Showing posts with label Dal. Show all posts
Showing posts with label Dal. Show all posts

15 December 2017

चिंच गुळाची आमटी ( Chinch Gulachi Aamti)

1 comment :

तूर डाळीची चिंच गुळाची आमटी खास करून महाराष्ट्रीयन ब्राम्हण समाजात केली जाते . रोजच्या जेवणात भातासोबत वरण,आमटी, कढी,सार, किंवा पालक, मेथीची पातळ भाजी असे कांही ना कांही पातळ पदार्थ असतोच. यापैकीच हा एक प्रकार. पावसाळ्यात किंवा थंडीमधे गरमा-गरम मोकळा भात, आमटी, वर तुपाची धार  व सोबत पापड आणि लोणच्याची फोड अहाहा.. अप्रतिम लागते. या आमटीचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तूर डाळ १ वाटी
* मेथी दाणे ७-८
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची पावडर एक टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* गूळ सुपारी एवढा खडा
* मीठ चवीनुसार
* कढीपत्ता, कोथंबिर, ओले खोबरे
* फोडणीसाठी मोहरी, हींग, हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.नंतर डाळीत चिमूटभर हळद, हिंग, मेथी दाणे व शिजण्यापुरते पाणी घालावे आणि कुकरला मऊ शिजवावी.

आता एका पातेल्यात तेल घालून हींग, मोहरी, हळद व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यात एक वाटीभर पाणी घालावे. म्हणजे फोडणी जळत नाही. आता त्यात एक एक साहित्य म्हणजे मसाला, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचाकोळ घालावे. शेवटी शिजलेली डाळ थोडे पाणी घालून, पळीने घोटून एकजीव करावी व फोडणी मधे घालावी. आपल्या आवडीनुसार घट्ट, पातळ करण्यास पाणी घालावे. चांगली उकळावी. म्हणजे सर्व मसाल्यांचे स्वाद उमटतात.

उकळताना थोडे खोबरं, कोथंबिर घालावे व राहीलेले शेवटी वरून सजावटीसाठी घालावे. जेवणात गरमा-गरम भातासोबत वाढावी.

टीप्स :
* आमटीची डाळ चांगली मऊ मेणासारखी शिजवावी. आमटी एकसंध होते.
* डाळीमधे मेथी दाणे शिजवतानाच घालावे. आमटीला जास्त खमंग चव लागते.
* चिंचेऐवजी ४ आमसुले घातली तरी चालते.
* महत्वाचे म्हणजे आमटी नेहमी गरमच वाढावी.
* या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात.

20 March 2017

दाल पकवान (Dal Pakwan)

No comments :

'दाल पकवान' हा सिंधी बांधवांचा नाष्ट्याचा चविष्ट व पोटभरीचा पदार्थ आहे. सुट्टीच्या दिवशी वेगळे काय करायचे?  हा प्रश्न असतो. कारण रोजची पोळी-भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. सुट्टी म्हटले की काहीतरी वेगळे हवे असते. अशा वेळी मला नाष्टा व जेवण एकच म्हणजे "ब्रंच" हेवी नाष्टा करणे सोईचे वाटते. तर मी ही पाककृती केली. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
दाल
* चणाडाळ १ वाटी
* कांदा १+१
* कोथंबिर
* आलं-लसूण
* हिरवी मिरची २
* गरम मसाला १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद
* जीरे
* तेल २ टेस्पून
पकवान
* मैदा १ वाटी
* गव्हाचे पीठ १ वाटी
* रवा २ टेस्पून
* मीठ चिमूटभर
* ओवा पाव टीस्पून
* जीरे अर्धा टीस्पून
* तेल मोहन १ टेस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम चणाडाळ अर्धा ते एक तास भिजत घालावी.

आता मैदा, गव्हाचे पीठ व रवा एकत्र करून त्यामधे मीठ जीरे, ओवा व तेल घालून सारखे करावे. गरजेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळावा.

एक तासानंतर  डाळ थोडेच पाणी घालून कुकरला शिजायला लावावी. फक्त एक शिट्टी काढावी. दुसर्या शिट्टीला वाफ आत ठेवून गँस बंद करावा. डाळ जास्त गुळगूळीत मऊ शिजवू नये. डाळींब्या दिसाव्यात इतपतच शिजवावे.

आता डाळ शिजेपर्यंत कांदा, कोथंबिर, आलं-लसूण सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे.

आता कढईमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत. त्यामधे चिरलेला कांदा, आलं-लसूण, मिरची घालून परतावे. नंतर राहीलेले सर्व साहित्य घालावे. तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतावा. शेवटी शिजलेली डाळ घालावी व थोडेसे पाणी घालून पांच मिनिट झाकून शिजवावे. दाल तयार!

