उन्हाळा चालू झाला की, उन सुध्दा कडकडीत तापत असते. घरातल्या महिला वर्गाची उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग चालू होते. कोणाच्या मदतीशिवाय एकट्यानेच होऊ शकणारे पदार्थ म्हणजे बटाट्याचा किस, चकल्या, सांडगी मिरच्या असे प्रकार आधी करून घ्यायचे. बाकीचे म्हणजे कुरडई, पापड, शेवया, सालपापड्याअसे मुलांच्या उन्हाळी सुट्टया चालू झाल्या की करायचे. म्हणजे मुलं ताटे आत-बाहेर कर, राखण कर अशी बरीच छोटी कामे करण्यास येऊ शकतात. या पदार्थामधेसुध्दा शेजारणी सोबत स्पर्धा असते बरं, तिच्यापेक्षा आपले पदार्थ कसे जास्तीत-जास्त सुबक व स्वच्छ रंगाचे होतील? यासाठी एकमेकींकडून किंवा एखाद्या अनुभवी महिलेकडून टीप्स देणे-घेणे चालू असते. त्यातील वस्तुच्या प्रमाणाची उजळणी केली जाते. एकंदरीतच हा सर्व हौसेचा व आवडीचा भाग आहे. तसे तर आजकाल सर्वच पदार्थ रेडीमेड मिळतात. पण असे वाळवणाचे पदार्थ करणे,म्हणजे सकाळपासूनच धांदल असते. रोजची कामे फटाफट उरकून मग या कामांच्या मागे लागयचे. करणे, वाळविणे मग संध्याकाळी घरात आणून थोडेफार कडेचे अर्धे ओले वाळलेले रात्रिच्या भाजीच्या फोडणी आधी कढईत तळून बघायचे, त्यावर घरातल्यासोबत चर्चा करायची की,यावर्षीचे कसे जास्त हलके व पांढरे स्वच्छ झालेत वगेरे वगेरे..! एकूणच घरच्या पदार्थाना तोड नाही. आजकाल जागेचा, वेळेचा सर्वच गोष्टीचा अभाव असतो. तरीही लहानपणी आईने केलेल्या पदार्थाची चव आठवली किंवा त्या वाळवणाच्याआठवणी शांत बसू देत नाहीत. मग काय थोडे -थोडेसेच व सोपे प्रकार मी बिल्डिंगच्या टेरेसवर वाळवून करतेच. तर असाच सोपा प्रकार म्हणजे उपवासाच्या चिवड्याचा "बटाट्याचा किस " पण यातसुध्दा बारकावे, ट्रिक्स आहेत बरं... कसा करायचा साहीत्य व कृती 👇
साहित्य :-
* नवे व कडक मोठे बटाटे ५ किलो
* सर्व बटाटे पाण्यात बुडतील इतके पाणी
कृती :-
प्रथम सर्व बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे व सर्व बटाटे त्यामधे घालावेत. वर ताट झाकून १० ते १५ मिनिट शिजू द्यावेत.
मधेच एकदा मोठ्या चमच्याने वर-खाली करावेत. बटाट्याची साल निघते का बघावे . साल निघत असेल तर गँस लगेच बंद करावा.
थोड्या वेळाने थंड झाल्यावर साल काढून घ्यावी व मोठ्या छिद्राच्या किसणीने आधीच उन्हात पसरलेल्या प्लास्टिक कागद अथवा साडीवर डायरेक्ट विरळ किसावे. कडकडीत उन्हात दोन दिवस वाळू द्यावा.
वाळलेला किस हवाबंद डब्यात भरून ठेवावा. वर्षभर रहातो. लागेल तसा काढून तेलात तळून मस्त खमंग चिवडा करावा.
टिप्स :
* बटाटे नवेच असावेत. जूने व मऊ पडलेले असल्यास किस काळा होतो.
* जास्त मऊ उकडू नयेत. साल निघण्याइतपतच उकडावेत. किस नीट पडतो.
* शक्य असल्यास बटाटे रात्रीच उकडून फ्रिजमधे ठेवावेत व सकाळी किस पाडावा.. किस मोकळा पडतो.
No comments :
Post a Comment