10 July 2019

दुधीचे मुठीया (Dudhi Muthiya)

No comments :
दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे.एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दुधच आहे. दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते.परंतु दुधीभोपळ्याची भाजी जेवणात आहे म्हटले की नाकं मुरडली जातात. सामान्यपणे लोकांना आवडत नाही. म्हणून मी त्याचे मुठीया केले. जेवणात खा,नाष्टा म्हणून खा किंवा चहासोबत स्नँक्स म्हणून खा उत्तम लागतात व पौष्टीक आहेत. जेणेकरून दुधी पोटात गेला पाहीजे. तर हे मुठीया कसे करायचे पाहुयात.

साहित्य :-
* खिसलेला कोवळा दुधी २ वाट्या
* गव्हाचे पीठ १ वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* चणाडाळीचे पीठ अर्धी वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* तांदुळाचे पीठ पाव वाटी
* बारीक रवा २ टेस्पून
*मीठ
*हळद
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
*धना-जिरा पावडर
* लिंबू रस चमचाभर
* कोथिंबीर
* फोडणी साहित्य तेल,हिंग, मोहरी,तिळ, कढीपत्ता

कृती :-
प्रथम  कोवळा दुधी भोपळा सालं काढून किसून घ्यायचा. थोडं हलक्या हाताने किस पिळून घ्यायचा व निघालेले पाणी पिऊन टाकायचे.  खूप नाही पाणी काढायचे. पण अगदीच न पिळता किस घेतला की पीठ खूप घालावे लागते व चवीला पीठ पीठ खूप लागते.

तर आता दुधीच्या किसात मावेल इतके गव्हाचे, तांदूळाचे व डाळीचे पीठ, रवा थोडासा घालायचे. तसेच मीठ,  हळद, धना-जिरा पावडर, आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट, लिंबू रस, कोथिंबीर चिरून सर्व घालून सैलसर पीठ भिजवावे,

आता त्याचे मुटके करून उकडायचे व गार झाल्यावर कापून हिंग,जीरे,मोहरी,तिळ, कढीपत्ता घालून फोडणी करावी व त्यामधे उकडलेले  मुठीया घालून चांगले तांबूस रंगावर परतायचे व खायचे.

टीप - यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या म्हणजे गाजर, पालक, मेथी मिसळले तरी छान लागते. तसेच पीठही बाजरी, मका, नाचणी मिसळून अधिक पौष्टिक करता येते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment