Showing posts with label Curry. Show all posts
Showing posts with label Curry. Show all posts

16 November 2019

राजमा मसाला (Rajama Masala)

No comments :
राजमा मसाला
-----------------

 राजमा चावल ही खास करून उत्तर भारतीयांची आवडती डिश आहे. तिथे प्रत्येक छोट्या धाब्यापासून ते फाईव्हस्टार हाँटेलच्या मेन्यू मधे तुम्हाला मिळणार. तर अशा या लाडक्या राजम्यामधे भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, आयर्न व मॅग्नेशियम असते. मसाल्याबरोबर मऊ शिजलेले राजमा पाढर्या मोकळ्या भातासोबत खूप रुचकर लागताे. करायलाही एकदम सहज सोपी पाककृती आहे. तर असा हा चविष्ट, रुचकर राजमा करण्यासाठी लागणारे साहित्य व कृति --

साहित्य :-
• भिजवून उकडलेला राजमा २ वाट्या
• बारीक चिरून कांदा मोठा १
•  टोमँटो प्यूूरी १ वाटी
•  आलं,लसुण,हिरवी मिरची पेस्ट  २ टीस्पून
•  खडा गरम मसाला ( एक तमालपत्र, दोन लवंगा, दोन दालचिनी काड्या, मसाला वेलची  एक)
•  पावडर गरम मसाला १ टीस्पून
•  कसूरी मेथी अर्धा टीस्पून
•  धना-जीरा पावडर २ टीस्पून
•  लाल मिरची पावडर १ टीस्पून
•  आमचूर पावडर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)
•  मीठ चवीनुसार
•  तेल व फोडणी साहित्य
•  वरून सजावटीसाठी क्रीम व कोथिंबीर (ऐच्छिक)

कृती :-
प्रथम राजमा आदले दिवशी रात्री स्वच्छ धुवून  भरपूर पाण्यात भिजत घालून ठेवावेत. दुसरे दिवशी मीठ घालून कुकरला मऊ  शिजवून घ्यावेत.

आता  प्रथम कढईत तेल घालून हिंग, जीरे, मोहरीची फोडणी करावी व फोडणीमधे हळद, खडा मसाला घालावा. थोडे परतून आता कांदा घालून परतावे. पाठोपाठ आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात मसाला,तिखट,मीठ, कसूरीमेथी वगैरे राहीलेले सर्व साहित्य घालावे गरजेनुसार पाणी घालून ,झाकून ठेवून एक उकळी काढावी.

तयार राजम्यामधे वरुन क्रिम व कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करावे .

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.



25 July 2019

कटाची आमटी (Katachi Aamti)

1 comment :
इस कटाची आमटी हा आमटीचा पारंपारिक प्रकार आहे. पुरणपोळीचे जेवण म्हणजे सोबत कटाची आमटी पाहीजेच.या आमटीला निरनिराळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. कुठे येळवणीची आमटी..  तर कुठे सार! तसेच करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या असतात. पण पदार्थ एकच असतो.  हरभर्याची डाळ शिजवताना मधे मधे वरचे पाणी काढले जाते व त्या पाण्याची आमटी केली जाते ती कटाची आमटी होय.आजकाल डाळ कुकरमधे डाळ शिजवली जाते. म्हणून डाळीत जास्त, म्हणजे डाळीच्या चौपट पाणी घालतात व गाळून कट काढला जातो. तर अशा आमटीसाठी लागणारे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* डाळीचा काढलेला कट ५ वाट्या
* सुके खोबरे एक लहान वाटी, ५० ग्रँम
* लिंबाएवढ्या चिंचेचा काढलेला कोळ
* गूळ लिंबाएवढा
* गरम मसाला १ टीस्पून
* गोडा मसाला २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* फोडणीसाठी तेल एक पळीभर
* हींग, मोहरी, जीरे, कढीपत्ता
* कोथिंबीर

कृती :-
प्रथम सुक्या खोबर्याची वाटी डायरेक्ट गँसवर जाळामधे खरपूस भाजून घ्यावी.

आता भाजलेले खोबरे, जीरे, थोडा कढीपत्ता भाजून, कोथिंबीर सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे.

आता तेल गरम करून त्यामधे जीरे, मोहरी हींग तडतडवून घ्यावेत. त्यामधे कढीपत्ता, हळद, हींग घालावे व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतल्यावर त्यामधे लाल मिरचीपूड, गरम मसाला, गोडामसाला घालून परतावे.

सर्वात शेवटी डाळीचा कट, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून आमटी ५ मिनिट चांगली उकळू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.

अशी ही खमंग कटाची आमटी मोकळ्या भातासोबत खूप छान लागते. तसेच पुरणपोळी खाताना मधे-मधे भुरकायलाही मस्त लागते. बरेचजण आमटीत पोळी बुडवूनही खातात.  कशीही खा पण पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहीजेच.

टिप्स :
* बरेचवेळा आमटीला कट कमी निघतो अशा वेळी थोडी शिजलेली डाळ घोटून घालावी.
* या आमटीला मसाला वाटताना खोबर्यासोबत हिरवी मिरची,आले, लसूण, कोथिंबीर व जाळावर खोबर्याप्रमाणे आख्खा कांदा भाजून घातला तरी चालतो.छान वेगळी चव येते. परंतु मी देवाला नैवेद्य असल्याने कांदा लसूण नाही घातले.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.