Showing posts with label Chutney/Pickles/Muramba. Show all posts
Showing posts with label Chutney/Pickles/Muramba. Show all posts

04 December 2017

लाल मिरचीचा ठेचा (Red Chilli Chuttney)

No comments :

लाल मिरचीचा ठेचा हा झणझणीत व खमंग चटणीचा प्रकार आहे. हा फक्त ठराविक सिझनमधे म्हणजे साधारण नोवेंबर -डिसेंबर मधेच करता येतो. कारण याला झाडावरच पिकलेली मऊ म्हणजे गाभुळलेली अशी मिरची लागते. तरच हा ठेचा हवा तसा ओलसर, रसरशीत होतो. नाहीतर वाळका, चामट होतो. हा गावरान मेवा माझ्याकडे नुकताच गावाकडून आला. अन्यथा मुंबईच्या मंडईत अशा मिरच्या मिळत नाहीत. भाजीवाल्यांकडे शिळ्या होऊन पिकलेल्या वाळक्या लाल मिरच्या असतात. याचा ठेचा होतो पण हवा तसा नाही होत. हा ठेचा वर्षभर टिकतो. नंतर पाहिजे तेव्हा गरजे नुसार थोडा थोडा बाऊलमधे काढायचा व मस्त हिंग-मोहरीची ताजी फोडणी देऊन जेवणात घ्यायचा. खूपच चवदार लागतो. बरेचवेळा यात लसूणही घातला जातो. परंतु आमच्याकडे हिंग, मेथी मोहरीची फोडणी घातलेलाच आवडतो. व टिकण्याच्या दृष्टीतून पण विना लसणाचाच ठिक.  त्यातून कधी लसूण वाला खायची इच्छा झालीच तर बाऊलमधे काढून फोडणी देताना लसूण घालावा. पण जास्तीच्या सर्व ठेच्यात नकोच. तर अशा हा चटकदार ठेचा कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ओली लाल मिरची १/२ किलो
*  मीठ ६ टीस्पून
* लिंबू रस मोठ्या ४ लिंबाचा
* मेथी दाणे १ टीस्पून
* तेल फोडणीसाठी २ टेस्पून
* मोहरी, हिंग, हळद

कृती :-
प्रथम मिरच्या स्वच्छ थुवून पुसून कोरड्या कराव्यात.

नंतर त्यांची देठ काढावीत.

आता देख काढलेेली मिरची, मीठ मिक्सरमधे भरडच वाटावे.

नंतर त्यामधे मेथी तेलात लालसर तळून केलेली पूड व लिंबूरस घालून एकत्र करावे..

स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवावा. त्यातील थोडासा बाऊलमधे काढून घ्यावा . हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी.. गार झाल्यावर ठेच्याावर घालून जेवणात भाकरी, पोळीसोबत खावा. अतिशय रूचकर लागतो. भरल्या वांग्याची भाजी, ठेचा, कांदा, घट्ट दही व सोबत भाकरी.. अहाहा अप्रतिम चव लागते. तसेच एरव्ही थालीपीठ, पराठ्यासोबतही खाल्ला तरी चालते.

टिप: ठेचा गुळगूळीत मऊ अजिबात वाटू नये. भरडच ठेवावा. मधे मधे मिरचीचे बी दिसावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

01 August 2017

अळू देठाचे भरीत (Raita)

No comments :

'अळू' म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पट्कन अळूच्या खमंग, खरपूस वड्याच येतात व नंतर फारतर अळूची पातळ भाजी. भाजी केली तर अळूच्या देठाचा वापर आपसूकच होतो. कारण देठ भाजीत घातल्याशिवाय भाजी चांगली मिळून येत नाही. मात्र आपण अळूच्या पानांच्या वड्या करताना  देठ कापून सरळ टाकून देतो. तर तसे न करता त्या देठांचे भरीत बनवावे. चविला अतिशय उत्कृष्ट लागते व जेवताना पानांत एक डाव्या बाजूला पट्कन होणारा पदार्थ झाला. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* अळूची देठ १५ -२०
* घट्ट दही २ टेस्पून
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* फोडणीसाठी १ टेस्पून तेल, हिंग, मोहरी, जीरे, सांडगी मिरची किंवा हिरवी मिरची
* कोथिंबीर

कृती :-
प्रथम अळूची देठं स्वच्छ धुवून घ्यावीत.नंतर ती हातानेच सोलून घ्यावीत.  सहज साल निघते.

आता त्याचे अंदाजे दोन इंचाचे तुकडे करून डाळ-भाताच्या कुकरसोबत वाफायला ठेवून द्यावे.

नंतर कुकर थंड झाल्यावर वाफवलेली देठ बाहेर काढून हाताने कुस्करून घ्यावीत व त्यामधे दही, मीठ, साखर घालावे.

शेवटी गार फोडणी घालावी व कोथिंबीर घालून एकत्र करावे. जेवणात ताटात डाव्या बाजूला वाढावे.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 December 2016

शेंगदाणे लसूण चटणी ( Dry Chutney)

No comments :

शेंगदाण्याची कोरडी चटणी एकदम सोपी, सर्वाना आवडणारी आहे. मुलांना डब्यात पोळीला तूप लावून त्यावर चटणी पसरून रोल करून देता येते.तसेच ऐत्यावेळी पाहुणे आल्यास ताटात डाव्या बाजूला वाढता येते. रोजच्या जेवणात दही घालून खाता येते. घाईच्यावेळी एखाद्या रस्साभाजाीमधे चमताभर टाकली असता रस्सा दाट व चवदार होतो. अशा अनेक प्रकारांनी उपयोगी येणारी चटणी कशी केली पहा. साहित्य व कृती ,

साहित्य :-
* भाजून सोललेले शेंगदाणे १ वाटी
* सोललेल्या लसूण पाकळ्या १० -१२
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड २ टीस्पून (आवडीनुसार कमी-जास्त)
* जीरे १/२ टीस्पून

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे भरड वाटले तरी चालते परंतु मी नेहमी ही चटणी खलबत्त्यात कुटून करते. चव अधिक चांगली लागते व कुटून केल्याने शेंगदाण्यांचे तेल सुटून एक ओलसरपणा चटणीला येतो व मुद्दा होते. कोरडे कुट होत नाही.

कुटताना सुध्दा सर्वात आधि खलबत्त्यात जीरे, लसूण, मीठ कुटून घेउन वाटीत काढावे. नंतर शेंगदाणे चांगले चेचून -चेचून तेल सुटेपर्यंत भरड कुटावेत.

नंतर त्यामधे मीठ चविनूसार, लाल तिखट व आधि कुटून ठेवलेला लसूण घालावा व एकत्र करून थोडे कुटावे. सर्व साहित्य एकजीव झाल्याची खात्री करून नंतर लहान बाटलीमधे भरून ठेवावी. आठ दिवस आरामात टिकते.

प्रवासात नेण्यासाठी पण उत्तम आहे.बरेचजण यामधे सुके खोबरेही कुटून मिसळतात. परंतु खोबरे घातले असता जास्त टिकत नाही. वास येतो.

तसेच मी मिरचीपूड घेतली आहे. पण ऐवजी सुक्या लाल मिरच्याही घेतात. अशी चटणी खूप तिखट होते. कारण मिरचीचे बी सुध्दा त्यामधे  कुटले जाते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

24 September 2016

कच्च्या टाोमेटोची चटणी (Tomato Chutney)

No comments :

