'दाल पकवान' हा सिंधी बांधवांचा नाष्ट्याचा चविष्ट व पोटभरीचा पदार्थ आहे. सुट्टीच्या दिवशी वेगळे काय करायचे? हा प्रश्न असतो. कारण रोजची पोळी-भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. सुट्टी म्हटले की काहीतरी वेगळे हवे असते. अशा वेळी मला नाष्टा व जेवण एकच म्हणजे "ब्रंच" हेवी नाष्टा करणे सोईचे वाटते. तर मी ही पाककृती केली. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
दाल
* चणाडाळ १ वाटी
* कांदा १+१
* कोथंबिर
* आलं-लसूण
* हिरवी मिरची २
* गरम मसाला १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद
* जीरे
* तेल २ टेस्पून
पकवान
* मैदा १ वाटी
* गव्हाचे पीठ १ वाटी
* रवा २ टेस्पून
* मीठ चिमूटभर
* ओवा पाव टीस्पून
* जीरे अर्धा टीस्पून
* तेल मोहन १ टेस्पून
* तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम चणाडाळ अर्धा ते एक तास भिजत घालावी.
आता मैदा, गव्हाचे पीठ व रवा एकत्र करून त्यामधे मीठ जीरे, ओवा व तेल घालून सारखे करावे. गरजेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळावा.
एक तासानंतर डाळ थोडेच पाणी घालून कुकरला शिजायला लावावी. फक्त एक शिट्टी काढावी. दुसर्या शिट्टीला वाफ आत ठेवून गँस बंद करावा. डाळ जास्त गुळगूळीत मऊ शिजवू नये. डाळींब्या दिसाव्यात इतपतच शिजवावे.
आता डाळ शिजेपर्यंत कांदा, कोथंबिर, आलं-लसूण सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे.
आता कढईमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत. त्यामधे चिरलेला कांदा, आलं-लसूण, मिरची घालून परतावे. नंतर राहीलेले सर्व साहित्य घालावे. तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतावा. शेवटी शिजलेली डाळ घालावी व थोडेसे पाणी घालून पांच मिनिट झाकून शिजवावे. दाल तयार!
आता मळून तयार केलेल्या पीठाच्या मध्यम जाडीच्या मोठ्या पुर्या लाटाव्यात, त्यावर काटा चमच्याने टोचावे. म्हणजे फुगत नाहीत.
मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळून काढाव्यात. गार झाल्यावर छान कडक होतात.
आता तयार डाळ बाऊलमधे घेऊन त्यावर कांदा व कोथंबिर घालावी. सोबत कडक पुर्या डिशमधे द्याव्यात. मस्त भरपेट नाष्टा होतो. नंतर एका मोठा ग्लास थंड मसाला ताक प्यावे. दुपारी जेवणाची भुकच रहात नाही. तुम्हीही करून पहा. नक्कीच आवडेल.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment