13 October 2014

चकलीची भाजाणी (Chakali bhajani )

No comments :
दिवाळी फराळातील खुसखूषीत खमंग चकली हा मोठा कौतुकाचा पदार्थ असतो. कारण सर्वानाच आवडतोही. परंतु खुसखूषीत खमंग चकली जमणे म्हणजे एक कलाच आहे. चकलीचे घटक पदार्थ घेणे ते चकली तळणे पर्यंत प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो व तो यशस्वी पणे पार पडला तरच चकली चांगली होते. तर यातील भाजणी तयार करणे हाही एक अत्यंत महत्वाचा भाग. यावर चकलीचा रंग, चव व कुरकूरीत पणा अवलंबून असतो. तर साहित्य किती घ्यावे कृती कशी? काय काळजी घ्यावी पहा,

साहित्य:-
* मोठा तांदुळ (पटणीचा)  १ किलो
* चणा (हरभरा) डाळ १/२ किलो
* उडीद डाळ १/४ किलो
* धणे ६ टीस्पून
* जिरे ३ टीस्पून
* मेथी दाणे २ चमचे (ऐच्छीक)

कृती:-
प्रथम तांदुळ व डाळी स्वच्छ निवडून घ्याव्यात.नंतर वेगवेगळे धुवून चाळणीमधे पाणी निथळण्यास ठेवावे.अथवा थोडावेळ सुती कपड्यावर पसरावे. मात्र उन्हात वाळवू नये. घरातच फॅन खाली सुकवावे.

आता सुकलेले तांदुळ व डाळी कढईमधे वेगवेगळे  भाजून घ्यावेत.धणे,जिरे व मेथीदाणे थोडे गरम करावेत.आता भाजलेले तांदुळ व डाळी पुर्णपणे थंड होऊ दे.

नंतर सर्व गार झालेले साहित्य एकत्र करावे व गिरणीतून दळून आणावे.आणल्यावर नीट चाळून हवाबंद डब्यामधे ठेवावी.महीना- सहा महीने पर्यंत सुध्दा छान रहाते.

चकल्या करण्याच्यावेळी डब्यातून भाजाणीचे पीठ काढून घ्यावे व त्यात मोहन तिखट,मीठ इ. सर्व घालून चकल्या तळाव्यात.

टिप :-
*भाजाणी बेतशीरच भाजावी.कारण चकली पुन्हा तेलात तळायची असतेच.नाहीतर करपट चव येते.
*भाजणी शक्यतो तांदुळावर दळावी.चकलीचा रंग चांगला येतो.डाळीवर दळल्यास काळपट येतो.
* भाजाणी थोडी मोटसर खसखशीत दळावी.फार बारीक ,गुळगूळीत दळू नये.म्हणजे चकली छान कुरकूरीत बनते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


No comments :

Post a Comment