15 June 2020

उकडपेंडी (Ukadpendi)

No comments :



उकडपेंडी हा जुनाच, पारंपरिक न्याहरीचा पदार्थ आहे. काळाच्या ओघात मागे पडलाय. परंतु आमच्या कडे वरचेवर होतो व सर्व आवडीने खातातही. आजकाल पोहे, इडली, डोसे, वडा अशा पदार्थांची चलती असल्याने बर्याचजणाना माहीतही नाही. तर उकडपेंडी गव्हाच्या पीठाची, ज्वारी, नाचणी, तांदूळ, भाजणीच्या पीठाची केली जाते. आवडीनुसार व उपलब्धतेनुसार कोणतेही पीठ घ्यावे. मी ज्वारीचे घेतले. आता कशी करायची ते पाहू.

साहित्य :-
• ज्वारीचे पीठ २ वाट्या
• आंबट दही/ताक १ वाटी
• पाणी १ वाटी
•  कांदा बारीक चिरुन १
•  हिरवी मिरची, आलं पेस्ट १ टीस्पून
•  कढीपत्ता
•  मीठ चवीनुसार
•  तेल पाव वाटी
•  हिंग, जीरे, मोहरी
•  हळद, लाल तिखट
•  कोथंबीर

कृती :-
प्रथम ज्वारीचे पीठ मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे व एका थाळीत काढून ठेवावे.

आता त्याच कढईत तेल तापवून मोहरी,जीरे, हिंग घालून मस्त खमंग फोडणी करावी. फोडणीत कांदा, कढीपत्ता, आलं, मिरची पेस्ट घालून परतावे.

आता फोडणीमधे भाजून ठेललेले पीठ घालावे. तिखट, मीठ, हळद ही घालून, घ्यावे. ऩंतर हळू हळू हलवत दही व गरम पाणी घालावे. गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने सर्व जिन्नस एकत्र करावे . पांच मिनीटे मंद आचेवर वाफ येण्यास ठेवा.

पाच मिनीटात वाफ आल्यावर गरमागरम 'उकडपेंडी' डिशमधे खायला घ्यावी. वरून कोथंबीर घालावी. बरेचवेळा आवडीने वरून कच्चे तेलही घातले जाते.

सकाळच्या नाष्ट्याला अशी मस्त, खमंग गरमागरम उकडपेंडी खाल्ली की आत्मा तृप्त  होतो. अन् वरून पौष्टिक हं!  तर चला उद्या नाष्ट्याला तुम्हीही आवडीच्या पीठाची उकडपेंडीच करा. व कशी झाली ते सांगायला  विसरू नका.

टीप: उकडपेंडी ला तेल मात्र जरा सढळ हातानेच लागते बरं का! कंजूषी नको. नाहीतर उकडपेंडी चिकट होते व खाण्यातली मजाच जाते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment