ! तर कसा करायचा पहा.

साहीत्य :-

1) कोबी,सिमला मिरची,गाजर,फ्लाॅवर,मटार ,लाल भोपळा या सर्व किवा आपल्या आवडीच्या अजून काही भाज्या मिळून 500 ग्रॅम
2) कांदा एक
3) लसूण 3-4 पाकळ्या
4) आले एक इंच
5) मिरे 8-10
6) तमालपत्र दोन लहान पाने
7) लवंगा 3-4
8) पाणी दोन लिटर

कृती :-

      सर्वात आधि  पाणी गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामधे वरील सर्व मसाला टाका. पाणी गरम होईपर्यंत वरील सर्व भाज्या मोठ्या-मोठ्या कापून एक एक करून गरम पाण्यात टाका.

सर्व भाज्या पाण्यात 25-30 मिनिटे चांगल्या उकळू द्याव्यात.

नंतर सर्व भाज्या तशाच थंड होऊ द्याव्यात. गार झाल्यावर मोठ्या गाळणीतून सर्व भाज्या गाळाव्यात. आता जो अर्क निघाला आहे तो एका बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावा. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरा.कोणत्याही भाजीचे झटपट सूप तयार करता येते.आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून व स्टाॅक वापरून विविध प्रकारची सूप्स तयार करता येतात.

हा स्टाॅक 8-10 दिवस आरामात टिकू शकतो. जास्तच रहातो पण शक्यतो आठ आठ दिवसांचा करून ठेवावा.

टीप :- भाज्या गाळून घेतल्यावर वर ज्या भाज्या रहातात त्या सत्वविरहीत असतात पण टाकायचे नसेल तर त्यात आणखी थोड्या भाज्या वापरून पावभाजी ,कटलेट किवा मॅश करून थोडे गहूपीठ वापरून पराठे बनवू शकतो.

  आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

13 May 2015

मिश्र भाज्यांचे सूप (Mix Veg soup)

No comments :
सूप म्हणजे एक प्रकारचे पातळ स्वरूपातील अन्नच असते. लहान मुले , आजारी माणसे,  वृध्द ज्यांना अन्न चावून खाणे जमत नाही त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पोटभरीचा व पौष्टीक प्रकार आहे. तसेच सर्वसामान्य माणसे मुख्य जेवणाच्या आधिचा पाचक पदार्थ म्हणून घेतात. सूप करणे म्हणजे अनेक गृहीणीना क्लिष्ट काम वाटते. पणे ते तसे नाही. अत्यंत सोपे व कमी साहीत्यात व पट्कन होणारा पदार्थ आहे. आपण जर भाज्याचा स्टाॅक (पातळ स्वरूपात भाज्यांचा अर्क) फ्रिज मधे तयार करून ठेवला तर कोणत्याही भाजीचे सूप पट्कन बनविता येते. सूपचे खूप विविध प्रकार आहेत. आपण आपल्या बुध्दीमत्तेचा वापर करून अनेक नवनवीन प्रकारचे सूप बनवू शकतो. मी आज चार-पाच भाज्या पण थोड्या-थोड्याच शिल्लक होत्या म्हणून मिक्स व्हेज सूप बनविले. कसे ते पहा.
साहीत्य :-
1) सिमला मिरची 1
2) कोबी अर्धी वाटी
3) फ्लाॅवर अर्धीवाटी
4) गाजर 1
5) मटार दाणे पाव वाटी
6) बटर 1 टीस्पून
7) 7-8 काळ्या मिर्याची भरड पूड
8) मीठ चवीला
9) भाजीचा स्टाॅक 4 कप
10) गव्हाचे पिठ 1-1/2 टेस्पून
टीप :- आपल्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेनुसार भाज्या व भाज्यांचे प्रमाण घ्यावे.
कृती ;-
   सर्व भाज्या आधि धुवून मग बारीक चिरून घ्याव्यात .
नंतर पॅनमधे बटर घाला व भाज्या त्यावर थोड्या परता.सिमला व कोबी थोडे नंतरच घालावे म्हणजे क्रंची रहाते व दाताखाली आलेले चांगले लागते.
नंतर त्यामधे गव्हाचे पिठ घालून थोडे परता.(गव्हाच्या पिठाने दाटपणा येतो) आता भाजीचा स्टाॅक चार कप घाला. मीठ व मिरपूड घाला.चांगले उकळवा.
गरमा-गरम पौष्टीक सूप तयार ! जेवणाचा फारच कंटाळा आला एखादे दिवशी तर रात्रिच्या जेवणाला पोटभरीचा व पौष्टीक असा पर्याय ठरू शकतो.कारण सर्व भाज्या व कणिक म्हणजे पोळी,भाकरीची जागा भरून काढते.
समजा आपल्याजवळ भाजीचा स्टाॅक तयार नसेल तर बटरवर आधि एखादे तमालपत्र,मिरे चार ,दोन लवंगा, लसूण दोन पाकळ्या,आलं लहान तुकडा टाका नंतर बारीक कांदा टाका व परतत परतत एक-एक भाज्या,पिठ व पाणी घाला व उकळवा. वरून मिरपूड घालून सर्व्ह करा. असेही सूप आपण करू शकतो पण स्टाॅक वापरल्यास त्याचा पौष्टीकपणा जास्त वाढतो. तसेच गव्हाच्या पिठाऐवजी पाण्यात मिसळून काॅर्नफ्लोअर पण वापरू शकतो.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 March 2015

नाचणी सूप (Raagi Soup)

No comments :

नागली किंवा रागी या नावाने ओळखलं जाणारं हे  धान्य गरिबांचं अन्न म्हणून आजवर माहीत होतं, पण या गुणी नाचणीचं महत्त्व हल्ली खूपच जाणवायला लागलं आहे. लोह आणि कॅल्शियम यांनी युक्त असलेली नाचणी मुलांच्या वाढीसाठी अप्रतिम आहे. म्हणूनच नाचणी सत्त्वाची लापशी मुलांना देतात. तसेच मोड आलेल्या नाचणीच्या सेवनामुळे नाचणीतलं नैसर्गिक लोह शरीराला मिळतं आणि बाळंतिणीला दूध येण्यासाठी मदत होते. वजन घटवायचे असेल तर आहारात नाचणीची भाकरी खातात. गहू व ज्वारी ऐवजी. नाचणी ग्लुटेनफ्री आहे, नाचणीला कीड लागत नाही, हा तिचा आणखी एक गुण.आणि अतिशय थंड आहे .उन्हाळ्यात खास याचे अंबिल केले जाते.याचाच थोडा माॅडर्न प्रकार म्हणजे सूप ! कसे केले पहा.

साहित्य :

1) नाचणीचं पीठ, एक टेस्पून
2) आंबट ताक, एक वाटी
3) जिरेपूड, 1/2 टीस्पून
4) काळी मिरपूड, 1/4 टीस्पून
5) गाजर, भोपळी मिरची इ. भाज्यांचे बारीक तुकडे एक वाटी,
6) अक्रोड किवा बदाम काप ऐच्छीक
7) चवीला मीठ,
8) लसणीच्या दोन पाकळ्या बारीक चिरून,
9) तूप एक टीस्पून
10) पाणी 2 वाट्या
11) कोथिंबीर.

कृती :

तूप गरम करून त्यात लसूण परतावी, भाज्या आणि अक्रोडचे बारीक तुकडे घालून परतावे, पाणी घालून उकळत ठेवावं.

ताक आणि नाचणीचं पीठ एकत्र कालवून उकळत्या पाण्यात घालावं आणि शिजेपर्यंत ढवळत राहावं. आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवा .

नंतर मीठ, जिरेपूड, मिरपूड घालून खाली उतरावं, कोथिंबीर घालून गरम प्यायला द्यावं.

26 February 2015

काॅर्न सूप (Corn Soup)

No comments :

आजकाल स्वीटकाॅर्न ( गोड मक्याची कणसे) बाजारात भरपूर प्रमाणात येतात.मक्याचा अनेक प्रकारानी आहारात वापर करता येतो.तसेच मका पौष्टीक पण असतो व पोटभरीचा पण! मक्याचे सूप जर एक बाऊल प्यायले तर एखादे रात्रीचे जेवण नाही घेतले तरी चालते.पोट भरते.तर हे सूप कसे करायचे ते पहा.

साहीत्य :-

1) मक्याचे दाणे वाफवलेले 2 वाट्या
2) गाजर जाड किसून एक
3) सिमला मिरची बारीक चिरून
4) कांदापात बारीक चिरून
5) बिन्स (सर्व भाज्या मिळून एक वाटी)
6) आले-लसूण बारीक चिरून ऐच्छिक
7) मिठ,मिरपूड चवीनुसार
8) बटर एक टेस्पून
9) काॅर्न फ्लोअर 2 टेबलस्पून
10) पाणी 4 वाट्या

कृती :-

प्रथम पॅनमधे बटर गरम करावे व आले,लसूण परतावे. त्यावर भाज्या टाकून थोडे परतून पाणी घाला.

पाण्याला ऊकळी येईपर्यंत मका अर्धी वाटी तसाचा बाजूला ठेउन बाकीचा मिक्सरवर भरड वाटून घ्या.

आता उकळलेल्या पाण्यात वाटलेली पेस्ट व काॅर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिक्स करून आणि अख्खा बाजूला ठेवलेला मका सर्व  मिसळावे.मिरपूड, मिठ घालावे व एक उकळी येऊ द्यावे.

गरभा-गरम सर्व्ह करावे.

14 February 2015

पालक सूप (Spinach soup )

No comments :

पालक एक अशी सहज व स्वस्त मिळणारी भाजी आहे की ज्यात लोह ,'अ'जीवनसत्व भरपूर असते. पालक आपण खूप प्रकारानी आपल्या आहारात वापरू  शकतो.
उदा.भाजी,सूप,सलाड वेगवेगळे स्नॅक्स इत्यादी तर अशा या बहुउपयोगी पालकाचे आपण सूप बनवूया ! कसे पहा

साहीत्य :-

1) एक मध्यम जुडी ताजे पालक
2) लवंगा 4
3) दालचिनी एक इंच
4) मिरे 4-5
5) आले अर्धा इंच
6) लसूण 3-4 पाकळ्या
7) काॅर्न फ्लोअर 2 टेस्पून
8) दूध काॅर्न फ्लोअर मिक्स करण्यापुरते
9) साखर 1 लहान चमचा
10) मीठ चवीला
11) पाणी

कृती :-

       प्रथम पालकाची पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत.

नंतर ही पाने व लवंग,दालचिनी,मिरे,आले-लसूण गरम पाण्यात पाच-सात मिनिट वाफविण्यास टाकावीत. वाफून थंड होऊ द्यावे.

आता हे सर्व ब्लेडरने घुसळावे व मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावे.आवशक्यतेनुसार पाणी घाला.थोडे दाटसरच असावे.

काॅर्नफ्लोअर थंड दूधात कालवून त्यात मिक्स करा. चवीला मीठ व साखर घालून एक उक्ळी आणण्यास गॅसवर ठेवा. सतत हलवत रहा.म्हणजे काॅर्नफ्लोअरच्या गुठळ्या होणार नाहीत.

उकळले की गरमा-गरम सर्व्ह करा.आवडत असेल तर वरून फ्रेश क्रीम घालावे.

टीप :- पालक फार वेळ शिजवू नये.सूपचा रंग पिवळसर येतो.तसेच चिमूटभर साखर जरूर घालावी म्हणजे हिरवा रंग टिकतो.

13 October 2014

बिटाचे सूप(Beetroot Soup)

No comments :

साहीत्य:-
* साल काढून केलेले एका बिटाचे तूकडे
* दोन टोमॅटो
* लसूण पाकळ्या ३-४
* आले एक इंच (साल काढून तूकडे करून)
* काळे मिरे ५-६
* दालचिनी एक ते दोन इंच
* मिठ,साखर चवीसाठी
* काॅर्नफ्लोअर दोन टेस्पून
* फ्रेशक्रीम ऐच्छीक
* पाणी

कृती:-
प्रथम एका भांड्यामधे पाणी घेऊन गरम करण्यास ठेवावे व त्यामधे मीठ,साखर आणि काॅर्नफ्लोअर सोडून वरील सर्व साहीत्य टाकावे व मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. कुकरमधे शिजवले तरी चालते.शिजल्यावर थंड होऊ द्यावे.

थंड झाल्यावर टोमॅटोचे साल काढावे .पाणी गाळून बिटाचे तूकडे, टोमॅटो सर्व साहीत्य मिक्सरमधे वाटावे अथवा ब्लेंडरला वाटावे.वाटताना गरज वाटली तर गाळून ठेवलेलेच पाणी वापरावे.त्यात जीवनसत्वे असतात.वाटून झाल्यावर एका मोठ्या गाळणी मधून गाळावे.

आता गाळलेल्या पातळ पेस्टला ,पाण्यात कालवून काॅर्नफ्लोअर लावावे व चवीला मीठ,साखर घालून उकळण्यास ठेवावे. सतत हलवावे म्हणजे काॅर्नफ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत. आधि गाळलेले पाणी शिल्लक असेल तर आता घालून टाकावे.कितपत दाट आहे त्यानुसार आवडीप्रमाणे कमी-जास्त साधे पाणी घालावे व चांगले गरम होऊ द्यावे.

तयार गरमा-गरम सूप वरून क्रीम घालून सर्व्ह करावे.

टीप :-टोमॅटो नाही घेतला तरी चालते. पण थोडी आंबट गोड चव छान लागते म्हणून मी घालते.
रक्तातील हीमोग्लोबीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर , बिटाचे सूप हा एक अतिशय उत्तम असा प्रकार आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.