आता मळून तयार केलेल्या पीठाच्या मध्यम जाडीच्या मोठ्या पुर्या लाटाव्यात, त्यावर काटा चमच्याने टोचावे. म्हणजे फुगत नाहीत.

मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळून काढाव्यात.  गार झाल्यावर छान कडक होतात.

आता तयार डाळ बाऊलमधे घेऊन त्यावर कांदा व कोथंबिर घालावी. सोबत कडक पुर्या डिशमधे द्याव्यात. मस्त भरपेट नाष्टा होतो. नंतर एका मोठा ग्लास थंड मसाला ताक प्यावे. दुपारी जेवणाची भुकच रहात नाही. तुम्हीही करून पहा. नक्कीच आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 December 2016

दाल मखनी (Dal Makhani)

No comments :
"दाल मखनी" ही पंजाबी डिश आहे. हाँटेलमधली सर्वात जास्त खाल्ली जाणारी, सर्व वयोगटातल्या लोकांच्या आवडीची व करायला पण सोप्पी अशी आहे. कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
* अाख्खे काळे उडीद १ वाटी
* राजमा किंवा आख्खी मसूर १/४ वाटी
* मोठा कांदा १ बारीक चिरून
* टोमँटो २ मध्यम पेस्ट करून
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावङर १ टीस्पून
* आमचूर पावडर १/२ टीस्पून
* कसूरी मेथी २ टीस्पून (ऐच्छिक)
* मीठ चविनूसार
* फ्रेश क्रिम २-३ टेस्पून /दूध अर्धा कप
* बटर २ टेस्पून
* जीरे अर्धा टीस्पून
* कोथिंबिर बारीक चिरून
* हळद पूड अर्धा टीस्पून

कृती :-
प्रथम ६ ते ८ तास भिजलेले उडीद व राजमा कुकरला ३ -४ शिट्या काढून मऊ शिजवून घ्यावेत.
नंतर पँनमधे बटर गरम करून जीरे,हळद  घालावे. त्यावर चिरलेला कांदा व आलं -लसूण,मिरची पेस्ट टाकून परतावे.

आता टोमँटो पेस्ट घालावी. त्यावर लाल मिरचीपूड, गरम मसाला, मीठ, कसूरी मेरी घालून तूप सुटेपर्यंत परतावे. थोडे पाणी घालून, वर झाकणी झाकून पाच मिनिट शिजू द्यावे.

पाच मिनिटानी तयार मसाल्यामधे, मऊ शिजवून घेतलेले उडीद व राजमा /मसूर घालावे. आवडीनुसार अजून थोडे पाणी घालावे. परंतु जास्त पातळ करू मधे. घटसरच ठेवावे. घेतलेल्या पैकी निम्मे क्रिम घालावे व सर्व व्यवस्थित ढवळून गँस एकदम लहान करून किमान १० मिनिट झाकून शिजू द्यावे.महत्वाचे म्हणजे जितके जास्त शिजेल तितकी चव अधिक चांगली लागते. मोठ-मोठ्या रेस्टोरेंट मधे अधिक चांगल्या चविसाठी रात्रिच मंद आचेवर शिजत ठेवतात.

शेवटी बाऊलमधे काढून शिल्लक क्रिम व कोथंबिर वरून घालावे व गरमा-गरम फुलके, रोटी, चपाती आवडेल त्यासोबत खावे. खूप अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. कसे झाले कळवायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

25 July 2016

डाळ ढोकळी(Dal Dhokali)

No comments :
'डाळ ढोकळी' हा प्रामुख्याने गुजरात प्रांतातील पदार्थ आहे. राजस्थान, महाराष्ट्रातही केला जातो. महाराष्ट्रामधे याला 'वरणफळे' 'चकोल्या' असे सुध्दा म्हणतात. सकाळचा पोटभरीचा नाष्टा किंवा वन डिश मिल म्हणूनही खाता येतो. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहित्य :-
डाळ
* तूर डाळ १ वाटी
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
*,गरम मसाला १ टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* गूळ सुपारी एवढा
* हळद,  हींग, मोहरी, जीरे
* कढीपत्ता
* कोथंबिर, ओलं खोबरं
* तूप वरून घालण्यासाठी
* तेल फोडणी साठी
* पाणी
ढोकळी
* गव्हाचे पीठ २ वाट्या
* चणाडाळ पीठ १ टेस्पून
* हळद
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* ओवा चिमूटभर
* मीठ चवीनुसार
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* मोहन तेल २ टीस्पून
* पाणी

कृती :-
प्रथम डाळ कुकरला शिजायला लावा. नंतर एका पसरट भांड्यात गव्हाचे व डाळीचे पीठ घेऊन त्यामधे गार तेलाचे मोहन व वर ढोकळीसाठी दिलेलेे सर्व साहीत्य घालून कणिक मळून घ्या. फार घट्ट अथवा सैल नको नेहमीच्या पोळीच्या कणिके सारखेच असावे.

आता शिजलेली डाळ रविने अथवा डावानेच छान घोटून घ्या. गँसवर पातेले गरम करून त्यात तेल घाला व कढीपत्ता, हींग, हळद, जीरे-मोहरीची फोडणी करा.

नंतर डाळ घाला व दिलेले सर्व साहीत्य घाला. आपल्याला कितपत पातळ हवे त्यानुसार पाणी घाला. थोडे जास्तच घातले तरी चालेल. कारण नंतर ढोकळी सोडली की डाळ घट्ट होते. व पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. शेवटी खोबरं, कोथिंबिर घाला.

आता डाळ उकळेपर्यंत भिजलेल्या कणिकेची पोळी लाटा व सुरीने शंकरपाळी सारखे चौकोनी तुकडे कापावेत. पोळी खूप जाड किंवा पातळ नसावी.

आता उकळत्या डाळीमध्ये कापलेलै तुकडे सोडा. गरज वाटली तर परत थोडे पाणी घाला व ५-७ मिनिट  उकळी काढा. अथवा कणकेचे काप, वेगळ्या भांड्यात गरम पाणी घेऊन ते उकळू लागल्यावर त्यात सोडावेत व पाच मिनिटांनी शिजले की वर तरंगू लागतात. मग तयार डाळीत सोडावेत  डाळ ढोकळी तयार!

आता तयार डाळ ढोकळी बाउलमधे काढा, वरून तूप घाला व गरम -गरम खाऊन घ्या किंवा खायला द्या. थंडीच्या दिवसांत अथवा पावसाळी दिवसांत गरमा -गरम अशी डाळ ढोकळी खाल्ली कि मस्त एकवेळचे जेवणच होते. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

31 March 2015

आंबे डाळ/ कैरी डाळ ( Mango Dal)

No comments :

उन्हाळ्याची चाहूल लागली की मला थंडगार वाळ्याचं माठातलं पाणी, कैरीचं गारेगार पन्हं, चमचमीत आंबा डाळ, कैरी बारीक चिरून केलेलं तात्पुरतं ताज लोणचं, हे लहाणपणीचे सर्व आठवू लागते.चैत्र लागला की,चैत्रातले हळदी-कुंकू एखाद्या मंगळवारी ,शुक्रवारी केले जाते. तेव्हा खास कैरीचे पन्हे व आंबा डाळ करतात. अतिशय रूचकर लागते.अशी आंबेडाळ किवा डाळीची कोशिंबीर कशी करायची व साहीत्य काय ते पहा.

साहीत्य :-

1) चणाडाळ, 2 वाट्या (2-3 तास भिजवलेली) 2) मध्यम एक कैरी साल काढून किसून,
3) हिरव्या मिरच्या 2-3
4) मीठ साखर चवीनुसार, 
5) बारीक चिरलेली कोथिंबीर,
6) रिफाईंड तेल, मोहरी ,जिरे, हळद, हिंग,मेथीदाणे फोडणीसाठी, दोन लाल सुक्‍या मिरच्या. कडीपत्ता

कृती:-

प्रथम भिजवलेली डाळ जाडसर कुटावी. खलबत्यात कुटली तर जास्त चांगली होते.रद्दा होत नाही.नाहीतर आजकाल मिक्सर मधे करतातच पण अवल-चवल अशी भरड ठेवा.
कुटताना पाव चमचा जिरे,मीठ,मिरची व साखर सर्व घालून कुटावे. म्हणजे नीट मिक्सही होते.

नंतर त्यात किसलेली कैरी व कोथिंबीर घालून नीट कालवून घ्यावी.

आता तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे,मेथी, हिंग, लाल मिरच्या,कडीपत्ता घालून फोडणी करावी. शेवटी हळद थोडी जास्त घालावी.
ही फोडणी गार करून डाळीत मिसळावी व डाळ नीट कालवून घ्यावी.

सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरावी. ही डाळ जेवणात पण कोशिंबीर म्हणून वाढता येते व नुसतीसुध्दा बशीत घेऊन खातात.परंतू चना डाळ पचायला जड असते व त्यात आंबे डाळ कच्चीच असते.त्यामुळे आपले प्रकृतीमान संभाळून खावी.

टीप:-कैरीचा आंबटपणा पाहून प्रमाण कमी-जास्त करावे.

ही माझी रेसिपी २ मे २०१५ महाराष्ट्र टाइम्स, च्या,"चख दे " या  सदरा खाली प्रसिद्ध झाली होती.


 

12 March 2015

दाल बाटी (Dal Baati)

No comments :

दाल बाटी हा खाद्यप्रकार राजस्थानी बांधवांचा पारंपारीक खाद्यप्रकार आहे.यालाच इंदौरकडे दाल बाफना पण म्हणतात.वन डीश मिल म्हणून अतिशय उत्तम असा प्रकार आहे.जास्त स्पायसी नसल्याने मलाही आवडला.एक-दोन वेळा खाण्याचा योग आला पण करण्याचा कधीच आला नाही.पण दाल बाटी करणार्या व खाणार्या मित्र/मैत्रीणींच्या सहकार्याने व गुगलच्या मदतीने मी स्वता ही दाल बाटी आज बनविली ,अतिशय उत्तम झाली व मुख्य म्हणजे घरातल्या सर्वाना आवडली.कशी केली पहा.अतिशय सोपी व कमी साहीत्यात आहे.

साहीत्य :-

बाटीसाठी-
1)  मोटसर  दळलेली गव्हाची कणिक 2         मोठ्या वाट्या
2) रवा 1/2 वाटी(जर कणिक नेहमीची मऊ असेल तरच वापरा)
3) तेल /तूप 4 टेस्पून
4) दही 2 टेस्पून
5) ओवा 1 टीस्पून
6) बेकींग पावडर 1/2 टीस्पून किवा चिमूटभर सोडा ऐच्छीक
7) मीठ चवीला
8) तळण्यासाठी तेल

डाळीसाठी-
1) तूर डाळ अथवा आपल्या आवडीच्या मिक्स डाळी 1 वाटी
2) बारीक चिरून टमाटा
3) चिरून आल एक इच लसूण 8-10 पाकळ्या
4) सुकी लाल मिरची 2-3
5) गरम मसाला/काळा मसाला
6) चिंच,गूळ आवडीनुसार
7) कडीपत्ता,कोथंबीर
8) मीठ चवीने
9) फोडणीचे साहीत्य
10) पाणी

कृती:-

     प्रथम एकीकडे डाळ दोन वाट्या पाणी घालून कुकरला शिजत लावा.

डाळ शिजेपर्यंत बाटीसाठी दिलेले सर्व साहीत्य एकत्र करून थोडेच पाणी वापरून नेहमीच्या कणिकेपेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घ्या. 20-25 मिनिटे झाकून ठेवा.

आता शिजलेली डाळ तेलाची फोडणी करा,त्यामधे मिरची,आल लसूण कडीपत्ता घाला व त्यात घाला .डाळीसाठी दिलेले सर्व साहीत्य घाला आणि आवडीनुसार घट्ट किवा पातळ ठेवा.(थोडी घट्टसरच बरी लागते)एक उकळी आणा.डाल तयार.

आता बाटीची कणिक व्यवस्थित भिजून फुलली असेल.त्या कणिकेचे साधारण लिंबाएवढे गोळे करावे व किचित दाबून खोलगट करा .असे सर्व गोळे करून घ्या.

एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवा व त्या उक्ळत्या पाण्यात सर्व गोळे सोडा वरून एक चमचा तेल घाला व 15-20 मिनीट शिजू द्या.

नंतर एका चाळणीत ओतून पाणी काढून टाकावे.थंड होऊ द्यावेत.

आता एका पॅनमधे तेल घालून गरम तेलात मंद आचेवर बाट्या खरपूस तळा.

सर्व्ह करताना तळलेल्या बाटीचे तूकडे करा व वरून गरमा गरम डाळ व घरचे साजूक तूप सोडून खायला द्या.

मस्त पोट भरते व एक वेळचे जेवणच होऊन जाते.

टीप :-डाएट काॅनशिअस लोकांनी preheat ovenla 180° तापमानाला 30 मिनीट तूपाचे ब्रशिंग करून भाजाव्यात.ओव्हनला भाजायच्या असतील तर आधि शिजवायची गरज नाही.पारंपारिक पध्दतीत चूलीमधे भाजतात. किवा शक्य असेल तर तंदूर भट्टीला भाजावे.मी थोड्या ओव्हनला भाजल्या पण मला तळलेलयाच आवडल्या.