चटणी हा पदार्थ ताटामधे डाव्या बाजूला वाढतात. रोजच्या जेवणात आंबट, खारट, तिखट, गोड, तुरट असे सर्व रस असावे. चटणी, कोशिंबिर, भाजी, डाळ, उसळ, भात, पोळी असा चौरस आहार घ्यावा असे आहारातज्ञ सांगतात. तर या कच्च्या टोमँटो चटणी मधून आपल्याला आंबट, तुरट, तिखट असे रस मिळतात. ही चटणी जेवणात तर चांगली लागतेच, शिवाय ब्रेड,पराठ्याला लावून खाण्यास पण चांगली लागते. कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
* कच्चे हिरवे टोमँटो ४
* मुठभर शेंगदाणे
* हिरव्या मिरच्या ४-५
* कोथिंबिर
* मीठ चविनूसार
* साखर चविनुसार
* तिळ २ लहान चमचे
* हिंग,मोहरी,जीरे फोडणी साठी
* तेल १ टेस्पून

कृती :-

प्रथम टोमँटो बारीक चिरून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करून हिंग, जीरे -मोहरीची फोडणी करावी. फोडणीमधे अनुक्रमे आधि तिळ,हिरवी मिरची, शेंगदाणे घालावेत व चांगले परतावे. परतताना मध्यावर चिरलेला टोमँटो घालावा व सर्व साहीत्य खमंग परतावे. परतून झाल्यावर थंड होऊ द्यावे.

आता थंड झालेल्या साहीत्यामधे मीठ, साखर व कोथंबिर घालावे व मिक्सरमधे भरड वाटावे. तयार चटणी बाऊलमधे काढावी.

आंबट -गोड तिखट चविची ही चटणी अतिशय रूचकर लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

पडवळाची कोशिंबिर

No comments :

सर्वसामान्यपणे पडवळ म्हणजे नावडीची भाजी. परंतु पडवळ हे गुणाने थंड. त्यामुळे सिझनला पोटात गेलेच पाहीजे. तर पडवळाची भाजी खाण्यापेक्षा थोडे वेगळ्या चवीचे भरीत, कोशिंबिर केले तर आवडीने खाल्ले जाते. म्हणून मी कोशिंबिर केली. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* पडवळ पाव किलो
* घट्ट ताजे दही १ वाटी
* मीठ चविनुसार
* साखर चिमुटभर
* मोहरी १ टीस्पून
* फोडणीसाठी हिंग, जीरे, सांडगी मिरच्या २
* तेल फोडणीसाठी १ टेस्पून
* कोथिंबिर

कृती :-
प्रथम पडवळ स्वच्छ धुवून, आतील बीया काढून किसून घ्यावे.

किसलेल्या पडवळामधे मीठ, साखर व दही घालून चांगले ढवळून एकत्र करावे.

नंतर एका लहान कढल्यात हिंग जीरे व सांडगी मिरची घालून फोडणी करावी. ती थंड होईपर्यंत चमचाभर मोहरी कुटून अगदी थोड्या पाण्यात फेटून घ्यावी.

आता थंड झालेली फोडणी, फेटलेली मोहरी व कोथंबिर चिरून दही घालून तयार केलेल्या पडवळाच्या किसावर घालावे व परत नीट एकत्र करावे. कोशिंबिर तयार.

टिप :- फोडणी ऐच्छिक आहे. नाही दिली तरी कोशिंबिर छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

09 April 2015

कैरीची लाल चटणी ( Red Chutney)

No comments :
आता बाजारात भरपूर प्रमाणात कच्या कैर्या येतात.ज्या मोसमात जी फळे व भाज्या येतात ती भरपूर प्रमाणात त्याचे विविध प्रकार बनवून खावित.कधीही बाधत नाहीत.आरोग्याला चांगलेच असते.कैरीचे खूप पदार्थ बनतात.जसे की पन्हं,लोणच,सरबत,मुरांबा,हिरवी चटणी इ.अशी खूप यादी वाढत जाईल. तर मी आज कैरीची लाल चटणी सांगते.
साहीत्य :-
* कैरी एक मध्यम आकाराची
* तेवढाच एक कांदा
* दाण्याचे कुट दोन टेस्पून
* गुळ लिंबा एवढा -कैरीच्या आंबटपणा नुसार कमी-अधिक करावा
* लाल मिरची पूड आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* तेल,हींग,मोहरी,हळद फोडणीसाठी

कृती :-
सर्वात आधि कैरी साल काढून किसून घ्या.कांदा सोलून मोठा-मोठा चिरून घ्या.

