सध्या बाजारात छान आंबट-गोड चवीच्या लालबुंद स्ट्राँबेरी येताहेत. सहाजिकच बघितले की घ्यावे वाटतात. घेतोही आपण पण घरी आणले की त्याचे काय करावे? प्रश्न पडतो. थोड्या नुसत्या खाल्या, कांही मिल्कशेक मधे गेल्या तर काही फ्रूट सलाडला गेल्या.राहीलेल्या वाया नको जायला म्हणून त्याचे क्रश करून ठेवले.कधीही मिल्कशेक, केक, हलवा, बर्फी बनविता येते. तर स्ट्राँबेरी क्रश कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• स्ट्राँबेरी ५०० ग्रॅम
• साखर २५० ग्रँम
• व्हिनेगर १ टीस्पून
कृती :-
प्रथम स्ट्राँबेरी देठ काढून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी.
नंतर स्ट्राँबेरीचेे चाकूने मोठे -मोठे तुकडे करावेत.
आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व स्ट्राँबेरी एकत्र घालून मंद आचेवर ठेवावे व सतत साखर विरघळेपर्यंत ढवळत रहावे.
साखर विरघळली की, व्हिनेगर घालून दोन मिनिट मिश्रण उकळू द्यावे. एकतारी पाक होतो. गँस बंद करावा.
आता थंड झाल्यावर ब्लेडरने घुसळावे. तयार क्रश काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे.
हे क्रश फ्रिजमधे ठेवले तर दोन महीन्यापर्यंत टिकते. हवे तेव्हा काढून वापरता येते.अगदी रेडीमेड ज्यूस पिण्यापेक्षा एक भाग क्रश व तीन भाग थंड पाणी घालून झटपट ज्यूस करता येतो, मुले आवडीने पोळीबरोबर सुध्दा खातात.
टीप: स्टाँबेरी एकदम गोड नसतील तर साखरेचे प्रमाण वाढवावे. ५०० ग्रॅम स्ट्राँबेरी असेल ४०० ग्रँम साखर घ्यावी.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment