17 March 2015

कोवळ्या कैरीचे लोणचे(Mango Pickle)

No comments :

कैरी,चिंच असे नांव निघाले तरी तोंडाला पाणी सुटते. साधारण फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या सुरूवातीला बाजारात कोवळ्या कैर्या (आत अजून कडक कोय तयार नसते) यायला सुरवात होते.मग घरी आणल्या जातात व अनेक प्रकार केले जातात. किसून सरबत , चिरून कधी भेळेवर,जेवणात मीठ,तिखट घालून फोडी. तर मुलं येता नुसत्याच मीठ लावून खातात.तशा आत्ता या कैर्या आंबट नसतात. बरेचवेळा लाल/हीरवी चटणी,चैत्र पाडव्याला अंबेडाळही केली जाते.मी कैर्या घरी आणल्या की, सर्व पदार्थ आलटून पालटून करत असते. आज ताजे-ताजे लोणचे केले.हे लोणचे टिकाऊ नसते.दोन-चार दिवसात खाऊन संपवायचे असते.तसेही लोणचे म्हणले की संपतेच म्हणा ! हे लोणचे मुरायची गरज नसते.केले की लगेच भाज्यांच्या लोणच्या प्रमाणे खाता येते.चला तर कसे करायचे पाहू.

साहीत्य :-

1) कोवळ्या कैर्या 3 नग
2) मोहरी डाळ पाव वाटी
3) गूळ किंवा साखर पाव वाटी
4) मेथी पाव टीस्पून
5) लाल मिरची पूड 2 टीस्पून
6) हळद 1/2 टीस्पून
7) मीठ 3- 4 टी स्पून
8) हीग मोहरी फोडणीसाठी
9) तेल पाव वाटी फोडणीसाठी
10)  पाणी अर्धी वाटी

कृती :-
            प्रथम कैर्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.थोड्या बारिकच चौकोनी फोडी करून घ्या.

आता या फोडीवर मीठ ,हळद व गूळ चिरून घाला व हलवून थोडावेळ ठेवा.म्हणजे रस सुटतो.

नंतर मोहरीची डाळ कुटून त्यामध्ये पाणी घालून नाकाला झिणझिण्या येईपर्यंत घुसळा (ही क्रिया मिक्सर मधे केली तरी चालते). घुसळलेली डाळ फोडीवर घाला. तसेच मेथी पण पळीमधे तांबूस तळून कुटून फोडींवर घाला. मिरची पूड निम्मी घाला.सर्व नीट हलवा.

नंतर मेथी तळलेल्या पळीतच हींग,मोहरी हळद घालून फोडणी करा.गॅस बंद करा.थोडासा गरमपणा कमी झाला फोडणीचा की शिल्लक मिरची पूड घालावी. आता फोडणी पुर्ण थंड होऊ द्यावी.

आता वरील फोडीवर थंड फोडणी घाला व परत नीट हलवा.मस्त आंबट-गोड चवीचे ताजे झटपट लोणचे तयार ! जेवणाची रंगत तर वाढतेच व पोहे ,उपमा, पराठे,पुर्या कशाही सोबत खाता येते.

सुटले न तोंडाला पाणी ? चला तर बघू आजच्या जेवणात झटपट करून टाका ! आणि हो कसे झाले ते सांगायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा.

No comments :

Post a Comment