आता कांदा,कैरी,गुळ,तिखट,मीठ व दाण्याचे कुट एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या.

वाटलेला गोळा एका बाउलमध्ये काढा.फोडणी करून घ्या.थोडी थंड होऊ द्या.

आता थंड फोडणी चटणीवर घाला व नीट एकत्र करावी.चटणी तयार!

ही चटणी निरनिराळे पराठे,थालीपिठ,ब्रेडला लावून अथवा जेवणात भाकरी,पोळी बरोबर सुध्दा छान लागते. डब्यात द्यायला किवा प्रवासात सुध्दा सोईची आहे.चार-पाच दिवस फ्रिज शिवाय टिकते.

ही माझी रेसिपी २ मे २०१५ महाराष्ट्र टाइम्स, च्या,"चख दे " या  सदरा खाली प्रसिद्ध झाली होती.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 March 2015

कोवळ्या कैरीचे लोणचे(Mango Pickle)

No comments :

कैरी,चिंच असे नांव निघाले तरी तोंडाला पाणी सुटते. साधारण फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या सुरूवातीला बाजारात कोवळ्या कैर्या (आत अजून कडक कोय तयार नसते) यायला सुरवात होते.मग घरी आणल्या जातात व अनेक प्रकार केले जातात. किसून सरबत , चिरून कधी भेळेवर,जेवणात मीठ,तिखट घालून फोडी. तर मुलं येता नुसत्याच मीठ लावून खातात.तशा आत्ता या कैर्या आंबट नसतात. बरेचवेळा लाल/हीरवी चटणी,चैत्र पाडव्याला अंबेडाळही केली जाते.मी कैर्या घरी आणल्या की, सर्व पदार्थ आलटून पालटून करत असते. आज ताजे-ताजे लोणचे केले.हे लोणचे टिकाऊ नसते.दोन-चार दिवसात खाऊन संपवायचे असते.तसेही लोणचे म्हणले की संपतेच म्हणा ! हे लोणचे मुरायची गरज नसते.केले की लगेच भाज्यांच्या लोणच्या प्रमाणे खाता येते.चला तर कसे करायचे पाहू.

साहीत्य :-

1) कोवळ्या कैर्या 3 नग
2) मोहरी डाळ पाव वाटी
3) गूळ किंवा साखर पाव वाटी
4) मेथी पाव टीस्पून
5) लाल मिरची पूड 2 टीस्पून
6) हळद 1/2 टीस्पून
7) मीठ 3- 4 टी स्पून
8) हीग मोहरी फोडणीसाठी
9) तेल पाव वाटी फोडणीसाठी
10)  पाणी अर्धी वाटी

कृती :-
            प्रथम कैर्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.थोड्या बारिकच चौकोनी फोडी करून घ्या.

आता या फोडीवर मीठ ,हळद व गूळ चिरून घाला व हलवून थोडावेळ ठेवा.म्हणजे रस सुटतो.

नंतर मोहरीची डाळ कुटून त्यामध्ये पाणी घालून नाकाला झिणझिण्या येईपर्यंत घुसळा (ही क्रिया मिक्सर मधे केली तरी चालते). घुसळलेली डाळ फोडीवर घाला. तसेच मेथी पण पळीमधे तांबूस तळून कुटून फोडींवर घाला. मिरची पूड निम्मी घाला.सर्व नीट हलवा.

नंतर मेथी तळलेल्या पळीतच हींग,मोहरी हळद घालून फोडणी करा.गॅस बंद करा.थोडासा गरमपणा कमी झाला फोडणीचा की शिल्लक मिरची पूड घालावी. आता फोडणी पुर्ण थंड होऊ द्यावी.

आता वरील फोडीवर थंड फोडणी घाला व परत नीट हलवा.मस्त आंबट-गोड चवीचे ताजे झटपट लोणचे तयार ! जेवणाची रंगत तर वाढतेच व पोहे ,उपमा, पराठे,पुर्या कशाही सोबत खाता येते.

सुटले न तोंडाला पाणी ? चला तर बघू आजच्या जेवणात झटपट करून टाका ! आणि हो कसे झाले ते सांगायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा.

10 December 2014

लिंबाचे गोड लोणचे ( Sweet Lemon Pickle)

No comments :
उपवास असला की आंबट-गोड चवीचे लोणचे, चटणी असे काही चवीला असेल तर थालीपीठ, वरीचा भात असे उपवासाचे पदार्थ पण एकदम चटपटीत वाटतात. जिभेला चव येते. तर उपवासाचे लोणचे कसे करायचे याची कृती व साहित्य पुढे देत आहे.

साहित्य:-
* लिंबू २५ नग
* साखर मध्यम आकाराच्या १० वाट्या
* मीठ २ वाट्या
* लाल मिरचीपूड १ १/२(दिड)वाटी
* जीरेपूड ४ टीस्पून

कृती:
प्रथम  लिंबू  स्वच्छ  धुवून व पुसून कोरडे करून घ्यावेत. नंतर लिंबाच्या मध्यम आकाराच्या साधारण ८-१० फोडी करून त्यातील शक्य तितक्या बिया काढून टाकाव्यात. 

नंतर फोडींना मीठ, मिरचीपूड, जीरेपूड लावून साधारण आठ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.

नंतर साखर,आठ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडीत मिसळावी व बरणीत भरून ठेवावे. रोजच्या रोज बरणी उघडून, स्वच्छ व कोरड्या चमच्याने लोणचे ढवळावे.असे साखर पूर्ण विरघळेपर्यंत करावे. 

ज्यांना वेळ नसेल किवा साखर विरघळे पर्यंत रोजच हलविण्याचे काम त्रासाचे वाटत असेल त्यांनी साखरेचा एकतारी पाक करावा व त्यामधे लिंबाच्या फोडी घालव्यात.

असे हे रसाळ आंबट,गोड,तिखट चवीचे लोणचे खास करून उपवासा दिवशी खाता येते.उपवासाला तर चालतेच  शिवाय तोंडाला चव नसेल,तर तसेच आजारी व्यक्तीना पत्थकर आहारात चालते.लहान मुलांना भाताबरोबर चवीला देता येते.

टीप :-पावसाळ्यामधे लिंबू स्वस्त असतात पण पावसाळी लिंबूचे लोणचे बर्षभराचे साठी करू नये टिकत नाही.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

25 November 2014

चिंच-गूळ ,खजूराची गोड चटणी (Sweet Chutney)

No comments :
साहित्य :-
* चिंच एक वाटी
* गुळ अर्धी वाटी
* खजूर अर्धी वाटी
* तिखट,मीठ चवीनुसार
* जीरे पूड,चाट मसाला चवीला

कृती:-
प्रथम चिंच ,गुळ व खजूर थोडे पाणी घालून एकत्र कुकरला लावावे व एक शिट्टी काढावी. 

थंड झाल्यावर मिक्सरला वाटावे आणी गाळणीतून गाळून घ्यावे.

नंतर त्यात चवीनुसार तिखट,मीठ,चाट मसाला, जीरेपूड घालावे.चटणी तयार! भेळ,समोसा कोणतेही चाट कशासोबतही खाता येते. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 October 2014

मेथीची चटणी(Methi Chutney)

No comments :

साहित्य:-
* मेथीदाणे लहान एक चमचा
* मेथीपाने एक वाटी
* लसूण १०-१२ पाकळ्या
* लाल मिरची आवडीनूसार
* मीठ,साखर चवीनूसार
* लिंबू
* तेल एक टेबलस्पून

कृती:
प्रथम एका पॅनमधे तेल गरम करून त्यामधे मेथीदाणे टाकावेत.नंतर लसूण,मिरची टाकावी व शेवटी मेथीची पाने टाकावीत आणि मंद आचेवर सर्व कोरडे होईपर्यंत परतावे.

नंतर सर्व साहीत्य थंड झाल्यावर चवीसाठी मीठ व साखर घालून मिक्सरमधे भरडच वाटावे.
वाटलेले मिश्रण एका बाऊलमधे काढावे व वरून लिंबू पिळावे व नीट हलवून वाढावी.

ही चटणी चवीला अतिशय रूचकर व खमंग लागते.तसेच मधुमेहासारख्या आजारात लाभदायक आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

कढीपत्ता चटणी(Curry leaves Chuteney)

No comments :
कढीपत्यामधे खूप सारे औषधि गुणधर्म आहेत. रोजच्या आहारात जरूर वापर करावा. असे असले तरी बर्याच जणाना कढीपत्ता आवडत नाही. पुढील प्रकारे चटणी करून बघा नक्की आवडेल. साहित्य व कृती, 

साहित्य:-
* जून कढीपत्ता पाने एक वाटी
* सुकं खोबरं पाव वाटी 
* चणाडाळ पाव वाटी 
* उडीद डाळ पाव वाटी
* लाल सुकी मिरची ८-१०
* गूळ सुपारी एवढा खडा 
* चिंच सुपारी एवढी 
* मीठ चविनूसार
* तेल १ टीस्पून 

कृती:-
प्रथम दोन्ही डाळी कोरड्याच भाजून घ्याव्यात. नंतर खोबरं भाजून घ्या. शेवटी तेलावर कढीपत्ता पाने व मिरची तेलावर परतून घ्या. चिंचही थोडी परतावी. सर्व थंड होऊ द्या. 

नंतर थंड झालेले सर्व साहित्य, चविला मीठ घालून मिक्सरमध्ये भरडसर वाटावे.

तयार कोरडी चटणी हवाबंद बाटलीमधे भरून ठेवावी.बरेच दिवस छान टिकते. पोळी सोबत किंवा डोस्यावर पसरून खायला चवदार लागते. 

टीप:
चटणीत थोडे भाजलेले तीळ, जिरे घातले तरी चालते छान चव येते.
* चटणी भरडच ठेवावी. दाताखाली कण आलेले चांगले लागतात. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 September 2014

पिकलेल्या पेरूचे लोणचे(Guava Pickle)

No comments :

साहित्य:-
* पिकलेल्या पेरूच्या बारीक चिरलेल्या फोङी एक वाटी
* चिरलेला गूळ मोठे दोन चमचे
* मिठ चवीनुसार
* लोणच्याचा तयार मसाला एक चमचा किंवा मिरची पावङर व मोहरीचे कूट
* पाणी एक चमचा
* मोठा एक चमचा तेल,मोहरी हिंग हळद

कृति:-
प्रथम पॅनमधे फोङणी करून त्यामधे पेरूच्या फोङी घालाव्यात.थोङेसे परतून त्यात मीठ व किंचित वाफवण्यापूरते,पाणी घालून झाकण ठेवून फोङी मऊ वाफवून घ्याव्यात. पाच मिनीटमधे मऊ होतात.
फोङी मऊ झाल्यावर त्यामधे लोणचे मसाला व गूळ घालावे.गूळ विरघळून एक चटका आला की गॅस बंद करावा .थंङ झाले की बाऊल मधे काढावे.
 पराठा,पुरी अथवा  ब्रेङला लावून खाण्यास,आंबटगोङ चवीचे हे लोणचे छान लागते.

टिप:-  पेरू छान पिकलेला व मऊ असावा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.